संस्कार

Sanskar Is Indicator Of Family Values, It Shows How Civilized And Cultured We Are

रमेशचं शिक्षण जेमतेम झाल्याने तो एका कंपनीत वर्कर म्हणून कामाला होता,त्याच्या मुलीला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने तो दिवसभर कंपनीत काम करायचा आणि रात्री एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. रमेशची मुलगी लहान असताना त्याच्या बायकोचे एका दुर्धर आजाराने निधन झाले होते, तेव्हापासून रमेशने एकट्यानेच आपल्या मुलीला वाढवले होते. रमेश आपल्या मुलीचे स्वप्न करण्यासाठी खूप कष्ट करत होता. 

रमेशची मुलगी नयन आता बारावीत होती, ती खूप अभ्यासू होती, तिला वडिलांच्या कष्टांची जाण होती. दिवसभर कॉलेज व कॉलेज नंतर ती क्लासला जायची आणि रात्री उशिरापर्यंत जागून ती अभ्यास करायची. नयनला शिकून खूप मोठे व्हायचे होते, तिला तिच्या वडिलांना सुखाचे आयुष्य देण्याची इच्छा होती.

एके दिवशी रात्री 8 च्या सुमारास रमेश हॉटेलमध्ये नेहमी प्रमाणे काम करत होता, तेवढ्यात त्याला नयनचा फोन आला होता.नयन फोनवर रडत होती, तिला नेमके काय झाले होते? हे तिने रमेशला सांगितले नाही, फक्त ताबडतोब घरी निघून यायला सांगितले. रमेश हॉटेल मालकाला सांगून नयनच्या काळजीने ताबडतोब तो आपल्या घरी गेला. घरी पोहोचल्यावर रमेश दारात उभा असतानाच नयन त्याच्या गळयात पडून खूप रडायला लागली. रमेश नयनला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, त्याने तिला घरात नेऊन एका खुर्चीत बसवले व तिला पाणी पिण्यासाठी दिले. नयन आता पहिल्या पेक्षा थोडी शांत झाली होती. रमेशची नजर बाजूला बसलेल्या एका मुलाकडे गेली. रमेश त्याच्याकडे बघून म्हणाला," नयन हा मुलगा कोण आहे? मी याला बघितल्या सारखे वाटत नाही आणि तु एवढी रडत का आहेस?"

नयन बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिला रडू आवरत नसल्याने तिला बोलताच येत नव्हते. शेवटी रमेश त्या मुलाकडे बघून म्हणाला," नयनला काय झाले आहे? आणि तु कोण आहेस? तु आमच्या घरी यावेळी काय करत आहेस?"

रमेशला पडलेले प्रश्न त्याच्या नजरेतून दिसत होते. तो मुलगा म्हणाला," काका माझं नाव अजित आहे. नयनला आज extra लेक्चर असल्याने तिला नेहमीपेक्षा क्लास वरुन परतायला आज उशीर झाला होता, आपल्याला घरी जायला उशीर होऊ नये म्हणून आज ती शॉर्ट कटने घरी येत होती पण रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर टवाळखोर मुलं बसलेली असतात ह्याची तिला कल्पनाचं नव्हती. मी माझ्या कामा निमित्ताने त्या रस्त्यावरुन चाललो होतो, तेव्हा ती टवाळखोर मुलं नयनची छेड काढत होते, तो रस्ता सामसूम असल्याने नयन ओरडून सुद्धा तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकत नव्हता. मी अचानक तिथे पोहोचलो आणि त्या मुलांच्या तावडीतून नयनला सोडवले. नयन खूप जास्त घाबरलेली होती, तिने मला फक्त तिचे नाव आणि पत्ता कसेबसे सांगितले मग मी माझ्या आईला फोन केला तेव्हा आईने मला सांगितले की नयनला तिच्या घरी सोडवून ये, मी तिला घेऊन घरी आलो तर तुम्ही नव्हतात, नयनला एकटं सोडून मला घरी जावं वाटलं नाही म्हणून मी तुमची वाट पाहत बसलो."

हे सर्व ऐकून रमेशच्या डोळयात पाणी आले, तो अजित समोर हात जोडून म्हणाला," अजित आज तु जर वेळेवर पोहोचला नसता तर काय झाले असते? याचा विचार करुन सुद्धा माझ्या अंगावर काटा येत आहे. तुझ्या रुपात देवाने येऊनच आज आमची मदत केली."

अजित म्हणाला," काका मी देवाला जास्त मानत नाही पण मी जे काही केले ते माझ्या आईच्या शिकवणुकीमुळेच, ती मला लहानपणापासून मुलींचा आदर करण्याचे शिक्षण देत आली आहे, मी आज जे काही केले आहे त्यामुळे माझ्या आईला माझा खूप अभिमान वाटत असेल."

रमेश म्हणाला," ज्या स्त्रीने तुझ्यावर इतके छान संस्कार केले आहेत ती खरंच खूप महान असेल. थोर तुझी आई आणि थोर तिचे विचार. तुझ्या आईसारखी शिकवण जर प्रत्येक आईने आपल्या मुलाला दिली तर ह्या जगात कोणत्याच मुलीच्या बापाला स्वतःच्या मुलीच्या सुरक्षिततेची काळजी करण्याची गरज राहणार नाही."

अजित म्हणाला," काका प्रत्येक आई आपल्या मुलाला चांगलंच शिकवते पण ते त्यातून किती शिकायचं आणि किती नाही? हे त्या मुलावर अवलंबून असतं. असो मी आता घरी जातो, माझी आई वाट बघत असेल."

रमेश म्हणाला," अजित तु घरी जाऊ शकतो, मला तुझा पत्ता देशील का? तुझ्या आईचे विचार ऐकून मला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे तसेच त्यांच्या विचारांमुळेच आज माझी मुलगी एका भयानक संकटातून वाचली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहे."

अजित म्हणाला,"काका तुम्ही माझ्या घरी येऊन आईला भेटू शकता पण जाता जाता एक गोष्ट सांगतो तेवढी तुम्हाला माझी ऐकावी लागेल. आज नयन सोबत जे झालं ते पुन्हा होईल ही मनात शंका ठेऊ नका आणि चुकीचे समज मनात धरुन तिचं शिक्षण बंद करु नका. नेहमीप्रमाणे तिला कॉलेज व क्लासला जाऊद्यात म्हणजे आजच्या घटनेचा परिणाम नयनच्या मनावर होणार नाही. माझी आई म्हणते की आपण जर कोणाचं वाईट केलं नाही तर देव आपल्या सोबत सुद्धा काही वाईट होऊ देत नाही."

रमेशला आपल्या घराचा पत्ता देऊन अजित आपल्या घरी निघून गेला. अजित गेल्यावर रमेशने नयनला समजावून सांगितले व पुन्हा कधीच त्या रस्त्याने यायचे नाही असे सांगितले. दुसऱ्या दिवसापासून नयनचं रुटीन जसं सुरु होतं तसंच राहिलं त्यामुळे त्या घटनेचा तिच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. दोन तीन दिवसांनंतर रविवार होता, त्यादिवशी रमेश व नयन दोघांना सुट्टी असल्याने संध्याकाळच्या वेळी नयन व रमेश अजितच्या घरी गेले. 

अजित एका मोठ्या आलिशान बंगल्यात राहत होता, त्याच घर लांबून बघूनच नयन व रमेश अवाक झाले होते. इतक्या मोठ्या बंगल्यातील मुलगा अश्या विचारांचा असू शकतो यावर रमेशचा विश्वास बसत नव्हता. रमेश व नयनला अजितच्या सांगण्यावरुन वॉचमनने गेटमधून आत सोडले. रमेश व नयन बंगल्याच्या दरवाजापाशी पोहोचेपर्यंत अजित दरवाजा जवळ आला होता, त्याने दोघांचे हसून स्वागत केले, त्यांना आपल्या घरात नेऊन सोप्यावर बसण्यास सांगितले. घरातील एका नोकराने रमेश व नयनला पाणी आणून दिले. एवढ्या मोठ्या घरात आल्यामुळे रमेश व नयन दोघेही अवघडल्यासारखे झाले होते, हे अजितच्या लक्षात आले होते, म्हणून तो त्यांना म्हणाला," तुम्हाला माझ्या घरी येऊन अवघडल्यासारखे होत आहे हे माझ्या लक्षात आले आहे पण तुम्ही रिलॅक्स बसा, माझं घर जेवढं मोठं आहे तेवढं आमचं मनही मोठं आहे, सो डोन्ट वरी. नयन तुझा अभ्यास कसा सुरु आहे? तुला काही मदत लागली तर मला सांग, मी अभ्यासात तसा बरा आहे."

नयन म्हणाली," दादा तु काय करतोस? त्यादिवशी घाई गडबडीत विचारायचंच राहून गेलं."

अजित म्हणाला," मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात आहे. पुढे जाऊन डॅडची कंपनीच जॉईन करायची असल्याने इंजिनिअरिंग करणे गरजेचे आहे तसा डॅडचा हुकूमच होता आणि डॅडचा शब्द मोडण्याची आमच्या घरात कोणामध्येच हिंमत नाहीये. माझे डॅड खूप स्ट्रिक्ट आहेत, तसे ते कामानिमित्ताने नेहमी बाहेरच असतात त्यामुळे आमची कधीतरी भेट होते."

रमेश म्हणाला," अरे त्यांना कामाचा तेवढा व्याप असेल. तुझी आई घरी आहे ना?"

अजित म्हणाला," हो, माझी आई नेहमी घरी असते, ती आहे म्हणून तर आमच्या या बंगल्याला घरपण आहे. तुम्ही आल्याचा निरोप मी आईला दिला आहे, ती इतक्यात येईलच."

अजित बोलत असतानाच त्याची आई रमेश व नयन समोर येऊन उभी राहिली. अजित आपल्या आईची ओळख करुन देणार इतक्यात रमेश आपल्या जागेवरुन उठत आश्चर्यचकीत होऊन म्हणाला, "सरला अजित तुझा मुलगा आहे का?"

"हो, एवढं आश्चर्य चकीत होण्याची गरज नाहीये. अजित माझाच मुलगा आहे." सरलाने उत्तर दिले

त्या दोघांच्या प्रतिक्रिया बघून अजित म्हणाला," आई तु रमेश काकांना ओळखते का?"

यावर सरला म्हणाली," हो रमेश माझ्या मैत्रिणीच्या घराजवळ राहत होता त्यामुळे मी त्याला ओळखत होते."

नयन म्हणाली," काकू हा तर योगायोगचं म्हणावा लागेल."

सरला म्हणाली," नयन बाळा आपण लहानपणापासून भूगोलात शिकत आलोय की पृथ्वी ही गोल आहे ते काही खोटं नाही."

रमेश यावर काहीही न बोलता खाली मान घालून बसला होता. नयन व अजित समोर असल्याने रमेशला काहीच बोलत येत नाहीये हे सरलाच्या लक्षात आले होते म्हणून ती अजितकडे बघून म्हणाली," अजित नयनला आपलं घर दाखवं आणि तिला आपली लायब्ररी पण दाखवं, तिला जी पुस्तके आवडतील ती आपल्या कडून भेट म्हणून देऊन टाक."

अजित नयनला घेऊन गेल्यावर सरला रमेश कडे बघून म्हणाली,"रमेश मला आज वाईट वाटतंय की नयन सारखी एवढी चांगली मुलगी देवाने तुला दिली आहे. रमेश तुला एक प्रचलित म्हण माहीत असेलच ना की \"करावे तसे भरावे\". तुला तुझ्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून तुझ्या मुलीवर त्यादिवशी तो प्रसंग ओढावला होता पण माझ्या मुलामुळे तो टळला व तुझी मुलगी त्या नराधमांच्या तावडीतून सुटली. मला अजितने सांगितले की तु माझ्या संस्कारांचं व माझं त्याच्यापुढे खूप कौतुक करत होतास आणि वरुन तु असंही म्हणाला होतास की माझ्या सारखी शिकवण प्रत्येक आईने आपल्या मुलाला द्यावी म्हणून.

रमेश तुला तुझ्या आईने मुलींवर बलात्कार करण्याची शिकवण दिली होती का? एखाद्या मुलीचे आयुष्य उध्वस्त करण्याची शिकवण दिली होती का? अरे त्यादिवशी तुझ्या मुलीचा बलात्कार झाला असता तर तुला माझ्या वेदना कळाल्या असत्या. आज नयन जर तुझ्या सोबत नसते तर मी तुला घराच्या बाहेर काढून दिले असते. तिच्या नजरेत तु हिरो असशील पण तिला जेव्हा तुझं कर्तृत्व कळेल तेव्हा ती तुझ्याकडे बघेल तरी का? आणि मी स्वतःहून तिला काही सांगेल एवढी नीच प्रवृत्ती माझी नाहीये. रमेश आयुष्यात असं काही करावं की माणसाने सतत ताट मानेनं रहावं आणि इथे तुला तर मान वर करुन बोलता सुद्धा येत नाहीये."

रमेश खाली मान घालून म्हणाला," सरला माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती याची कल्पना मला आहे, त्या वयात चांगलं वाईट काहीच कळत नव्हतं. मी जे करायला नको होतं तेच केलं होतं. मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच तु मला आवडली होतीस पण तु काही केल्या मला भाव देत नव्हती की माझ्या सोबत काही बोलत नव्हती मग मला तुझा खूप राग आला होता त्यात दोन तीन मित्रांनी तुला मिळवण्या साठीच्या कल्पना सुचवल्या आणि मी रागाच्या भरात तुझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या घरी जेव्हा हे कळालं होतं तेव्हा माझ्या वडीलांनी मला खूप मारलं होतं, आई तर माझ्यासोबत शेवट पर्यंत प्रेमाने बोलली नाही. तु एका मोठ्या घरातील मुलगी होतीस, तुझ्या घरचे माझ्या जीवाचं काही बरं वाईट करतील या भीतीने माझ्या वडिलांनी मला मामाच्या घरी जाऊन रहायला सांगितले होते. त्या दिवशी नयन सोबत ती घटना घडल्यावर रात्रभर मी केलेली चूक मला आठवत होती, त्यादिवशी मला समजलं की मी केलेल्या एका चुकीमुळे तुला व तुझ्या घरच्यांना किती काही सहन करावं लागलं असेल. सरला त्यावेळी मी तुझी माफी मागू शकलो नाही पण प्लिज आत्ता मला माफ कर. मी हे ओझं घेऊन आयुष्यभर जगू शकणार नाही. मला स्वतःचीच लाज वाटत आहे."

सरला म्हणाली," मी तुला माफ केले काय किंवा नाही केले तरी त्याने फारसा फरक पडणार नाही. तु ज्या घटनेला चूक म्हणत आहेस त्यामुळे माझं आयुष्य उध्वस्त झालं होतं, त्या घटनेमध्ये माझी काहीही चूक नसताना त्याची मी आजपर्यंत शिक्षा भोगत आहे. मी चांगल्या घरातील होते, माझ्या वडिलांचं नाव गाजलेले होते पण माझ्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून माझा जराही विचार न करता, माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न एका घटस्फोटित श्रीमंत माणसासोबत झालं, त्याला आधीच एक मुलगा होता. त्या माणसाने माझ्या सोबत लग्न फक्त त्यांच्या मुलाचा सांभाळ करावा यासाठी केलं होतं, त्यांनी माझ्याकडे कधीच त्यांची बायको म्हणून या नजरेने बघितलं नाही. माझ्यात व त्यांच्यामध्ये नवरा बायको सारखे कुठलेही संबंध नाहीत. 

अजितला मी जन्म दिलेला नाही. लग्न झाल्यापासून त्याचे डॅड महिन्यातून मोजून दोन किंवा तीन दिवस आमच्या सोबत या घरात राहतात. सुरवातीला काही दिवस मी त्यांच्या कडून अपेक्षा ठेवल्या होत्या पण कालांतराने मला याचं काहीच वाटलं नाही. अजितला मी माझा मुलगा मानून त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली, त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला लागले, त्याला वाढवताना मी एकच गोष्ट ठरवली होती की एका पुरुषामुळे माझं आयुष्य उध्वस्त झालं होतं पण माझ्या मुलामुळे कुठल्याच मुलीचं आयुष्य उध्वस्त झालं नाही पाहिजे आणि म्हणूनच मी त्याच्यावर तसे संस्कार करायला सुरुवात केली."

रमेश म्हणाला," सरला तु अजित वर अतिशय चांगले संस्कार केले आहेत. अजित खरंच खूप चांगला मुलगा आहे. मी एक विनंती करतो की प्लिज मी केलेल्या चुकीबद्दल तु अजित व नयनला काहीच कळू देऊ नकोस."

सरला म्हणाली," अजितला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नाहीये, नयनला मी याबाबतीत काहीच सांगणार नाही. मी काही दिवसांपूर्वी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे, त्याच्या अंतर्गत मी \"संस्कार\" नावाचे एक यूट्यूब चॅनल सुरु केले आहे, त्या चॅनलवर मी असे काही व्हिडीओ टाकते त्यात मुलांवर कोणते संस्कार, कोणत्या वयात व कसे करावेत? याबद्दल माहिती देत असते. हल्ली आई वडील दोघेही नोकरी करत असल्याने त्यांना आपल्या मुलांना जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे अश्या व्हिडीओ मुळे त्यांची थोडीफार मदत होते, काही मुलंही ते व्हिडिओज मन लावून बघतात तर त्यांच्यावर पण परिणाम होताना दिसून आला आहे. बलात्कार करण्याच्या वेळी तुझ्या मनात झालेल्या भावना, त्यानंतर झालेला पश्चाताप आणि आपल्या मुलीवर तसाच प्रसंग ओढवला असता या कल्पनेने तुझ्या मनात उठलेले विचार हे सर्व एका कागदावर लिहून दे म्हणजे या विषयावर मी माझ्या चॅनलवर व्हिडीओ टाकण्याचा माझा विचार आहे. एवढं तर तु करुच शकतोस ना?"

रमेशने मान हलवून होकार दिला. अजित व नयन पूर्ण घर बघून आल्यावर रमेश व सरलाला पुढे काही बोलता आलं नाही. नयन म्हणाली," काकू अजित दादाने मला तुमच्या युट्युब वरील \"संस्कार\" नावाच्या चॅनल बद्दल सांगितलं, काकू तुम्ही खूप छान काम करत आहात. काकू हा चॅनल निर्माण करण्यामागे तुमचा मुख्य हेतू काय होता?हे मला तुमच्या कडून ऐकायला आवडेल."

सरला म्हणाली," मुलांवर वेळीच काही संस्कार, त्यांना योग्य वयात योग्य शिकवण न दिल्याने काय होऊ शकतं? याचे दुष्परिणाम मी जवळून अनुभवले, पाहिले आहेत. काही मुला मुलींना एखादी गोष्ट करताना ती आपण चूक करतोय की बरोबर हे माहीत नसते आणि त्याबद्दल आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत बोलण्याची त्यांच्यात हिंमत नसते. तुम्ही आजकालची मुलं जास्तीत जास्त वेळ त्या यूट्यूबवर घालवत असतात म्हणून मी एक छोटासा प्रयत्न करुन बघितला आहे."

पुढील काही वेळात रमेश व नयन अजितच्या घराबाहेर पडले. घरातून बाहेर पडेपर्यंत रमेश मान वर करुन अजित किंवा सरला सोबत काहीच बोलू शकला नाही. 

संस्कार हा मुलांच्या वैचारिक, मानसिक व शारीरिक वाढीतील एक अविभाज्य घटक आहे.

©®Dr Supriya Dighe

(वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाहीये.)