Login

सापळा ( दत्ता जोशी ) भाग तिसरा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा
सापळा ( रहस्य कथा भाग तिसरा )

वाचमनच्या बोलण्याचा ईन्स्पे. जाधव विचार करत होते. या मुलांना कोण बरं ब्लॅकमेल करत असेल. याचा अर्थ ही नुसती मिसींग केस नाही.  त्यांनाही एक मुलगा होता. त्या मुळे ते मुलांच्या बाबतीत जास्तच हळवे होते. आजकालच्या मुलांना आजूबाजूच्या मोहमयी जगापासून दूर ठेऊन वाढवण खरोखर खूप कठीण गोष्ट होती. बाहेर मुलं काय करत असतील याचा घरी काहीचं अंदाज येत नसतो.

गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता. त्याच्या आसपास दाट जंगल होते. शक्यतो त्या किल्ल्यामध्ये कोणीच जात नसे. किल्ल्याची वाट देखील अवघड होती. किल्ल्याच्या खाली एक  खडकाळ दरी होती. त्या दरीमध्ये जायला कोणतीच वाट नव्हती. किल्ल्यामध्ये ज्यांना एकांत हवा असायचा असे काही प्रेमीयुगुल तर काही वेळा ड्रग घेणारे किंवा काही व्यसनी लोक जात असत.  बाकी निर्जन असलेला तो किल्ला पूर्णपणे पडिक होता. किल्ल्यामध्ये दाट असे गवत माजलेले होते.

बुरुजाच्या पडक्या पायऱ्यां वरून इन्स्पेक्टर जाधव बुरुजावरती चढून आले. त्या बुरुजावर ते येण्याच्या आधीच बरेचं लोक जमा झालेले होते. तिथे जाऊन इन्स्पेक्टर आणि जाधव यांनी खाली जाऊन खाली पाहिले. एक बॉडी पालथी पडलेली होती. त्यांनी लगेच आपल्या ईतर स्टाफला दरीमध्ये उतरून ती बॉडी बाहेर काढण्यास सांगितले.

इन्स्पेक्टर जाधव आणि त्या बॉडीचे सगळ्या बाजूने निरीक्षण केले. उंच बुरुजावरून पडल्या मुळे आणि एका तीक्ष्ण दगडावर डोकं आपटल्या मुळे त्या शरीराचे डोके छिंन्न भिन्न झाले होते. त्यांनी बॉडी सरळ केली. कानातून, तोंडातून आणि नाकातून बराच रक्तस्त्राव झालेला होता. गवतावरचे आणि दगडा वरचे रक्त वाळून काळे झालेले होते.

त्यांच्या मनात पहिल्यांदा शंका आली की ही बॉडी विजयची तर नसेल ना. कारण मृत व्यक्तीचं वय साधारण सतरा अठरा वर्षाचं होतं. जर हा विजय असेल तर तो ईथ का आला असावा. आणि त्या वेळी त्याचे मित्र कुठं होते.

बॉडी विजयची असेल तर ही सरळ सरळ आत्महत्येची केस होती. पण हा त्यांचा वरवरचा अंदाज होता. कारण त्यानं चिठ्ठी देखील लिहून ठेवलेली होती. आत्महत्या करावी असं कोणतच सबळ कारण विजय जवळ नव्हत. पण ते वाचमनचं बोलण त्यांना आठवत राहिलं. मग त्यांनी विजयचा विचार बाजूला सारून बॉडी पोस्ट मार्टमला पाठवायला सांगितले.

ते आपल्या गाडीत बसून पोलिस स्टेशन वर जायला निघणार तोच, एक पोलीस धावत त्यांच्या कडे आला. आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत त्याला सापडलेली वस्तू त्याने त्यांच्या जवळ दिली. जी मृत व्यक्तीच्या जवळ सापडली होती. ते एक लेडीज रिस्ट वॉच होतं.

इन्स्पेक्टर जाधव विचारात पडले. जर ही आत्महत्येची केस असेल तर मृत व्यक्तीच्या हातात मरतांना हे लेडीज घड्याळ येण्याचं काही कारण नव्हतं.  याचा अर्थ असा तर नव्हता ना की मरतांना मृत व्यक्ती एकटी नव्हती. मग एकटी नव्हती तर दूसरी व्यक्ती कोण असेल. मग त्या दुसऱ्या व्यक्तीने या व्यक्तीला वाचवले का नाही. का मारण्यासाठीच ईथ आणलं होतं. पण मग मुख्य प्रश्न तोच शिल्लक रहात होता की का मारलं असेल. डोक्यात विचार फिरत असतांनाच ते पोलीस स्टेशनला आले.

पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी विजयच्या आई वडिलांना पोलीस स्टेशन मधे बोलावलं. विजय सापडला असेल अशा मोठया आशेने ते दोघं नवरा बायको पोलीस स्टेशनमध्ये आले. परंतू त्यांच्याशी जास्त काही न बोलता जाधव साहेबांनी त्यांना जीप मध्ये बसवलं आणि गाडी हॉस्पीटल मधे नेली.

तिथं शवागारात अनेक प्रेत ठेवलेली होती. त्या पैकी एका प्रेताच्या तोंडावरच झाकण त्यांनी बाजूला केलं. आणि ते प्रेत पाहताच विजयची आई थरथर कापू लागली. आणि तिने मोठ्याने हंबरडा फोडला. त्याच्या वडिलांनी डोळ्याला रुमाल लावला.

त्या दुर्दैवी जोडप्याचे कसे सांत्वन करावे हे त्यांना सुचत नव्हते. त्यांनी मोठ्या दुःखाने ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली.

पण त्यांच्या डोक्यातून ते घड्याळ जातं नव्हतं. त्यांनी विजयच्या आई वडिलांना त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं आणि ते घड्याळ दाखवलं. घड्याळ बघताच त्याची आई म्हणाली,

" हे घड्याळ तर सुरेखाच आहे"

सुरेखा विजयची धाकटी बहिण. दोघांचं खूप चांगलं जमायचं. ते घड्याळ सूरेखाच आहे म्हटल्यावर प्रश्न अजूनच गुंता गुंतीचे झाले. सुरेखाला चौकशीसाठी बोलावल गेलं. तेंव्हा तिने सांगितलं की रमणच्या बहीणीला देखील तसचं घड्याळ त्याला भेट द्यायचं असल्यानं, त्याला ते रमणला दाखवायसाठी हवं होतं म्हणून त्याने नाहीसे होण्याच्या आदल्या दिवशीच ते घड्याळ सुरेखा कडून घेतलं होतं.

आता या गोष्टीत विजयचा मित्र रमण ऍड झाला होता जो विजयचा जवळचा मित्र होता. पोलिसांच्या चौकशीची सुई विजयचे मित्र रमण आणि राकेश कडे वळू लागली.

ईन्स्पे. जाधव यांना विजयचा मृत्यू हा अपघात वाटतच नव्हता. विजयने मरतांना ते घड्याळ का सोबत नेले होते. हेच त्यांना कळतं नव्हते. त्यांनी विजयचे आणि त्याच्या मित्रांचे फोटो आणि फोन नंबर मागवून घेतले.

ते पुन्हा किल्ल्या जवळ आले. किल्याच्या आसपास त्यांनी विजय बद्दल काही माहिती मिळते का याची चौकशी केली. किल्ल्याच्या खाली पायथ्याशी एक पान टपरी वाला होता. त्याला त्यांनी फोटो दाखवल्या बरोबर त्याने विजयला ओळखले. त्या दिवशी विजय कोणाची तरी वाट बघत बराच वेळ तिथं घुटमळत होता.

" मग तू तो कोणाची वाट बघत होता. त्या व्यक्तीला बघितलं का"

" कोणीतरी एक मुलगी रिक्षातून आली आणि दोघं किल्या कडे जावू लागले"

" तू त्या मुलीला ओळखशील का?"

" नक्कीच सर, कारण तिच्या कपड्यांवरून ती चांगली मुलगी नसावी असं मला वाटलं"

आता ईन्स्पे. जाधव यांच्या समोर प्रश्न होता, ती कोण होती ?

कदाचीत विजयचे मित्र या प्रश्नाचं उत्तर देवू शकले असते.