Feb 24, 2024
माहितीपूर्ण

संत एकनाथ महाराज यांची मराठीतून माहिती (Sant eknath Maharaj information in Marathi)

Read Later
संत एकनाथ महाराज यांची मराठीतून माहिती (Sant eknath Maharaj information in Marathi)
संत एकनाथ महाराज यांनी चतु:श्लोखी भागवत हा पहिला ग्रंथरचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यानकाव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातिपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात त्यांनी सामावून घेतले.


भारुड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली, त्यामुळे भारुड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला.

भारुड हे 'अध्यात्मिक रूपक' असते. सर्वसामान्य जनतेला परमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्या मागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून संसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत.

त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडे लिहिताना लौकिक छंद वापरले. त्यांनी वासुदेव, भराडी, गोंधळी, भुत्या, पोतराज, जोशी, दरवेशी, पिंगळा, शकुनी, कोल्हाटी, माळी, मांड, जोगी, जागल्या यांसारख्या लोकभूमिकांचे माध्यम वापरले. त्या लोकभूमिकांबरोबर शिमगा, होळी, गोंधळ, फुगडी यांसारखे खेळ व सण आणि विंचू, सर्प, गाय, एडका, पोपट, पाखरू यांसारखे पशुपक्षी उपयोगात आणले. जोहार, आशीर्वादपत्र, चोपदार यांसारखे दरबारी विषय आणि रहाट, बाजार(हाट), सासुरवास, यांसारखे संसारी विषय ही त्यांची सामग्री होती. त्याचबरोबर महालक्ष्मी, अंबा, कान्होबा यांसारख्या दैवी भूमिका त्यांनी लेखनात हाताळल्या. नाथांनी अशा विविध तऱ्हांनी ‘रूपक पद्धती’ने भारुडे लिहिली आहेत.

विषयांची विविधता आणि भारुडातून मांडलेले तत्त्वचिंतन लक्षात घेता नाथांच्या भारुडांचे पुढील प्रकारांत वर्गीकरण करता येते.


अ. मानवी भूमिका दर्शवणारी भारुडे – या भारुडांचे पुन्हा सात उपप्रकार पडतात.

१. प्रबोधनात्मक मानवी भूमिका दर्शवणारी भारुडे. उदाहरणार्थ, वासुदेव, जोशी, पागुळ, पिंगळा, सरवदा इत्यादी.

२. जाती-व्यवसाय दर्शवणारी भारुडे. उदा. भट-भटीण, महार-महारीण, माळी, कंजारीण, वैदीण इत्यादी.

३. शारीरिक व्यंग दर्शवणारी भारुडे. उदा. मुका, आंधळा, बहिरा, नकटी इत्यादी.

४. ‘सौरी’ व्यवसायात्मक भारुडे. उदा. सौरी, कुंटीण, जगझोडी इत्यादी.

५. नाती-गोती सांगणारी भारुडे. उदा. दादला, बायकला, पोर, मुलगी इत्यादी.

६. सामाजिक वृत्तिदर्शक भारुडे. उदा. चोपदार, जागल्या इत्यादी.

७. गावगुंडी विषयावरील भारुडे. उदा. गावगुंड, आडबंग इत्यादी.

ब. दैवी-भूमिका व भूत-पिशाच्चविषयक भारुडे. उदाहरणार्थ, महालक्ष्मी, जोगवा, भुत्या, कान्होबा इत्यादी.

क. पशु-पक्षीविषयक भारुडे. उदा. गाय, विंचू, एडका, पोपट, पाखरू, टिटवी, बैल, कुत्रे इत्यादी.

ड. ‘कूटे-कोडी-नवल’विषयक भारुडे. उदा. कोडे, नवलाई इत्यादी.

इ. खेळ-सण व उत्सवविषयक भारुडे. उदा. होळी, फुगडी, हळदुली, शिमगा, जाते, पिंगा, एकीबेकी, हमामा, हेतूतू, झोंबी इत्यादी.

फ. जोहार-दरबारी पत्रे व दरबारी विषयावरील भारुडे. उदा. जोहार, आशीर्वादपत्र, अर्जदस्त, अभयपत्र, जाबचिठ्ठी, ताकीदपत्र इत्यादी.

ग. संसारातील व्यवहारी गोष्टी – वस्तू आणि नैतिक बाबींविषयक भारुडे. उदा. बाजार-हाट, सासूरवास, व्यापार, नीती, थट्टा, रहाट, संसार इत्यादी.

विषयांची आणि रूपकांची विविधता हे तर नाथांच्या भारुडांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी काही भारुडांमधून सद्धर्माचे दान मागितले तर काही भारुडांतून विवेकाचा होरा सांगितला आहे. काही भारुडांतून सामाजिक दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध जोरदार फटके मारले तर काहींमधून सामाजिक विकारांचे व्यंगात्मक विनोदी पद्धतीने लोकांसमोर उभे केले. काही भारूंडामधून आत्मानंदाचा खेळ वर्णन केला तर जीवात्म्याने देहगावची सनद वाया घालवल्याबद्दल त्याला शिवात्म्याकडून जाब विचारला. कूटांमधून आध्यात्मिक कोडी मांडली तर काही भारुडांतून देहाहंकारी वृत्ती आणि त्यातून उद्भवणाऱ्या आसक्ती विकारांनी होणाऱ्या नाशाची जाणीव करून दिली.

त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली आहे.


भारुड – अंबा

सत्वर पाव गे मला ।
भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥

सासरा माझा गावी गेला ।
तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥

सासू माझी जाच करिते ।
लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥

जाऊ माझी फडफड बोलति ।
बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥

नणंदेचे पोर किरकिर करिते ।
खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥

दादला मारून आहुति देईन ।
मोकळी कर गं मला ॥ ६ ॥

एका जनार्दनि सगळेच जाऊ दे ।
एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥

पूर्वीच्या काळी मुलींची लहान वयात लग्न व्हायची आणि त्यांना सासरी जावं लागे. सासरच्या भल्या मोठ्या खटल्यात त्या मुलीला कोणीही लवकर सामावून घेत नसे. वयाने, अनुभवाने लहान म्हणून तिला सारे जण जाच करायचे. सासरी जाच होणारच हे प्रत्येक स्त्रीने गृहीतच धरलेले होते.

याच सर्वमान्य समाजाला एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून रूपकात्मक वाचा फोडली आहे.

सासरी नांदायला गेलेली स्त्री म्हणजे या पृथ्वीतलावर जन्माला आलेला जीव आणि त्याला होणारा सासुरवास म्हणजे या भवसागरात त्याला परमार्थ प्राप्ती मध्ये निर्माण होणारे अडथळे असा या भारुडाचा परमार्थिक अर्थ आहे.

ती सासूरवासीन म्हणते, हे आई मी पराधीन सासुरवाशीण तुला फार काही नवस बोलू शकत नाही. परंतु रोडगा मात्र मी तुला नक्कीच वाहु शकते, कारण मी स्वयंपाकघरात राहते, तेवढाच हक्क आणि तेवढी तयारी माझ्याकडे नक्कीच होईल. मी तुला रोडगा वाहते हाच माझा नवस आहे आणि मला ह्या मोह-मायेच्या संसारातून मुक्त कर हाच संदेश या अभंगातून संत एकनाथ महाराज आपल्यापुढे मांडतात.


इथली सून म्हणजे ‘बुद्धी’ असून, ती आदीशक्तिची प्रार्थना करीत आहे कि, भवानी मी तुला नवस करते आणि त्या नवसासाठी तू मला पांव.

प्रपंच’ हे सासर असून, ‘हरिपद’ हे माहेर आहे. ‘अहंकार’ हा सासरा आहे. जोपर्यंत माझ्यापासून अहंकार दूर गेला आहे तोपर्यंतच मला मोक्षाची प्राप्ती होऊ दे. आणि माझे जीवाला अहंकाराचा वारा पुन्हा कधीही न लागू दे अशी ती देवीकडे मागणी करते आहे.

ईथे ‘कल्पना’ ही सासू आहे. तिला लवकर ने…
म्हणजे त्या सासुरवाशीणीने आपलं वैवाहिक जीवन खूप छान, सुखद, आनंददायी असेल अशी कल्पना केली होती परंतु व्यवहारिक जीवनातील कष्टांमुळे आणि या नश्वर जगाच्या वास्तवाची प्रचिती आल्याने ती म्हणते, की माझी ही कल्पना तू लवकरात लवकर घेऊन जा.

‘इच्छा’, ‘निंदा’ या जावा असून, त्याना बोडकी कर….
म्हणजेच संसारात राहताना मनात अमर्याद इच्छा निर्माण होतात आणि त्या पूर्ण झाल्या नाही की चिडचिड होते, मनस्ताप होतो. तर कधी कधी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त ऐहिक सुख मिळत आहे म्हणून आपण त्यांची निंदा करायला ही मागे पुढे पाहत नाही, म्हणूनच या अमर्याद इच्छा आणि निंदा यांचा समुळ नायनाट करण्यासाठी ही सून त्यांना बोडकी करण्याची विनंती देवीला करते आहे.

ममता’ ही नणंद असून ‘दु:ख’ हे तिचे पोर आहे. ही ममता रूपी माझी नणंद, तिचं दुःखरूपी कार्ट माझ्या घरी राहते. आणि ते कार्ट सारख किरकिर करत राहते. म्हणजे मी काहीही करू दे. त्याचं रुपांतर हे दु:खामध्ये करत. एक दिवस सुखानं संसार हे होऊ देत नाही, मला सुखाने राहू देत नाही. म्हणून या दुःखरूपी माझ्या नंणदेच्या त्या पोराला. खरुज होऊ दे. त्यालाच दुःख होऊ दे म्हणजे ते आम्हाला ते त्रास द्यायचं थांबेल.‘काम’ हा दादाला (नवरा) आहे जो नित्य माझा भोग घेतो त्याशिवाय त्याला दुसर काही सुचतच नाही, आता मी त्याला (दादल्याला) मारून तुला आहुती देते, पण हे आई तू मला त्या कामरूपी नवऱ्यापासून मोकळी करा…. ‘क्रोध’ हा दीर आहे त्याच्यापासून मला कायमची मुक्त कर अशी विनवणी ही स्त्री देवीकडे करते आहे.


स्रीला नकाराचे स्वातंत्र्यच नव्हते. लहान वयातच घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत असत. फक्त संसार करायचा यापलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता. त्या काळातील स्त्रियांना जणू या भारुडाने बोलकं केले


बया बया बया !
काय झालं बया ?

दादला नको ग बाई
मला नवरा नको ग बाई !

मोडकंच घर, तुटकंच छप्पर
पन र्‍हायाला जागा नाही
मला दादला नको ग बाई !

फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी
पन शिवायला दोरा न्हाई
मला दादला नको ग बाई !

कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
वर तेलाची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !

एका जनार्दनी समरस झाले
पण तो रस येथे नाही
मला दादला नको ग बाई !


दादला म्हणजे नवरा आणि तो लग्न केल्याशिवाय मिळत नाही. लग्न केलं म्हणजे संसार आला, मुलं आली, कुटुंबातील इतर मंडळीही आलेत. एकदा संसारात पडलं की रोजच्या रहाटगाडग्यात सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करता करता त्या गृहिणीला देवाचं नाव घ्यायला वेळच मिळत नाही म्हणून ती वैतागून म्हणते की मुळात या सगळ्या कारणीभूत असणारा दादलाच मला नको आहे.

ही संसारात वैतागून गेलेली गृहिणी म्हणते की, माझं घर मोडकळीस आलेलं आहे, त्याचं छप्परही तुटलेलं आहे, ऊन, वारा, पाणी पावसात मला आणि माझ्या लेकरांना राहायला कुठेही जागा राहत नाही तर मी या घरात देवघर कुठे मांडू? मोडके घर हे मनुष्याच्या पार्थिव देहाचे रूपक आहे. तुटलेलं छप्पर म्हणजेच व्यक्तीचं अज्ञान आहे आणि त्या घरातलं देवघर हा सर्वांप्रतीचा शुद्ध भाव आहे.

त्या गृहिणीला सगळ्यांसाठी सगळं व्यवस्थित हवा आहे पण ते काही होत नाही आहे त्यामुळे ती वैतागून म्हणते की हा असला नवराच म्हणजेच संसार मला नको आहे.

दुसऱ्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे या संसारात काहीच चांगलं नाही आहे. प्रत्येकाच्या मनात एकमेकाविषयी द्वेष आहे, राग आहे, लोभ, मोह, माया यांनी सगळ्यांची मने पोखरलेली आहेत, त्यामुळेच माणसाचं आत्मारूपी सुवर्ण वस्त्र हे फाटून गेलेलं आहे. आणि ते शिवण्यासाठी यमनियमाचे बंधन हवे पण तेही तिला संसाराच्या रहाटगाडग्यात मिळत नाही म्हणून तिला दादला नको आहे.

तिसऱ्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे, खरंतर हे जग शाश्वत नाही. मुक्ती हाच इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं अंतिम शाश्वत सत्य आहे; पण तरीही जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी लोकं चोऱ्या-माऱ्या करतात, खून-दरोडे पाडतात, परंतु त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी कुणीही तेलासारखा मायेचा स्निग्ध पुरवठा करीत नाही.

शेवटी संसारातल्या चटक्यांनी पळून निघालेली स्त्री म्हणते की मला शाश्वत सुख हवा आहे देवा प्रतीच खरं ज्ञान मला हवा आहे आणि त्या मार्गावर जाण्यासाठी ही सगळी नातीगोती माझ्या पायात वेड्या घालत आहेत आणि मला सगळ्यात शेवटी परमात्म्याचं अमृतरस रुपी ज्ञान हवा आहे परंतु संसार चक्रात अडकल्याने तो रस मला मिळत नाही आहे त्यामुळेच मला या संसार रुपी दादल्याचा कंटाळा आला आहे आणि मला तो नको आहे.


महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.
महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.


©® राखी भावसार भांडेकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//