संसार वेल (भाग 4)

Marriage Life

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय- कौटुंबिक कथा
कथेचे नाव- संसार वेल ( भाग 4)

नितीन व नयनाचा संसार मुंबईमध्ये बहरत होता. जवळजवळ एक वर्ष होत आलं होतं लग्नाला. तरीही त्या दोघांचे वागणे म्हणजे इतक्यातच भेटले आहेत असे च जणू होते. 

तिचा घरामध्ये सासरी खूपच लाड होत होता. तिला कशाची ही कमी नव्हती. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच नितीन ने स्वतःची डिजिटल मल्टिनॅशनल कंपनी सुरू केली होती. 

त्याच्या हाताखाली दोन असिस्टंट इंजिनियर ही ठेवले होते. नयना अजून तिच्या कंपनीमध्ये काम करत होती. तिला सीनियर इंजिनिअरची पोस्ट भेटली होती व पगारही भरमसाठ असल्याने तिने लगेच तो जॉब सोडला नव्हता. 

दोघांनीही ठरवले होते की, ' त्यांची कंपनी व्यवस्थित स्थिर झाली की ती ही त्या कंपनीला जॉईन होणार होती '.

दोघांच्याही निर्णयाला यश आले होते. एका वर्षामध्ये त्यांच्या कंपनीचे टर्नओव्हर लाखोच्या घरामध्ये जात होते. 

इतक्यात त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये नवीन पाहुण्याची चाहूल लागली व तिने त्या कंपनीमध्ये राजीनामा देऊन टाकला. 

तिला मुलांची जबाबदारी घेताना कोणतीही कसर ठेवायची नव्हती. त्यामुळे तिने पूर्ण स्वतःकडे व घरामध्ये लक्ष देण्याचे ठरवले. अधून- मधून त्याच्यासोबत स्वतःच्या कंपनीमध्येही काम पाहत होती. वर्क फ्रॉम होम तिच्यासाठी काम बाजूला ठेवण्यात आले होते.

" मला अजूनही विश्वास बसत नाही, आपले लग्न झाले आहे म्हणून . तू माझ्या आयुष्यात आली आणि मी स्वतःचे निर्णय इतक्या लवकर अमलात आणेल असं स्वप्नातही वाटले नव्हते. थँक्यू सो मच नयना " , तो लाडात येऊन तिच्याशी बोलत होता.

तिला ते सगळं कळत होतं पण ती दुर्लक्ष करूनच त्याच्याशी बोलत होती.

" फक्त थँक्यू म्हणूनच भागवणार आहेस की अजून तुला काही बोलायचे आहे म्हणजे एखादी पार्टी देऊन त्यामध्ये आभार प्रदर्शन वगैरे असे काही प्लॅन असेल तर ते ही लवकर करून टाक. उगाच मनामध्ये काही शंका राहिला नको म्हणून बोलले मी" , ती लटक्या रागातच बोलत होती.

त्याला जाणवले होते की , ' तिला थँक्यू, सॉरी म्हणलेले अजिबात आवडत नाही '.

तो तिला सॉरी म्हणणार च  होता पण त्याने जीभ चावली. 

" ओके सगळं राहिलं बाजूला. तुला काय खावं वाटत असेल तर मला नक्की सांग. ये बंदा हाजीर हे मेमसाब ", असे म्हणून तो तिच्यासमोर थोडासा वाकला.

" बस झालं आता.  आपल्या ऑफिसमध्येही थोडा वेळ द्यावा. आपली जबाबदारी वाढणार आहे तर पोरखेळ पणा आता कमी करावा " , ती हसत- हसत  च त्याला बोलत होती.

तो संध्याकाळी लवकर येण्याचे आश्वासन देऊन कंपनीमध्ये निघून गेला.

त्याच्या भावाला कंपनीतर्फे अमेरिकेला स्थायिक होण्याचे ऑर्डर भेटल्याने घरचे सगळे त्या गडबडीत होते. एक महिन्याने दादा- वहिनी व आई -वडील ही त्याच्यासोबत अमेरिकेला निघून गेले. त्याचे आई -वडील सहा महिने अमेरिकेत व सहा महिने मुंबईत राहत होते. 

ते दोघे स्वतःच्या कंपनीमध्ये खूप कष्ट घेत होते. मुळातच हुशार असल्याने त्यांना नवीन- नवीन कल्पना नेहमी सुचत होत्या. ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग लोकांना शिकवत होते व करोडो रुपये वर्षाला उभे करत होते. त्यांच्या कामाचा व्याप आता बराच वाढला असल्याने कंपनीमध्ये वीस पंचवीस इंजिनियर काम करत होते. 

त्यांनी स्वतः चा बंगला मुंबईमध्ये उभारला होता. त्याचे इंटरियर डिझायनर सगळे तिच्या मनासारखे करून घेतले होते. नवीन बाळाच्या स्वागतासाठी नवीन बंगला तयार झाला होता. 

एक महिन्याने रियाचा जन्म झाला व कुटुंबामध्ये आनंदी आनंद वातावरण झाले. घरातील मंडळी खूप- खूप खूश होती. 

म्हणतात ना ' पहिली बेटी धनाची पेटी ' . 

' रियाच्या जन्माने त्यांची कंपनी अजूनच भरभराटीस येऊ लागली ', असं आजूबाजूच्या लोकांचं मत होतं पण घरातील सगळे उच्चशिक्षित असल्याने त्यांना माहीत होते , ' आपल्या कष्टाने कंपनी भरभराटीस येत आहे '.

रियाच्या जन्माने नयना -नितीन सुखावले गेले होते. तिने पूर्णपणे ऑफिसमधून अंग बाजूला काढून घेतले होते व ती संपूर्ण लक्ष रियाच्या बालपणात , तिच्या वाढीमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही त्याकडे देत होती. आजी -आजोबा ही अमेरिकेतून नातीच्या स्वागतासाठी परतले होते. घर कामांमध्ये मदत करण्यासाठी तिने एक मदतनीस पण ठेवली होती. 


नितीन व नयनाने पूर्ण प्लॅनिंग करून एक एक पाऊल आयुष्यामध्ये पुढे टाकत होते. त्या दोघांना यशही येत होते कारण त्यांचे कष्ट च अपार होते. दोघे ही पूर्ण एकमेकांना समजून घेत आयुष्यामध्ये पुढे जात होते. रियाच्या जन्माने तर आता त्यांचा आनंद गगनात ही मावत नव्हता. 

सगळ्यांच्या मायेमध्ये रिया लहानाची मोठी होत होती. आपल्या बाललीले ने सगळ्यांना आपलंसं करून घेत होती. सगळेजण तिच्यावर जीवापाड भरभरून प्रेम करत होते. अमेरिकेमधून काका- काकी ही व्हिडिओ कॉल करून तिच्याशी गप्पा मारत असायचे. ती जन्मतःच खूप हुशार बुद्धिमत्तेची होती. 

तिचे वाढदिवस ही खूप उत्साहाने दरवर्षी साजरे केले जात होते. बघता -बघता ती पाच वर्षाची झाली व तिच्या पाठोपाठ नवीन बाळाची ही चाहूल लागली. नयनाला तर तिच्यामधून व ऑफिस आणि घरातील कामामधून उसंतही मिळत नव्हता तरीही तिने या बाळाला वाढवण्याचे ठरवले होते. 

ह्या बातमीने घरातील वातावरण अजूनच व्दिगुणीत झाले. दिवस कसे भराभर निघून जात होते. दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढत चालल्या होत्या.

" मम्मा, आपल्या घरी बाल कधी येणार आहे . लवकर त्याला आण मला एकटीला कंटाळा खूप येतो ", रिया आपले बोबडे -बोबडे बोलत आईला विचारत होती.

तिच्या बोलण्याचे सगळ्यांना फार गंमत वाटत असे. तिच्या बुद्धीच्या मानाने ती खूप प्रश्न विचारत होती.

मग नयना तिला समजावत उत्तर देत असे, " तू शहाण्या मुली सारखी वागली की बाळ लवकर येते .  तुझ्याबरोबर मस्ती करायला बाळाला पण लवकर यायचं आहे. तू छान वागणार ना " .

असे बोलल्यानंतर याला फार आनंद होत असायचा. ती मानेनेच होकार देत असे.

दिवाळीमध्येच रोहित चा जन्म झाला व नितीन -नयनाचे कुटुंब पूर्ण झाले. आपल्या परीने दोन्ही मुलांचे लाड करत असत पण शिस्तही लावत असत. त्यांच्या संगोपनात कोणतीही कसर नव्हती. हळू-हळू रोहित ही मोठा होऊ लागला. रिया ही आता स्कूलमध्ये जाऊ लागली होती. रोहितच्या येण्याने तिला खूप आनंद झाला होता. 

आजी -आजोबा मुलाचा संसार पाहून खूप खूश होते. परत ते मोठ्या मुलाकडे अमेरिकेत निघून गेले. 

क्रमशः

नाव - सौ. ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड
टीम - सोलापूर

🎭 Series Post

View all