संवेदना हरवत चाललीय..

Sanvedna

संवेदना हरवत चाललीय! 

परवा घडलेली एक घटना. सकाळची ऑफिसला जाण्याची घाईची वेळ. पटकन आवरून निघाले. बस ऑफिसच्या दिशेने निघाली. थोड्या अंतरावर जाताच गाडीचा वेग कमी झाला. बसच्या पुढे वाहनांची गर्दी होती. मोठा अपघात झाला होता. एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता. बघ्यांची नुसती गर्दी जमली होती. काही लोक आपल्या गाडी मधूनच मृत्यूच्या दारात निपचित पडलेल्या त्या देहाकडे बघत बघत पुढे सरकत होते. काहीजण अपघाताचे फोटो घेण्यात, व्हिडीओ बनवण्यात गुंग होते. त्यातला कुणीही मदतीला धावून येण्याचं धारिष्ट्य दाखवत नव्हता. कुणी पोलीस कारवाईच्या भीतीने, तर कुणी कुठं आपलं कोणी आहे? अशा अविर्भावात निघून जात होते. जाणीव झाली,“खरंच संवेदना हरवत चाललीय. माणुसकी लोप पावत चाललीय." 

आपण जन्माला येतो आणि आपल्या जन्मासोबतच रक्ताची नाती आपसूक जोडली जातात. रक्ताच्या नात्यात आपली आवड निवड नसते..ईश्वराची कृपा असते ती.. आई, बाबा, दादा,ताई, काका, काकू, मावशी, आत्या,मामा अशी अनेक नाती जन्म घेत असतात. हळूहळू आपण त्यांच्या मायेच्या पंखाखाली लहानाचे मोठे होत असतो.. मग कालांतराने बाहेरच्या जगात आपलं पहिलं पाऊल पडतं..ते जग आपल्याला आकर्षित करू लागतं. आपण त्या जगाकडे खेचले जातो..इथेही आपल्याला एकटं राहायचं नसतं.अनोळखी माणसांच्या गर्दीत आपण आपल्या माणसांचा चेहरा शोधत राहतो..

कधी मायेच्या नात्याने, कधी आधाराच्या,तर कधी गरजेच्या तर कधी मैत्रीच्या नात्याने आपण जोडले जात असतो.एक अदृश्य अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते.. अनोळखी नात्यात गुंफत असते.कधी हसू, कधी आसू जीवनाचा अनोखा प्रवास सुरु होतो. मग  भावनांची देवाणघेवाण होते.आणि मग भावनेच्या ओघात, मैत्रीच्या नात्यात बऱ्याच गोष्टी बोलून जातो.मनातले भाव सांगून टाकतो. ताई माया आक्काचा प्रवास सुरु होतो.."तू माझी बच्चा, कधी बाबू, कधी बेब्स, कधी बाळ" या विशेषणांनी संमोहित केलं जातं.. सभोवताली माणसांची गर्दी जमा होत असते..आणि इथेच खरी गल्लत होते आणि मुखवट्याआड दडलेले चेहरे उमजून येतं नाही..आणि गुंतणं सुरू होतं.या नात्यांवर ठेवलेल्या अति विश्वासामूळे आपण अंध झालेलो असतो. आणि मग  आपण चक्क विसरून जातो की या गर्दीलाही लाख तोंडं आहेत.दूषणं लावणारी.टीका करणारी आपल्या तोंडावर गोड बोलून मागे चर्चेचा विषय बनवणारी..खरंतर आपणच मूर्ख बनत असतो किंबहूना मूर्ख बनवले जात असतो.

सगळीकडे भावनांचा बाजार.. खोटेपणाचे मुखवटे चढवलेले चेहरे..विश्वास तरी कोणावर ठेवावा..?? आपण स्वतः पेक्षाही जास्त विश्वास ठेवावा आणि समोरच्याने उंच कड्यावरून कडेलोट करावा..अगदी कपाळमोक्ष व्हावा..आपण इतका जीव ओवाळून टाकावा आणि समोरच्याने श्वास हिरावून घ्यावा तोही न सांगता.. !!! आणि आपण  हतबल होऊन फक्त उघड्या डोळ्यांनी पहात राहावं.. का हे प्राक्तन..?? मग मन खूप सैरभैर होतं. मनाचा तळ ढवळून निघतो.. तसंही अशांत मनाचा तळ गाठणं खरंच खूप कठीण..हरवत जाते मग संवेदना. हरवत जातात मनापासून ऐकणारे कान.. 

मग अशा वेळीस नेमकं काय करावं? व्यक्त व्हायचं.! आपल्याला जमेल तसं..! व्यक्त होण्याचं माध्यम निवडून व्यक्त व्हायचं. आता हे माध्यम चित्रकला, संगीत, वादन, हस्तकला, पाककला, भटकंती, खरेदी वगैरे काहीही असू शकतं.ज्यांना लिखाणाची कला अवगत आहे त्यांनी लेखणीला आधार बनवावं.. आपल्या शब्दांच्या विश्वात मन रमवावं.. शब्दांशी मैत्रेय व्हावं.. शब्द बदलत नाहीत..माणूस फसवा..एक चकवा..आणि मग आपण आपल्या वाटेने मार्गस्थ व्हावं.. 'हा माझा मार्ग एकला' म्हणत चालत राहायचं.. स्वतःशीच म्हणत राहायचं संवेदना अजूनही आपल्यात जिवंत आहे.तेवढंच आपल्या हाती..????????

©® निशा थोरे,(प्रत्युषा) मुंबई