सापळा ( दत्ता जोशी ) भाग दुसरा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग दुसरा )

विजयचे वडील घाई घाईने घरी आले. विजयची आई ओक्साबक्शी रडत होती.

विजय चा मोबाईल घरामध्येच होता पण त्यामध्ये सिम कार्ड नव्हते. अजून नवीन गोष्ट म्हणजे त्याच्या पुस्तकांमध्ये एक चिट्ठी सापडली. त्या चिठ्ठीत असे लिहिलेले होते की,

"माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. मी जीवनात अयशस्वी झालेलो आहे . माझे जगणे म्हणजे सगळ्या घराला एक कलंक आहे. जर मी जिवंत राहिलो तर सगळ्यांची जीवन उध्वस्त होईल. मी हा जो काही निर्णय घेतला आहे तो खूप विचार करून घेतलेला आहे. माझ्यासारखी संकटाची कोणावरही सावली पडू नये ही परमेश्वरा जवळ प्रार्थना. मला क्षमा करा. मी कोणालाच सुखी ठेवू शकलो नाही.  ताईला भरपूर शिकवावे आणि मोठे करावे. सर्वांना माझा शेवटचा नमस्कार-  आपला विजय."

चिठ्ठी वाचून विजयची आई तर हंबरडा फोडून रडू लागली. कोणालाच काय करावे सुचत नव्हते. विजय कुठे आहे ? त्याचे काय झाले आहे ? कोणालाच काय माहीत नव्हती. विजयच्या वडिलांनी ती चिठ्ठी आणि तो मोबाईल घेऊन पोलिसांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

ते पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी इन्स्पेक्टर जाधव ड्युटी वरती होते. त्यांनी विजयच्या वडिलांची सगळी गोष्ट ऐकून घेतली. आणि मिसिंग कंप्लेंट लिहून घेतली.

विजय घरातून नाहीसे व्हायला आता जवळजवळ चोवीस तास होत आले होते. त्यांना या केस मध्ये वेगळाच संशय यायला लागला. कदाचित असे तर झाले नसेल ना की विजयने जिवाचे काही बरे वाईट केले असेल. त्यामुळे लवकर हालचाल करायची गरज होती. ताबडतोब त्यांनी अगोदर सर्व जवळच्या पोलीस स्टेशनला विजय चे फोटो पाठवून अशी व्यक्ती सापडली आहे काय याचा शोध घ्यायला सांगितला.

ते स्वतः आपल्या स्टाफसह गाडीमधून विजयच्या घरी आले. विजयच्या घरी आणि आजूबाजूच्या लोकांकडे त्यांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली. ते ज्यावेळी विजेची चौकशी करत होते, त्याचवेळी दुसरे पोलीस विजयच्या एरियात त्याच्याबद्दल माहिती जमा करत होते.

जाधव साहेबांनी विजयच्या आईला बहिणीला , विजय कसा मुलगा त्याचे कोणाशी भांडण झाले होते काय काही दिवसांमध्ये त्याच्या वागण्यामध्ये काही बदल झाला होता काय ? या बद्दल खूप बारकाईने प्रश्न विचारले . विजयच्या आईचं आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की, विजय हा अतिशय सुस्वभावी, प्रामाणिक, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याला जास्त कोणी मित्रही नव्हते. शाळेत जे मित्र सोबत होते तेच कॉलेजमध्ये त्याचे मित्र होते. त्यांच्या व्यतिरिक्त त्याची  कॉलेजमध्ये  कोणाशी जास्त ओळख नव्हती.

मग जाधव साहेबांनी त्याच्या मित्रांची नावे आणि पत्ते विचारले . सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांना पडला होता की, जर विजय हा अतिशय अभ्यासू मुलगा होता तर तो बरेच दिवस कॉलेजमध्ये का गेला नव्हता आणि  सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की सध्या विजय कुठे आहे हा

त्यांचा इतर स्टाफ जेव्हा एरियामध्ये विजयची चौकशी करत होते. त्यावेळी बहुतेक प्रत्येक जणांनी विजय हा अतिशय चांगला मुलगा असल्याची ग्वाही दिली. त्याच्या नाहीसे होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केल.

फक्त बिल्डिंगचा वाचमन म्हणाला,

" सर, माझ्या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल की नाही माहीत नाही. पण मागच्या आठ दिवसा पूर्वी एका रात्री साधारण अकरा वाजता विजयला दोन मुलं आली होती. त्याचं वेळी विजयला कोणाचा तरी फोन आला होता. आणि विजय रागारागाने, मुझे धमकावो मत, ब्लॅकमेल मत करो असं बोलत होता. नंतर तिघ जण बराच वेळ बोलत बसली होती. नंतर ते निघून गेले."

" अच्छा, जर त्या मुलांचे फोटो दाखवले तर तू ओळखशील ? " इंस्पे. जाधवांनी विचारलं.

" हो साहेब "

" ठीक आहे. तुझा नंबर देऊन ठेव "

विजयचं आतापर्यंत कोणाशी भांडण झालेलं नव्हतं.
त्याला कोणतेही व्यसन नव्हतं मग विजय का नाहीसा झाला असावा, याबद्दल जाधव साहेब साहेबांना खूप आश्चर्य वाटत होतं. त्याचवेळी त्यांच्या फोनची रिंग वाजली.

"सर ,गावाच्या बाहेर एका पडक्या किल्ल्याच्या खाली एक अठरा वीस वर्षाच्या मुलाची बॉडी सापडलेली आहे. आपण ताबडतोब या."

फोन ऐकल्यावर का कुणास ठाऊक जाधव साहेबांच्या मनात एक अशुभ पाल चुकचुकली हा विजय तर नसावा ना . परंतु त्यांनी त्या विचाराला दूर सारले आणि सावरून ते म्हणाले," ठीक आहे आम्ही निघतोच"

विजय बद्दल काहीही माहिती समजल्यास आम्हाला ताबडतोब कळवा. असं सांगून ते तातडीने गाडीत बसून निघून गेले.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all