संतराम ( भाग १)

ध्यानाला बसलेल्या संतरामला आज एकाग्रता टिकवणं कठीण जाऊ लागलं होतं......
                               ध्यानाला बसलेल्या संतरामला आज एकाग्रता टिकवणं कठीण जाऊ लागलं होतं. सारखे डोळे मिटले की कामिनीदेवी समोर येऊ लागत. त्यांच्या त्या धनुष्याकृती भुंवया, आणि त्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला हालवण्याची नाजुक लकब, भुंवयांखालचे टकटकीत, चकचकीत काळेभोर डोळे आणि त्यांचा कमनीय आकर्षक बांधा, त्याच्या डोळ्यासमोरून काही केल्या हालेना. संतरामचं वय असं होतं तरी काय? तेवीस किंवा चोवीस. आश्रमात सुद्धा सेविका होत्या, त्याही तरुण..... पण त्यांच्या बद्दल त्याला कधी असले विचित्र आकर्षण वाटले नव्हते......... "सं त रा म ".......... पंधरा सोळा वर्षांपूर्वी राजप्रासादाच्या आसपास घुटमळताना पाहून गुरुमाऊलींनी म्हणजे राजपुरोहित विश्वंभरशास्त्र्यांनी त्याला आपला मुलगा मानून आश्रमात आणला. त्यावेळी तो नऊ दहा वर्षांचा असणार. लांबट उभट चेहरा, रुंद कपाळ, मोठे पण चमकणारे स्थिर डोळे, त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेची खूण दाखवीत असत. वेदांमधल्या कोणत्याही कल्पना त्याला फार पटकन आत्मसात होत असत. माउलीच्या ही गोष्ट त्याला ऋग्वेद शिकवताना लक्षात आली होती. माउलीने कधीही त्याच्या पूर्वायुष्याबद्दल विचारले नाही की त्यानेही त्याचा कधी आग्रह धरला नाही. आता तर तारुण्यामुळे, साधनेमुळे, आणि सात्त्विक आहारामुळे त्याचं गोरेपण खुललं होतं. जणू एक प्रकारची उपजत प्रभावळच त्याच्या भोवती असल्याचे माऊलींना जाणवत असे. त्यांनी विवाह जरी केलेला नसला तरी पुत्रसूख त्यांना संतरामच्या निमित्ताने अशा रितीने मिळत होते. त्यांना तो जणू स्वतःचा मोठा झालेला मुलगाच वाटे. एखादा पिता जसा आपल्या विशेष बुद्धिमत्ता असलेल्या मुलाकडे कौतुकाने आणि अभिमानाने पाहतो, तसे ते आजकाल त्याच्याकडे पाहू लागले होते. संतरामच्या अस्तित्वाने ते पुरते भारले गेले होते. कधी कधी त्यांना वाटे, एवढे आपण विरागी वृत्तीचे, वेदांचा अभ्यास केलेले वेदांती साधू आणि या मुलाबद्दल आपल्याला इतकी माया, ह्या न जुळणाऱ्या परमेश्वरी संकेताचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. त्यांनी कधीही वैषयिक सुखाचा साधा उल्लेखही त्याच्या सान्निध्यात केलेला नव्हता. अर्थात त्यांना संतरामच आत्ताचं गूढ वागणं याचा त्यांना अर्थ लागत नव्हता. आज तो त्यांना टाळत असल्याचं त्यांना जाणवलं होतं.
संतरामने समोर ठेवलेला दुधाचा पेला तोंडाला लावला. पण त्यात त्याला आज चव लागेना. का कोण जाणे सुगंधी शर्करायुक्त दूध त्याला हवंसं वाटू लागलं. जे कालच त्याने कामिनीदेवींच्या महाली प्यायलं होतं..... तो अर्धवट ध्यान सोडून उठला होता. त्याने आपली चलबिचल कोणी पाहिली नाही ना याची चोरटेपणाने खात्री केली. आता तो आश्रमातल्या इतर सेविकांची तुलना कामिनीदेवींशी करू लागला. वल्कलं नेसलेल्या त्या तरूण होत्या आणि आकर्षकही (असे त्याला आजच वाटू लागलेलं होतं). वासनेच्या आघाताने त्याची दृष्टी चांगलीच बदलली होती. हे व्हायला फार काळ लागत नाही तर कधी कधी काही सेकंदात होतं..... पण त्यांच्यात ती "बात " नव्हती जी त्या प्रौढेमध्ये होती. काल पासून झालेल्या अचानक बदलाचं आश्चर्य करीत तो अंगावर पांघरलेल्या भगव्या वस्त्राने घाम पुसू लागला. घाम नक्की कशामुळे आला होता. कोणास ठाऊक. वातावरणात एवढी उष्णता वाढायला काही दुसरा प्रहर चालू झाला नव्हता की फार उन्हाळा नव्हता, विक्षिप्त भावना उद्दीपत झाल्या होत्या म्हणून त्याला घाम फुटला होता की काय, कोण जाणे. व्यायामामुळे कसलेलं बांधेसूद शरीर परत अंगावरील उत्तरीय वस्त्राने झाकीत सेविकेने ठेवलेलं पूजेचं तबक उचलीत राधागोविंदजींच्या मंदिरात पूजेसाठी निघाला. तशी आश्रमात वेगवेगळ्या देवतांची बरीच मंदिरे होती. पण त्याला राधागोविंदजींबद्दल विशेष प्रीती होती. पायातल्या खडावा वाजवीत तो आपल्या कुटीच्या बाहेर आला. अंगावर कोठेही अलंकार नाही, की पुरुषी सौंदर्याला खुलवणारे वस्त्र नाही. मागच्या बाजूने येणारे सकाळचे कोवळे ऊन त्याच्या पातळ कानांवर पडल्याने रक्तवर्ण दिसत होते........ त्याला पाहून माउलीने त्याला गोड आवाजात साद घातली, "बेटा संतराम इकडे तर ये जरा.......... " ते पुढे आणखीनही काही बोलणार होते. पण संतरामने आज समजूनही मागे वळून पाहिले नाही. याचं त्यांना आश्चर्य वाटलं. नक्की काय झालंय याला? ते नुसतेच पाहत राहिले. ते फार दूर नव्हते. ह्याला ऐकू गेलं नाही असं होणारच नाही. मग याचा आचार आज कसा काय बदलला? त्यांनी पुन्हा साद न घालण्याचं ठरवलं. झपाझप पावलं टाकीत तो मंदिरात शिरला. एरव्ही त्याचं मन राधागोविंदजींच्या सौंदर्यात लिप्त होत असे. त्याला राधेची मीलनोत्सुक मूर्ती वेगळी अशी भासतच नसे. आज मात्र त्याला दोन्ही मूर्ती स्पष्ट आणि वेगवेगळ्या दिसू लागल्या. त्यांच्यातली जवळीक त्याला आज वैषयिक वाटू लागली. हा असला फरक आपल्याला कसा काय वाटू लागला याचं त्याला नवल वाटलं. इतक्या वर्षांची आपली विरागी साधना केवळ एका प्रौढेच्या दर्शनाने काही तासातच कोलमडून पडली याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. बरं हा प्रकार काही क्षणांपुरता असता तर त्यानं लक्ष दिले नसते. पण एखादा स्पर्शजन्या रोग शरीरात भराभर पसरावा तशी अवस्था झाली होती. जणू तो रोग इतक्या कमी अवधीत अगदी हाडीमाशी खिळल्यासारखा झाला होता.
त्याने यांत्रिकपणे अभिषेकाला सुरुवात केली. पण पुरुषसूक्ताच्या दोन तीन मंत्रांपुढे त्याची गाडी जाईना. राधेच्या जागी त्याला कामिनीदेवींची मूर्ती दिसू लागली. आपण देवींच्या मुखमंडलाकडे गोविंदजींच्या ठिकाणी राहून एकटक पाहत आहोत आणि ते कुरवाळीत आहोत असंही वाटू लागलं. त्याने जास्त लक्ष न देण्याचे ठरवले....... त्याने बळेबळेच अभिषेक आणि पंचांमृती पुजा पुरी केली. गोविंदजींची क्षमा मागितली. आणि त्यांच्याकडे पाठ वळवून तो कुटीकडे निघाला. नाहीतर त्याचे दीडदोन तास तरी जात असत. आणि एकप्रकारची ध्यानाची धुंदी घेऊनच तो बाहेर पडत असे. आपल्या कुटीकडे जात असतानाच त्याला माउलींनी गाठले. " बेटा, आज तुझे चित्त थाऱ्यावर दिसत नाही, अन्यथा तू माझ्याकडे दुर्लक्ष केलं नसतंस. काही समस्या आहे का? " त्यांच्या नजरेला नजर न भिडवता तो म्हणाला, " नाही माउली. काहीच नाही " असे म्हणून त्याने आपला एक हात नाकाच्या शेंड्याकडे नेला. माउलींनी ओळखलं, तो असत्य बोलत आहे. पण इतक्या वर्षात आजच असत्य भाषणाची त्याला गरज का भासली. त्यांनी पुढे होऊन मृदू आवाजात विचारलं. " बेटा मला नाही का सांगणार? " त्याच्या पाठीवरून आश्वासक हात फिरवीत ते राहिले. पण संतरामची आज इच्छा नसावी असं पाहून त्यांनी जास्त न बोलता आपली पावले सतःच्या कुटीकडे वळवली. आता कुटीमध्ये जाऊन तो फलाहार करणार होता. तो शिरण्याच्या आधीच फळांच्या फोडींनी भरलेले तबक त्याच्या आसनासमोरील मेजावर ठेवले होते. हा सगळा त्याच्या रोजच्याच जीवनाचा भाग होता (म्हणजे फलाहार करणं वगैरे). अंगावरचं वस्त्र बाजूला उघड्या असलेल्या खिडकीच्या तावदानावर वाळत घालून संतराम आसनावर बसला. पण समोरच्या फळांपैकी एकही फोड त्याला आकर्षित करू शकली नाही. कशीतरी अर्धवट दोन तीन फळं खाऊन त्याने ते तबक तसेच ठेवले. अंगाचा नुसता दाह होत होता. एका स्त्रीचं आकर्षण इतकं प्रज्वलित करू शकतं याची त्याला आत्तापर्यंत जाणीवही नव्हती. त्याने तिथल्याच शय्येवर पडून राहण्याचा प्रयत्न केला पण शय्या सुद्धा त्याला तप्त वाटू लागली. मग त्याला आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला............
गुरूमाऊलींनी संतरामला महाराजांकडे मुद्दामच नेलं होतं. त्यात दोन हेतू होते. आपल्या नंतर संतरामसारखा शिष्य राजपुरोहित पद पुढे चालवणार होता आणि महाराजांना हे आपोआपच कळावं असा त्यांचा हेतू होता. तसाच संतरामची तेजस्वी मूर्ती महाराजांना दिसावी हाही एक हेतू होता. कोणत्याही लाभाची त्यांना अपेक्षा नव्हती. पण संतरामचा मोह मात्र त्यांना अशा गोष्टी करायला लावीत होता. खरंतर महाराजांनाही निरिच्छ असणाऱ्या पुरोहितांच्या या वागणुकीबद्दल आश्चर्य वाटलं होतं. संतराम पुरोहितांचा स्वतःचा पुत्र नव्हता. हा बदल समजावा की मोह, हेच महाराजांना कळेना. पण त्यांनी तशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या उलट त्यांनी वाट पाहण्याचं ठरवलं. काळच काहीतरी पुढे आणील, म्हणजे कोणालाच दुखावणं नको असा त्यांचा सरळ विचार होता. राज पुरोहित दरबारात आले आणि महाराजांच्या शेजारी बसलेल्या कामिनीदेवी संतरामकडे आकर्षित झाल्या. ते कोणाच्याच लक्षात आले नाही. योग्य तो परिचय
करून दिल्यावर महाराजांनी संतरामला आसन ग्रहण करण्यास सांगितले. आणि जुजबी वेदचर्चा करून त्यांनी त्याचा सत्कार केला. सत्कारात खास रेशमी वस्त्रं काही अलंकार होते. संतरामने फक्त वस्त्राचा स्वीकार केला आणि नम्रपणे अलंकार परत केले. ते पाहून महाराजांचा आदर त्याच्याबद्दल दुणावला. कामिनीदेवी मात्र थोड्याच वेळात तेथून उठून स्वतःच्या महाली गेल्या. स्वतःच्या कक्षात आल्या आल्या त्यांनी आपल्या खास दासीला बोलावून श्री संतराम महाराजांना आपल्या कक्षात घेऊन येण्यास सांगितले. महाराजांकडे निरोप दिल्यावर त्यांनी संतरामला त्याबद्दल आज्ञा फर्मावली. पुरोहितांना इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करायची असल्याने त्यांनीही संतरामला कामिनीदेवींना भेटून येण्यास सांगितले. ते लवकरच त्यांच्या दासीबरोबर कामिनीदेवींच्या कक्षाकडे निघाले........

दालनामागून दालने ओलांडीत संतराम दासीच्या मागे निघाले. मध्ये मध्ये येणारे हुजरे, रक्षक आणि इतर दरबारी त्यांना लवून अभिवादन करीत होते. त्यांची तेजः पुंज चर्या पाहून पाहणाऱ्यांना आपण कुणातरी विशेष साधूच्या दर्शनाने पावन होत आहोत असे वाटत होते. लवकरच देवींचा कक्ष आला. दासी तिला सांगितल्याबरहुकूम परत फिरली. कक्षाचे प्रवेशद्वार अर्धवट उघडेच होते. उघड्या प्रवेशद्वाराच्या आरशात पडलेल्या प्रतिबिंबात देवींना संतरामांचे पूर्णाकृती दर्शन झाले. दरबारात सहज म्हणून पाहिलेल्या संतरामांची देहयष्टी त्यांना जरा जास्तच आकर्षक वाटू लागली. त्या तन्मय होऊन पाहत राहिल्या. भानावर आल्यावर मोकळा सोडलेला भरदार केशसंभार खांद्यावरून पुढे आणीत कुरवाळीत त्या प्रतिबिंबाकडे पाहत होत्या. मग उत्तरीय वस्त्र बाजूस सारून त्यांनी काचोळी सोडली . अर्धवट सुटलेल्या काचोळीतून प्रौढ वयातही घाटदार दिसणारे त्यांचे उरोज उसळी मारून बाहेर आले. . ........ संतरामांनी अशा दर्शनाची अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे तेही पाहत राहिले. कामिनीदेवींच्या हे लक्षात आलं. किंबहुना असा प्रसंग त्यांनी स्वतःहून निर्माण केला होता. पण संतरामांना याची कशी कल्पना येणार ? असे स्त्रीदेहाचे दर्शन त्यांना तरी आजपर्यंत कधी घडले नव्हते. देवींचा भुलवण्याचा पहिला प्रयत्न तर यशस्वी झाला होता. नकळत जाणीव झाल्याचे दाखवीत स्त्रीसुलभ लज्जा स्वतःच्या चर्येवर आणीत अधिकच लाजून स्वतःला सावरीत म्हणाल्या, " महाराजांनी प्रवेश केल्यास आम्हाला उपकृत झाल्यासारखं वाटेल. दासीसुद्धा कधी कधी प्रवेशद्वार उघडे ठेवण्याचा प्रमाद करतात . त्याबद्दल क्षमा असावी. " असे म्हणून घाईघाईने त्यांनी अंगावरील उत्तरीय वस्त्राने वक्षांना झाकून घेतले. पण काचोळी मात्र बांधली नाही......... मोठ्या दिवाणखान्यात संतराम प्रवेश करते झाले. मंदपणे जळणाऱ्या समयांच्या प्रकाशात आतलं वातावरण थोडं धूसर आणि गूढ झालं होतं. त्यांना दर्शवलेल्या आसनावर ते विराजमान झाले. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांना सोडून गेलेली दासी फलाहाराची तबकं आणि सुगंधी दुधाचा सुवर्ण पेला घेऊन कधी त्यांच्या मागे येऊन उभी राहिली. आत आल्यावर त्यांची दृष्टी मात्र लज्जेने सभोवार भिरभिरू लागली. त्यांची मानसिक उलाघाल लक्षात घेऊन आणि अपेक्षित परिणाम साधल्याच्या आनंदात देवींनी प्रवेशद्वाराशी लगेचच आलेल्या सुलक्षणा दासीला मंजूळ आवाजात आत येण्यास फर्मावले. सुलक्षणेने संतरामांच्या जवळच असलेल्या नक्षीदार चंदनी मेजावर तबकं ठेवली आणि मागे मागे जात ती दिवाणखान्यातून जाऊ लागली. ती अंमळ थांबली. तशी देवींनी तिला आपल्या मृदू आवाजात रागे भरली. " सुलक्षा (त्या तिला सुलक्षा म्हणत) दरबारी रीतीरिवाजांची आजच कशी विस्मृती झाली तुला? आता कशाची वाट पाहत आहेस? नीघ कशी ती " ........ती गेली. ....प्रवेशद्वार लागल्यावर कामिनीदेवींनी पुन्हा एकवार संतरामांना आपल्या मधाळ आवाजात म्हंटले, " महाराज अशा भेटीगाठी तर आता होतच राहणार आहेत......... "
देवी संतरामांच्या प्रतिक्रियेसाठी थांबल्या. त्यांचं बारकाईनं निरीक्षण चालू होतं. नाही म्हटलं तरी देवी पस्तिशीच्या पुढे झुकल्या होत्या. पण वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करून त्यांनी आपलं सौंदर्य अधिकच उजळून घेतलं होतं. तश्या त्या मूळच्या सौंदर्यवती होत्याच. शेलाट्या बांध्याच्या कामिनीदेवी सिंहकटी होत्या आणि त्याखाली असलेले भरदार नितंब त्यांचा हा नाजुक बांधा
कसा काय सांभाळीत असेल याचा पाहणाऱ्याला अचंबा वाटणं स्वाभाविक होतं. अंगाला लावलेल्या वेगवेगळ्या अत्तरांचा सुवास संतरामांना येईल अशा रितीने त्यांच्या जवळच्याच आसनावर अगदी निकट येऊन त्या बसल्या. त्यांच्या जवळून दिसणाऱ्या म्हणण्यापेक्षा आव्हान देणाऱ्या सौंदर्याने संतरामना हळूहळू ज्वराची भावना होऊ लागली. अंगाच्या दाहावर ताबा आणीत ते म्हणाले, " देवींची आमच्याकडून काय अपेक्षा आहे ते समजलं तर बरं होईल. कारण आता आमची ध्यानाची वेळ झाली आहे व त्यासाठी आम्हाला आश्रमात जावं लागेल. "....... देवींनी मग स्वतःच्या हाताने त्यांना तबकातील फळं खायला घालण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर ते अंमळ मागे सरकून म्हणाले, " अशानं प्रज्ञेचा नाश होतो असं आचार्य म्हणतात. " आपले पांढरे शुभ्र दात अर्धवट दाखवीत खळाळून लटके हसत देवी म्हणाल्या, " असं आचार्यांचं म्हणणं आहे, पण आपलं तर तसं म्हणणं नाही ना. आम्ही तर आज आपल्यासाठी खास भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या पंक्तीचा लाभ आम्हांस झाला तर ते फार पुण्यकारक ठरेल. ...... " यावर कोणतेही उत्तर न देता संतरामांनी तबकातला दुधाचा पेला मात्र आपल्या ओठी लावला. तोही देवींचा मान राखण्यासाठी..... दुधाचा पहिला सुगंधी घोटच मुळी त्यांच्या चित्तवृत्ती डळमळीत करून गेला. मग पुढच्या घोटागणिक त्यांची अस्वस्थता वाढवीत गेला....... अचानक डोकावलेल्या सुलक्षेला पाहून देवींना खरंतर क्रोध आला होता, पण त्यांनी तशी काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी फक्त भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं. देवींच्या कानाशी लागून तिने महाराजांचा निरोप सांगितला. संतराम स्वप्नात असल्यासारखे झाल्याने त्यांना ती आल्याचं एकदम जाणवलं नाही. आणि जाणवलं तेव्हा ती देवींच्या कानाशी लागली होती.......... देवींच्या बोलण्यावर ते काही उत्तर देणार एवढ्यात त्यांना महाराज्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली असल्याचे देवींनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेची भावना आलेली देवींनी हेरली. खरंतर त्यांना महाराजांचा राग आला होता. तरीही त्या म्हणाल्या, "
आपणास महाराजांनी बोलावल्याने आम्ही रोखणार नाही ,पण पुन्हा याल तेव्हा मात्र भोजन केल्याशिवाय आपणास जाता येणार नाही. आपण
आम्हाला दुखावणार नाही याची खात्री आहे. खरं ना? " असं म्हणून त्या संतरामांकडे आर्जवी नजरेने पाहू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर इतका
भोळसट भाव होता की संतरामना नाही म्हणता आलं नाही. खरंतर त्यांचा पाय निघत नव्हता. पण ते अनिच्छेनेच उठले. हेही त्या प्रौढेने ओळखले. आपल्या वशीकरणाचा उपयोग शतप्रतिशत झाला असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. आता मात्र संतराम उठले.
आणि मागे वळत ते दिवाणखान्यातून बाहेर आले. कपाळावर आणि मानेवर जमलेले घर्मबिंदू त्यांनी उत्तरीय वस्त्राने पुसून घेतले. बाहेरील
मोकळ्या हवेत त्यांना सुटल्यासारखे वाटले. आचार्य , महाराजांची भेट घेऊन निघण्यासाठी उभे राहिले होते. महाराजांना संतराम आवडले, आणि त्यांना प्रत्येक भेटीत दरबारात घेऊन येण्याची त्यांनी आचार्यांना प्रेमळ आज्ञा केली. आपल्या दरबारात असं रत्न असायलाच हवं असा
महाराजांचा हेतू होता. या सर्व प्रसंगाचा आणखी एक साक्षीदार होता, तो म्हणजे "गुप्तहेर सोमनाथ ". महाराजांच्या खास मर्जीतला.
त्याचं लक्ष राजवाड्यातल्या सगळ्याच हालचालींवर असायचं. त्याच्या स्वतःच्या हालचाली अतिशय सावध, चाणाक्ष आणि वेगवान असायच्या. योग्य वेळेला महाराजांना तो बातम्या देत असे. देवींवर आणि संतरामांवर लक्ष ठेवणं जरूर असल्याचं त्याला जाणवलं. देवीही काही कमी नव्हत्या. त्यांचं स्वतःचं असं हेरखातं होतं. त्यामुळे त्यांना राजवाड्यात आणि इतर महालांमध्ये काय चालतं याची बित्तमबातमी असायची.
रात्रीच्या शांत प्रहरात त्या बातम्या ऐकत असत. त्यात त्या जराही कुचराई करीत नसत. आता संतराम महाराजांवर लक्ष ठेवणारे दोन हेर होते. एक महाराजांचा आणि दुसरा कामिनीदेवींचा. तिचं नाव होतं. " किस्त्री " . ती एक अत्यंत कुरूप स्त्री होती. त्यामुळे तिच्याकडे कोणीही पाहत नसे. बुटकी, म्हातारी कुब्जा, तिला कोण खिजगणतीत धरणार? पण आपल्या कामात ती वाकबगार होती. वेडेवाकडे डोळे, तोंडावर देवीचे
वण, खुरटे पण आखूड केस, पाठीवरच्या मोठ्या कुबडाने वाकलेली, काळसर पिवळसर दात, बोलणं बेतास बात आणि मधूनच कुत्सितपणे
हसण्याची सवय . ती वेडसर असल्यासारखी दिसत असे. त्यामुळे ती अस्तित्वात नसल्याचे समजूनच आजूबाजूचे लोक वावरत असत.
कामिनीदेवींना संततिसुख नव्हतं. त्यामुळे महाराजही चिंतीत असत. आपली गादी चालवणारा पुत्र कुणाला नको
असतो, तसाच तो त्यांनाही हवा होता. पण परमेश्वरी मनात एखादा वंश पुढे चालावा असं जर नसेल तर माणूस काय करणार. तसा महाराज आणि कामिनीदेवी यांच्यात कोणताच शारीरिक दोष नव्हता. पण संतती नसणं याची टोच जेवढी देवींना होती, तेवढी ती महाराजांना नव्हती, निदान ते तसं दाखवीत तरी नव्हते. कामिनीदेवींना जेव्हा विवाहानंतर काही वर्षातच संतती होणार नसल्याचं समजलं तेव्हा त्या न खचता
त्यांच्या संपर्कात येणाऱ्या दरबारी पुरुषांवर लक्ष केंद्रित करू लागल्या . पण संतराम आयुष्यात आले आणि बाकी सर्व पुरुषांचा पुरुषार्थ त्यांना
फारच फिका वाटू लागला. तसे त्यांचे संबंध एक दोन पुरुषांबरोबर होते, पण ते उघडकीस येणार असं वाटू लागताच त्यांनी त्या दोघांना
गुप्तपणे किस्त्रीच्या मदतीने यमसदनास पाठवले. त्याचा बभ्रा झाला नव्हता. आता संतरामांच्या बाबतीत बभ्रा झाला तरी त्यांना पर्वा नव्हती..
कारण त्यात महाराज आणि राजपुरोहित अडकणार होते. व्यभिचारी माणसाला अश्या मोठ्या व राजकारणी व्यक्ती अडकल्या की जबाबदारी
विभागल्यासारखी वाटते. शेवटी आपल्या बदनामी बरोबर त्यांचीही बदनामी होणार या भावनेतच त्या समाधानी राहतात. एकूण कामिनीदेवी निर्धास्त होत्या. त्या संतरामांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. किमान त्यांनी आलिंगन दिलं तरी सध्या त्या समाधान मानणार होत्या. तश्या स्वप्नात त्या बिछान्यावर लोळत पडल्या असतानाच सुलक्षा आत आली. पुन्हा तिचा त्यांना राग आला. त्या स्वप्नावस्थेतून जाग्या होऊ
इच्छित नव्हत्या. पण न रागावता मांजराच्या पावलांनी सरकत आलेल्या सुलक्षेची बातमी ऐकू लागल्या. सुलक्षा म्हणाली, " महादेवींचा विजय
असो, एक शुभ समाचार आहे. महाराजांनी आत्ताच राज पुरोहितांना संतरामना नेहमी दरबारी येण्याची आज्ञा केली आहे, आणि लवकरच
पुढील एक दोन दिवसातच संतराम दरबारात येणार आहेत. " देवींनी आपले मुख वक्राकार करीत म्हटले, " त्यात काय विशेष? आत्ता तर येणार नाहीत ना? " त्यांना असल्या टुकार समाचाराबाबत सुलक्षेचा राग आला होता. " आता तू नीघ
आणि तेही त्वरित..... " देवी समाचाराने फारश्या प्रसन्न न झाल्याचे पाहून सुलक्षा आल्या वाटेने निघून गेली. देवी परत संतराम बिछान्यावर असून ते आपले अधरपान करीत असल्याचे स्वप्न रंगवू लागल्या. ती रात्र अशीच तळमळण्यात गेली.
सकाळ मंदपणे उगवली. देवींच्या बाबतीत, तशीच संतरामांच्या बाबतीतही. संतराम यांत्रिकपणे जागे झाले. ब्राह्ममुहूर्ती केलेले सचैल स्नान क्षणभरापुरते का होईना त्यांना समाधान देऊन गेले. पण अंग कोरडे करून होईपर्यंतच. लगेचच कालच्याच विचारांनी त्यांना घेरले. तरीही ते ध्यानाला बसले. तेजोमय विश्वाची कल्पना करून त्यांनी पुन्हा एकदा विरोधी विचार काढून टाकले. आता ते विश्वातल्या तेजोमय समुद्रात पोहत आहेत अशा कल्पनेने भारले गेले. नेहमीप्रमाणे ध्यान लागले. मग एकेक पायरी खाली उतरून सफाईने देहभानावर आले. समोरच्याच पर्वतराजीवर गुलाबी लालसर रंगाचे सूर्यबिंब पाहून त्यांनी भक्तिभावाने हात जोडले. मग काही काळापुरते सूर्यबिंबाची लाली अंगभर भिनवून घेत त्यांनी गायत्रीचा जप पुरा केला. पण पुढच्याच क्षणी समोरून जाणाऱ्या एका तरुण सेविकेला
पाहून त्यांच्या मनात टपून बसलेल्या कालच्याच विचारांचा आता अचानक झंझावात सुरू झाला. तो होता कामिनीदेवींच्या जवळून पाहिलेल्या सौंदर्याचा. मनाने क्षणार्धात त्यांचे मादक चित्रच त्यांच्यासमोर तयार केले. गात्र गात्र देवींसाठी कण्हू लागले. संतरामांना आपल्याला मूर्च्छा येईल की काय असे वाटू लागले. गळ्याला शोष पडला. हाता पायांना थरथर सुटली. देहावर हलक्या घामाची चादर पसरली. तसा सकाळचा प्रहर इतकाही उष्ण नव्हता. बाजूलाच ठेवलेल्या वस्त्राला घाम पुशीत संतराम कुटीच्या बाहेर डोकावले. हवेतला गारवा अजुनही सुखद होता.
समोरच उभे असलेले अशोकाचे वृक्ष जणू काही डोक्यावर हिरवी शाल पांघरून हवेबरोबर बावळटपणाने डोलत होते. जवळच असलेला मोगरा वेड्यासारखा फुलला होता आणि त्याचा मंद मधाळ वास अधूनमधून तरंगत होता. एकूण वातावरण अजिबात उष्ण नव्हते. मनातले
डचमळणारे विचार बलपूर्वक बाजूला सारून ते आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करून घेऊ लागले. आचार्यांनी सांगितलेला गतकाळ विसरण्याचा प्रयोग ते निष्ठेने करू लागले. तेव्हा कुठे त्यांना जमिनीवर आल्याची जाणीव झाली. नाहीतर दोन दिवसांपासून त्यांचं मन थाऱ्यावर राहत नव्हतं. आता त्यांना समोरच असलेल्या राधागोविंदजींच मंदिर दिसलं. तिथे जाण्याची आजपर्यंतची ओढ त्यांना परत वाटू लागली. मग खरंतर तिथे जाण्याची ही वेळ नसूनही त्यांनी पूजेचं तबक स्वतःच तयार करून ते रेशीमकाठी सुवर्ण केशरी पितांबर नेसून निघाले. अजूनही मन वर्तमानात होतं. चालता चालता त्यांची नजर दूरवर दिसणाऱ्या रानाकडे अहेतुक पण गेली. त्यांना एक हरीण आणि हरिणीचा जोडा प्रणयाराधनात मशगुल असलेला दिसला. त्यातला नर हरिणी भोवती जेवढ्या जवळून वर्तुळाकार फिरता येईल तेवढा, तिच्या स्पर्शासाठी
वेडा होऊन फिरताना दिसत होता. अंगाला अंग घासणारी ती जोडी पाहून संतरामच्या मनात परत एकदा कामिनी देवींनी घुमायला सुरुवात केली. हातात तबक असल्याने आणि दुसऱ्या हातात झारी असल्याने कपाळावर जमणारे घर्मबिंदू त्यांना पुसता येईनात. मग हरणाच्या जोडीवरील नजर कष्टाने दूर करीत ते मंदिराची वाट चालू लागले . अंगावरील निळसर उत्तरीय वस्त्र, गळ्यातील रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावरून रुळणारे पांढरे शुभ्र जानवे पाहून कुणालाही ते साक्षात बृहस्पती वाटले असते. आज मार्ग नेहमीचा असूनही त्यांची चाल थोडी अस्वस्थ होत होती. मंदिरातल्या संगमरवरी सभामंडपात ते शिरले. ते दृश्य पाहणाऱ्याला जणू काही एका मूर्तीला दुसरी मूर्ती भेटण्यास आली असल्याचा भास झाला असता. गोविंदजींच्या गळ्यात हात टाकलेली राधेची मूर्ती पाहून त्या जागी त्यांना आपली आणि कामिनीदेवींची मूर्ती असल्याचा भास झाला. तरीही बलपूर्वक त्यांनी विचार झटकून पंचामृती पुजा आरंभ केली. स्वच्छ, शुद्ध आणि सात्त्विक मंत्रोच्चारांमध्ये
स्वतःच काही वेळापुरते रमले. साधारण एका कलाकानंतर त्यांच्या पूजेची सांगता झाली. आणि ते मूर्तीकडे न पाहता आपल्या कुटीकडे निघाले. ही मूर्ती पाहूनच जर मन चलबिचल होत असेल तर तिकडे न पाहण्याचे त्यांनी ठरवले. थोड्याच वेळात ते कुटीत परत आले. अर्धा पाऊण तास त्यांनी आराम केला असेल नसेल, बाहेरून त्यांना आचार्य हाक मारीत असल्याचे जाणवले. खरंतर त्यांची ही वेळ आता थोड्याशा नाश्त्याची किंवा फलाहाराची होती. नंतर लगेचच ते काही नवशिक्या विद्यार्थ्यांना संथा देत असत. ती जवळ जवळ दिवस माथ्यावर येईपर्यंत चाले. मग भोजनाची वेळ. गेल्या दोन दिवसांपासून हे वेळपत्रक मात्र मागेपुढे होत होते . अचानक आचार्यांची हाक ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. आपण परवाच तर दरबारात जाऊन आलो. परत आज जायचं म्हणजे पुन्हा कामिनीदेवी आपल्याला बोलावणार आणि त्या भोजन केल्याशिवाय सोडणारच नाहीत. हे जर वेळीच टाळलं तर थोडी तरी परिस्थिती हातात राहील. पण मनाचा हा ताबा वरवरचा होता. आतून मनाने त्यांना सक्ती केली. गेलास तर देवींचं दर्शनच नाही तर थोडा फार संगही होऊ शकतो आणि त्यातील आनंद वेगळ्या प्रकारचा असणार. पण मनाने परत दुसरा पर्याय दाखवला. समजा आपण गेलोच नाही तर निदान काया आणि वाचेने होणारे पाप तरी टळेल. पण आचार्यांना समजावून सांगावं लागेल. नक्की विचार पक्का करण्याच्या आतच कुटीमध्ये आचार्य प्रवेश करते झाले. ते अंतर्ज्ञानी होते हेच खरं. आल्या आल्या त्यांनी संतरामचा प्रणाम स्वीकारल्यावर सांगितले, " असं पाहा बेटा योगाभ्यासाला स्त्री दर्शन हानिकारक आहे. मी महाराजांना याची कल्पना देणारच आहे. तुला देवींसमोर जाण्याची वेळच येणार नाही याची जबाबदारी मी घेतो. आता निर्धास्तपणे चल. महाराजांचा निरोप आला आहे. "........ म्हणजे आचार्यांना आपली चलबिचल जाणवली आहे तर. पण त्यांची द्विधा मनः स्थिती कमी होईना. ते काही न बोलता निघाले. लवकरच महाराजांनी धाडलेल्या रथातून ते राजवाड्यात पोहोचले. ......... त्यांच्यामागून येणारी किस्त्री त्यांना दिसली नाही.
अर्ध्या घटिके नंतर ते दरबारात उपस्थित झाले. महाराजांना प्रणाम केल्यावर त्यानी आपापली आसने ग्रहण केली.
दरबारातील इतर कामे पुरी होता होता जवळ जवळ दोन घटिका संपल्या. इतर दरबाऱ्यांनी निरोप घेतल्यावर महाराजांनी त्यांना
थोड्या अंतरावर असलेल्या खलबतखान्यात नेले. खलबतखान्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचल्यावर बरोबर आलेले अंगरक्षक मागे मागे येत येत
सुरक्षित अंतरावर जाऊन थांबले. महाराजांनी आता तेथील भिंतीतील कळीला लावण्यासाठी आपला हात पुढे केला. तेवढ्यात सुलक्षणा दासी त्वरेने धावत येऊन महाराजांना म्हणाली, " महाराजांचा विजय असो. श्री संतराम महाराजांना त्यांचे दरबारी कामकाज पूर्ण झाल्यावर आज देवींनी भोजन करून जाण्यास सांगितले आहे. " त्यावर महाराज थोडेसे क्रोधित होत म्हणाले, " भोजनाची सिद्धता पुन्हा केव्हातरी करावी. असा देवींना निरोप द्या, आणि परत महत्त्वाच्या कार्यात परवानगी न घेता येण्याचा प्रमाद घडल्यास कारागृहात पाठवण्याची शिक्षा भोगावी लागेल हेही लक्षात ठेवा. तेव्हा तुमच्या देवीही तुम्हांस वाचवू शकणार नाहीत. "....... ती गेल्यावर महाराजांनी भिंतीतल्या कळीला हलकासा स्पर्श केला. मग तिथे असलेली नर्तिकेची पाषाण मूर्ती डावीकडून उजवीकडे कोणताही ध्वनी न करता फिरली. त्याबरोबर समोर निर्माण झालेल्या अरुंद मार्गिकेवर आत जळत असलेल्या पलित्याचा उजेड पडला. आणि खालच्या तळघरात उतरणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. मग आचार्य पुढे, मागे संतराम आणि शेवटी महाराज उतरले. ते आत उतरल्यावर महाराजांनी परत भिंतीतल्या कळीला हलका स्पर्श केल्यावर नर्तिकेची मूर्ती उजवीकडून डावीकडे फिरली आणि मार्गिका बंद झाली. मार्गिकेच्या प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूंना बालकांच्या वेगवेगळ्या मुद्रेतल्या मूर्ती होत्या. म्हणजे मार्गिकेला असलेल्या वीस पायऱ्यांवर मिळून एकूण चाळीस मूर्ती होत्या. प्रत्येक मूर्ती पूर्णपणे पोकळ असून त्यातून वरच्या छतावरून कोणी चालत गेल्यास सांगीतिक स्वरांमधले आवाज येत. त्यावरून कळत असे की ज्या विभागात कुणालाच येण्याची परवानगी नसताना कोणीतरी तिथे संचार करीत असल्याची कल्पना खलबतखान्यातल्या व्यक्तींना येत असे. जेवढा पदरव नाजूक तेवढा स्वर नाजुक येत असे आणि तो जेवढा कठोर तेवढा तो स्वर जड येत असे. तसेच खलबतखान्यातून बाहेर जाण्याचा दुसरा एक गुप्त मार्गही तयार केलेला होता. त्यातून आतल्या व्यक्ती तात्पुरत्या तरी गुप्त होत असत. असो. पण खलबतखान्याच्या वरच्या बाजूला कुणालाच फिरण्याची परवानगी नसल्याने असं आजपर्यंत तरी घडलेलं नव्हतं. आतमध्येही पहिल्या चार पायऱ्यांवर चार सशस्त्र रक्षक होते....... पहिल्या चार पाच पायऱ्या सोडल्यास पुढील पायऱ्या डाव्या बाजूला वळत होत्या. पायऱ्या उतरल्यावर पुन्हा भिंतीतली कळीस स्पर्श करून महाराजांनी गुप्त दरवाजा उघडला. मग ते तिघेही आत शिरले. आत एक छोटेखानी दरबारवजा दिवाणखाना होता. त्यात बसण्याची योग्य व्यवस्था केलेली होती. रचना अशी होती की बाहेरील शुद्ध आणि गार हवा आत येत होती आणि आतली कुबट हवा बाहेर जात होती. ती शिल्पशास्त्र्याची कलाकुसर होती. महाराज सोडले तर इतर कुणासही ते माहीत नव्हतं. समोरच असलेल्या सिंहासनवजा आसनावर विराजमान होत महाराजांनी राजपुरोहित आणि संतराम यांना आपापल्या आसनांवर बसण्यास खुणावले........
********* **************** *************** **************** ***************** *********** ****************
किस्त्रीकडून संतराम आल्याची वार्ता देवींना कळल्याबरोबरच त्यांनी सुलक्षणेबरोबर निरोप पाठवला होता. पण आजकाल सुलक्षणेचं लक्षण ठीक दिसत नव्हतं. ती प्रमादावर प्रमाद करीत होती. सांगितलेलं काम वेळेवर न करणं, या सवयी मुळे महाराज खलबतखान्यात जाताना तिने निरोप दिला होता. आता देवी कोणती शिक्षा देतील हे तिला समजत नव्हतं. शिक्षेच्या भीतीने तिने दबकत दबकतच देवींच्या कक्षात खालच्या मानेने प्रवेश केला.

(क्र म शः)