Login

संसारात नणदेची भूमिका काय? भाग ३ अंतिम भाग

एक कथा
संसारात नणदेची भूमिका काय ३अंतिम भाग

साक्षीला लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. ती आता सासरी रुळली होती – पण त्यामागे नंदिनीचं स्नेहाचं सावलीसारखं अस्तित्व होतं. तिचं जग आता बदललं होतं – ती एक जबाबदार गृहिणी, सुजाण सून आणि प्रेमळ पत्नी झाली होती.
त्या वर्षी तिच्या लहान बहिणीचं लग्न ठरलं – रूपालीचं. साक्षीच्या सासरप्रवासात जे जे काही गोड-तुरट अनुभव आले, ते तिच्या मनात नव्याने उफाळून आले.
लग्नाची तयारी जोरात सुरू होती. रूपालीचा चेहरा फारसा आनंदी दिसत नव्हता. ती साक्षीकडे सतत काही बोलू, काही विचारू, असं करत होती.
एकदा संध्याकाळी दोघी गच्चीवर बसल्या होत्या.
रूपालीने शेवटी विचारलं, “ताई… एक विचारू का?”
“हो गं, विचार ना.”
“तुला तुझं सासर खरंच आवडलं? म्हणजे… खरंतर मी ऐकलं होतं की तुझी नणंद फार रागीट आहे. सासूबाई खूप शिस्त लावतात… आणि मग तू लग्नानंतर काही महिन्यांनीसुद्धा एकटीच घरी आली होतीस…”
साक्षी हलकं हसली. “हो गं. मी पण ऐकलं होतं. सगळ्यांनी नंदिनीबद्दल आधीच धाक दाखवला होता. ‘तुझी नणंद फार रागीट आहे’, ‘कशालाही नकार देईल’, ‘तुला सासरचं आयुष्य कठीण जाईल’… असं बरंच काही.”
रूपाली चिंतेने म्हणाली, “मग खरंच… ती तशीच आहे का?”
साक्षी हसली. “छे! माझं नशिब छान निघालं. पहिल्याच दिवशी मी चुकून साखर जास्त घातली चहात. सासूबाई भडकल्या. पण नंदिनीने अगदी समजून घेतलं… म्हणाली, ‘ती नवीन आहे, शिकेल हळूहळू’. त्या दिवसापासून तिनं मला एकटं कधी पडू दिलं नाही.”
“आणि तुझं माहेरी येणं? तुला तर खूपदा परवानगी मिळते. अगदी सहज येतेस!”
“हो, ती नंदिनीमुळेच. ती म्हणायची – ‘माझं घर इथे जवळ आहे, पण तरीही पहिल्याच दिवशी माझ्या सासूबाईंनी माझ्या डोळ्यांत आईची ओढ पाहून समजून घेतलं. म्हणून त्या म्हणाल्या – ‘जा, पण सहज आल्यासारखं दाखव. माहेराची सवय सासरला बोचू नये.’”
साक्षी पुढे म्हणाली, “तीच शिकवण मी घेऊन आली. माझ्या सासूबाई आणि नंदिनी – या दोघींसारखी समजूतदार माणसं प्रत्येक सासरी हवीत. आणि तुझ्यासाठीही माझी इच्छा तीच आहे.”
रूपाली डोळे पुसत म्हणाली, “माझं नशिबही तुझ्यासारखंच छान असायला हवं. ”
साक्षीने तिचा हात हातात घेतला. “अगं, नणंद वाईट असते, असा ठसा समाजाने आपल्या मनावर बिंबवले आहे. पण एखादी नणंद जर समजूतदार असेल, तर तीच वहिनीसाठी आईसारखी माया देणारी असते. आणि अशी सावली जर सासरी मिळाली… तर ते घरही आपल्या माहेरासारखंच वाटतं.”
त्या रात्री साक्षी शांत झोपली – कारण तिनं नंदीनीसारखी सावली अनुभवली होती… आणि आता ती स्वतः कुणासाठी तरी अशीच सावली बनायला निघाली होती

🎭 Series Post

View all