संसार वेल (भाग 3)

Marriage Life

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय- कौटुंबिक कथा
कथेचे नाव- संसार वेल ( भाग 3)

नितीन व नयनाचे ठरलेलेच होते ऑफिस नंतर ते नेहमी बाहेर भेटत असायचे. त्यांच्या भेटीत ऑफिसचा कधीही चुकून सुद्धा विषय निघत नसायचा. प्रोफेशनल आणि आपलं खाजगी लाइफ त्यांनी व्यवस्थित स्वतंत्र ठेवलेले होते. कंपनीमध्ये ही ती दोघे प्रोफेशनलीच वागत असत कधी ही ते असं दाखवत नसत की ते एकमेकांला ओळखत आहेत. 

नयनाच्या ताईने तिच्या आई-बाबांना नितीनबद्दल कल्पना दिली होती. तिचे आई-बाबा थोडेसे ओशाळले पण त्यांनी धीर धरला. आई-बाबांना जाणीव होती की आपण मुंबईसारखा शहरांमध्ये राहतो व इथे सर्वजण आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणेच निर्णय घेऊन जीवन जगतात. ते जेव्हा गावाकडे होते तेव्हा त्यांचे तसे विचार नव्हते पण इथे आल्यानंतर त्यांनी आपला विचारांमध्ये काळाप्रमाणे बदल करत गेले. हा बदल चांगला आहे. 
.
पण नितीन ने अजून घरी काही सांगितलेले नव्हते.

रोजच्याप्रमाणेच नितीन व नयना गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेले होते. ती नेहमी मंदिर , गार्डन किंवा समुद्रकिनारी फिरत असत. योगायोगाने त्या मंदिरामध्ये नितीनचे दादा -वहिनी ही गणपतीच्या दर्शनासाठी आलेली होती. दादा- वहिनी दर्शन करून जवळच्या बाकावर ते बसलेले होते. नितीन व नयना तिथून मंदिरात शिरले पण त्यांचे दोघांचेही आजूबाजूला लक्षच नव्हते. 

दादा -वहिनी ने मात्र त्या दोघांना पाहिले होते. वहिनीने मुद्दाहून त्या दोघांचा लांबून फोटो ही काढला होता. त्या दोघांनी तिथून काढता पाय घेतला व थेट घरी याचा सोक्षमोक्ष लावायचा ह्या विचारानेच घर गाठले. 

" आज किती दिवसांनी आपण ह्या मंदिरामध्ये दर्शनाला आलो ", नयना नितीन कडे पाहून बोलत होती.

नितीन मात्र इकडे -तिकडे सारखे पाहत होता. 

तिच्या बोलण्याकडे ही त्याचे लक्ष नव्हते. हे तिच्या लक्षात आले होते. परत तोच प्रश्न तिने त्याला विचारला. 

तरीही तो मात्र " हम्म " , तेवढेच बोलला.

आता मात्र तिला राहवत नव्हतं. मधूनच हा असा कसा वागतो तिला प्रश्न पडत होता.

' कंपनीमध्ये एवढा आत्मविश्वासाने वागणारा बाहेर चारचौघांमध्ये ह्याला काय होते , कुणास ठाऊक ?' , ती स्वतःशीच पुटपुटली.

दोघांनीही दर्शन घेऊन त्याच बाकावर येऊन बाहेर बसले.

तिच्या लक्षात आले होते इथे आल्यापासून ह्याचं चित्त थाऱ्यावर नाही.

" काय झाले, तू असा का बेचैन दिसत आहेस ", ती परत बोलली.

आता आता मात्र त्याला दम निघत नव्हता.

" मला इथे आल्यापासून असं जाणवत आहे की मला कोणीतरी पाहत आहे ", तो म्हणाला.

" तुझं आपलं काहीतरीच. सगळी लोकं आपापल्या कामात व्यस्त आहेत. समोरून कोणी गेला तरी कोणाचं लक्ष नसतं. आपल्या ओळखीचं इथे कोण असणार आहे. म्हणून तर आपण एवढ्या दूर या मंदिरामध्ये येत असतो", ती म्हणाली.

" ते पण खरं आहे पण कोण जाणे आज मला इथे आल्यापासून सारखं हे जाणवत आहे की मला कोणीतरी पहात आहे", तो परत तेच बोलला.

"चल, आपण चालत- चालत बोलू व तसेच घरी जाऊया ", ती म्हणाली.

ती दोघेही मंदिरापासून बराच दूर चालत होती व गप्पा ही मारत होते. दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेली.

नयना जेव्हा घरी पोहोचली तेव्हा घरातील वातावरण अगदी शांत होतं. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते पण तिला काहीतरी बिनसले याची जाणीव झाली होती. ती ताईला विचारण्याचा प्रयत्न करत होती पण ती काहीही प्रतिसाद देत नव्हती. आता मात्र तिला अस्वस्थ वाटायला लागले होते. 

" माझं काही चुकलं आहे का ?  आई , कोणीच काही माझ्याशी नीट बोलत नाही ", असं म्हणत तिने सरळ आपला मोर्चा आईकडे वळवला. 

आईने मात्र ऐकून न ऐकल्यासारखं केलं व तिच्यासोबत चा अबोला तसाच चालू ठेवला. 

जेवणाची वेळ झाली. सगळेजण जेवायला बसले पण तरीही कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. तिला मात्र आपल्या हातून खूप मोठी चूक झाली याची जाणीव होत होती. 

सगळ्यांनी तसेच जेवणे उरकली. कोणाचे ही जेवणात मात्र लक्ष नव्हते. सगळेजण झोपायला निघून चालले पण तिला मात्र बेचैन होत होतं. तिने आईचा पदर धरून तिला विचारत च राहिली. आईलाही तिच्याशी बोलायचे होते पण राग आल्याचा थोडं दाखवायचं होतं म्हणून ती इतका वेळ गप्प बसून राहिली. 

आईने समोर तिला बसवले व प्रश्नांचा भडीमार सुरू केला.

" नयना, आपल्या घराण्याबद्दल तुला माहित आहे .असं मुलीने स्वतःहून लग्न ठरवणे म्हणजे ती मुलगी चांगल्या चाली- रिती ची  नाही असंच आपल्या समाजात मानलं जातं. तिच्या आई-वडिलांचा ही उद्धार केला जातो. तुला हे असं लोक बोललेले चालेल का? ", आईने आपला आवंढा गिळत एका दमात सगळं बोलून टाकले.

आत्ता मात्र तिला इतक्या वेळ घरातील वातावरण का गढूळ झाले याची कल्पना आली होती.

तिने ही अगोदरच घरातल्या लोकांना कसे समजावायचे याचा विचार करून ठेवला होता त्यामुळे ती गोंधळून गेली नाही.

तिने स्वतःला शांत केले व लगेच आईला बोलू लागली, " आई, माझ्यापेक्षा तू पावसाळे जास्त पाहिलेले आहेत पण तरीही माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करेन. हे जे लोकं आहेत ते आजही बोलतील व उद्याही बोलतील. पण मनासारखा जोडीदार नाही भेटला व संसार कडेपर्यंत नाही यशस्वी झाला तर हेच बोलणारे लोकं उद्या ही नावे ठेवणारच आहेत. संसार तर हा आपल्यालाच करायचा असतो. मग लोकांचा कशाला विचार करायचा " .

बराच वेळ दोघींनी एकमेकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मागे हटायला तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने आईने थोडासं सकारात्मक बाजू दाखवली. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. तशी ही ती लहानपणापासून समोरच्याला पटवण्यात हुशार होती. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच झाला.

बाबांनाही आई पटवून देणार असे ,  तिच्याकडून आश्वासन तिने मात्र मिळवले. 

इकडे मात्र नितीनच्या घरी वेगळाच प्रसंग मांडून ठेवला होता.
दादा -वहिनीने त्याला मंदिरात तिच्या सोबत पहिल्यामुळे ते सरळ घरी आले व घरच्यांनाही त्यांनी ती बातमी देऊन ठेवली होती. 

नितीन ने दारात पाऊल ठेवताच , आई लांबूनच ओरडली, " थांब नितीन, तू आता खूप मोठा झाला आहेस. आयुष्यातील सगळ्या गोष्टी तू स्वतःच ठरवतोस. आत्ता आई-बाबा दादा कोणाच्या ही मदतीची तुला गरज राहिली नाही वाटतं ".

नितीन चक्राहून गेला. 

' हे आज काय नवीनच. तरी मला मंदिरामध्ये याची जाणीव झाली होती कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. बहुतेक त्याचाच परिणाम येथे दिसत आहे' , तो विचार करत होता.

त्याच्या आईला त्याच्यावर रागावता येत नव्हते पण ती पुरेपूर प्रयत्न करत होती. त्याचे बाबा, दादा- वहिनी लांबूनच हे दृश्य पाहण्याचा आनंद घेत होते. 

त्याचा चेहरा केविलवाणा झाला होता. आता मात्र दादाला राहवत नव्हते . त्याची दया आली. पण तरीही त्याने स्वतःला सावरले. 

शेवटी वहिणीनेच मध्यस्थी करून त्याला शांत होऊ दिले.

तिने स्वतःचा मोबाईल त्याच्या समोर धरला तेव्हा मात्र त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. 

" अच्छा तर तुम्ही त्या मंदिरामध्ये होतात. तरी मला असे जाणवत होते. " , तो कसा बसा स्वतःला सावरत बोलला.

वहिनी म्हणाली, " चला, आता कसलेही आढेवेढे न घेता सर्व सांगा. आमच्यासमोर पुरावा आहे. त्यामुळे तुम्ही काही लपवू शकणार नाहीत".

त्याला आता नयनाबद्दल सांगण्याशिवाय पर्याय च नव्हता.

त्याला हे सगळं घरी सांगायचं होतं पण इतक्या लवकर सांगावे लागेल याचा विचार मात्र त्याने केलेला नव्हता.

शेवटी एका दमात त्याने सर्व काही तिच्याबद्दल सांगून टाकले.

त्याच्या घरात उच्चशिक्षित व खेळीमेळीचे वातावरण होते. त्यामुळे त्यांचे प्रेम सर्वांनी स्वीकारले. त्यालाही खूप आनंद झाला.

दोघांनाही एकमेकांना मेसेज करून घरातील प्रसंग हसू- हसू सांगितले. 

आज त्यांना गणपतीच पावला होता.

दोघांच्याही घरातून परवाना देण्यात आली व पुढच्या सहा महिन्यात त्यांचे लग्नही लावून देण्यात आले. हे सगळं एवढं अचानक झाले तरी ही दोघे खूप- खूप खूश होते.

क्रमशः

नाव - सौ. ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड

टीम - सोलापूर

🎭 Series Post

View all