संस्कार..

अविनाशला आज ऑफीसला जायला उशीर झाला होता; त्यात लहानग्या रोहनलाही शाळेत सोडायचं होतं. आणि तो नेमका ट्रॅफिक मध्ये अडकला होता.
स्पर्धा : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : अहिंसा.. एक मानवता धर्म
शीर्षक : संस्कार


अविनाशला आज ऑफीसला जायला उशीर झाला होता; त्यात लहानग्या रोहनलाही शाळेत सोडायचं होतं. आणि तो नेमका ट्रॅफिक मध्ये अडकला होता. त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होत होती. तितक्यात एक रोहन एवढाच लहान मुलगा त्याच्या गाडीजवळ आला.
 (तो अतिशय गरीब होता. काही वस्तू विकण्यासाठी तो अविनाशच्या गाडीजवळ आला होता.)

"साहेब, हे बघा माझ्याकडे खूप वस्तू आहेत. काय हवं आहे तुम्हाला."
"ए... जा रे तू. मला नकोय काहीच."
अविनाश चिडून म्हणाला. लहानगा रोहन ते सर्व बघत होता.

"बाबा... त्याच्याकडे छान छान टॉईज आहेत. मला हव्या आहेत. घ्या ना बाबा, मला हव्या आहेत." 
"रोहन गप्प बस हं. घरी आहेत त्या काय कमी आहेत का?"
अविनाश असं म्हणाल्यावर रोहन हट्ट करू लागला. त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आरडाओरडा करू लागला. तेव्हा तो गरीब मुलगा म्हणाला,
"साहेब घ्या की. कालपासून जास्त विक्री झाली नाही. मी कालपासून उपाशी आहे हो."
"ए मुला, तुला सांगितलं ना एकदा मला नकोय. जा इथून."
"बाबा... मला हव्या आहेत." 
"रोहन गप्प बस नाहीतर खूप मारेल तुला."
"साहेब अहो घ्या ना काहीतरी."
"हे काय, तू अजून इथेच? थांब तुला चांगला चोप दिल्याशिवाय अक्कल येणार नाही."
अविनाशने गाडीतूनच त्याला खेचलं आणि तो त्याला खूप मारू लागला. हा सगळा प्रकार रोहनच्या डोळ्यांसमोर घडला. 
अविनाश भयंकर रागीट स्वभावाचा. बायकोवर तर लहान लहान कारणांवरून हात उचलायचा. रोहन सुध्दा त्याचं वागणं बघुन त्याच्यासारखंच वागू लागला. शाळेत गेल्यावरही त्याच्या मनासारखं काही झालं नाही तर तो हाणामारी करायला लागला. एखाद्याची वस्तू हिसकावून घेऊन ती वस्तू आपली समजू लागला. वर्गातले सगळे जन त्याला घाबरु लागले. शिक्षकांनी वारंवार त्याच्या तक्रारी त्याच्या आईवडिलांकडे केल्या. पण अविनाशने दुर्लक्ष केले. शेवटी त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. अविनाशने रोहनला खूप मारले. दुसऱ्या शाळेत गेल्यावर तरी तो सुधारेल अशी आशा त्याच्या आईवडिलांना होती. पण तो काही सुधरला नाही. "जर कुणी माझी तक्रार केली तर मी खूप मारेल." अशी त्याने सर्वांना ताकीद देऊन ठेवली. त्यामुळे ह्या भीतीने कुणी तक्रार करत नव्हते. रोहन जसजसा मोठा होत होता तसतसे त्याचे वागणे अजूनच हिंसक रूप घेऊ लागले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याच्या काही सिनियर मुलांनी त्याची रॅगिंग घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याने त्या मुलांना खूप मारले.

दुसऱ्या दिवशी रोहन कॉलेज वरून घरी येत असताना त्याला अचानक काही मुलांनी रस्त्यात गाठले. हे तेच मुलं होते ज्यांना रोहनने काल मारले. पण त्या मुलांनी आणखी दहा पंधरा मुलं सोबत आणले होते. ते सर्व जण रोहनवर तुटून पडले. त्याला खूप मारू लागले. ते मारत असताना रोहनला त्याने इथून मागे केलेल्या सर्व चुका आठवू लागल्या. 

दुसऱ्या दिवशी रोहनने डोळे उघडले ते थेट हॉस्पिटलमध्येच. तो खूप चिडला होता. लगेच जाऊन त्या मुलांना चांगला धडा शिकवावा असं त्याला वाटलं. तो उठायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपला एक पाय उचलतच नाहीये. 
शेवटी काही दिवसांनी त्याचा तो पाय काढून टाकावा लागला. रोहनला जन्माचे अपंगत्व आले. 

अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही मुलं तर आत्महत्या करतात. मग ह्या सगळ्यात त्या मुलांची चूक असते की त्यांच्या पालकांची? त्यांच्यावर चांगले संस्कार केले नाहीत तर ती हिंसक होतात. आणि ह्याचा त्रास फक्त त्यांनाच नाही तर सर्वांनाच होत असतो. 
त्यामुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर चांगले संस्कार करणं आवश्यक आहे!



©® कोमल पाटील