संवेदना

A Sharp and brilliant boy tries to make his career and he gets the support from his love of life. What she does for him read the story to know about it.

संवेदना:-

ऋषीकेश आज खूप खुश होता, पहिला फोन त्याने प्रीती ला केला, " प्रीती काय करते आहेस?"
" हे असं काय विचारतो रे तू नेहमी? बरं असो, मी तर माझी आवडती कादंबरी वाचत बसलेय कालच लायब्ररी मधून आणलीय. तुला सांगते अशी जबरदस्त, रोमँटिक स्टोरी आहे ना! त्यात ना काय होते....."
" ए बस ना...., मी काय तुझी स्टोरी ऐकायला फोन केलाय का?" मधेच तिला तोडत ऋषीकेश म्हणाला.
थोड्या रागानेच," बोल काय काम होते? मला वाचताना डिस्टर्ब केलेलं आवडत नाही कोणी."
"राहू दे मग, चल बाय..."म्हणत त्याने फोन ठेवला.
तिला guilty वाटलं, आपण त्याला दुखावले. यावेळी फोन केला म्हणजे तसेच काही असेल उगीच फालतुपणा करणारा तो नाही.
तिने त्याला फोन लावला.
" बोल ऋषी, तू मला त्या लव्हस्टोरी पेक्षा महत्वाचा आहेस. बोल पटकन नाहीतर बघ फोनच घेणार नाही तुझा!"
नाराज झालेला तो पण तिचा फोन आला म्हणून त्याची कळी खुलली होती," आपल्या नेहमीच्या जागेवर येतेस का?"
" ठीक आहे, पण काहीतरी पार्टी हवी मला तरच येईन."
"हो ग बाई, किती वेळ लागेल?"
" 5 मिनिटे तयार व्हायला  आणि 15 तिथवर पोचायला 5 मिनिटे एक्सट्रा ".
" कळलं तुझं वेळेचं गणित! मी अर्धा तास कंसिडर करतोय, पोहोच वेळेत." म्हणत त्याने फोन ठेवला आणि खुशीत तिची येण्याची वाट बघत काय बोलू आणि काय नाही अशा विचारात नेहमीच्या जागेवर जाऊन बसला. जाणार प्रत्येक मिनिटं त्याला तासासारखा भासत होता पण भेटणार या खुशीत मस्त गाणी ऐकत बसला.
बरोबर अर्ध्या तासात प्रीती तिथे पोहचली आणि त्याला टपली मारत," ऋषी घड्याळ बघ मी अगदी वेळेत आलेय" हसत त्याच्या बाजूला बसत ती म्हणाली.
तिला बघून ऋषी चा  चेहरा प्रफुल्लित होतो आणि तिच्या हातात तो  एक लिफाफा देतो.
जरा प्रश्नार्थक नजरेने प्रितीने त्याच्याकडे बघत तो ओपन केला आणि त्यातला पेपर वाचत तिचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. एकदम ओरडल्यासारखं," wow ऋषी congradulations! पहिला जॉब आणि तोही इतक्या मोठ्या ऑर्गनायझेशन  मध्ये म्हणजे लॉटरी यार. क्या बात है , झकास! आता तर मोठी पार्टी." म्हणत तिने ऋषी चे अभिनंदन केले.
तिला खरच मनापासून आनंद झाला हे तिचा चेहराच सांगत होता  आणि  गोड दिसणारी प्रीतीकडे बघत ऋषी पण मनोमन खुलत होता.
" आता सांग जरा सविस्तर, जॉइनिंग ला अजून 10 दिवस आहेत. पूर्वतयारी केलीस का? आणि हो तिथले लोक आणि तुझं हे साधं राहणीमान यात काहीतरी चेंज हे करावे लागणार सो आपण उद्या शॉपिंग ला जातोय" तिने ऑर्डर सोडली.
" अहो मॅडम पगार हा त्याच्या एक महिन्याने मिळणार आहे, जरा शांत बस."
" तुला ऑर्डर चा अर्थ समजत नाही का? तुला विचारात नाहीये मी." ठसक्यात ती म्हणाली तसे तो गप्प झाला.
ऋषी आणि प्रीती यांची मैत्री वेगळीच म्हणजे ना ते कॉलेज मध्ये सोबत की शेजारी ना ही त्यांचे काही फॅमिली काँनेकशन.
प्रीती च्या एका कॉमन फ्रेंड मुळे यांची ओळख झाली. ऋषी हा छोट्या शहरातून आलेला पण अगदी हुशार,चुणचुणीत लाघवी मुलगा. घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने जाणीवपूर्वक वागणे, बोलणे आणि खर्च करणे आणि अभ्यास म्हणाल तर त्यात तो सगळ्यात पुढे.
पहिल्याच भेटीत तिला त्याचा चांगुलपणा जाणवला त्यामुळे ती अगदी बिनधास्त बोलत होती.
दिसायला गोड वाटणारी प्रीती एका श्रीमंत घरातून असल्याचे कळताच ऋषि जरा लांबूनच वागण्याचा प्रयत्न करायचा. जरी ती खूप चांगली असली, फ्रेंडली असली तरी स्वतःबद्दल असलेला कॉम्प्लेक्स त्याला तिच्याशी मैत्री करू देत नव्हता.  याउलट ती दिवसेंदिवस त्याला जवळचा मानायला लागली होती. त्याचा निरागसपणा, समजूतदारपणा, आणि जाणीवपूर्वक वागणे तिला फार भावले होते. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी म्हणतात ना विधिलिखित त्याप्रमाणे त्यांची गट्टी जमलीच. प्रीती ही  BSC इलेक्ट्रॉनिक्स करत होती, तिच्या बाबांची फॅक्टरी होती. पुढे जाऊन तीच ते सगळं सांभाळणार हे पक्के कारण तिला कुणी भावंडे नव्हती याउलट ऋषि हा जॉईंट फॅमिलीतील मुलगा. त्याला एक लहान भाऊ होता. ऋषी ने मेरिट च्या बेसिस वर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळवली होती. त्याने इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला होता आणि दरवर्षी तो टॉप करत होता त्यामुळे कॉलेज मध्ये सगळ्यांना हवाहवासा होता तर शिक्षकांचा अगदी लाडका. कुठेतरी त्यांची तार ही शिक्षणातील विषयावर पण जुळली होती आणि मनाच्या पटलावर पण. छान मैत्री झाली होती, कधी काही अभ्यासातील अडचणींवर तर कधी काही इतर विषयांवर असे त्यांचे चर्चासत्र सुरू असे. एक दिवस असा जात नसे की बोलले नाही किंवा कधी वाद झाले नाही,कारण ऋषी हा परफेक्टनिस्ट तर प्रीती थोडी अवखळ. तरीही कायम परिस्थीची तफावत ही दरी ऋषि च्या मनातून जात नसे त्यामुळेच कितीही वाटले तरी त्याने आपले मन प्रीती पुढे उघडे केले नव्हते. तिच्याबद्दल ज्या काही भावना, संवेदना त्याला जाणवत असे त्या त्याने उघडपणे कधीच मांडल्या नाही उलट तिला जाणवू नये हाच प्रयत्न तो करत असे.पण काही चांगले घडो किंवा तो बेचैन असो फोन मात्र प्रीती लाच जात असे आणि हे तिला पण चांगले माहीत होते. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या शब्दांवरून त्याचा मूड जाणवण्याइतपत प्रीती पण त्याला ओळखायला लागली होती. त्याचा स्वाभिमान तिला आवडत असे आणि त्याने नक्की काहीतरी मोठे आयुष्यात बनावे यासाठी त्याच्याशी वेगवेगळ्या यशस्वी लोकांबद्दल चर्चा ही करत असे.  ऋषि ला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करायचा, त्याला मोठी स्वप्न दाखवायची आणि त्याच्यातील खूप काही  करण्याची ईच्छा ती कायम तेवत ठेवत असे.
BSC झाल्यावर तिने MSC ला ऍडमिशन घेतली होती आणि त्याच दरम्यान पुन्हा युनिव्हर्सिटी मध्ये टॉप करून ऋषीचे इंजिनिअरिंग  पूर्ण झाले होतं.
शांत बसलेल्या ऋषी चा हात धरून त्याला उठवत," उद्या कशाला चल, आजच सुरू करूयात शॉपिंग " ती म्हणाली.
ऋषी थोडा कचरत होता कारण त्याचा प्रश्न हा बजेट चा होता आणि जे प्रीती ने कधी विचारात सुद्धा आणले नव्हते.
याची जाणीव प्रीतीला होती तरी ती ते कधी दाखवत नसे कारण हे अंतर तिला मान्य नव्हते.
" आज मी तुला लोन देतेय,हे घे माझे कार्ड आणि जे खर्च करशील त्यावर मला व्याज म्हणून तू छानशा हॉटेल मध्ये तुझा पहिला पगार झाला की पार्टी दे"सहज पणे म्हणत त्याच्या हातात कार्ड कोंबून तिने तिच्या ज्युपिटर ला स्टार्ट पण मारला.
तिच्या पुढे चालणार नाही हे माहीत असल्याने गप्प आपला तो तिच्या मागे बसला आणि गाडी फिनिक्स मॉल च्या दिशेनं निघाली.
पूर्ण मॉल मध्ये फिरून तिने कॅज्यूल जॅकेट, जीन्स, टीशर्ट घेऊन झाले.
" अरे शूज राहिलेत चल ते पण घेऊ" म्हणत ती शॉप ला शिरली सुध्दा. तिच्या मागे फिरत आणि शॉपिंग बॅग सांभाळत ते दोघे बाहेर पडले तर अंधार पडला होता.
" किती रे फिरवलेस मला वेड्यासारखं भूक लागली बघ आता, पाय पण दुखत आहे" मिश्किल पणे हसत ती म्हणाली. बॅग्स खाली ठेऊन तिला कोपरापासून हात जोडत त्याने नमस्कार केला आणि 'हुश्श' असे रिऍक्ट केले तसे ती खळखळून हसली. मॉल मधल्या रेस्टेरांत मध्ये ती गेली. तिच्या मागे जाण्याशिवाय पर्याय नसल्याने ऋषि ही गप्प आपला आत शिरला. तिने सँडविच, कॉफी आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले. 
" ऋषी ही पार्टी तुझ्याकडून बर का" म्हणाली तसा त्याचा चेहरा नॉर्मल झाला. त्याचे अवघडलेपण तिच्या लक्षात आले होते, त्याचा स्वाभिमान दुखायला नको आणि जे करायचे ते पण करायचे हे दोन्ही ती साधत होती.
त्याच्यातील काही करायची तडफ तिला आवडत होती,स्वाभिमान तिला जिवंत ठेवायचा होता आणि सोबत तिला कायम हवी होती. काही जाणीव तिला पण होत होत्या पण न बोलता ती कृतीतून ते करत होती कारण तिला ही हवे होते की तो आयुष्यात काही मोठा बनावा.
" भूक लागल्यावर खायची मज्जा काही औरच " म्हणत तो सँडविच खात होता आणि ती पण कडकडून भुकेलेली फ्राईज वर तुटून पडली होती. न बोलता 15 मिनिटे गेली तेव्हा कुठे कळकळणारे तीचे डोकं शांत झालं
त्याला त्याच्या रूमजवळ सोडताना ती म्हणाली," उद्या मला 2चे लेक्चर आहे, बरोबर 10.30 ला कॉलेज जवळ भेट" म्हणत ती जायला निघाली.
"हो भेटतो, पण काय प्लॅन उद्याचा?"
" आहे काहीतरी" म्हणत भुर्रर ती निघून पण गेली आणि हा आपल्या बॅगा सांभाळत रूम वर आला.
त्याचा मित्र सुद्धा आश्चर्याने बघत राहिला कारण व्यर्थ पैसे खर्च करणार्यातला ऋषी नाही हे त्याला माहित होते.
"काय राजे, कोणाचं लग्न आहे?" त्याला डिवचत मनोज म्हणाला.
ऋषी ने अपॉइंटमेंट लेटर दाखवले तस तो पण उडी मारूनच उभा राहिला आणि त्याने जोरदार मिठी मारत" congratulations man" असे  म्हणाला.
"कुठे प्रीती सोबत होतास का?" मनोज ने हसत विचारले.
फक्त मानेनेच हो म्हणत ऋषी ने वर पाहिले.
" ऋषी तू बोलत का नाहीस तिला?"
" मनोज अरे, ती कुठे मी कुठे? ती  की सोन्याच्या चमच्याने दूध पिते, मला तिच्या मनातला माहीत पण नाही आणि काही बोलून मला ते दूर पण करायचे नाही. आपण आपल्या पायरीनेच मित्र राहिलो तर निदान ते तरी कायम असू!" ऋषी खेदाने म्हणाला.
" ऋषी, मला नाही वाटत की असे काही होईल. कोणी उगाच कोणासाठी सगळे करत नाही. असो काळाला ठरवू दे, पण खूप उशीर करू नकोस."
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो कॉलेज जवळ पोहोचला, ती वाटच बघत होती. आता गाडी वळली ती कॉटन किंग मधून चांगले 10 फॉर्मल शर्ट तिने खरेदी केले ते ही स्वतःच्या चॉइसने! नंतर मेन्स फॉर्मल वेयर च्या दुकानात जाऊन ट्रॉउजर्स आणि  सॉक्स पासून सगळे  शॉपिंग झाले.
रोज काहीतरी घे, काहीतरी तयारी कर,  भेटत बोलत 10 दिवस गेले. त्याच्या ऑफिस च्या पहिल्या दिवशी सकाळी फोन करून त्याला शुभेच्छा देऊन तिने दिवसाची सुरवात केली.
पहिला दिवस कसा गेला, कसा अनुभव आला या विषयावर संध्याकाळी चर्चा झाली आणि एकूणच तो उत्साही असल्याचे तिला जाणवले.
तो त्याच्या ऑफिसमध्ये रुळायला लागला.
मुळातच हुशार असल्याने कामाने सगळ्यांच्या नजरेत येत होता.
तिची परीक्षा झाली, निकाल पण आला ती पण छान 'डीस्टी'ने पास झाली. तीचा तर प्लान होताच, आता तिने बाबाची कंपनी जॉईन केली आणि त्याच दरम्यान ऋषीला 1 वर्ष परदेशी जाण्याचा चान्स आला.
" प्रीती खरच जाऊ का ग मी? मला नाही जायचे!" ऋषी थोडं नाराजीने म्हणाला.
" अरे काय डोक फिरलय का तुझं? तुझ्या करिअर ला नवीन दिशा मिळेल, value addition होईल तुझ्या कारकिर्दीला. 1 वर्ष उडून जाईल." मनात तर ती पण थोडी धास्तावलेली होती की हा भेटणार नाही पण त्याचे स्वतःला साबीत करणे हे तिलाच हवं होतं, त्याला तस कारण ही होते.
"तुला चालेल मी गेलेलं? न भेटलेले? " आज पहिल्यांदा तो वेगळ्या नजरेने बघत बोलत होता.
तिलाही ते जाणवत होते पण त्याला कच खाऊ द्यायची नव्हती
"हे बघ मी काही लग्न वगैरे करत नाहीय 1 वर्षात! तू आला की तूच कोणी शोध मग बघू" त्याला डीवचत ती मुद्दाम म्हणाली कारण तिला हसत खेळत वातावरण ठेवायचं होते.
थोडा शॉक झालेला तो, 'वेळ आहे आपल्याकडे' विचार करत जायला निघाला.
त्याच्या तिथे जायच्या तयारी साठी पण तिने पुन्हा तोच कित्ता गिरवला, 2 दिवस फक्त शॉपिंग आणि मज्जा करत सोबत वेळ घालवत होते.
शेवटी त्याचा जायचा दिवस आला त्याही सकाळीच त्याच्या रुम वर पोचली, " मी वाट बघेन" एवढेच सूचक बोलत तिने बाकी सगळे  बोलायचे टाळले आणि एअरपोर्ट ला सोडायला पण गेली.
" प्रीती, मला तुझ्यासाठी यायचं आहे पण आपल्यातील  जी दरी आहे त्याचे काय?" असे त्याने विचारले.
काही कळलं किंवा नाही असं दाखवत " आता काय बुवा एक माणूस फॉरेन रिटर्न असणार,आणि स्वतःच्या कर्तृत्वावर ! जग आपोआप नमेल. All the best फॉर your journey " म्हणत तिने त्याला बाय केले आणि  तिथून निघाली.
एअरपोर्ट च्या पार्किंग मध्ये तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
त्या एक वर्षात तिने स्वतःला कामात झोकून दिले, कंपनी जरी वडिलांची असली तरी आता ती तिच्या मार्गाने पुढे नेत होती आणि इथे 1 वर्ष कधी संपत याची दोघेही वाट बघत होते.
बघता बघता एक वर्ष सरले. ऋषी जेव्हा एअरपोर्ट ला पोहोचला तेव्हा तिथे प्रीती एकटी नव्हती तर यावेळी तिचे बाबा पण आले होते. त्यांना बघून ऋषि ला आश्चर्य वाटले पण तसे न दाखवता त्याने कॉन्फिडेंटली त्यांच्याशी ओळख करून घेतली बऱ्याच गप्पा झाल्या . त्या रात्री डिनर पण सोबत एअरपोर्ट च्या बाहेर एका मोठ्या 5 स्टार हॉटेल ला झाले, त्याला तिला एकट्याला भेटायचे होते पण तसे न घडता हे वेगळेच सुरू होते.
रात्री तिने वडिलांना  घरी सोडले आणि जरा चक्कर मारून येऊयात म्हणून ती ऋषी ला घेऊन कार ने  निघाली.
" प्रीती,आज मी खूप खुश आहे. तुझ्याशी खूप बोलायचे आहे."
त्याला तोडत मिश्कीलपणे म्हणाली" मग कोणी पसंत केलीस की नाही फॉरेन मध्ये? आता काय बुवा मज्जा एक माणसाची."
तस  तो थोडं वैतागला त्याला काय बोलायचे होते आणि प्रीती काही वेगळंच बडबडत होती, तो शांत होऊन बसला आणि डोळे मिटून बसला.
त्याची आपण जास्त खेचतोय हे जाणवून तिने गाडी साईड ला घेतली, " ऋषी माझ्याशी लग्न करशील का? " तिने डायरेक्ट विचारले तसे त्याने खाडकन डोळे उघडून तिच्याकडे बघितले, त्याचा विश्वास बसत नव्हता.
" प्रीती!" इतकेच तो म्हणाला तर हसून " ऋषी तुझ्या भावना मला कधीच कळल्या होत्या. पण तुझा स्वभाव स्वाभिमानी आहे आणि तीच तुझी ताकद आहे जी मला आवडते. तुझं स्वतःहून मोठं होणं हेच तुझ कर्तृत्व आहे जे मला जगाला दाखवायचं होत. माझे बाबा सुद्धा हे बघूनच तयार होतील हे मला माहित होतं म्हणून आज तुझी ओळख मी तिथे एअरपोर्ट ला करून दिली. माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती हि त्या लेव्हल ची असावी हे त्यांचं बोलणे खूप योग्य होते, म्हणूनच ती ओळख मला करून द्यायची मी आजवर वाट पाहिली." एक दमात ती सगली बोलली आणि ऋषी फक्त बघत राहिला.
न राहवून तिला एक घट्ट मिठी मारून फक्त तो व्यक्त झाला आणि तिला मनापासून " मला या दरीची कायम भीती वाटत असे" इतकंच बोलू शकला.
आज त्यांच्या मधील संवेदनांला मैत्रीच्या पलीकडे अर्थ मिळाला होता जो सगळ्यांनी मान्य करावा अशीच स्थिती प्रीती ने निर्माण केली होती.
त्यांच्यातील त्या भावनेचा उल्लेख जो आज होतोय पण ज्या कायम दोघांनाही त्यांच्याच नकळत जपल्या  होत्या.
त्या भावना सांभाळताना त्यांनी एकमेकांना जीवापाड सांभाळले होते.
त्या भावनेच्या बळावर यापुढे आपण एकत्रपणे आयुष्याचे हे दिव्य सहज पार करणार या आनंदात ते दोघेही एकमेकांची संवेदना बनत होते!
©®अमित मेढेकर