संसारातील भांडी कि भांड्यांचा संसार

कथा रूखवतातील भांड्यांची आणि त्यात गुंतलेल्या भावनांची

संसारातील भांडी कि भांड्यांचा संसार..



"हि माझ्या आईने दिलेली भांडी आहेत.. आम्ही वेगळे झालो तेव्हा माझ्या आईने दिलेला संसार आहे हा. उरलेले चमच्यापासून सगळे आमचे आम्ही उभे केले आहे.. एकूण एक भांडे माहित आहे मला.." सासूबाई नवीन सुनेला सगळे समजावून सांगत होत्या.. सुनेने मान हलवली..


काही दिवसांनी...

" स्वाती, तो स्टीलचा चपटा डबा दिसत नाही मला.. तू कुठे ठेवला आहेस का?"

" हो.. म्हणजे त्या दिवशी दादा आला होता ना.. त्याची आवडती भाजी केली होती.. तो डबा आपण जास्त वापरत नाही म्हणून मी त्यात भाजी घालून त्याला दिला.."

" असं कोणाला काही द्यायचे असेल तर प्लॅस्टिकचे डबे द्यायचे.. म्हणजे परत आले नाही तरी चालतात.. तो जो डबा होता तो नीलिमा शाळेत जाताना न्यायची हो.. आठवण म्हणून ठेवला होता.."

" सांगते आईला पाठवून द्यायला.."

" रागवू नकोस हं. प्रश्न डब्याचा नाही. भावनेचा आहे.."

" बरोबर आहे तुमचे.."

 सासूबाईंच्या भावना जपायच्या म्हणून स्वातीने लगेचच तो चपटा डबा माहेरहून मागवून घेतला आणि परत असे होऊ नये म्हणून माहेरी काही द्यायचे टाळू लागली किंवा अगदी दिलेच तरी प्लॅस्टिकच्या डब्यात देऊ लागली..

त्या घटनेनंतर काही दिवसांनी तिची नणंद नीलिमा भेटायला आली होती.. तिला पाहून अर्थातच सासूबाईंना फार आनंद झाला..


" नीलिमा, अग किती दिवसांनी आलीस.. मी सकाळीच फोन करणार होते तुला.."

" कशासाठी आई?"

" अग, तुला आवडतात तसे लाडू केले आहेत.. स्वाती सकाळी केलेले लाडू जरा हिला पण दे आणि तिला डब्यात पण भरून दे.."

" हो आई.."

" अग काय हे? प्लॅस्टिकच्या डब्यात कोणी लाडू देते का? ते ही घरच्या माणसांना? थांब मीच देते.. हिला ना काही काम सांगायची सोय नाही.."

सासूबाई आतून नवीन मोठा डबा शोधून लाडवांनी भरून देतात.. 

" लाडू कसे झालेत ते सांग बरे.. आणि डबा द्यायची काही गरज नाही बरे.."

स्वाती पडलेल्या चेहर्‍याने आत गेली.

" काय ग आई, आतापर्यंत तर हि बरी होती.. आता हिला काय झाले अचानक?"

" हे असेच असते बघ सतत.. कधीही बघावे तोंडावर बारा वाजलेले असतात सतत.. ते सोड.. तुमच्याकडे काय चालू आहे?"

मायलेकींच्या गप्पा चालू राहिल्या. स्वातीला जी गोष्ट खटकली होती ती मात्र बोलाविशी वाटत होती ती तिने नवर्‍याकडे बोलून दाखवली..

" निलेश, मला थोडे बोलायचे आहे.."

" बोल ना.. आज आईंनी माझ्या रूखवतातला डब्बा नीलिमाताईंना दिला.."

" मग?"

" तुला काहीच वाटले नाही?"

" त्यात काय वाटायचे? डब्यासारखा डबा.. तो आईने ताईला दिला.. त्यात मला सांगण्यासारखे काय आहे?"

" मागे मी दादाला एक जुना चपटा डबा दिला तर तुझ्या आईच्या आठवणी त्याच्याशी निगडीत होत्या. हा तर माझ्या लग्नातला डबा होताना? तू जेव्हा मला विचारतोस तुझे या घरात काय आहे तेव्हा माझे नाव असलेल्या माझ्या माहेरच्यांनी दिलेल्या या वस्तूच मी दाखवू शकते ना? त्या डब्याचे ताईंना काय वाटणार आहे का?"

" स्वाती मला वाटते, तू ना घरी बसून त्या सासूसूनांच्या सिरीयल्स जरा जास्तच बघतेस.. जरा कमी कर त्या."

" निलेश म्हणजे तुझ्या आईच्या जुन्या भांड्यात अडकलेल्या भावना खऱ्या आणि माझ्या भावनांना काहीच महत्व नाही?" 

" हे बघ.. मी दिवसभर काम करून थकलेलो असतो.. तुमच्या या किचनच्या भांडणात मला अजिबात रस नाही.. मला यात ओढू नका.. तुमचे तुम्ही बघून घ्या.." हे बोलून निलेशने हात वर केले.. 

       इतक्या दिवसानंतर स्वातीला एक गोष्ट कळून चुकली होती कि सासूबाईंना तिची एकही गोष्ट तिला न विचारता कोणालाही द्यायला काहीच वाटायचे नाही.. पण हिने मात्र आधी विचारायचे.. त्यांना जर ती गोष्ट नकोशी असेल तरच द्यायची अन्यथा नाही.. जणू हिच्या भावना कोणत्याच वस्तूंशी निगडित नाहीत.. खरेतर तिचे सगळे रुखवत तिने स्वतः निवडलेले होते.. आणि घरात फक्त त्याच भांड्यावर तिचे नाव होते.. त्यामुळे त्या भांड्यांबद्दल तिच्या मनात वेगळीच आपुलकीची भावना होती. घरात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर फक्त आणि फक्त तिच्या सासूबाईंचे नाव असायचे.. ना तिच्या सासर्यांचे ना नवर्‍याचे.. तिचा आक्षेप त्यावर नव्हता. पण स्वतःच्या भावनांचा विचार करणाऱ्यांनी तिच्या भावनाही समजून घ्याव्यात इतकी साधी अपेक्षा होती.. गप्प तरी किती राहणार.. तिने या गोष्टीवर बोलायचे ठरवले आणि ती संधी तिला लवकरच मिळाली..

नीलिमाची दूरच्या गावी बदली झाली होती.. त्यामुळे तिला तिच्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायचे सासूबाईंनी ठरवले होते.. स्वाती सगळ्या कामात मदत करत होती.. पॅकिंग करताना नेहमीप्रमाणेच सासूबाईंनी नवीन दिसणारे स्वातीच्या रूखवतातले डबे काढले.. 

" आई या डब्यांपेक्षा ते दुसरे डबे दिले तर नाही का चालणार?"

" पण हे का नाही?"

" कारण हे माझ्या रूखवतातले आहेत.. " सासूबाई त्या वेळेस काही बोलल्या नाहीत पण निलेश आल्यावर त्यांनी हे सगळे त्याच्या कानावर घातले.  

" हे जे काही झाले ना निलेश ते मला अजिबात आवडले नाही.." त्यांनी वाक्य पूर्ण केले..

" स्वाती, काय हे? तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती.." पाणी घेऊन येणाऱ्या स्वातीला निलेशने ऐकवले.

" तू या किचनच्या गोष्टींमध्ये बोलणार नव्हतास ना?" स्वातीने हळू आवाजात विचारले..

" आणि आई हे घर तुमचे, माणसे तुमची.. लग्नाला पाच वर्ष झाली तरी इकडच्या चमच्यावर देखील माझा हक्क नाही.. अशावेळेस जी काही चारदोन माझी भांडी आहेत त्यात माझा जीव गुंतणारच ना? तुम्हीच म्हणता ना प्रश्न भांड्यांचा नसतो भावनांचा असतो. तसेच माझ्याही भावना आहेत.. उद्या जरी नगास नग आणला तरी तो माझा नाही हे सत्य तर बदलणार नाही ना?"

यावर निलेश आणि सासूबाई गप्प राहिल्या.. स्वातीने सुरूवात केली नणंदेच्या पदार्थांची पॅकिंग करायला प्लॅस्टिकच्या डब्यात....



कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई