Feb 06, 2023
Readers choice

संवाद आई आणि मुलीचा

Read Later
संवाद आई आणि मुलीचा

संवाद आई आणि मुलीचा...


वय वर्ष सहा महिने.. वेळ रात्रीचे दोन.

आई: काय झाले माझ्या छकुलीला? झोप येत नाही का? झोप ना माझ्या राजा.. आईला उद्या लवकर उठून कामाला जायचे आहे.. उद्या खेळू आपण परत.. कधी मोठी होणार बाळा तू? 

मुलगी.. जी अजिबात झोपायच्या मूडमध्ये नसते.. शेवटी झोपायला तीन वाजतात.. आई आपले तारवटलेले डोळे घेऊन ऑफिसचे , घरातले काम करते आहे..


वय वर्ष दोन..

आई: अग पिलू..नको ना ती भांडी घेऊस..

मुलगी: मला घरघर खेळायचे आहे..

आई: अग पण पसारा होतो.. मला आवरून कामाला जायचे आहे ना..

लेक: मग मला पोळी करू दे..

आई: कर बाई पटकन. म्हणजे मला आवरून जाता येईल. 


वय वर्ष चार..


लेक: आई तू नको ना जाऊस कामाला.. प्लीज ना..

आई : बाळा न जाऊन कसे चालेल? मी नाही गेले तर तुझ्या बर्थडे ला बार्बीचा केक कसा आणणार?

लेक : नको मला केक.. तू हवी आहेस फक्त..

आई : आज अग खूप महत्त्वाची मिटिंग आहे.. मी आत्ता जाते आणि आत्ता येते..

लेक: नाही.. नाही..

आईने लेकीला मारलेले दोन फटके आणि मग रडारड..


वय वर्ष पाच...

लेक : आई, हि बघ माझी नवीन मैत्रीण.. तिला ना छान गाणी येतात.. खूप हुशार आहे ती..

आई: हो ना.. तूपण तशीच हुशार आहेस ग बाळा..


वय वर्ष सात

आई: ऐक ना आपण थोडेसेच केस कापूया?

लेक : नको ना.. मला छान लांब केस हवे आहेत..

आई : अग पण ते बांधायला होत नाही ना.. थोडेसेच कापू..


वय वर्ष दहा..

लेक : आई तुला माहित आहे, मला तू खूप खूप आवडतेस.. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही..

आई: हो का? उद्या लग्न करून जाशील ते.

लेक : मी लग्नच करणार नाही..


वय वर्ष बारा..

लेक: माझ्या वस्तूला कोणी हात लावला?

आई : अग, मी फक्त उचलून ठेवली..

लेक: मला हे असे आवडत नाही.. माझ्या वस्तू मला हव्या तश्या मीच ठेवीन..


वय वर्ष चौदा..

लेक : आई तू नको ना शाळेत येत जाऊस?

आई : आता काय झाले?

लेक: सगळे मला हसतात ..

आई: आई घ्यायला आली म्हणून?

लेक : हो.. मग मी लहान आहे असे चिडवतात..

आई : माझ्यासाठी पिल्लूच आहेस तू.. लेक : म्हणूनच नको..


वय वर्ष सोळा.


लेक: तू मुद्दाम मला न आवडणारी गवार केलीस ना? तुला मी आवडतच नाही..

आई: अग त्यात न आवडण्यासारखे काय आहे? आज काहीच भाजी नव्हती म्हणून ती केली.. तू ना लहान होतीस ना तेच बरे होते.. काहीही केले तरी खात तरी होतीस..वय वर्ष सतरा...


आई : अग काय हे विचित्र केस कापून आली आहेस?

लेक : अग ही फॅशन आहे.. मस्त दिसते आहे ना मी?

 आई: मस्त? चांगले रेशमासारखे लांबसडक केस कापलेस ग..

लेक : मॉम, माय लाईफ,माय हेअर..

 

वय वर्ष अठरा..

लेक : आई तू माझ्या मैत्रिणीला फोन का केला होतास?

आई : तू काल दहा वाजेपर्यंत येणार होतीस.. बारा वाजले तरी पत्ता नाही.. मग काय करणार? आणि फोन का बंद होता तुझा?

लेक : फोनची बॅटरी संपली होती. आणि काल तिचा बर्थडे होता.. म्हणून झाला उशीर.. त्यात काय एवढे.. आता मी सज्ञान झाले आहे.. याच्यापुढे तू फोन करत जाऊ नकोस कोणालाही..


वय वर्ष वीस..


आई: आज मला थोडे बरे वाटत नाहीये, दोन पोळ्या करून जातेस का ग बाबांपुरत्या?

लेक : आई.. प्लीज ग.. मला उशीर होतो आहे.. बाबा घेतील ना ऑफिसमधून काहीतरी..


वय वर्ष बावीस


लेक: आई मला तो खूप आवडला आहे.. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे..

आई: अग पण त्याची चौकशी नको का करायला?

लेक : मी केली आहे ना .. शेवटी हे माझे आयुष्य आहे.. मला हवे तसेच जगणार..


वय वर्ष चोवीस 

लेक: आई ती गवारीची भाजी कशी करतात ग? खाविशी वाटते आहे..

आई : गोड बातमी आहे का ग? थांब भाजी आणि भाकरी घेऊन येते..

 

वय वर्ष पंचवीस 

लेक आपल्या कुशीतल्या लेकीला कुरवाळत.." थॅंक यू आई.."

" थॅंक यू मीच तुला म्हटले पाहिजे ,हे असे छानसे गाठोडे दिल्याबद्दल.."

एक नवीन चक्र सुरू होते..आई आणि लेकीचे.. दुसरीकडे जुने आहेच..


वय वर्ष तीस..

आई : का ग एवढ्याश्या लेकराला मारतेस?

लेक : एवढेसे लेकरू? जीव खाल्ला आहे माझा नुसता.. जरा काही करायची सोय नाही.. बाहेर गेले कि हे घे, ते घे. कामाला जाऊ नकोस.. तुम्ही सगळ्यांनी लाडावून ठेवले आहे..

यावर आईचे फक्त हसणे..


वय वर्ष चाळीस


लेक: मला ना कंटाळा आला आहे घराचा.. सगळ्यांसाठी फक्त करा, कोणालाच कौतुक नाही.. असे वाटते सगळे सोडून निघून जावे कुठेतरी..

आई: तुला ते गाणे माहित आहे का ग?

लेक : मी इथे रडते आहे,आणि तुला गाणे सुचते आहे? कोणते गाणे?

आई: लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..

लेक निशब्द..


वय वर्ष पन्नास


आई: थांबतेस का ग थोडा वेळ माझ्यासोबत?

लेक : थांबले असते ग.. पण आज घरी याने सगळ्यांनाच जेवायला बोलावले आहे.. तरिही तू बोलावलेस म्हणून पटकन आले.. काही हवे आहे का अजून?वय वर्ष सत्तर


लेक: आज आई असती तर नक्कीच माझ्यापाशी बसली असती...
सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now