Feb 23, 2024
माहितीपूर्ण

संत जनाबाई यांची मराठीतून माहिती (Sant Janabai Information In Marathi)

Read Later
संत जनाबाई यांची मराठीतून माहिती (Sant Janabai Information In Marathi)
संत जनाबाई यांची मराठीतून माहिती


विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी

पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर
गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवाबरोबरी

बंका कडेवरी नामा कारंगुळी धरी
जनी म्हणे गोपाळा करि भक्तांचा सोहळा

हा अभंग संत जनाबाई यांनी लिहिलेला आहे. जनाबाईंचे अभंग त्यांच्या स्त्री पणाची आपणास एकसारखी जाणीव करून देत असतात. विठ्ठलाचे किती समर्पक आणि सुंदर वर्णन जनाबाईंनी या अभंगात केल आहे.

आपले वडील आपल्याला जत्रेत घेऊन जाणार म्हणून सगळी मुलं जशी आनंदाने अधीर होतात, त्याचे अगदी हुबेहूब शब्दात वर्णन या अभंगात आपल्याला दिसून येते. लेकुरवाळा बाप विठ्ठल आणि त्याची हौशी, खोडकर, सारी संत मुलं असं एक सुंदर चित्र आपल्याला या अभंगातून प्रत्ययास येतं.

गावाकडचा एखादा हौशी बाप आपल्या मुला-बाळांना जत्रेत घेऊन जातो असे मनोज्ञ, भाव चित्रण जनाबाईंनी या अभंगात केले आहे.


विठू म्हणजे एक लेकुरवाळा बाप आणि संपूर्ण संत मंडळी तिची लेकरं अशी कल्पना करून जनाबाईंनी हा अभंग रचला आहे. खरं तर विठ्ठल हा संपूर्ण विश्वाची माऊली म्हणजेच आई. पण इथे मात्र विठ्ठलाला त्यांनी वडिलांची भूमिका दिली आहे. वडील यात्रेला निघाले आहेत. एका खांद्यावर त्यांनी निवृत्तीला घेतलं आहे तर, दुसऱ्या खांद्यावरच्या सोपानाने त्याचा हात धरला आहे. ज्ञानेश्वर महाराज वडिलांच्या पुढे चालतात आहे, तर मुक्ताई त्यांच्या मागोमाग निघाली आहे. विठ्ठलाने बंकाला कडेवर घेतला आहे तर, संत नामदेवांनी विठ्ठलाची करंगळी धरली आहे. गोरा कुंभाराने विठ्ठलाच्या मांडीवर आपलं स्थान निर्माण केला आहे तर, संत चोखामेळा जणू विठ्ठलाचा जीवच आहे. जनाबाई पुढे म्हणतात की, ज्याप्रमाणे कृष्णाने गोकुळामध्ये त्याच्या सवंगड्यांना एकत्र घेऊन अनेक लीला केल्या, अनेक सण, उत्सव साजरे केले, त्याचप्रमाणे आता या कलीयुगात विठ्ठल त्याच्या भक्तांना सोबत घेऊन जणू आनंदाचा सोहळाच साजरा करीत आहे.आता थोडंसं संत जनाबाई बद्दल….. संत जनाबाईंचे वडील निस्सीम विठ्ठल भक्त होते, त्यामुळे त्यांना विठ्ठल भक्तीचा वारसा वडिलांकडून मिळाला. आई-वडिलांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने त्यांना नामदेवाकडे राहावे लागले.

जेव्हा त्यांची आई वारली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना दामा शेठजी कडे पोहोचले. दामाशेटजी नामदेवांचे वडील. नामदेवांच्या घरी नामदेव, त्यांची पत्नी, आई-वडील, नामदेवांचे चार मुलगे, त्यांच्या चार बायका, थोरली बहीण आणि मुलगी असा एकूण १४ जणांचा गोतावळा आणि त्यात पंधरावी जनाबाई. म्हणूनच जनाबाई स्वतःला म्हणतात, 'पंधरावी ती दासी जनी'.

आई-वडील नाही, स्वतःचे घरदार ही नाही, संसार नाही. मग जनाबाईंनी चक्रपाणी हाच आपला माय- बाप, बंधू-बहिण-सर्वस्व म्हणून मान्य केले. नामदेवांच्या घरचा स्त्री-वर्ग अखंड ईश्वरचरणी असतो. परंतु 'मजे ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी' असा विषाद तिने अभंगातून व्यक्त केला. नामदेवाच्या कुटुंबातील सर्व कामे जनाबाईंना करावी लागत. शेण-गोठा, झाडलोट, पाणी भरणे, कपडे धुणे, साळी कांडणे, इतर दळण कांडणं करताना त्यांचा विठोबाशी आंतर संवाद सुरू असे. संत सहवास,नाम भक्तीतील आर्तता, यामुळे त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार घडला. विठ्ठलाशी एक्य भाव निर्माण झाला, देहाचा पालट झाला, त्यांचे शारीरिक कष्टात विठ्ठल त्यांना मदत करू लागला. म्हणूनच त्या म्हणतात -" झाडलोट करी जनी | केर भरी चक्रपाणि. "

जातीक्षुद्रतेमुळे जनाबाईंना बडग्यांचा खूपच त्रास झाला. तो त्रास त्यांनी त्यांच्या अभंगातून वर्णन केला आहे. त्या एकादशीच्या दिवशी पांडुरंग दर्शनाचा संकल्प करून, गहिवरलेल्या अंतःकरणाने पूजा साहित्य घेऊन मंदिराकडे निघालेल्या होत्या. त्यांना येताना पाहून मंदिरातील बडग्यांनी खूप त्रागा केला आणि त्यांचे पूजेचे ताट भिरकावून दिले. एवढेच नाही तर विठोबाच्या गळ्यातील पदक चोरल्याचा आळ घेऊन 'अगे शिंपयाचे जनी | नेले पदक दे आणूनी' असा दमही भरला.

ज्या विठ्ठलामुळे आपल्याला लोकोपवाद सहन करावा लागत आहे, त्याला त्याची चाड नाही, याचा वैताग येऊन त्यांनी 'अरे विठ्या विठ्या | मूळ मायेच्या कारट्या' अशा सात्विक संतापाने विठ्ठलाला शिव्याही दिल्या आहेत. विठ्ठलाची शपथ घेऊन त्यांनी 'मी पदक घेतले नाही' असे व्याकुळ होऊन सांगितले तरी ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला, मारहाण केली आणि सुळावर चढवण्याची शिक्षा दिली, पण त्याचवेळी चमत्कार घडला. सुळाचे पाणी झाले आणि त्यांच्या अधिकाराची प्रचिती येऊन लोकांनी त्यांचा जयजयकार केला.

पण जनाबाईंच्या भावकाव्याचा विषय विठ्ठल हाच होता. 'जशी मोहोळ अशी लुब्धमाशी अशी तू सखी माझी होशी' हे विठू माऊलीशी असलेले सख्ख्यात्वाचे नाते तेच त्यांचे जीवनाचे श्रेयस आणि श्रेयस होते.

जनाबाईचे अभंग त्यांच्या स्त्री मनाची आपणास एकसारखी जाणीव करून देत असतात. त्यातील स्त्री-स्वर आपले लक्ष पुन्हा पुन्हा वेधून घेत असतो. जनाबाईंनी आपल्या विरुद्ध उभ्या असलेल्या उच्चवर्णीय समाजाची अजिबात दखल न घेता विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, 'डोईचा पदर आला खांद्यावर | भरल्या बाजारी जाईन मी' हा त्यांचा आक्रमक पवित्रा त्यांच्या 'लौकिक बंधनातून मुक्त' होण्याची तळमळ दर्शवितो.जनाबाईंच्या अभंगांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येईलसंत जनाबाई यांच्या अभंगांचे वर्गीकरण खालील प्रमाणे केलेले आढळते.

भक्तीपर अभंग - एकूण अभंग १५५, यामध्ये नाममहात्म्य, विठ्ठलमहिमा, भक्तिस्वरूप, आर्त भक्तीपर अभंग यांचा समावेश होतो.

परमार्थ जीवन - एकूण अभंग ५६, मनाचा निश्चय, आत्मस्वरूप स्थिती, मागणे अशा अभंगांचा समावेश होतो.

संतमहिमा - एकूण अभंग ४८, यामध्ये संतस्तुती, ज्ञानेश्वर स्तुती, सेना न्हावी आणि संत नामदेव यांच्या स्तुतीपर अभंगांचा समावेश होतो.

आख्यानपर रचना - एकूण अभंग ४५, यामध्ये हरिश्चंद्राख्यान, थाळीपाक, दशावतार, बालक्रीडा याचा समावेश होतो.

स्फुट काव्यरचना - एकूण अभंग ११, यामध्ये पाळणा, पदे, कूटरचना, आरती, जाते यांचा समावेश होतो.

हितवचने - एकूण अभंग ३२ - उपदेशवाणी आणि प्रारब्धगती यांचा समावेश होतो.


*******************************************
वाकळ

पीठ शेल्याला लागले झाला राउळी गोंधळ
कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल

पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर

कोणी शेला झटकला पीठ उडून जाईना बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना

झाली सचिंत पंढरी वाढे राउळी वर्दळ ठिगळाच्या पांघरूणा शेला म्हणती सकळ

फक्त जनिस दिसे होती तिची ती वाकळ
विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ

-श्री.दि. इनामदार

संत जनाबाईला दळण-कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग. परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो. पण इकडे मंदिरात वेगळाच गोंधळ होतो. पांडुरंगाच्या शेल्याला लागलेलं हे पीठ कुणाच्या घरचं आहे बरं? असा सगळ्यांना प्रश्न पडतो. कुणीतरी ते शेल्याचे पीठ थोडसं चाखून बघतो, तर त्याला ते साखरेहून गोड लागतं. एक जण ते पीठ हुंगतो तर त्याला कापुराचा वास येतो. एक जण सुचवतो की, तो शेलाच झटकून टाका म्हणजे शेल्याला लागलेलं पीठ निघून जाईल. पण शेल्याला लागलेले पीठ झटकलं तरी निघेना आणि धुतलं तरीही निघेना. इकडे विठ्ठलाला मात्र वेगळाच पेच पडला. त्याला असं वाटलं 'आपण जनीला दळण दळण्यात मदत केली आणि मंदिरात परतताना शेला तिथेच ठेवून चुकीने तिची गोधडी पांघरून आलो. आता लोकं जनीला खूप बोल लावतील.' पण झालं मात्र उलटच. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विठ्ठलाच्या अंगावर शेला दिसत होता आणि जनीला मात्र आता ही वाकळ लोकांना दिसली तर माझ्यावर आळ येईल अशी काळजी वाटत होती.

पण जनाबाईंच्या निस्सिम भक्ती मुळे चमत्कारच झाला आणि मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला जनाबाईंची वाकळ ही पांडुरंगाच्या अंगावर शेला म्हणूनच दिसत होती.
©® राखी भावसार भांडेकर

****************************************
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//