संस्कारच नाहीत

-----------------

संस्कारच नाहीत

© आरती पाटील

" आजकालच्या मुलींवर संस्कारच नाहीत. " वसुधा बाई आज चारचौघीमध्ये सरिता म्हणजेच आपल्या सुनेला बोलल्या. नेहमीच कडू बोलण सरिता सहन करत होती पण आज तिच्या सासूबाईंनी चार चौघीमध्ये तिला अपमानित केलं होतं. अगदी संस्कार काढले होते. आज मात्र सरिता खूप चिडली होती.

सरिता जवळपास दीड वर्षांपूर्वी जयशी लग्न करून या घरात आली होती. सरिता एका संस्कारी आणि घरंदाज घरातून होती. M. Com करून एका कंपनी मध्ये काम करणारी,नाकासमोर चालणारी, घरकामात पण तरबेज असलेली सरिता वसुधाबाईंनी आपल्या मुलासाठी जयसाठी निवडली. लग्न धूमधडक्यात पार पडलं.

वसुधाबाईंची एक मुलगी होती मधू, जी लग्न करून जवळच रहात होती. त्यामुळे सारखंच जाण येणं सुरु असायचं. सरिता घरातील सर्व कामे करून ऑफिसला जायची येवून सर्व काम करायची. सरिता आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देत नव्हती. सरिताची रविवारची हक्काची सुट्टी सुद्धा नणंदेची कामे करण्यात जातं होती. तरी सुद्धा सरिता संयम बांधून होती.

मधू सरिताची नणंद जेव्हा यायची तेव्हा ती सरिताला न विचारता तिचं कपाट खोलून सर्व पाहत असे. तिला जे आवडेल ते घेऊन जातं असे. खास करून तिच्या साड्या. सरिताची निवड छान होती. त्यामुळे ती साडी घेताना चोखदळ असायची. साडीचा रंग, डिसाईन, पॅटर्न सर्व बघून घ्यायची. ऑफिसला ती ड्रेस वापराची त्यामुळे तिच्याकडे साड्या मोजक्याच पण सुंदर असायच्या, कार्यक्रमाला, सण समारंभाला ती आवर्जून साडी नेसे.

हळूहळू तिची नणंद तिच्या साड्या एक एक करून नेऊ लागली. सरिताने पुन्हा नवीन घेऊन ठेवल्या. पण त्याही मधू नऊ लागली ते ही न विचारता. वहिनीला काय विचारायचं? असा तिचा तोरा होता. एकदा तर ती सरिताला जयने आणलेली साडी सुद्धा घेऊन गेली. सरिता त्यादिवशी खूप उदास होती. तिने जयला सांगितलं तर तो म्हणाला मी नवीन आणून देतो तुला. न सांगता आणलेल्या साडीत प्रेम होतं. पण आता तो जो साडी आणेल ती फक्त एक औपचारिकता म्हणून. त्या साडीच्या जागी ही साडी घे म्हणून. सरिताला ही गोष्ट खुपू लागली. ती सासूबाई कडे जावून म्हणाली, " आई ताईंना सांगा त्यांना एखादी साडी आवडली तर मला सांगायला. मी त्यांना नवीन आणून देईन. " हे ऐकून वसुधा बाई खूप संतापल्या. म्हणाल्या, " माझ्या मुलीला भीक लागली आहे का तुझे उपकार घ्यायला? " त्या बराच वेळ बडबडत होत्या पण वाद वाढू नये म्हणून सरिता गप्प बसली.

मधुने ( नणंदेने ) जवळ जवळ तिच्या सर्वच साड्या नेल्या होत्या. आणि अचानक वसुधाबाईंनी घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठरवला. त्यामुळे सरिताला नवीन साडी घेऊन त्यावर ब्लाउज शिवता आला नाही. त्यामुळे तिने छानसा ड्रेस घेतला. सरिता जशी बाहेर आली तसं हळदी कुंकूला आलेल्या बायकांपैकी एकीने विचारले, " सरिता अगं आज तरी साडी नेसायचीस. " त्यावर सरिता काही बोलणार तोच तिची सासू बडबडू लागली. " आजकालच्या मुलींवर संस्कारच नाहीत. आई - वडील असे कसे पाठवतात कोरडा दगड कळत नाही. एवढ्यावर्षात साधे संस्कार देता आले नाहीत मुलींना. " हे सर्व ऐकून आणि चार चौघीमध्ये झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागला. एरवी घरी, घरच्या माणसांमध्ये बोलतात ठीक आहे पण आज? सरिता खूप संतापली आणि म्हणाली, " हो आई बरोबर बोललात. खरंच काही आईंना हे कळतंच नाही की आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत. जसं तुम्हाला कळलं नाही. " हे ऐकून आणि सरिता असं सर्व बायकांमध्ये बोलल्यामुळे तिच्या सासूबाई रागाने उसळल्या, " तू मला सर्वांसमोर बोलतेस लाज नाही वाटतं का? माझे संस्कार काढतेस? "

"हो सासूबाई, तुमचेच संस्कार असतील ना मधू ताईंवर जे त्या कधीही आल्या तर न विचारता माझ्या कपाटाला हात लावतात, जे आवडतं ते घेऊन जातात तेही न विचारता. मला संसार आहे, मला स्वप्न आहेत. माझा नवरा प्रेमाने साडी घेऊन येतो, त्यात त्याचं प्रेम असते, मला त्यात एक बंधन जाणवत. माझी आई साडी देते त्यात माझ्या आईची ममता असते. ताई येवून जातात तेव्हा न विचारता घेऊन जातात. मला त्रास होतं नसेल? माझ्यावर संस्कार आहेत म्हणून एवढे दिवस सहन करत होते. तुम्ही पण ताईंची पाठराखण करत होतात. संस्कार नसते तर कधीच वाद विकोपाला गेले असते. एवढे दिवस मी सर्व ऐकत आले पण आज तुम्ही सर्व बायकांसमोर मला अपमान केलात. आज मी साडी नेसली नाही कारण आता माझ्याकडे एकही साडी नाहीये. सर्व ताई घेऊन गेल्यात. आज पण बघा ताई जी साडी नेसल्यात ती माझ्या आईने मला दिली होती तिचं आहे. तुम्ही अचानक हळदी कुंकू चा कार्यक्रम ठेवलात त्यामुळे मला नवीन साडी आणताही आली नाही. असं असताना तुम्ही माझेच संस्कार काढताय तेही चार जणांमध्ये? तुम्ही तुमच्या मुलीला एक चांगलं घर ( सासर) पाहून द्यायचं होतं, जिथे किमान त्यांना साड्या तरी घेता आल्या असत्या. अश्या दुसऱ्याच्या उचलून न्याव्या लागल्या नसत्या. "

हे ऐकून सर्व बायका कुजबुजू लागल्या. वसुधाबाईंचा राग अनावर झाला होता तर मधू रागाने तिथून निघून गेली. रात्री जय आल्यावर वसुधा बाईंनी खूप आरडा ओरड केली. शेवटी कंटाळून जय म्हणाला, " आई ताईच लग्न झालं तेव्हा सहा महिन्यात ताई वेगळी झाली भावोजीना घेऊन का तर सासूबाई आणि नणंदचा त्रास होतं होता तिला. नणंद आणि सासूबाई चांगल्याच होत्या तिच्या पण तिला जबाबदारी नको होती, रोक टोक नको होती. आज ताई सरिता सोबत जे वागते तुला काय वाटतं मी काय करायला हवं? मला दिसत होतं की ताई न सांगता, न विचारता सारितच्या गोष्टी घेऊन जाते. सरिताने मला कधी सांगितलं नाही. त्यादिवशी मी आणलेली साडी ताई घेऊन गेली त्याचं तिला वाईट वाटलं म्हणून तिने मला सांगितलं, तुलाही सांगितलं. तू तिलाच दोष दिलास. तूच सांग कोणाची चूक आहे? तुझ्या वस्तू कोणी न विचारता नेल्या तर? आणि सारखाच नेत राहिलं तर? शिवाय एवढे दिवस सरिता काही बोलली नाही तुला. तूच चार जणींसमोर तिला बोललीस. एवढा अपमान कोण सहन करेल? तेही चूक नसताना? ताईला वेगळं होण्याचा सल्ला तूच दिला होतास, परत काही असं झालं तर, मला वाटतं की मला पण तोच सल्ला अमलात आणावा लागेल. असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला.

वसुधाबाई मात्र डोक्याला हात लावून बसल्या होत्या आणि आपण आपल्या मुलीला दिलेल्या संस्कारांबद्दल विचार करत होत्या.

समाप्त...