सापळा ( दत्ता जोशी ) भाग चवथा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग चवथा )

विजयच्या मृत्यू बद्दल ते विचार करत होते की विजय चांगल्या स्वभावाचा, अभ्यासू मुलगा होता. मग त्याला आत्महत्या का करावी लागली. आणि त्याच्या जवळ लेडीज घड्याळ का होत. त्याच्या सोबत किल्ल्यावर आलेली ती मुलगी कोण होती.  याचा अर्थ निश्चित होता की मरतांना विजय एकटा नव्हता. आता ती मुलगी शोधण खूप महत्त्वाचं होतं.

इन्स्पेकटर जाधव साहेबांनी या केस मधे जातीन लक्ष घालायच ठरवल. कॉलेज मधे जावून त्यांनी विजय बद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. कॉलेजचे प्रिन्सिपॉल विजयला चांगले ओळखत होते. ते त्याच्या मित्रांमुळे. विजय आणि त्याचे दोन मित्र, रमण आणि राकेश या तिघांची मैत्री सगळया कॉलेज मधे प्रसिध्द होती. तशी या तिघांबद्दल कोणाची कोणतीच तक्रार नव्हती. तिघही नेहमी सोबत रहात. सोबत अभ्यास करत. कोणालाही काही व्यसन नव्हतं. त्या मुळे कोणी त्यांना काही बोलत देखील नसे.

पण मागच्या आठवड्या पासून तिघेही गैरहजर होते. त्यांना कारण विचारण्याच्या आधीच विजयचा मृत्यू झाला होता. एकाच वेळी तिघांनी गैरहजर राहणे जरा विचित्र वाटतं होतं. या गैरहजर राहण्यात काहीतरी रहस्य दडलेल असावं असं त्यांना वाटायंला लागलं. कारण या पूर्वी लागोपाठ ईतके दिवस ते सगळेच्या सगळे कधीचं गैरहजर राहिलेले नव्हते.

कॉलेज मधून निघता निघता एक निशा नावाची मुलगी त्यांना आडवी आली. आणि म्हणाली,

" सर मला तुम्हाला काही सांगायचं आहे. पण ते विजय बद्दल नाही तर रमण बद्दल आहे. माहीत नाही त्याचा तुम्हाला कितपत उपयोग होईल ते. पण सर या गोष्टीचा मला त्रास व्हायला नको "

अचानक माहिती द्यायला पूढे आलेली ही मुलगी पाहून जाधव साहेबांना आश्चर्य वाटलं. तिला विश्वासात घेत त्यांनी म्हटलं,

" बाळ, अजीबात चिंता करू नकोस. तुला त्रास काय पण तुझं नाव देखील मी कुठं येवू देणार नाही. उलट तु आम्हाला मदत करते आहेस या बद्दल आम्हीच तुझे आभारी आहोत."

या त्यांच्या बोलण्याने तिची भिती बरीच कमी झाली. ईकडे तिकडे पाहात ती म्हणाली,

" सर, कसे सांगू समजत नाही. रमण तसा माझा चांगला मित्र आहे. पण मागच्या आठवड्यात त्याने मला मोबाईल मधे घाणेरड्या क्लिप्स दाखवल्या होत्या. त्या मुळे मला त्याचा खूप राग आला होता. त्या वरून मी त्याला बरच काही बोलली होती. म्हणजे जवळ जवळ आमचं भांडणच झालं होत. "

" भांडण म्हणजे काय ?"त्यांनी विचारलं.

" काही नाही. मी त्याला म्हणाले की मला असल्या गोष्टी आवडत नाही. पुन्हा जर का त्याने दाखवल्या तर मी सरळ सरांना नाव सांगेन "

" बरं, विजयला कोणी मैत्रीण होती का ? " त्यांनी सहज चौकशी केली.

" नाही सर " ती म्हणाली.

इन्स्पेक्टर जाधव साहेबांचं डोकं गरगरायला लागलं. रमण जवळ तशा क्लिप होत्या म्हणजे त्याने त्या विजय आणि राकेशलाही दाखवल्या असतील. म्हणजे या गोष्टीत आता सेक्सही आहे. कदाचीत विजय त्या मुली सोबत त्यासाठीच आलेला असावा .

विजय सोबत असलेल्या मुलीला त्याचे मित्र ओळखत असावेत अशा विचारात त्यांनी आपली गाडी. रमणच्या घराकडे वळवली.