Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

संसार वेल (भाग 2)

Read Later
संसार वेल (भाग 2)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय- कौटुंबिक कथा

कथेचे नाव- संसार वेल ( भाग 2)

नितीन हा त्या कंपनीमध्ये गेली सात वर्षे काम करत होता.

नयनाला तो चार वर्षे सीनियर होता कंपनीमध्ये. एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये ते नक्कीच एकमेकांना चांगले ओळखत होते. अधून- मधून त्यांचे बाहेर भेटणे सुरू झाले होते. 

नितीन हा मध्यम कुटुंबातून उच्चशिक्षित घराण्यातून होता. मूळचा तो जळगावचा पण मुंबईमध्ये नोकरी निमित्त त्याचे कुटुंब स्थायिक झाले होते. नयना ही मूळची लातूरची पण त्यांचे ही कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. 

नयना दहा वर्षाची होती , तेव्हा ती मुंबईत राहायला आली होती. तिला मुंबईची धावपळ , तिथलं वातावरण अजिबात आवडत नसायचे. तिला आपलं मूळ गाव लातूरच खूप आवडायचे. पण वडिलांच्या नोकरीनिमित्त तिला तिथेच राहावे लागले व ती लहानाची तिथेच मोठी झाली.

नितीन चा जन्म हा मूळचा मुंबईमध्येच असल्याने त्याला तिथले वातावरण अंगवळणी पडले होते. 

मुंबई हे स्वप्नांचा लखलखता झराच होता. सर्व शैक्षणिक , नोकरी व व्यवसायाचे ठिकाण असल्याने इथे नेहमी गर्दी च असते. मोठमोठ्या कंपन्या ही इथे आहेत. 

नयना व नितीन असेच एकदा व्हॅलेंटाईन डे निमित्त समुद्रकिनारी फिरत होते. संध्याकाळचे अकरा वाजले तरी ही त्या ठिकाणची गर्दी मात्र कमी होण्याचे नाव घेत नव्हती. उलट तिथली गर्दी ही वाढत च चालली होती. 

कोणताही समुद्रकिनारा हा प्रेमी युवकांसाठी हक्काचे ठिकाण च असते. तसेच नितीन व नयना ही त्या समुद्र किनारी लाटांचा आस्वाद घेत बसले होते.

ते समोरचे नयनरम्य दृश्य डोळ्यांमध्ये भरत होते. समुद्राच्या लाटा या वर -खाली येतच राहत होत्या. कधीकधी त्या किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. किनाऱ्या ठिकाणी छान लाइटिंग केल्यामुळे त्याचाही उजेड समुद्राच्या लाटा वरती पडल्याने तिथले वातावरण अजूनच सुंदर भासत होते.

थंड हवा वाहत होती. 

" कितीतरी वेळ आपण इथेच बसून आहोत. घरी जावेसे च वाटत नाही ", नयना समुद्राकडे पहात नितीनला बोलली.

आज मात्र नितीन चे समुद्रापेक्षा नयनाकडे च जास्त लक्ष होते. तो सकाळपासून नयनाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याला योग्य संधीच भेटत नव्हती.

त्याला वाटले , ' हीच संधी योग्य आहे '.

त्याने तिचा हात हातात घेतला व सोबत आणलेली अंगठी तिच्या बोटात सरकावत पुढे बोलला, " जे माझ्या मनात होते तेच तू बोलली ".

नयनाला दोन मिनिटे भानावर येण्यातच गेले.

नितीन ने ज्याप्रकारे तिला प्रपोज केले होते त्याला काय उत्तर द्यावे याचा विचार नयना करत होती. 

त्याने कोणत्याही शब्दाचा आधार न घेता डायरेक्ट कृती मधूनच त्याने त्याचे प्रेम व्यक्त करून दिले होते. तो असाच होता. नितीन ला गोड- गोड बोलणे जमत नसायचे. त्याची कृती च जास्त बोलकी होती.

तिला हे आवडले नसते तर तिने ती अंगठी काढून लगेच त्याच्या तोंडावर फेकली असती. पण तिने असे काहीही केले नाही. त्याचा अर्थ स्पष्ट होता.

ती ही विचार करत होती त्याला नकार देण्यासाठी कोणतेच कारण नव्हते. ती फक्त लाजून चूर झाली होती. 

" आज मी प्रत्यक्ष दोन चंद्रांना जवळून पाहत आहे. त्यातला एक हा माझा हक्काचा झाला आहे ", तो म्हणाला.

तिने फक्त मानेनेच होकार दिला व अलगदच त्याच्या खांद्यावर मान टेकवली.

इतका वेळ बडबड करणारी ती एकदम शांत झाली. आनंदाने तिचा उर भरून आला होता. तिला बोलायचे तर खूप काही होते पण ओठातून शब्द च फुटत नव्हते. 

तासभर दोघे ही शांत बसून होते. आजूबाजूच्या लोकांचा ही त्यांना विसर पडला होता. एवढा मोठा गर्दीमध्येही ते फक्त आपण दोघेच आहोत याचाच विचार करत होते. 

थंड वाऱ्याची झुळूक हळूच स्पर्श करून गेली. वाऱ्यानेच त्यांना भानावर आणले. दोघेही फक्त एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघूनच डोळ्यांनीच बोलत होते. शब्दांच्या भाषेची त्यांना आज गरज नव्हती.

दोघे ही तिथून जाण्यासाठी निघाले. आपापल्या घरी जाण्याची ही त्यांना इच्छा नव्हती पण जावे तर लागणार होते. दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन घरी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जेव्हा ते एकमेकांसमोर आले. तेव्हा त्यांना जाणवले की आजचा दिवस हा खूप वेगळा भासत होता. दोघे नसून ते एक झाले होते. 

ऑफिस मधील सहकाऱ्यांच्याही ते लक्षात हळूहळू येत गेले.

" कालचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे का ? बॉसने केबिनमध्ये बोलावले आहे ", नयना म्हणाली.

या प्रश्नाने मात्र नितीन ची भांबेरी उडाली. 

तो आठ दिवस झाले व्हॅलेंटाईन डे ला तिला प्रपोज करण्याचा विचारात असल्याने ऑफिसमध्ये लक्षच नव्हते. तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला नव्हता व आज त्याला बोलणी खावी लागणार असेच वाटले. 

तो दबकत च बॉसच्या केबिनमध्ये शिरला. बॉस चा पारा अगोदरच चढलेला होता. त्याने नितीन ला खूप सुनावले. तो केबिन मधून कसा तरी बाहेर पडला. 

त्याच्याही डोक्यात तिडीक गेली होती.

 ' आपण ही एवढे स्कॉलर असून स्वतःच्या पायावर का उभे राहत नाही ' , असे तो मनातच पुटपुटला. 

कालचा दिवस त्याच्यासाठी खूप स्पेशल होता पण आज मात्र नयनाकडे त्याचे लक्षही जात नव्हते. त्याच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. स्वतःचा सॉफ्टवेअर व्यवसाय सुरू करण्याचा.

लंच टाईम मध्ये नयना व नितीन एकत्र भेटले.

बॉसने तिला ते काम दिले हे जेव्हा नितीनला कळाले तेव्हा त्याला वाईट वाटले पण ती ही तेवढीच तोडीस तोड होती. 

नयनाला मात्र हे काम करण्याची इच्छा नव्हती. 

" नितीन, मला अजिबात हे काम करण्याची इच्छा नाही. तुझ्याकडून काम काढून घेऊन मला ते दिले . त्यामुळे मी हे काम करणार नाही ", ती वैतागून बोलली.

नितीन तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करीत होता. 

" नयना, ही कंपनी आहे इथे ज्याचा सिक्का चालतो तोच इथे टिकतो. काळाप्रमाणे आपल्यालाही प्रत्येक वेळी अपडेट राहावे लागते जर मागे राहिलो तर तो ह्या स्पर्धेतून बाद होतो . तू हे काम यशस्वीपणे पूर्ण करणार आहेस ", तो तिला समजावत होता.

नितीनच्या हट्टामुळे नयना ने ही ते काम लवकरात लवकर पूर्ण करून ही कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण एकमेकांचा झालेल्या अपमान ते इथे सहन करू शकणार नव्हते. त्यामुळे दोघांपैकी कोणाला तरी इथून जाणे च योग्य वाटत होते. त्यांनी तसे एकमेकांना सांगितले नव्हते पण दोघांच्याही मनात हा विचार सुरू झालेला होता. 

संध्याकाळी ही ऑफिस नंतर ते बाहेर भेटले. 

बाहेर भेटल्यानंतर ऑफिसचा कोणताही विषय त्यांच्यामध्ये नसायचा.

" नितीन, तू आपल्याबद्दल घरी लवकरात लवकर सांगायला हवे. मी ही ताईला तशी कल्पना दिलेली आहे. ती लवकरच आई बाबांना सांगेल ", नयना बोलली.

" हो गं, माझ्या लक्षात होतं पण इतक्या लवकर घरी कशाला सांगायचे . अजून आपण एकमेकांना पुरते कुठे ओळखले आहे " , नितीन मुद्दाहूनच नयनाच्या जवळ जात बोलला.

नयना मात्र लाजून चूर झाली होती. 

" वाट बघत बस. मला स्थळे येणे चालू झाले आहे . तुझा नंबर येईपर्यंत माझ्या घरचे लग्नही लावून देतील ", ती म्हणाली.

" लवकरच घरी सगळं सांगेन मी. आता खूश राणी सरकार ", तो म्हणाला.

दोघांनाही लग्नाची घाई झाली होती.

क्रमशः

नाव- सौ. ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड

टीम - सोलापूर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Jyotsna Gaikwad

Electronic Engineer

Hobby to write articles

//