संसाराची दोन चाके.. भाग २

कथा एका जोडप्याची


संसाराची दोन चाके.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की पैसे मागितल्यावर अनिश पूजाला वाटेल तसे बोलतो. आता बघू पुढे काय होते ते.



अनिश गेला तिथून.. पण निघताना आत जाऊन मुलांची चौकशी करायला विसरला नाही.. अनिश ऑफिसला गेल्यावर पूजा स्वतःशीच विचार करायला लागली.. किती वेगळे आयुष्य होते तिचे काही वर्षांपूर्वी.. तो काळ तिचा तिलाच स्वप्नवत वाटायला लागला.. अनिश आणि पूजा एक सुखी जोडपे.. दोघे नवरा बायको आणि एक छोटा राज.. अनिशचे आईबाबा गावी असायचे आणि पूजाचे दुसर्‍या शहरात.. राज झाला तेव्हाच दोघांनी हम दो हमारा एक ठरवले होते.. अनिशच्या पूजाच्या दोघांच्या आईवडिलांनी केलेल्या मदतीमुळेच नोकरी न सोडता राजचे व्यवस्थित संगोपन झाले. आता राजही मोठा झाला होता. तिघांचा सुखी संसार चालू होता.. अनिशचे आईबाबा जाऊन येऊन रहात होते.. सर्व छान असतानाच मध्येच पूजाला चाहूल लागली एका नवीन जीवाची.. ती यासाठी तयार नव्हतीच.. पण अनिशला अजून एक बाळ हवे होते. तो एकुलता एक होता. त्यामुळेच एकाला एक असे हे बाळ त्याला हवेच होते.. दोघांच्याही घरातून गर्भपाताला विरोध होता.. त्यातही हि बातमी छोट्या राजपर्यंत कशी पोचली ते पूजाला कळलेच नाही.. तो सुद्धा बाळ हवे म्हणायला लागला.. तिला कोणाचेच मन मोडवेना.. शेवटी तिने बाळाला जन्म द्यायचे ठरवले.. पण हे बाळंतपण तिला जेवढे वाटले तेवढे सोपे गेले नाही.. अशक्तपणा, सततच्या उलट्या या सगळ्यांनी तिचा जीव हैराण झाला.. नेमके तेव्हाच अनिशचे प्रमोशन झाल्यामुळे त्याने तिला जॉब सोडायचा सल्ला दिला.. पूजा एवढी वैतागली होती कि तिनेही तो मान्य केला.. तिला खात्री होती कि बाळ झाल्यावर परत ती नवीन नोकरी करू शकेल याची.. पण निमा दोन महिन्याची झाली आणि लॉकडाऊन सुरू झाले.. गावी असलेले सासूसासरे तिथेच अडकले.. फ्लॅट सिस्टीम त्यात करोनाची भिती त्यामुळे बाहेर पडणे मुश्किल.. मग या सगळ्यात पूजाची नोकरी बाजूलाच राहिली.. हे सगळे सुरळीत होईपर्यंत घरची परिस्थिती बिघडली होती.. जन्मापासून सतत पूजाच डोळ्यासमोर असल्यामुळे निमाला तिची इतकी सवय झाली होती कि ती आता तिला सोडून राहूच शकत नव्हती.. खाताना, पिताना, झोपताना फक्त आई..ती नाही दिसली कि मग रडारड.. अशा बाळाला सोडून जायचे मग पूजालाही जीवावर यायला लागले.. तिने ठरवले कि निमा थोडी मोठी होईपर्यंत थांबू या.. नोकरी काय नंतरही करता येईल.. पण आता अनिशचे वागणे बदलले होते.. पूजा त्याच्यावर अवलंबून आहे हि गोष्ट त्याला सुखावू लागली.. त्यातूनच सुरुवात झाली कुरबुरींना. आज मात्र हे अति झाले.. निमाच्या रडण्याचा आवाज ऐकून पूजाची तंद्री तुटली.. आणि ती लागली घरातल्या कामांना. पण काम करता करता तिच्या विचारांचे चक्र सुरूच होते
त्या दिवशी कधी नव्हे तो अनिशने ऑफिसमधून घरी फोन केला.. पूजाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले.. पण तरिही पूजाचे दुखावलेले मन शांत झाले नाही.. तिने दोन तीन ठिकाणी फोन करून बोलून घेतले.. संध्याकाळी अनिश जेव्हा घरी आला तेव्हा थोडासा घाबरलेला होता.. पण पूजाने सकाळचा विषय न काढता वेगळाच विषय काढला..
"अनिश, तुझ्या सुट्ट्या खूप बाकी आहेत का रे?"


काय असेल नक्की पूजाच्या मनात, बघू पुढील भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all