Login

सांताने दिलेले सुंदर गिफ्ट..

कधी कधी लहान मुलेही मोठ्यांना खूप काही शिकवतात.
"आई या वर्षीही सांता येवून मला गिफ्ट देईल का ग?"

छोट्या रियांशची आईच्या मागे गेल्या अर्ध्या तासापासून भुणभुण सुरू होती.

"हो रे.. देईल.. आता सारखं सारखं तेच विचारत राहिलास तर मी सांताला फोन करून सांगेल की, रियांशला काही गिफ्ट वगैरे नको देवूस."

"आई आता फक्त एक शेवटचा प्रश्न, आपल्याला गिफ्ट पाहिजे असेल तर सांताला लेटर लिहावेच लागते का ग? म्हणजे ते जर लिहिले नाही तर सांता गिफ्ट देणारच नाही.?"

"असं काही नाही, पण तुला काय पाहिजे ते जर सांताला तू सांगितलेे तर तुला हवे ते गिफ्ट तो देईल की."

"नक्की असे होते का ग आई..?"

"मला तर वाटते बुवा होते म्हणून."

"आई आई तुला दिले आहे का ग कधी सांताने गिफ्ट?"

"मला तर खूप मोठ्ठं गिफ्ट दिलं होतं सांताने माहितीये."

"ते आणि कोणतं बरं ? आणि मला कसं ते माहीत नाही.?

"अरे तू जेव्हा माझ्या पोटात होतास ना तेव्हा, मी ख्रिसमसच्या आदल्या रात्री एक चिठ्ठी लिहिली होती सांताला की, \"मला एक क्यूट असा राजकुमार दे.\" आणि खरोखर सांताने ख्रिसमसच्या दिवशी तुला पाठवलं माझ्या आयुष्यात. आहे की नाही गंमत."

रियांशला जवळ घेत त्याची पापी घेत रेवतीने त्याला सांताचे सिक्रेट सांगितले.

"आणि माहितीये या गोष्टीला आता पाच वर्षे पूर्ण झाली. उद्या माझ्या रियांश बाळाचा बर्थडे आहे. तुला हवं ते तू सांग आता सांताला तो नक्की तुझी विश पूर्ण करणार."

"पण आई मला तुझ्यासारखे लिहिता येत नाही ना. मी सांगेल ते तू लिहून देशील मला?"

"हो देईल की. माझे काम आवरले की मग आपण लिहुयात आ सांताला लेटर. जा पळ आता खेळ थोडावेळ."

आई लेटर लिहून देणार, या आनंदात लेकरु खेळायला गेलं.

आता रेवतीलाही उत्सुकता लागली होती, रीयांश नेमकं काय काय मागणार याची.?

"रियांशने काहीही मागू दे, मी सांता बनून त्याची प्रत्येक विश पूर्ण करणार. असा धूमधडाक्यात साजरा करते की नाही माझ्या लेकाचा बर्थडे. तेव्हाच कळेल सर्वांना ही रेवती काय चीज आहे ते. रिमोट कार, टेडी, चॉकलेटस्.. जे हवं नको ते सारं काही मी रियांशला देणार."

किचनमधील सर्व काम आवरुन रेवती कागद पेन घेवून आली.

"रियांश, चल बेटा, ये इकडे. सांग आता काय लिहायचं आहे लेटर मध्ये?"

"हा लिही आई.."

प्रिय सांता ...

मी खूप खुश आहे तू येणार म्हणून. आणि तुला माहितीये का सांता, उद्या ना माझा बर्थडे आहे बरं का. तू येशील ना रे माझ्या बर्थडेला मला विश करायला.?
माझे सगळे मित्र पण येणार आहेत. आर्यन, अथर्व, ऋग्वेद, रिया, वेदिका. सगळे सगळे मित्र येणार आहेत. आम्ही सगळे मिळून खूप खूप मज्जा करणार आहोत.

आई माझ्यासाठी हे एवढा मोठ्ठा केक सुद्धा ऑर्डर करणार आहे. माझ्यासाठी चॉकलेट्स, आईसक्रीम सगळं आणणार आहे ती.

तुला एक गंमत सांगू, आई ना माझे खूप खूप खूप लाड करते. माझे सगळे हट्ट पुरवते.

लिहिता लिहिता रेवतीचे डोळे पाणावले. कित्ती निरागस असतात नाही ही लहान मुलं. रियांशकडे पाहून तिने एक गोडशी स्माइल दिली. आणि पुढे रियांश आणखी काय सांगतो याकडे तिचे आता लक्ष लागले.

सांता मला तुला खूप काही सांगायचे आहे रे,पण कसे सांगू तेच कळत नाही.

तू सगळ्या मुलांना गिफ्ट देतोस ना रे मग मी तुझ्याकडे काही मागितले तर तू नक्की देशील ते मला?

प्लीज मला माझे बाबा हवेत रे. सगळ्या मुलांकडे त्यांचे बाबा आहेत पण माझ्याकडे ते नाहीत. कारण माझे बाबा आता आमच्यासोबत राहत नाहीत ना.

रियांशचे बोलणे ऐकून रेवती क्षणभर गोंधळलीच.

आईचे आणि त्यांचे एकदा खूप मोठे भांडण झाले तेव्हापासून आम्ही ह्या नवीन घरी आलो राहायला. पण तुला सांगू, मला बाबांची खूप आठवण येते रे. तू देशील का रे पुन्हा मला माझे बाबा? त्यांना नसेल का रे माझी आठवण येत.

रेवतीचा हात आता थरथरायला लागला होता. एवढंसं लेकरु, पण किती काही साठलंय याच्या मनात. आपण आपल्या सोयीने मार्ग निवडतो पण लहान मुलांना मात्र आपल्या म्हणण्याप्रमाणे जगावे लागते. त्यांच्या मनाचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही.

रियांश पुढे बोलू लागला.

मला ह्यावेळी ना सांता चॉकलेट्स, आइसक्रीम असं काहीही नकोय. फक्त मला माझे बाबा हवे आहेत रे. तू सगळयांच्या सगळ्या विश पूर्ण करतोस. असे आई म्हणाली मला. मग माझीही एवढी विश पूर्ण करशील ना रे?

तुला माझे हे पत्र मिळताच तू नक्की माझ्या बाबांना घेवून ये. मला हवे आहेत ते उद्या माझ्या बर्थडेला. मी वाट पाहीन त्यांची. आणि ते आल्याशिवाय मी तर केक कापणारच नाही बघ.

चल बाय आता. उदया बाबा येणार म्हटल्यावर मला त्यांच्या वेलकमसाठी छान छान ग्रीटिंग बनवायचं आहे. बाबांना छान सरप्राइज देणार आहे मी. आणि तू पण नक्की ये बरं का माझ्या बर्थडे. विसरू नकोस हं.

बाय सांता,
तुझाच लाडका रियांश.

रेवतीच्या विचारांचे चक्र आता थांबायचे काही नावच घेईना. देवा, काय करु मी आता? काही दिवसातच राकेशचा आणि माझा डीवोर्स फायनल होणार आहे. अगदी अंतिम टप्प्यात आहे प्रोसेस. आता कसं मी समजावू ह्या लेकराला? रेवतीला तर काहीच सुचत नव्हते.

पण आता जर रियांशची ही विश पुर्ण नाही झाली तर त्याचा सांता वरचा आणि पर्यायाने माझ्यावरचा विश्वास नक्कीच उडेल.आणि ह्यावेळी तर तो कायमस्वरुपी.

यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. राकेशच्या आणि माझ्या भांडणात ह्या छोट्या लेकराचा काय दोष? मी तर राकेश ला त्याला भेटण्यापासून पण मनाई केली आहे. वाटलं होतं रियांश लहान आहे राकेशला विसरून जाईल हळूहळू. पण हे तर आता उलटच झालंय सगळं. उद्या राकेश जर नाही आला तर रियांश खूप गोंधळ घालेल.

खूप वेळ विचार केल्यानंतर रेवतीने लिहिलेल्या लेटरचा फोटो काढून तो राकेशला पाठवला. बऱ्याच वेळाने राकेशने रेवतीचा मॅसेज पाहिला. रेवतीने तर अविचाराने घेतलेला डीवोर्सचा निर्णय आज तिलाच महागात पडणार होता.

खूपदा राकेशने समजावून सांगितले तिला,"नसेल पटत माझे काही तर काही दिवस एकमेकांपासून थोडे लांब राहूयात. पण इतका टोकाचा निर्णय नको घ्यायला. रियांशचाही विचार करायला हवा आपल्याला."

आज राकेशचे सर्व वाक्य रेवतीला जसेच्या तसे आठवत होते. पण आधीपासूनच "मी म्हणेल ती पूर्वदिशा" अशा स्वभावाची रेवती मनासारखे थोडे जरी झाले नाही तरी लगेच अशी टोकाची भूमिका घेणार हे ठरलेलेच.

पण आज तिच्या स्वभावाने तिचेच खूप मोठे नुकसान होणार होते. तिची चूक याआधी मात्र तिला कधीच उमगली नाही. कारण तिला स्वतःची चूक कधी मान्यच नसायची.

आज मात्र पहिल्यांदाच रियांशमुळे तिचे डोळे उघडले होते. काहीतरी चुकतंय याची जाणीव कुठेतरी तिला होत होती.

"खरंच एवढा मोठा निर्णय घेताना मी रियांश विचार केलाच नाही. उलट मी माझ्या हिमतीवर रियांशला सांभाळून दाखवेल. मला कोणाचीही गरज नाही या मतावर मी ठाम होते."

पण आज मात्र ती हतबल झाली होती.

"एवढे सगळे करून सुद्धा मी रियांश च्या मनातून त्याच्या बाबाला नाही दूर करु शकले. आणि इथेच खूप मोठी हार झाली आहे माझी."
रेवतीला आज स्वतःची चूक मात्र उमगली होती.

कुठलाही विचार न करता तिने लगेच राकेशला फोन लावला. तिकडे राकेशसुद्धा रियांशचे तर लेटर वाचून रडवेला झाला.

रेवतीचा कॉल पाहून मनातून त्याला खूपच आनंद झाला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने कॉल घेतला.

"आय एम सॉरी राकेश. मी खूप घाई केली रे. मी ऐकायला हवं होतं त्यावेळी तुझं." रडवेल्या सुरात रेवती बोलली.

ह्यावेळी पहिल्यांदा राकेशला रियांशचा खूप अभिमान वाटला. कारण जे त्याला कधी जमले नव्हते आतापर्यंत ते लेकाने करुन दाखवले होते. आज पहिल्यांदा रेवती कधी नव्हे तो त्याला सॉरी म्हणाली होती. विशेष म्हणजे तिला तिची चूक समजली हेच खूप होते राकेशसाठी.

दोघांनीही मग पुन्हा एक होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी राकेश लाडक्या लेकाच्या वाढदिवसाला खूप सारे गिफ्ट घेवून हजर झाला. लेकरु इतके खुश झाले की काही विचारूच नका. राकेशला समोर पाहताच रियांशने त्याला घट्ट मिठी मारली.

खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे एक सुंदर असे गिफ्ट रियांशला मिळाले होते सांता कडून. कोण म्हणतं सांता गिफ्ट देत नाही. आज फक्त सांतामुळेच तीन जीवांचे आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लागणार होते. लहान मुलेही कधी कधी त्यांच्या वर्तणुकीतून खूप काही शिकवतात नाही??

जाती धर्म विसरून प्रत्येक सणाकडे जर सकारात्मक वृत्तीने पाहिले तर जीवनाचे खरे मर्म उलगडते. कारण जे गितेत सांगितले आहे तेच कुराणात आणि तेच पुन्हा बायबल मध्ये. फक्त प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा.

भाषा जरी वेगवेगळी तरी शिकवण मात्र एकच आहे प्रत्येक ग्रंथात प्रत्येक धर्माची, आणि ती म्हणजे माणुसकीची शिकवण. हे कधीही विसरून चालणार नाही. आयुष्य थोडे आहे फक्त ते जगण्याची कला एकदा का समजली मग सारे कसे अगदी सोप्पे होवून जाईल नाही???