'संस्कार'

'संस्कार'

बलराम आणि श्रीकृष्ण सांदिपणी गुरूंच्या आश्रमात अध्ययन करीत असताना एकदा लाकडे गोळा करून आणण्यासाठी गुरुंनी त्यांना वनात पाठवले होते. थोड्यावेळाने त्यांनी सुदामालाही त्याच कामावर वनात पाठवले. आणि तिघां करीता त्याच्यासोबत काही चणेफुटाणे दिले.

वनात श्रीकृष्णाला भेटल्यानंतर श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला "दादा मला तहान लागली आहे" त्यावर काही न खाता म्हणजे अनशापोटी पाणी पिऊ नको. असे सुदामाने सांगितले. पण माझ्याजवळ गुरूंनी दिलेले चणेफुटाणे आहेत ते खा. असे तो काहीच बोलला नाही.

श्रीकृष्ण थकलेला असल्यामुळे त्याने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडी विश्रांती घेतली. श्रीकृष्णाचा डोळा लागलेला पाहून सुदामाने त्याच्या जवळील चणे फुटाणे खाण्यास सुरुवात केली. काहीतरी खाण्याचा आवाज ऐकून कृष्णाला जाग आली. त्याने सुदामाला विचारले" दादा, तुम्ही काय खात आहात? हा आवाज कशाचा आहे? त्यावर सुदामा म्हणाला. "अरे इथे खायला काय आहे? माझे दात थंडीने कुडकुडत आहेत.

सुदामा कृष्णाशी खोटे बोलून गेला म्हणून त्याला अठरा विश्व दारिद्र भोगावे लागले. असे पुराण कथा सांगते.

 लहानपणी अशा अनेक बोधकथा, नीती कथा सांगत आमची आजी आम्हाला झोपवायची. लहानपणापासूनच खोटे बोलू नये, खोटे बोलण्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात ही गोष्ट मनावर बिंबल्यामुळे  मन खोटे बोलायला धजत नसे. कधी कधी मुलांच्या खोटे बोलण्यामागे आई-वडिलांचा अवाजवी धाक, भीती अशी अनेक कारणे असतात. मुलांना एकदा खोटे बोलण्याची सवय लागली की पुढे त्यांची ती सवय वाढत जाते. म्हणून लहान मुलांना प्रेमाने, विश्वासात घेऊन त्यांना खोटे बोलण्यापासून परावृत्त करा. तसेच लहान मुले अनुकरणप्रिय असतात. म्हणून मोठ्यांनी सुद्धा याबाबतीत पथ्य पाळणे आवश्यक असते.

सौ. रेखा देशमुख