सापळा ( दत्ता जोशी ) भाग दहावा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग दहावा )

दुसरा नंबर एक अनोळखी मुलीचा होता. ज्याच्या वरून तिन्ही मुलांना कॉल गेलेले होते. त्या फोनची जाधव साहेबांनी  सायबर क्राईम डिपार्टेंटमध्ये चौकशी करायला सांगीतली.

साहेबांनी आपली गाडी रेड लाईट एरियात आणली आणि विजय, राकेश, रमण या मुलांचे फोटो दाखवून ते कोणाकडे आले होते का त्याची चौकशी करु लागले. त्यांना खर तर चंदनचा शोध घ्यायचा होता. अचानक एका पान टपरी वाल्याने सांगितलं की त्यांना हवा असलेला चंदन समोरच्या दुकानदारा बरोबर गप्पा मारतो आहे.

जाधव साहेब समोर गेले. त्यांनी सहज हाक मारली. " चंदन" आणि चंदनने मागे वळून बघताच त्यांनी त्याच्यावर झडप घातली. चंदन तर पोलीस बघून घाबरूनच गेला. त्याच्या कानफडात जोरदार वाजवून त्यांनी त्याला विचारलं,

" मी इंस्प. जाधव. या तीन मूलांना तू कोणाकडे घेऊन गेला होतास. " त्यांनी फोटो दाखवत विचारलं.

तसा तो एकदम सटपटलाच.

" साहेब, ईथ खूप गिऱ्हाईक येतात. सगळे कसे लक्षात राहतील. "

" ठीक आहे. पोलीस स्टेशनवर गेल्यावर तूझ्या बरोबर लक्षात येईल. चल माझ्या बरोबर. " असं त्यांनी म्हटल्याबरोबर त्याने लगेच मिस. रोमा कडे मुलांना नेल्याचं सांगितलं. पोलिसांनी चंदनला आपल्या ताब्यात घेतलं आणि रोमाला पोलिस स्टेशनला यायला सांगितलं.

आल्या आल्या चंदनला कोठडीत टाकले आणि पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली. एकदोन मजबूत दणके पडल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली.

" एक गोष्ट सांग चंदन, तू मुलांना वारंवार फोन का करतं होतास ? आणि त्या मुलांकडून पैसे का घेतं होतास  ? आणि डॉली कोण आहे ?  "

" मी नाही सर फोन करत होतो. आणि डॉली कोण आहे मला खरचं माहीत नाही. "

" खोटं बोलू नकोस. तुझे सगळे कॉल डीटेल्स मी जमा केले आहेत. प्रत्येक मुलाला तू फोन केला आहे. "

" सर, खरं म्हणजे आम्ही आमच्या कस्टमरला कधीच फोन करत नाही. पण जेंव्हा ही मुलं घरी जातांना जे काही बडबडत होती. ते ऐकल्यावर मला त्यांच्या कडून पैसे उकळण्याची आयडिया सुचली."

" मुलं काय बोलत होती"

" ती म्हणत होती, अरे यार आपल्याला काही बिमारी वगैरे तर लागणार नाही ना. मग मी रोमाची सेक्रेटरी कमलला त्या मुलांना फोन करायला सांगितला. की त्यांच्या मुळे तिला एड्स झाला आहे. तिने तसा फोन केल्या बरोबर मुलं घाबरून गेली. त्यांनी मला फोन करून विचारलं. मी त्यांना सांगितलं की घाबरू नका. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत. ते तुमची टेस्ट करून सांगतील. पण त्याला खूप खर्च येईल. मुलं बिचारी आजाराच्या नुसत्या विचारांनीच घाबरून गेली. त्यांनी प्रत्येकानं घरातून दागिने चोरून पैसे जमवले. मी त्यांचे खोट्या डॉक्टर कडून खोटे रिपोर्ट बनवले आणि पैसे ऊकळवायला सुरूवात केली. "

त्यानं आपली गोष्ट सांगताच जाधव साहेबांची सणसणीत थप्पड त्याच्या कानावर एव्हढ्या जोरात पडली की तो कोलमडलाच. त्याला त्यांनी पोलीस कोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

" आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे. ही डॉली कोण आहे ?"

" तूम्ही जीव घेतला तरी मला सांगता येणार नाही साहेब " तो गयावया करत म्हणाला.

" मूर्ख माणसा तूझ्या मुळे एका मुलाचा निष्कारण जीव गेला आहे " ते त्याच्या कडे जळजळीत नजरेने पहात म्हणाले.

त्यांनी आपली जीप काढली.  राकेश आणि रमण च्या एच.आय.व्ही. टेस्ट करायला सांगितल्या. 

आता त्यांना शोध घ्यायचा होता डॉलीचा. त्यांनी कांदिवलीच्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीला फोन केला.   ताबडतोब भाड्याच्या घराचे एग्रिमेंट पोलिस स्टेशनला घेऊन यायला सांगितले.

आणि डोळे मिटून ते स्वस्थ बसून राहिले. कितीवेळ गेला कुणास ठावूक. कोणीतरी त्यांना कांदिवलीहून भेटायला आलं असल्याचं सांगितलं.

त्यांच्या समोर आता एग्रिमेंटवर लावलेला डॉलीचा फोटो होता. तो फोटो घेऊन ते राकेश आणि रमण कडे आले. दोघांनी ती डॉलीच असल्याचं सांगितलं. त्या दोघांना बघून जाधव साहेबांना खूप संताप आला. कसली बेजाबदार मुलं होती ही. त्यांनी आपल्या खास पोलिसी आवाजात विचारलं.

" ही डॉली आहे हे तुम्ही मान्य केलं. चांगली गोष्ट आहे. पण तुमचा आणि तिचा काय संबंध ते सांगा. सरळ रितीने. "

" सर, मी तुम्हाला आधीच सांगितल आहे ना की तिने आम्हाला टॅक्सीतून लिफ्ट दिली होती म्हणून" रमण म्हणाला.

" मूर्खा मला बनवू नकोस. ईथ येण्या पूर्वी मी एका पोलिसाला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुकानदाराकडे पाठवल आहे. ज्यानं डॉलीला ओळखलं, की हिचं मुलगी विजय सोबत किल्ल्यावर जातांना आली होती. खरं सांगा, तुमच्यात काय गुपित आहे ते. नाही तर मी तुम्हाला देखील जेल मधे पाठवेल."

जाधव साहेबांचा तो आवाज ऐकल्यावर दोघांनाही थंडी भरली आणि दोघांनी बोलायला सुरुवात केली.

( क्रमशः)
लेखक : दत्ता जोशी

🎭 Series Post

View all