सापळा ( दत्ता जोशी ) भाग पाचवा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा
सापळा ( रहस्य कथा भाग पाचवा )

रमणच घर तसं पॉश एरियामधे होतं. त्याचे वडील कपड्याचे व्यापारी होते. ईन्स्पेक्टर जाधव जेव्हा त्याच्या घरी गेले, तेव्हा त्याची आई आणि बहीण घरी होती.जाधव साहेबांनी कडी वाजवली. रमणच्या आईने दरवाजा उघडला. इंस्पेक्टर जाधवांनी विचारलं," रमण इथेच राहतो का ?" त्यावेळी त्या दोघींनी हो म्हणत त्यांना आत घेतल.

" रमण कुठे आहे ? " असं विचारलं असता त्याची आई म्हणाली की तो मामाच्या घरी गेलेला आहे. आठ दिवस झाले."

" त्याच्या मामा कुठे राहतात ? त्यांचा पत्ता देता का. आम्हाला अर्जंट रमणला भेटायचं आहे " इन्स्पेक्टर जाधवांनी असं म्हटल्या बरोबर रमणच्या आईचा आणि बहिणीचा चेहरा गोरा मोरा झाला.

" त्याच्या मामाचा पत्ता मला पाठ नाही " असं त्याची आई चाचरत म्हणाली. त्यावेळी ईन्स्पेक्टर जाधव यांनी, ती खोटं बोलत आहे हे ओळखलं. मग थोडासा राखीव पोलीसी आवाज काढत त्यांनी म्हटलं,

"  हे बघा आम्हाला रमण घरातच आहे हे माहित आहे. आणि तो निर्दोष आहे हे ही माहीत आहे. फक्त तूम्ही घाबरल्या मुळे आमच्याशी खोटं बोलत आहात. कारण त्याचे स्पोर्टस् शूज आम्ही बाहेर पाहिलेले आहेत. घाबरू नका. आम्हाला फक्त त्याच्याशी बोलायचं आहे. कारण त्याचा मित्र विजय याने आत्महत्या केलेली आहे."

असं ते बोलत असतानाच वरून जिन्यावरून स्वतः रमण धावत खाली आला. त्याला पोलीस आपल्या घरात आलेले आहेत हे माहीत नव्हतं . त्यामूळे पोलिसांना बघितल्यावर तो एकदम दचकला. त्याला बघितल्यावर ईन्स्पेक्टर जाधव करड्या आवाजात म्हणाले,

" काय हो, हा तर गावाला गेला होता ना ? हे बघा पोलिसांशी खोटं बोलणं हे कधीच चांगलं नसतं. यामुळे तुम्ही संकटात येऊ शकतात. असं केल्याने संशयाची सुई तुमच्याकडे वळते. हे तुमच्या लक्षात येत नाही. बरं ते राहू दे. रमण, विजय वारला तेव्हा तू कुठे होतास ?  आणि विजयच्या घरी सांत्वनाला अजूनही तू गेलेला नाहीस. याचं कारण काय ? अजून दुसरी गोष्ट तुझा फोन मला बघायचा आहे."

असं इन्स्पेक्टर आणि म्हटल्यावर रमणचा चेहरा पडला.,

" सर माझा फोन बिघडला आहे"

" ठीक आहे. आपण त्याला दुरुस्त करू या आणि त्यात काय आहे हे जरा बघूया. हे बघ रमण, या ठिकाणी बोलणं तुला जरा अवघड वाटत असेल तर तू पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी येतोस का ? "

नंतर ते त्याच्या आईकडे वळून म्हणाले,

" ताई तुम्ही काळजी करू नका. मी फक्त त्याला चौकशीसाठी घेऊन जात आहे. जेलमध्ये टाकणार नाही हा माझा शब्द. कारण त्याने काही गुन्हाच केलेला नाहीये."

नंतर त्याला घेऊन ते पोलीस स्टेशन मध्ये आले. त्याला करड्या आवाजात ईन्स्पेक्टर जाधव म्हणाले,

" हे बघ रमण मला सगळं माहित पडलं आहे. फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, की विजयने आत्महत्या का गेली आणि त्यावेळी त्याच्या सोबत कोण मुलगी होती "

असं इन्स्पेक्टर नाही म्हटल्याबरोबर रमण एकदम जोरजोरात रडायला लागला. त्याच्या पाठीवर हात ठेऊन ते म्हणाले,

" रडू नकोस फक्त मला खरी गोष्ट काय आहे ते सांग."

रमण रडत रडत बोलत असतांनाच फोन खणाणला.
एक महिला पोलीस अधिकारी धावतच ईन्स्पेक्टर जाधव यांच्या कडे आली आणि म्हणाली,

" सर, एक राकेश नावाच्या अठरा वीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तो दवाखान्यात ऍडमिट आहे. "

राकेशच नाव ऐकल्यावर इन्स्पेक्टर जाधव एकदम दचकले. हे काय सुरू आहे, हे त्यांना कळेना. विजय, राकेश आणि रमण हे सगळे एकमेकांचे जवळचे मित्र होते.  त्यापैकी विजयने आत्महत्या केली होती. दुसऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिसरा त्यांच्या समोर होता. या तीनही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का . याबद्दल ते विचार करू लागले. त्यांनी रमणला घरी जायचा आदेश दिला. त्याचबरोबर इतर पोलिसांना त्याच्यावरती नजर ठेवायला सांगितली. आणि स्वतः सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये राकेश ला भेटायला निघाले.

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all