सापळा ( दत्ता जोशी ) भाग एक

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा
सापळा ( रहस्यकथा भाग एक)


संध्याकाळ व्हायला आली होती. कॉलेज सुटून जवळ जवळ तीन तास झाले होते तरी विजय अजून घरी आलेला नव्हता. असं कधी झालं नव्हतं म्हणून त्याच्या आईला आणि बहिणीला काळजी वाटू लागली. विजय तसा काही लहान नव्हता. दहावी पास होवून अकरावीत गेलेला होता. विजय अतिशय अभ्यासू आणि मनमिळाऊ मुलगा होता. त्याला मित्रही जास्त नव्हते. घर, कॉलेज आणि ठरावीक मित्र, एव्हढच त्याचं सिमीत जग होतं. त्याला आजपर्यंत कॉलेज सुटल्यानंतर घरी यायला ईतका वेळ कधी झालेला नव्हता. त्यामूळे त्याच्या आईला काळजी वाटायला लागली होती.

त्याचे वडील घरी येईपर्यंत वाट पाहण्या खेरीज त्यांच्या हातात काहीच नव्हतं. दोघी मायलेकी विजय सोबतच त्याच्या वडिलांची देखील वाट बघत होत्या. त्या दोघींना असं वाटत होतं कदाचित विजय मित्राकडे गेला असेल. वडील येईपर्यंत घरी येऊन पण जाईल. पण आता कॉलेज सुटून जवळ जवळ तीन तास होत आले होते. त्या दोघी चिंतातूर होऊन त्याची वाट बघत होत्या.

त्याच्या आईने दोन-तीन वेळा विजयला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन सतत बंद येत होता. तिला वाटत होतं कदाचित फोन बंद पडला असेल. मग तिने मित्रांच्या घरी फोन करुन विजयची  चौकशी केली. मित्रांना देखील विजय बद्दल काहीच कल्पना नव्हती.

हळूहळू संध्याकाळ होऊन दिवे लागायची वेळ झाली. विजयाचे बाबा कंपनीतून घरी आले. आल्या आल्या विजयच्या आईने त्यांना, विजय घरी न आल्याची बातमी सांगितली. त्यांना खूप टेन्शन आल होतं कारण आतापर्यंत विजय कधीच न सांगता ईतका वेळ बाहेर राहिलेला नव्हता.

विजयच्या बाबांनी जेवण न करता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. ज्या ज्या मित्रांचे नंबर आणि घर त्यांना माहीत होते. त्यांच्याकडे ते जाऊन चौकशी करून पाहात होते. परंतु विजयचा काहीच पत्ता लागत नव्हता. पुन्हा पुन्हा ते विजयचा फोन लावत होते. पण फोन सतत स्विच ऑफ येत होता. काय करावे त्यांना सुचत नव्हते.

शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली. चौकशीत अनेक प्रश्न विचारले. विजयचे मित्र कोण आहेत ?  त्याला कोणी मैत्रिणी आहे का ? त्याला काही व्यसन आहे का ? याआधी तो कधी बाहेर राहिलेला आहे का ? यावर विजयच्या आईचं एकच उत्तर होतं ."नाही साहेब, विजय खूप चांगला मुलगा आहे."

मग पोलिसांनी त्या सगळ्यांना थोडा वेळ वाट पाहण्याचं सांगितलं. चोवीस तासानंतर जर विजय घरी आला नाही तर पोलीस चौकशीला सुरुवात करणार होते. त्यांची तशी प्रोसेस होती.

विजयच्या आईचे डोळ्याचे पाणी थांबत नव्हते कारण विजय हा अतिशय सुस्वभावी मुलगा होता. तो कोणाच्या अध्यात मध्यात नसे. त्याला मित्रही जास्त नव्हते. काय झाले असेल विजयला. मन चिंती ते वैरी न चिंती, असं म्हणतात ते बरोबरच आहे. त्याच्या आईच्या मनात नाही नाही त्या अशुभ कल्पना येत. दुसरे मन तसं काही होऊ नये असे प्रार्थना करी. मनातल्या मनात तिने अनेक देवांना नवस केले.

विजय कुठे असेल ,काय करत असेल ,संध्याकाळी त्याने काय खाल्लं असेल ,असे नाना प्रश्न तिच्या मनात येत होते. जस जसा वेळ जाऊ लागला तस तसा तिचा धीर सुटू लागला. रात्रभर कोणीच झोपलं नाही.

सकाळी उठल्याबरोबर त्याचे बाबा कॉलेजमधे चौकशी करायला गेले. कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉलला भेटून विजयची चौकशी करू लागले. त्या ठिकाणी त्यांना नवीनच गोष्ट समजली. बरेच दिवस झाले विजय कॉलेजला आलाच नव्हता. त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. कारण तो कॉलेज बुडवणाऱ्यांपैकी नव्हता. पण शिक्षकांवर विश्वास ठेवणं भाग होतं. कारण त्याची हजेरीच लागलेली नव्हती. त्याचं बरोबर त्यांना एक गोष्ट समजली की विजयचे जे अगदी जवळचे मित्र होते ते देखील त्या काळात अब्सेंट होते.

सुन्न होऊन ते घरी आले. जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी करु लागले. कोणाच कडे तो गेलेला नव्हता. काय करावं, त्यांना काही सुचत नव्हतं. एकच चिंता त्यांच्या मनात येतं होती की विजयच काही बरं वाईट तरं झालं नसेल ना.

निराश होवून ते घरी आले तर घरी त्यांना एक भयानक बातमी ऐकायला मिळाली.

( क्रमशः )
लेखक: दत्ता जोशी

( जिथं लेखन हा माझा प्रांतच नाही. तिथं रहस्य कथा काय किंवा ईतर कोणताही लिखाण काय, ते लिहिण्याचा खटाटोप करणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. शेवटी लेक्राला सांभाळून घेणं आपल्याच हाती आहे. पुढच्या भागात बघू काय असेल ती बातमी. )

🎭 Series Post

View all