सांताक्लाज ला पत्र

एका गरीब मुलाचं सांता ला भेटायचं स्वप्न असतं, पण फक्त श्रीमंत मुलांनाच तो भेटतो असा त्याचा गैरसमज...यावर आधारित छूटकूने सांता ला लिहिलेलं पत्र

प्रिय सांताक्लाज,
डिसेंम्बर महिना लागला की वेध लागतात ते तुझ्या येण्याचे, तुझ्या गिफ्ट ची खूप आतुरतेने वाट बघणाऱ्या चिमण्या बालकांची. तुझा तो टोपीवाला लाल-पांढऱ्या रंगाचा नजर खिळवून ठेवणारा पोशाख, पांढरी लांबलचक दाढी, मागून झुपकेदार गोंडा लोंबकळणारी टोपी, खांद्यावर लटकलेली झोळी आणि त्यात लपवलेली मस्त पॅकिंग करून ठेवलेली असंख्य खेळणी, चॉकलेट्स, आणिक काय काय असतं त्यात ते तुलाच ठाऊक असतं बर! कारण ते तुझं खास सरप्राईज असतं त्या विशिष्ट दिवसाचं खास लहान मुलांसाठी. गिफ्टसाठी आणि तुला भेटण्यासाठीच तर खास मुलं तुझी आतुरतेने वाट बघतात.
गेली दोन वर्ष झालीत "कोरोना" ने नुसतं थैमान घालून गोंधळ घातलेला होता. तुझं आगमन झालंच नाही. पण यावर्षी मात्र छान संधी मिळाली हं....
तू आलास सोबत खूप गिफ्ट सुद्धा आणलेस आणि वाटलेसुद्धा.
पण! तरीही मनात खूप खंत वाटते रे!
सगळ्यांच्याच नशिबात का बरं नसावीत ही सारी सुखं, का नसत मिळावीत सर्वांना गिफ्ट.
चकीत झालास ना तू माझ्या प्रश्नाने. वाटलंच होतं मला तुला आश्चर्य वाटेल म्हणून. त्यात तुझी काहीच चूक नाहीये रे सांता, कारण तू तर फक्त श्रीमंतांच्या घरातील सांता ना! मोठमोठ्या मॉलमध्ये, हॉटेलमध्ये जिथे श्रीमंत घरातील पप्पा आपल्या मुलांना मोठ्ठी एन्ट्री फी भरून तिथे आणतात...का ? तर आपल्या लाडक्या मुलांनी हा सण साजरा करावा म्हणूनच ना! तू पण तुझी झोळी घेऊन तिथे असतोस, तिथल्याच मुलांना गिफ्ट देतोस. मी बघितलंय तुला असं मुलांना गिफ्ट देतांना, त्यांच्यासोबत सेल्फी काढतांना. माझी पण खूप इच्छा होती तुझ्यासोबत एकतरी फोटो काढावा म्हणून, तुझ्याकडून मोठं नाही पण निदान एक चॉकलेट तरी मिळावं आणि तुझ्या त्या लाल-पांढऱ्या लुसलुशीत मऊ मऊ पोशाखाला हात लावून बघावा म्हणून. खुपदा प्रयत्न केला मी तुझ्याजवळ येण्याचा, कधी पाण्याचे ग्लास घेऊन तर कधी नाश्त्याच्या प्लेटा घेऊन....एकदा तर मुद्दाम मी तुझ्या खूप जवळ आलो, तुला खेटून उभं राहता यावं, तुझा स्पर्श अनुभवावा म्हणून...पण एवढ्यात मालक जोराने खेकसला...मी दचकलो माझ्या हातातला ट्रे दणकनsss खाली पडला. तुझा ड्रेस खराब झाला. सर्वजण माझ्यावर ओरडले नीट काम करता येतं नाही म्हणून. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, शर्टच्या बाहीने पाणी पुसत मी बाहेर पडलो. पण तुझ्या नजरेने मात्र बरोबर टिपले माझ्या डोळ्यातले भाव.
कार्यक्रम आटोपला, सर्वजण आपापल्या घरी जायला निघाली. किती खुश होती सर्व लहान मुलं-मुली. कुणाच्या हातात फुगे, तर कुणाच्या हातात गिफ्ट्स चे खोके. मी हॉटेलच्या बाहेर पार्किंग च्या आवारात एका झाडाखाली बसलेला होतो.त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून मी मनातल्या मनात कुढत होतो माझ्या गरिबीवर, मी अनाथ म्हणून माझ्यावर आलेल्या परिस्थितीवर.
सांता...., खरं सांगायचं तर ही मोठमोठाली स्वप्न आमच्यासारख्यानी बघायची नसतात हे बाळकडू मला लहानपणीच उमगलेलं जेव्हा मी लहानश्या भाकरीच्या तुकड्यासाठी माझ्या वजनाच्या दुप्पट भार उचलुन हमाली करून पोट भरायचो.
पण आज अचानक का असं व्हावं...कळेनासं झालय. खूप आठवण आली आज आई-बाबांची.
ते असते तर.....?
असू दे...जे आपल्या नशिबात नसतं त्याची स्वप्न नाहीच बघायची हे शेजारच्या गणू काकांनी एकदा सांगितलं होतं मला...त्यावेळेस त्याचा अर्थ नाही उमगला, पण आज मात्र प्रकर्षाने जाणवलं. मी स्वतःशीच गुणगुणत होतो....
"जे आपल्या नशिबात नसतं.... त्या.....
एवढ्यात कुणितरी माझ्या मागून येऊन माझे डोळे झाकले...."ओळख बघु.... मी कोण?
मी दोन्ही पायाच्या मध्ये डोकं खुपसून बसलो होतो...
छे! हा भास असावा.... असं कुणी आपला लाड करवून घेनारा नाहीच या जगात...मी पण ना! आजकाल अशीच स्वप्न बघायला लागलोय.
एवढ्यात माझ्या झोळीत कुणीतरी एक मोठ्ठा खोका, सुंदर रंगीत रिबीन लावून रंगीत कागदांनी पॅक केलेला ठेवला....मी चाचपडत उठून बसलो...कुणी आजूबाजूला दिसतंय का म्हणून बघायला....
पण.... मला कुणीच दिसेना...सगळीकडे सामसूम झालेली. आता हॉटेलमधले लाईट सुद्धा बंद झाले होते. स्ट्रीट लाईट लाईट चा उजेड होता फक्त...
अचानक तू समोर आला, मी जोराने ओरडलो, "सांता....तू"....तू खरंच गिफ्ट आणलंय माझ्यासाठी.
माझा विश्वासच बसेना.... असंही होऊ शकतं म्हणून.
तू मला आपल्या कवेत घेऊन गररsssकन गोल गिरकी मारली...आणि तू नाहीसा झालास एखाद्या जादूगरासारखा.
तुझ्या पोशाखाचा मऊ मऊ स्पर्श अनुभवला मी त्या दिवशी स्वतःला खूप भाग्यवान समजलो...
सांता, मला माफ कर, तुझ्या बाबतीत माझा एक मोठा गैरसमज होता...."संताक्लाज फक्त श्रीमंतांच्याच घरी जातो त्यांनाच गिफ्ट देतो"
असं काही नसतं....सगळेच सांता असे नसतात बरं का!
काही सांता असे सुद्धा असतात, जसा मला भेटला..
बाय.... बाय.... सांता...लव्ह यु.
पुढल्या वर्षी नक्की भेट हं.... म्हणूनच हा शब्दप्रपंच. नक्की वाच माझं हे पत्र, माझ्या भावना समजून मला भेटून छान गिफ्ट दिलं त्याबद्दल.
काही चुकलं असेल तर क्षमा कर.

तुझ्याच प्रेमाचा भुकेला
छूटकू

©️®️चारुलता राठी