संसार वेल ( भाग 1)

Marriage Life

राज्यस्तरीय  करंडक कथामालिका स्पर्धा

विषय- कौटुंबिक कथा

कथेचे नाव- संसार वेल

" ए मम्मी, लवकर टिफिन दे ना. ट्रेन निघून जाईल. फर्स्ट लेक्चर माझे मिस होईल. परत प्रिन्सिपल चा ओरडा खावा लागेल ", रिया आईवर ओरडत होती.

" झाला हं बाळा, फक्त दोनच मिनिटं " , आई बोलली.

" काय मम्मी, तुझे हे रोजचे दोन मिनिटे असतात. कधीही तू माझ्या अगोदर टिफिन रेडी ठेवत नाहीस " , रिया वैतागून बोलत होती.

रियाला कॅन्टीनमध्ये खायला आवडत असे. पण तिच्या आईचा अट्टाहास असायचा की तिला घरचं जेवण मिळावे. 

काहीही करून रिया आईवर ओरडून टिफिन न घेता निघून जायचा प्लॅन करायची पण तिचा तो प्लॅन पूर्णपणे फसायचा.

आज ही रिया तोच प्लॅन सक्सेस होण्यासाठी धडपडत होती पण तिचा प्लॅन फ्लॉप झाला.

रिया टिफिन घेऊन घराबाहेर पडली ही. 

रियाने अकरावीला ऍडमिशन घेतले होते. तिचे कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. एका वेगळ्याच दुनिया मध्ये ती असायची.

रियाचा छोटा भाऊ रोहित. तो आठवीला होता. त्याची दुपारी स्कूल असल्याने तो नेहमी आरामात उठत असे.

रियाचे डॅडी सकाळी च कंपनीमध्ये निघून गेले होते. त्यांची स्वतःची एक मल्टिनॅशनल कंपनी होती.

रिया कॉलेजला निघून गेल्यानंतर नयना नि:श्वास सोडत असे. जोपर्यंत ती घरात असते तेव्हा अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचते. जेव्हा ती घराबाहेर पडते तेव्हाच घरसुद्धा सुटकेचा श्वास टाकतो.

नयनाला फक्त आता किचन आवरून घ्यायचे बाकी होते.

तिच्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजताच होत असे. रोज सगळ्यांच्या अगोदर उठून स्वतःचं आवरून घरातील कामे हाताला घेत असे. 

नितीन सहा वाजता उठून , स्वतःचं आवरून कंपनीमध्ये निघत असे तेव्हा त्याला सगळे रेडी पाहिजे असतं. त्याला कधीही बाहेर खायला आवडत नसे. त्यामुळे तो नेहमी घरून नाश्ता व टिफिन घेऊन जात असे. तीच सवय नयनाला होती. 

नयनाला वाटायचे की , ' प्रत्येकाने घरातीलच अन्नाला प्राधान्य द्यावे. शक्य नसल्यास बाहेर खावे '.

रोहित चे स्कूल उशिरा असल्यामुळे तो घरीच खाऊन जायचा व टिफिन मध्ये फक्त फ्रुट्स घेऊन जात असे.

नयनाचा बंगला प्रशस्त होता व घरात कोणी नोकर - चाकर ही तिने ठेवले नव्हते. ती स्वतःची कामे स्वतः ची करत असत व स्वच्छतेचे ही काम तीच पाहत होती.

प्रत्येक कामासाठी तिने मशीनचा उपयोग केला होता. व्ह्याॅक्युम क्लिनर ,फरशी पुसण्यासाठी माॅब अशा बऱ्याच मार्केटमधून ती नवीन वस्तू आल्या की घेऊन यायची. त्यामुळे तिचे कष्ट हलके व्हायचे.

कपडे धुण्यासाठी ही तिने भारीतली भारी वॉशिंग मशीन खरेदी केली होती. भांडी धुण्यासाठी ही तिने मशीनचा वापर केला होता. बंगला सुसज्ज ठेवला होता.

तिचे किचनचे काम आवरूनच होत होते तेवढ्यात रोहित आवाज देत उठला.

बाथरूम ही नवीन डिझाईनचे बनवून घेतले होते व त्यामध्ये सगळ्या सुख सोयी उपलब्ध केल्या होत्या. 

" रोहित , उठलास बाळा . जा पटकन आवरून घे , तोपर्यंत टेबलावर तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ केले आहेत ते ठेवते ", नयना आवरत- आवरतच रोहितला बोलत होती.

रोहित डोळे चोळतच बाथरूम कडे निघून गेला. रात्री तो व्हिडिओ गेम खेळत बसल्याने त्याला झोपायला उशीर झाला होता व सकाळी उठायचे ही भान राहिले नव्हते.

नितीन ने परदेशातून नवीन व्हिडिओ गेम्स त्याच्यासाठी मागवले होते. 

नयना व नितीन यांना दोनच हुशार व चुणूक असलेली मुले होती. दोन्ही मुले दिसायला देखणी, उंच -पुरी व शरीराने ही हेल्दी होती. अभ्यासात तर त्यांनी घराण्याचे नावच काढले होते. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हे दोघं नेहमी एक ते पाच मध्ये असायचे. स्कूलमध्ये ही वेगवेगळ्या स्पर्धेत पुढेच असायची. 

नयना व नितीन चा संसार दृष्ट लागावा असाच सुरू होता. 

नयनाच्या ओठी नेहमी हेच गाणे असायचे..

' दृष्ट लागण्याजोगे सारे..
गालबोट ही कुठे नसे..
जग दोघांचे असेल जोगे..
स्वर्ग त्यापुढे फिका पडे..

दोघांनाही जे जे हवे ते
होईल साकार येथे
आनंदाची अन तृप्तीची
शांत सावली इथे मिळे....'

खरंच स्वर्ग ही यांच्या संसारापुढे फिका पडला असता. 

नयना ने ही आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम केले होते. तिथेच सीनियर इंजिनीयर म्हणून नितीन ची ओळख झाली होती. नवीन लोकं जॉईन झालेले वीस जण होते त्यामध्ये एक नयना ही होती. त्या टीमचे ट्रेनिंग नितीन कडे होते. 

नितीन हा भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा उमदा पुरुष होता. त्याचे व्यक्तिमत्व च खूप बोलकं होतं. तो ट्रेनिंग अशा प्रकारे द्यायचा की कधी ही त्याने सीनियर किंवा ज्युनिअर हा फरक जाणवू दिला नाही. मुलींकडे तर तो ढुंकूनही पाहत नसायचा. हाच गुण नयनाला खूप भावला होता. दोन महिने ट्रेनिंग मध्ये कसे निघून गेले हे त्या नवीन टीमला कळाले सुद्धा नाही.

ट्रेनिंग झाल्यानंतर पाच- पाच जणांचे ग्रुप करण्यात आले. एक- एक ग्रुप प्रत्येक सीनियर इंजिनिअर कडे सोपवण्यात आले. सीनियर लोकांसोबत राहून हे जुनियर नवीन कोडींग शिकून घेणार होते. नयनाचे नशीब जोमात होते की काय त्यामुळेच परत नितीनच्या ग्रुप मध्ये ती सामील झाली. 

नयनाला तो पाहता क्षणीच आवडला होता. पण तिने तसे कधी कोणालाही जाणवू दिले नाही. कारण तिला माहीत होते, या कार्पोरेट क्षेत्रात सगळं भुलभुलय्या आहे. मृगजळासारखं सगळं दिसतं. वरवर पाहता आपल्याला सगळं भारी वाटतं पण जसे आपण त्या खोलात जातो तसं सत्य रूप बाहेर येतं. कार्पोरेट क्षेत्रात फक्त दिखावा करणारे खूप असतात पण त्यांना व्यसन किंवा गरिबीने पोखरून टाकलेले असते. कोणावर पटकन विश्वास ठेवावा असे व्यक्तिमत्व खूपच थोड्या लोकांमध्ये दिसते. त्यामध्ये नितीन हा असा एक व्यक्ती होता. ज्यावर विश्वास ठेवावा असे नयनाला वाटत होते.

तशी ही ती या कार्पोरेट क्षेत्रात नवखीच होती. नितीन हा तिचा सीनियर असल्यामुळे तिला प्रत्येक ऑफिसमधील गोष्ट त्याच्यासोबत शेअर करावी च लागत होती. 

नयना ही दिसायला खूप सुंदर होती. पाणीदार डोळे, कुरळे केस, धारदार नाक , नितळ त्वचा व सोज्वल भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत असायचा. नयना चे ही व्यक्तिमत्व खऱ्या स्वभावाचे वाटत होते. जे आहे ते आहे जे नाही ते नाही. 

नितीन व नयनाचा स्वभाव जवळपास सारखाच असल्याने त्यांच्यामध्ये लगेच ट्युनिंग जुळून आली. ऑफिसमधील कामाव्यतिरिक्त ते कधीही खाजगी गोष्टी बोलत नसत. 

दोघांनाही एकत्र काम करता- करता दोन-तीन वर्ष कधी निघून गेले कळाले ही नाही.


क्रमशः

नाव- सौ.ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड

टीम -सोलापूर




🎭 Series Post

View all