Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

संवाद नात्यांचा

Read Later
संवाद नात्यांचा

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : हरवत चाललेला संवाद 
                            संवाद नात्यांचा 
एकमेकांसोबत आपले विचार, भावना मांडणं किंवा अगदीच थोडक्यात सांगायचं तर एकमेकांसोबत झालेलं बोलणं म्हणजे संवाद.
नात्यांचा मेळ साधताना सर्वोत्तम माध्यम कदाचित संवादच असावं. कोणत्याही नात्यात महत्त्वाची भूमिका बजावायचं काम संवाद करत असतात. बरेचदा संवाद हे नात्यांत वाद ही निर्माण करतात तर अनेकदा नातं सुदृढ करण्यातही अग्रेसर असतात. नातं आणि संवाद यांच्यातील संबंधांना अधोरेखित करणं म्हणजे नात्यांची वीण उलगडून दाखवण्यासारखं असेल.
संवाद म्हणजे व्यक्तीने 'सोशल' होण्याची महत्त्वाची कडी आहे. पण आजकालच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 'सोशल' होणं म्हणजे जिवंत माणसांतून अलिप्त होऊन आभासी जगात लुप्त होण्यासारखं आहे. मित्रमैत्रिणींसोबत कल्ला करणं असो किंवा मग एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, मैत्रीत संवाद स्वतःचं कर्तव्य पार पाडताना दिसतात. कुटुंबातील संवाद म्हणजे घराच्या जिव्हाळा-आपुलकीचं एक रहस्यच म्हणावं लागेल. या संवादांना प्रत्येक वेळी शब्दांची भाषाच हवी असते, असंही नाही. बरेचदा मूक संवाद सुद्धा अनोखे असतात.
संवाद म्हणजे हास्य, आनंदाच्या लहरी आयुष्यात आणायचं एक उत्तम साधन आहे. हल्ली चॅटिंग नावाच्या संवादाची सवय लागताना नकळतपणे खरे मनसोक्त संवाद मात्र हरवत चालले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणं सोयिस्कर आणि सुखकर झालं आहे हे मान्य आहेच. परंतु भास आभासातला फरक जाणवून न देणाऱ्या संवादांचं व्यसन एका मर्यादेपर्यंतच बरं असावं.
प्रत्यक्षात असो किंवा मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, नात्यांना जिवंत ठेवण्यासाठी विशिष्ट प्रमाणात संवाद हा हवाच!
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//