सापळा ( दत्ता जोशी ) भाग सातवा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग सातवा )

पोलीस स्टेशन मधे आल्या आल्या विजयची आई आणि बाबा त्यांना सामोरं गेले. त्यांच्या सोबत एक व्यापाऱ्या सारखी पगडी घातलेला माणूस होता.
विजयची आई हात जोडून रडत म्हणाली,

" सर , आम्हाला काहीचं कळतं नाहीये. मुलाच्या मरणाचं दुःख कमी म्हणून की काय. त्यात हा माणूस पैसे मागतो आहे"

" सर मी खोटं बोलत नाहीये. यांच्या मुलाने माझ्याकडून पैसे उधार घेतले आहे. त्याचा हप्ता मी मागतो आहे. "

" माझा मुलगा पैसे कशाला उधार घेईल. आम्हाला काय कमी आहे."

" साहेब आम्ही व्यापारी माणसं आहोत. माझ्याकडे तसे सावकारीचे लायसन पणं आहे. माझा चोख व्यवहार आहे "

" बरं किती रुपये घेतले होते विजयने? "जाधव साहेबांनी विचारलं.

" दर महा दहा टक्के दराने साठ हजार रुपये सर "सावकार म्हणाला.

" तुमचं नावं काय सावकार?" जाधवांनी विचारलं.

" चंदुलाल सर "

" चंदुलाल, ईतकी मोठी रक्कम लहान मुलांना कशाला हवी आहे असा प्रश्न नाही आला तुमच्या मनात ?" जाधव साहेबांनी कठोर आवाजात विचारलं.

" आला ना सर, पण त्या मुलाने सांगितलं की त्याची आई कॅन्सरने आजारी आहे. तिला उपचारा करता पैसे पाहिजे आहेत"

" अहो पण असे पैसे बिना तारणाने तुम्ही दिलेच कसे ?"

" देणार नाहीच ना साहेब, त्या मुलाने आपल्या आईचे दागिने पावती सकट सोबत आणले होते. ते ठेवूनच मी कर्ज दिलं होतं. खोटं बोलत असेल तर दुकानात येवून दागिने बघून जा "

सावकार खरं बोलतं असणार यात शंकाच नव्हती. आता विजयच्या घरी जावून दागिने आहेत की नाही हे पाहणे आवश्यक होते.

ईन्स्पेक्टर विजयच्या आई वडिलांना घेऊन त्यांच्या घरी आले. धावतच जावून त्याच्या आईने दागिन्यांचा शोध घेतला. आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिजोरीत एकही दागिना नव्हता. सगळे दागिने नाहीसे झालेले होते.

आणि ते सावकाराच्या ताब्यात होते. ईन्स्पेक्टर जाधव विजयच्या आई वडिलांना घेऊन सावकाराच्या पेढीवर आले. त्याच्या जवळच्या दागिन्यांचा पंचनामा करून ते दागिने आपल्या ताब्यात घेतले.

दागिने तारण ठेवून पैसे घेवून गेलेला विजय मरण पावलेला आहे असं सांगितल्यावर सावकारालाही धक्का बसला.

आता ईन्स्पेक्टर जाधव यांच्या डोक्यात या आत्महत्येची पार्श्वभूमी स्पष्ट होवू लागली. विकृत लैंगिक आकर्षण आणि ते शमवण्या साठी कोणत्याही थराला जाऊन ती ईच्छा पूर्ण करणं. ते पूर्ण करण्या साठी जे पैसे लागतात मिळवण्या साठी दागिन्यांची चोरी करून सावकाराकडून पैसे उधार घेणं, आणि ते पैसे फेडता न आल्यामुळे आत्महत्येचा मार्ग निवडणे.
त्यांच्या मनात असे विचार सुरू असतांनाच रमणचे आई वडील पोलीस स्टेशन मधे येतांना त्यांना दिसले. ते जाधव साहेबांचीच चौकशी करत होते. त्यांना जाधव साहेबांनी बोलावणे पाठवले.

( क्रमशः )
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all