संस्कारच घडवी व्यक्तिमत्त्व

How the morals n ethics are important.


गोष्ट छोटी डोंगराएवढी (२१)

विषय - मना घडवी संस्कार

शीर्षक - संस्कारच घडवी व्यक्तिमत्त्व

©®लेखिका- स्वाती बालूरकर , सखी


संस्कार म्हटलं की आपण सरळ सरळ त्याचा संबंध संस्कृतीशी जोडतो.
संस्कृती म्हटलं की आपली वागण्या बोलण्याची पद्धत किंवा आपल्या जगण्याची पद्धत आणि आपल्या जगण्याची पद्धत किंवा नियम म्हणजेच आपला धर्म !
आपले संस्कार कुठेतरी धर्माशी निगडित असतात हे सत्य आहे.

मानवाने बनवलेल्या तथाकथित धर्मांव्यतिरिक्तही एक धर्म सगळ्यांचाच आहे आणि तो आहे मानवता धर्म ,म्हणून थोरा -मोठ्यांचा, स्त्रियांचा आदर करणे, नम्रतेने बोलणे, अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करणे ह्या गोष्टी सामाजिकपणे संस्कार मानले जातात.

समाजातला त्या व्यक्तीचा धर्म कुठलाही असो पण ह्या वरील गोष्टींना संस्कारक्षम मानलं जातं.

आता वळूयात हिंदू धर्मातल्या पुराणात किंवा शास्त्रात सांगितलेल्या १६ संस्कारांकडे! हे संस्कार म्हणजे केवळ सवयी नसून त्याचा खोल व गहन अर्थ चारित्र्य व व्यक्तिमत्त्वाशी आहे . परंतु यातले काही संस्कार आता प्रासंगिक वाट त नाहीत किंवा या काळात ते उपयोगी नाहित , शक्य नाहीत म्हणून ते कालबाह्य झालेत.

परंतु १६ मधील ४-५ संस्कार अजूनही पाळ ले जातात कारण ते आजही उपयोगी व मान्य आहेत.

शास्त्रातले सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते.

सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे.

गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे.

हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते.

माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत :

गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, सूर्यावलोकन, निष्क्रमण, अन्नप्राशन, वर्धापन, चूडाकर्म, अक्षरारंभ,
उपनयन, समावर्तन, विवाह, अंत्येष्टी किंवा अंत्यसंस्कार !

या संस्कारांमुळे जन्माच्या आधीपासून तर मृत्युपर्यंत मनुष्य नियमात बांधलेला राहतो.

पण रोजच्या जीवनात बोलताना वागताना आपण शास्त्रातले संस्कार गृहित धरत नाही तर आपण माणसांच्या वागण्यालाच त्याचे संस्कार समजतो.
म्हणून संस्कार शरीरावर नव्हे तर मनावर झाले पाहिजेत मग तेच संस्कार माणसाचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व घडवतात.

म्हणजे या सगळ्यां व्यतिरिक्त मुलं जेव्हा उद्धटपणे वागतात तेव्हा तुझ्या आई बापाने हेच शिकवलं का रे म्हणताना काढलेले संस्कार हे सामान्य वागण्या बोलण्याचे संस्कार आहेत , ते काही  शास्त्रीय नाहीत किंवा लग्नानंतर मुलीला घरातलं काम नाही आलं तर तुझ्या आईने काय संस्कार दिलेत ? असं विचारलं तर उत्तर म्हणून जे येईल ते सामाजिक संस्कार !

परंतु आजकालच्या काळात तुम्ही कुठल्या वातावरणात राहता? कसं बोलता ? काय परिधान करता ? तुमची आर्थिक स्थिति ? तुमचं ब्रांडेड वस्तु वापरणं  यावरून  तुमच्या व्यक्तिमत्त्वाला मोजलं जातंय हे दुर्दैव  आहे.

नीतीमत्ता, नैतिक व अनैतिक यांच्या व्याख्याच राहिल्या नाहीत.


तरीही जेव्हा मुलांच्या संगोपणाची किंवा वागण्या बोलण्याची वेळ येते त्यावेळी मात्र तुम्ही किती सत्संगात जाऊन बसता किंवा मुलांच्या पालनपोषणावरती पुस्तक वाचता हे कामी येत नाही.
घरात आई वडिल मुलांसमोर भांडत असतील तर मुलांना ते भांडण करू नये हे सांगूच शकत नाहीत.

कुणाकडूनही उपदेश घ्या परंतु जोपर्यंत तुमची मुलं तुमचं वागणं पाहत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती संस्कार होत नाहीत असं मला तरी वाटतं.
कारण मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे हे तोंडी सांगण्याने इतके संस्कार होत नाहीत जितके जास्त संस्कार जर मुलांनी घरामध्ये आई-वडिलांना आजी-आजोबांशी प्रेमाने वागताना, सन्मानाने बोलताना पाहिलं असेल, काळजी घेताना पाहिला असेल.

कदाचित तुमच्या अनुपस्थितीत कधीही, काहीही अडचण आली तरीही मुलं आठवतात की यावेळी माझी आई किंवा बाबा असते तर काय केलं असतं आणि ते तसेच वागायला लागतात यासाठी तुम्हाला बसून त्यांना उपदेश देण्याची गरज नाही.

या उलट तुम्ही उपदेश दिला आणि तुमच्याच वागण्यामध्ये विसंगती असेल तर मुलं कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.

म्हणून मुलांचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर पालकांना स्वतः तसं वागणं भाग आहे, वागताना पाहिलेले संस्कार अनुकरणाने मनावरती होतात आणि  आयुष्यात कितीही तोल जाऊ दे किंवा संगतीमुळे एखादा निर्णय चुकू दे, परंतु जेव्हा योग्य निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मुलांच्या मनावर जे संस्कार झालेले आहेत तेच मदत करतात.

म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमचे संस्कारच तुमचे व्यक्तिमत्व घडवतात आणि योग्य दिशा दाखवतात.

त्यामुळे घरातलं वातावरण कसं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. जे गूण मुलांमधे यावे वाटतात तसे तुम्ही वागायला लागा.

मोबाईल हातात घेवून तुम्ही मुलांना जर मोबाइल वापरू नको म्हणालात तर त्याचा परिणाम जास्त होणार नाही पण तुम्ही स्वतः मोबाइलचा वापर मर्यादित ठेवून पुस्तक वाचत बसलात तर मुलांना वेगळा उपदेश देण्याची गरज नाही.

एखाद्या कलेची उपासना केली , त्यावर चर्चा केली की आपोआप मुलांचं ज्ञान वाढतं आणि ते सुद्धा त्यात रस घ्यायला लागतात.

संस्कारक्षम मनच व्यक्तीला चारित्र्यवान व योग्य व्यक्ति बनवतं. म्हणून असं संस्कारी मन बनवण्यासाठी धडपड हवीच !

समाप्त

लेखिका ©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

दिनांक २७. ११ .२२