"आपल्या मुलीला सासरी त्रास होत असेल तर अशावेळी माहेरच्या माणसांनी तिच्या पाठीशी उभे राहायला हवे ना?" हळूहळू माईंचा पारा चढत होता.
"माई, आम्ही कृष्णाच्या सासरच्या मंडळींना समजावतो आणि पुन्हा तिला सासरी सोडून येतो. मग तर झालं?" दादासाहेब जरा नरमाईने म्हणाले.
हे ऐकून कृष्णाची आई पुढे आली. "अहो, मी काय म्हणते, पोरीला इतका त्रास होणार असेल तर आपण काहीतरी करायलाच हवे. मारहाणीच्या खुणा आहेत तिच्या अंगावर. मला माझ्या मुलीला परत तिथे पाठवण्याची अजिबात इच्छा नाही."
"गप्प बसा. तुम्हाला काय कळते? चल माई, कृष्णाला घेऊन आपण तिच्या सासरी जाऊ. मी समजावतो त्या मंडळींना." दादासाहेब, कृष्णा आणि माई पुन्हा कृष्णाच्या सासरी आले.
------------------------
कृष्णाला पाहताच तिच्या सासुबाईंनी आकांड - तांडव मांडला. "काल रात्री घरातून पळून गेली ही! कुठे होती कुणास ठाऊक?"
माई पुढे होत म्हणाल्या, "माझ्याकडे आली होती ती. रात्रभर ठेवून घेतली होती मी तिला. पुन्हा आमच्या मुलीच्या अंगावर हात टाकाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील."
"तरीही मी माझ्या मुलाला, जयवंतला म्हणत होते, ही असली मुलगी सून म्हणून नकोच. न सांगता रात्रभर बाहेर राहिलेली मुलगी आम्हाला नकोच या घरात. शिवाय तिला काही काडीचे काम येत नाही." कृष्णाच्या सासुबाई तावातवाने म्हणाल्या.
"विहीणबाई काय बोलत हे? एकदा मुलीचे लग्न करून दिले की सासर हेच तिचे घर. तुमच्या रीतिभाती तुम्ही शिकवायच्या तिला. आता आम्ही आमच्या मुलीला परत नेऊ शकत नाही. शिवाय लोक काय म्हणतील?" दादासाहेब समजावणीच्या सुरात म्हणाले.
"तर.. लोक काय म्हणतील याची पर्वा कशाला? खरंतर आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून नकोच होती. आमच्या घरी ठेवून तर बघा तिला. बघतेच मी कशी नांदते ती इथे?" कृष्णाच्या सासुबाई भांडायला पुढे आल्या.
हे सारं ऐकून माईंनी कृष्णाला आपल्या घरी ठेवून घेण्याची जबाबदारी घेतली. दादासाहेबांना त्यांनी शब्द दिला, "तुझी मुलगी तुला जड झाली असेल दादा. पण मला नाही. तुझ्या कृष्णेचं मी योग्य स्थळी दुसरे लग्न लावून देईन. मगच डोळे मिटेन."
दादासाहेब रागारागाने आपल्या घरी निघून गेले. खरंतर कृष्णेला आपल्या माहेरी परत जाण्याची इच्छा होती. पण खुद्द वडिलांनीच नकार दिल्याने ती नाईलाजाने माईंच्या घरी राहू लागली.
कृष्णेला पुन्हा आपल्या घरी आलेलं पाहून नंदनला खूप राग आला.
"माई, मी म्हटलं होतं ना ही ब्याद आपल्या गळ्यात पडेल म्हणून? बघ आणि झालंही तसंच."
"नंदन, कृष्णेसारखी मुलगी शोधूनही सापडायची नाही. आपण तिच्या लहानपणापासून ओळखत नाही की काय तिला? दादासाहेब आपली जबाबदारी झटकून मोकळे झाले. पण एका स्त्रीवर होणारा अन्याय मला अजिबात सहन होत नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी कृष्णेचा सांभाळ करीन." माईंनी सकाळी घडलेला सारा प्रकार नंदनच्या कानावर घातला. सासरच्या आणि माहेरच्या माणसांनी तिची जबाबदारी झटकली म्हणून नंदनला वाईटही वाटले.
कृष्णाच्या सासरची माणसे फारच वाईट निघाली. तिच्याबद्दल नको नको त्या गोष्टी त्यांनी गावात पसरवायला सुरुवात केली. पण माई फारच खमक्या होत्या. चार एक दिवसांनी माईंनी आपल्या ओळखीतल्या वकिलाला घरी बोलावून कृष्णाची सारी हकीकत त्याच्यापुढे मांडली. मात्र त्यांच्या तोंडून घटस्फोट हा शब्द ऐकून कृष्णेला घाम फुटला.
तशा माई म्हणाल्या, "तुझा नवरा आपल्या बायकोचा आत्मसन्मान जपण्यासाठी कधी पुढे आला आहे का? त्याचे तुझ्यावर प्रेम तरी आहे? अगं, ज्या माणसांना तू सून म्हणून त्या घरात नको आहेस, ती माणसे तुझ्याशी आयुष्यभर वाईटच वागतील आणि एका नवऱ्याने आपल्या आई -वडिलांचे ऐकून तुझ्यावर दररोज हात उचलणे ही अभिमानाची गोष्ट नक्कीच नाही. याचा अर्थ त्याला स्वतःची बुद्धी नाही असाच होतो आणि लोक काय म्हणतील? याकडे कधीच लक्ष देऊ नकोस कृष्णे. ते दोन्ही तोंडाने बोलतील..तर बोलू देत. आपला त्रास सहन करण्यासाठी लोकं कधीच येत नसतात. नसत्या चौकशा करायला आणि अफवा पसरवायला मात्र पुढे पुढे करतात."
हे मात्र खरं होतं. लग्न झाल्या दिवसापासून कृष्णाच्या नवऱ्याने तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. आपल्या आई-वडिलांचे ऐकून नवरा असण्याचा अधिकार मात्र तिच्यावर गाजवला होता. आता या नात्यात काहीच अर्थ उरला नव्हता. गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. कुणी कृष्णेची बाजू घेत होते तर कुणी तिच्या सासरच्या मंडळींची.
या चर्चा ऐकून नंदनला जीव नकोसा झाला. तो कृष्णेचा राग राग करू लागला. तो तिच्याशी बोलायलाही बघत नसे आणि बोलला तर धड बोलत नसे.
अखेर कृष्णा घटस्फोटासाठी तयार झाली. अनेक दिवस खटपट करून कृष्णाला घटस्फोट मिळाला. तिच्या सासरच्या मंडळींकडून काहीही न मागता माईंनी फक्त कृष्णाच्या लग्नात घातलेले दागिने त्यांच्याकडून सोडवून आणले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा