Login

सापळा ( दत्ता जोशी ) भाग आठवा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग आठवा )

रमणचे आई वडील रडतच पोलीस स्टेशन मधे आले. त्यांना तसं रडत येतांना पाहून खरं म्हणजे जाधव साहेबांना, काही अघटीत घडल आहे की काय अशी भीतीच वाटली होती. पण त्यांच्या सोबत रमणही असल्या मुळे त्यांना ती काळजी वाटली नाही. रमण आपण त्या गावचं नाहीच अशा रितीने त्यांच्या सोबत आलेला होता. त्याच्या आईचे डोळे रडून रडून सुजले होते.

" तूम्ही आधी रडणं थांबवा पाहू. आणि काय झालं आहे ते मला नीट समजावून सांगा."

" साहेब आम्ही पूर्णपणे लुटले गेलो आहोत. आमच्या घरात मोठी चोरी झाली आहे. सगळे दागदागिने नाहीसे झाले आहेत "

" तुम्हाला कसं कळलं ?" ईन्स्पेक्टर जाधवांनी विचारलं.

" अहो, काल माझ्या वडिलांची एकसष्टी होती म्हणून मी दागिने घालून जायचं ठरवलं आणि बघते तर काय. सगळी तिजोरी रिकामी. "

" बरं तुमचा कोणावर संशय ? " असं विचारतांना जाधव साहेब तिरप्या नजरेने रमण कडे बघत होते. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होते. रमण आपण त्या गावचेच नाही आहोत अशा चेहऱ्याने बघत बसला होता.

विजय कडे दागिने गायब. सेम रमण कडे पण दागिन्यांची चोरी. कदाचीत राकेश कडे देखील काहीना काही चोरी झालीच असली पाहिजे. नक्की या तिन्ही मुलांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सारख्याच घडतं होत्या.  नक्की रमणनेच दागिन्यांची चोरी केली असली पाहिजे. 

" आमचा कोणावरही संशय नाही साहेब. आमच्या घरी कोणी येतही नाही आणि जातही नाही."

" ठीक आहे. मी तुमची तक्रार लिहून घेतो. आणि लवकरच तुम्हाला तुमचे दागिने परत मिळतील." तक्रार लिहून घेतल्यावर जाधव साहेबांनी फिंगर प्रिंट घ्यायला एका पोलिसाला सांगितलं आणि त्यांना जायला सांगितलं. ते सगळे बाहेर जात असतांना ईन्स्पेक्टर जाधव म्हणाले,

" रमण जरा थांब, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे"

तो एकदम दचकला. त्याचे आई वडील देखील थांबले. ईन्स्पेक्टर त्यांना म्हणाले,

" तूम्ही बाहेर थांबा मला रमण जवळ काही चौकशी करायची आहे. प्लीज." मग ते बाहेर गेले आणि बेंचवर बसून वाट बघू लागले.

" हे बघ रमण. मला माहीत आहे की तू निर्दोष आहेस. पण मुख्य प्रश्न अजूनही सुटलेला नाही की त्या दिवशी रात्री तू आणि विजय का भेटले होते . तुमच्यात काय बोलणे झाले. आणि तूझ्या घरचे दागिने कोणी चोरले. विजयने घड्याळ कोणासाठी आणलं होतं. हे बघ आम्हाला राकेशने सगळं काही सांगितलेलं आहे. तूझ्या मोबाईल मधल्या क्लिप पासून ते चंदुलाल सावकारा पर्यंत सगळं काही. "

मोबाईल मधल्या क्लिप आणि चंदुलाल सावकार ह्या दोन गोष्टी ऐकल्या बरोबर रमणचा धीर खचला.

" सर, मला वाचवा. मी तुम्हाला सगळं काही सांगतो. सर त्या क्लिप मीच मोबाईल मधे डाऊनलोड केल्या होत्या. मग मी त्या राकेशला आणि विजयला दाखवल्या.नंतर आम्हाला त्याची सवयच लागली. मग विकृत कुतूहल निर्माण झालं. मग आम्ही ते शमवण्या साठी रेड लाईट एरीयात गेलो. पण आमची काही केल्या तिथं जायची हिंमत होत नव्हती. "रमण बोलत होता. त्याची आणि राकेशची हकीकत बऱ्याच प्रमाणात जुळत होती. म्हणजे तो खरं बोलतं होता.

" बरं एक काम कर. मला त्या एस्कॉर्ट सर्व्हिस सेंटरचा नंबर दे. आणि अजून एक तुझा मोबाईल नंबर देवून ठेव बरं मला. पण एक सांगायचं राहिलंच तुझं की तू विजयने आत्महत्या केली तेंव्हा तू काय करत होतास."

हे ऐकल्यावर रमण अक्षरशः थरथर कापू लागला.

" सर, मी शपथ घेऊन सांगतो की मी तिथं नव्हतो. ईतकंच काय विजय मरण पावला आहे हे देखील मला माहीत नव्हत."

आता मात्र जाधव साहेबांचा संयम सुटला. ते आपल्या खास पोलिसी आवाजात ओरडले,

" रमण, माझ्याशी उगाच खोटं बोलू नकोस. आणि माझ्या सहनशीलतेचा अंतही पाहू नकोस. मला राकेशने सगळं सांगितलेलं आहे. बोल तू आणि विजय त्या पडक्या किल्ल्याच्या बुरुजावर कशाला गेला होता."

" आम्ही दोघंही जीव देणार होतो साहेब. पण ऐन वेळी माझी हिम्मत झाली नाही. म्हणून मी गेलोच नाही. विजयने मात्र ठरल्या प्रमाणे जीव दिला आणि तो सुटला साहेब. " रमण ढसाढसा रडू लागला.

" पण तुम्ही दोघंही जीव का देणार होते. रेड लाईट एरिया काय किंवा एस्कॉर्ट सर्व्हिस काय आजकाल फार नवीन गोष्टी नाहीये या. सगळेच जण केंव्हा ना केंव्हा या रस्त्याला वळलेले असतात. कोणी प्रत्यक्ष जातो. तर कोणी विचार तरी करतोच करतो. बरं मी एक गोष्ट तुला विचारतो विजय सोबत त्या दिवशी कोण मुलगी होती ?"

" मला माहीत नाही सर "

तो असं बोलत असताना त्यांनी सहज आपला कमरेचा चामडी पट्टा काढून टेबलवर ठेवला. रमण थरथर कापत म्हणाला,

" सर, ती डॉली आहे. कांदिवलीला राहते "

" पण तुम्ही कांदिवलीला कशाला जात होता " साहेबांनी आपल्या ठेवणीतल्या आवाजात विचारलं.

" सर, आम्ही जात नव्हतो. तिचं आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली होती."

" तूझ्या जवळ डॉलीचा एखादा फोटो आहे का?"

" नाही सर "

" तुला डॉलीचं घर माहीत आहे का "

" हो सर "

तो खरं बोलतो आहे. हे जाधव साहेबांना समजत होतं. ते म्हणाले,"चल गाडीत बस आपण कांदिवलीला जावू."

त्याच्या आई बाबांची परवानगी घेऊन ते त्याला घेऊन कांदिवलीला आले. एका उच्चभ्रू सोसायटीत रमण त्यांना घेऊन आला. ज्या रूम वर त्यांना जायचं होतं. ती खोली कोणीतरी रत्ना टेकाडे नावाच्या बाईने भाड्याने घेतलेली होती. पण घराला कुलूप होतं. वाचमनने सांगितलं की कालच त्या लोकांनी घर खाली केलं. मग त्यांनी सेक्रेटरी कडून घरमालकाला फोन केला आणि पोलिस स्टेशन वर यायला सांगितले.

एक एक गुंता वाढतच चालला होता. जाधव साहेब रमणला घेऊन एका सामसूम रस्त्यावर आले आणि एकदम रागात ओरडले,

" रमण, मला मुकाट्यानं खरं काय ते सांग. या ठिकाणीं तुम्ही कशाला येत होता. "

रमण थरथर कापत रडायला लागला. " सर, मी तुम्हाला खरचं सांगतो. आम्ही स्वतःहुन इथ आलो नव्हतो. डॉली आम्हाला घेऊन आली होती."

" ही डॉली कोण आणि तुम्हाला कशी भेटली. कुठं भेटली ?"

" सांगतो सांगतो सर, त्या दिवशी आम्ही एस्कॉर्ट सर्व्हीसला फोन केला आणि तिकडून येताना एका टॅक्सीतून डॉलीने आम्हाला स्वतःहून लिफ्ट दिली. त्या वेळी तिने ड्रिंक केलेलं होतं. मग ती आम्हाला घेऊन घरी आली. मग आम्ही तिला घरी सोडलं आणि आमच्या घरी आलो."

" बस एव्हढंच की अजून काही सांगायचं आहे तुला. आणि तूझ्या घरातून तू दागिने का चोरले?"

" सर, मला माफ करा. मला पैशांची खूप गरज आहे. नाहीतर मी जगू शकणार नाही "

रमण बरच खरं बोलत होता.

तरी मुख्य प्रश्न अजूनही सुटलेलाच नव्हता. रेड लाईट एरियात जाणं काय किंवा एस्कॉर्ट सर्व्हिस मिळवणं काय. या साठी या मुलांना एव्हढ्या मोठ्या रकमेचे दागिने चोरण्याची गरज का पडली होती. आणि डॉली कुठं गेली होती. तिने मुलांना लिफ्ट का दिली होती.

त्यांनी लगेच सायबर क्राईम डिपार्टमेंटला फोन करून विजय, राकेश आणि रमण यांच्या फोन कॉल्सचे डीटेल्स मागवले.

आणि त्यांच्या हातात एक नवीनच माहिती मिळाली. ज्या माहितीने चौकशीचा मार्गच बदलवून टाकला.