Oct 18, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! (भाग 4 )

Read Later
संसार हा सुखाचा...! (भाग 4 )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
पुढचे दोन दिवस सगळ्यांसाठीच खूपच अवघड गेले.कोणीच कोणाशी बोलत नव्हतं.आई बाबांची सतत खळबत सुरू होती.फोनही हळू आवाजात चालू असायचे.प्रिया सैरभैर झाली होती...
" आज विनयला उशीर होणार आहे का ग ? आम्ही निर्णय घेतलाय...तो आला की सविस्तर बोलू..." असं म्हणून बाबा आत निघून गेले.
रात्री सगळे जमले...प्रियाच्या हृदयाची धडधड वाढत होती. ' आई बाबा जे सांगितील ते मी मान्य करणार असं विनयने आधीच ठरवलं होतं ...'
" आई , बाबा अगदी निःसंकोचपणे तुमचा निर्णय सांगा.तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य असेल...कुठल्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका..." आई बाबांजवळ बसत विनय म्हणाला...
" आम्हाला मान्य आहे ...आमची आजिबात काळजी करू नका पोरांनो बिनधास्त जा तुम्ही...तुमचा विचार चांगला आहे ...अनुच्या घराजवळ घर बघा आमच्यासाठी म्हणजे झालं.आणि तुझी मावशी आणि आत्याही आहेत जवळपास म्हणजे अगदी छान कंपनी आहे आम्हाला...आपले जावई बापू म्हणजे देवमाणूस ते आल्यावर कोणतीही गैरसोय होणार नाही हे नक्की...आता करियर वर फोकस करा आणि आयुष्य आनंदाने जगा...आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच..." बाबा हसत हसत विनयला जवळ घेऊन म्हणाले ...
प्रिया विनय खूप खुश झाले...दोघेही आई बाबांच्या पाया पडले... सिद्धीसुद्धा आनंदात आजी आजोबांचा आशीर्वाद घ्यायला विसरली नाही...
" तिकडे जाऊन आपले संस्कार विसरायचे नाहीत हा बाळा, आमची सिद्धू अशीच छान वागली पाहिजे नेहेमी...खूप मोठी हो यशस्वी हो बेटा...तिथेही अगदी पहिला नंबर नेहेमी मिळवशिल याची खात्री आहे आम्हाला..." आजोबांचे पाणावलेले डोळे बघून सिद्धी आजोबांच्या कुशीत शिरली !
" आजी आजोबा तुम्ही काहीच काळजी करू नका.मी अगदी शहण्यासारखी वागेन.शुभंकरोती , श्लोक रोज न चुकता म्हणेन .आणि तुम्ही पण तिकडे लवकर या आपण मस्त मज्जा करूया...आणि सुट्टी लागली की मी सुद्धा येईन इकडे..." शहाणी माझी बाळी म्हणून आज्जीने सिद्धीला जवळ घेतलं...
" तुझ्या प्रगतीच्या आड नाही रे येणार मी विनू...फक्त इतक्या वर्षांनी तुम्हा सगळ्यांना सोडून राहणं अवघड होईल हे मात्र खरं.आईला मुलाच्या सुखापुढे अजून दुसरं काय हवं ! छान आनंदात राहा तिकडे आणि आम्हाला विसरून कायमचे तिकडेच स्थाईक नका रे होऊ...आणि हो घर फार मोठं नको घेऊस रे आमच्यासाठी , उगीच आवरण होत नाही माझ्याच्याने आता...प्रिया तू सगळे कुळाचार नीट कर्शीलच याची खात्री आहे मला... देवाचं सगळं नित्यनियमाने करत जा...
सगळी नीट चौकशी करून जा रे बाबा , परका देश तिकडे कोणी नाही आपलं, सगळं नीट असेल तरच जा..." आईची माया ओसंडून वाहत होती...
घरात आज खऱ्या अर्थाने आनंद भरून गेला होता...प्रियाने मग पटकन सगळ्यांसाठी आईस्क्रिम आणले...सगळ्यांची तोंडे गोड झाली. विनयने ताईला आणि भावजीना फोन करून आनंदाची बातमी दिली आणि लवकरात लवकर आई बाबांसाठी घर शोधायला सांगितले.ते दोघेही खूप आनंदले !
विनयने आता जोरात तयारी सुरू केली..कंपनीकडून लागणाऱ्या अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे हे खरंच मोठे काम होते...प्रिया घरच्या जुळवाजुळवीत लागली...घर स्वतःच होतं त्यामुळे ते भाड्याने देऊया आणि सगळं सामान आई बाबांच्या नवीन घरात पाठवायचे असं सर्वानुमते ठरलं...
काही दिवस असेच गेले आणि अनिताचा फोन आला ....
" मी आई बाबांसाठी एक फ्लॅट बघितलाय...अगदी मोक्यावर आहे , मार्केट अगदी खाली उतरल्यावर सगळं आवश्यक समान मिळेल असं आहे..माझ्या घरापासून फारसं दूर नाही... आत्याच्या घरापासून तर अवघं पाच मिनिटाच्या अंतरावर...बघ कसं करायचं ते..पण एक अडचण आहे मालक फ्लॅट भाड्याने द्यायला तयार नाही , विकायचा म्हणतोय...किंमत आहे तशी चांगली...मला तर आवडलाय...तुम्ही ठरवा काय ते... हवं तर येऊन जा लगेच.मी फोटो पाठवते बघून एक दोन दिवसात निर्णय घ्या ..." 
" आई बाबा कसं करायचं आता ? खरंतर आता इतका खर्च करणं बरोबर नाहीये...आणि शिफ्टींग साठीही बराच खर्च होईल .मला वाटतंय की भड्यानेच घ्यावा सध्या फ्लॅट.आणि तसंही तुम्हाला कुठे फार दिवस राहायचं आहे तिकडे ? " विनयने आपली अडचण सांगितली...
" विनू अरे तुला सांगायचच राहिलं, तुझ्या आईची कधीपासून इच्छा आहे लेकीजवळ घर घ्यायची.आणि हे ठरलं तेव्हाच तिने सांगितलं होतं की मी भाड्याच्या घरात राहणार नाही...तिने हे सांगितलं असेल अनुला म्हणूनच तिने असा फ्लॅट बघितला...माय लेकीची खलबतं चालू आहेत कधीपासून " बाबांनी हळूच विनयला सांगितलं !
" आता विषय संपला म्हणायचा मग , आईला पटवणे काही खरं नाही...बघुया करूया काहीतरी...तुम्ही असं करा , आईला घेऊन जाऊन या , फ्लॅट बघा अजूनही काही घरं मी एका एजंट करवी बघितली आहेत ऑनलाईन , सगळं बघून ठरवा काय ते...तुमचं काही ठरलं की मग मी येतो फायनल करायला , सध्या सुट्टी घेणं अवघड आहे..." विनय बाबांना म्हणाला.
आई बाबा अनिता कडे गेले...खूप वर्षांनी प्रिया आणि विनयला एकांत मिळाला...
" मग काय खुश ना माझी राणी ? आता फक्त थोडेच दिवस ग मग आपला नवलाईचा संसार सुरू होणार पुन्हा...मग काय विचार आहे सेकंड हनिमून प्लॅन करायचा का ? " विनय रंगात आलेला पाहून प्रिया गोड लाजली आणि विनयचा कलिजा खलास झाला...प्रिया अजूनही खुप गोड दिसायची , पण घरच्या रहाटगाडग्यात तिला स्वतःसाठी आणि विनयसाठी वेळच मिळत नव्हता...
आता लंडन ला गेल्यावर सगळी कसर भरून काढायची आणि फक्त एकमेकांसाठी भरभरून जगायचं असं दोघांनी ठरवलं...!
एक एक गोष्टी हळूहळू ठरत होत्या...प्रियाने सुद्धा बरीच माहिती गोळा केली होती... लंडनच राहणीमान , तिथलं हवामान , काय काय वस्तू न्यायच्या , सिद्धीच स्कूल अश्या अनेक गोष्टींचा रिसर्च सुरू होता...नाही म्हटलं तरी प्रियाला धास्ती वाटत होती...परक्या ठिकाणी आपण एकटे आणि सिद्धी सुद्धा लहान होती.तिला सगळं मॅनेज होईल का याचीही काळजी होतीच.... विनयच्या कंपनीतले कलिग्स तिकडे होते त्यामुळे त्यातल्या त्यात जरा समाधान होतं...अगदीच अडचण आली तर मदतीला बोलावण्यासाठी कोणीतरी असणार होतं...
प्रियाने घरातला जास्तीचा पसारा आवरायला काढला होता तितक्यात विनयचा फोन आला..." प्रियू गूड न्यूज , व्हिसा ची डेट मिळाली ! येत्या शुक्रवारी सकाळीच इंटरव्ह्यू आहे...आपल्याला गुरुवारी दुपारीच निघाव लागेल...दोनच दिवस आहेत तयारीला...बरीच डॉक्युमेंट्स तयार करायची आहेत आणि काही प्रश्नही विचारतील आपल्याला , त्याचीही तयारी करावी लागेल...मी रात्री आलो की सांगतो सगळं सविस्तर...आता मी काही डॉक्युमेंट्स सांगतो ते सगळे प्रिंट काढून तयार ठेव...तुझे माझे आणि सिद्धी चे अशी वेगळी वेगळी फाईल कर म्हणजे गोंधळ होणार नाही...आणि सिद्धीच्या शाळेतून सुद्धा एक सर्टिफिकेट लागणार आहे ते आधी करून घे... चल बाय...खूप काम आहे मला ..."
प्रिया सगळा पसारा सोडून आधी शाळेत गेली....तिथे रिक्वेस्ट दिली आणि उद्यापर्यंत डॉक्युमेंट तयार करायला सांगितलं.मग बाकीचे डॉक्युमेंट प्रिंट करून आणले.तोपर्यंत बराच उशीर झाला होता.घरी येऊन सगळे डॉक्युमेंट अरेंज केले आणि मग स्वयंपाकाला लागली...आज काहीतरी शॉर्टकट करूया म्हणून तिने खिचडी बनवली आणि सकाळच्या उरलेल्या पोळ्या फोडणी घातल्या...खरंच आज आई बाबा नव्हते म्हणून तिला शॉर्ट कट मारता आला...ते असले की सगळा साग्रसंगीत स्वयंपाक ठरलेला...
" काय ग प्रिया इतका वेळ का फोन उचलायला ? काय करत होतीस ? जेवायला काय केलंस ? विनू आला नाही का अजून त्याला फोन केला पण उचलला नाही त्याने...घराचं फायनल करायचय तो आला की फोन करायला सांग त्याला...आमची मस्त बडदास्त ठेवली आहे अनु ने ...रोज काय काय पदार्थ खाऊ घालते...भारीच उरक आहे तिला कामाचा...तू सुद्धा जरा शिकून घे तिच्याकडून...तिकडे एकटीलाच करावं लागेल ना सगळं..." आईंचा फोन आला की तिला मिळणारे टोमणे पक्केच असायचे...
" हो आई जरा कामात होते ...हे गाडी चालवत असतील म्हणून नसेल उचलला फोन...मी सांगते आले की फोन करायला...विसा ची तारीख मिळाली आहे .परवा जावं लागेल आम्हाला...बाकी छान वाटलं तुम्ही मजेत आहात ते . कसं आहे घर ? कुठे आहे ? किती मोठं ? " प्रियाला उत्सुकता लागली होती...
तितक्यात विनय घरी आला आणि प्रियाने फोन त्याच्याकडे दिला...
" हा बोल आई , अगं मी गाडी चालवत होतो त्यामुळे उचलला नाही फोन...विसा ची तारीख मिळाली बरं का शुक्रवारची...तुमचं काय ? लवकर फायनल करा आणि या इकडे.करमत नाही तुमच्याशिवाय..." विनय बोलला
" अरे आम्हाला एक घर आवडलंय... अनुच्या घरापासून जवळच आहे.ती म्हणत होती ना तेच...सगळं छान वाटतंय...तू ये इकडे म्हणजे सगळं फायनल करून टाकू...मग नंतर जा तू त्या विसा साठी...तारीख वाढवून घे ...हा मालक काही थांबणार नाही म्हणतो..." आई म्हणाली
" अगं आई तसं नाही करता येणार ...विसा साठी जाणं आवश्यक आहे.मला फोटो दाखवा घराचे आणि मी बोलतो भावजिंशी व्यवहाराच्या गोष्टी...तुम्हाला आवडलाय ना मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही...जर काही टोकण पैसे भरून तो मालक थांबायला तयार असेल तर मी बघा...पण व्हिसा इंटरव्ह्यू झाला की माझा अजून एक इंटरव्ह्यू असणार आहे त्यामुळे आठ दिवस तरी मला नाही येता येणार...पण प्रिया येऊ शकते रविवारी... भावजिना दे ना फोन मी बोलतो त्यांच्याशी..." 
विनय मग सुजय रावांशी सविस्थर बोलला...सगळं काही ठीक वाटत होतं किंमत जरा जास्त होती पण फ्लॅट अगदी मोक्याच्या जागेवर होता आणि मुख्य म्हणजे आई बाबांना खूप आवडला होता...बाकी सगळी चौकशी सुजय रावांनी केली होती त्यामुळे मग विनयला होकार देण्यावाचून गत्यंतर नव्हते...
सर्वानुमते फ्लॅट घ्यायचा ठरला...पैश्यांची व्यवस्था विनयने आधीच केली होती त्यामुळे तसा प्रश्न नव्हता...
" ठीक आहे मग आमचं आम्ही बघून घेतो...पैसे जावई बापूंच्या खात्यावर पाठवून दे...प्रियाला पाठवायची काही गरज नाही... अनु आणि जावई बापू आहेत , आम्ही सुद्धा समर्थ आहोत आणि आता सवय करायलाच हवी आम्हाला ...तुम्हाला आता बऱ्याच दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत..." विनय तिकडे जायला नाही म्हंटल्यावर आई बाबांना राग आला होता...खोचकपणे बोलून त्यांनी फोन ठेऊन दिला...
विनयला आणि प्रियाला खूप वाईट वाटले...पण पर्याय नव्हता...मनात असूनही जाणे शक्य नव्हते हे आई बाबा समजून घेत नव्हते आणि उगीचच मनात अढी धरून होते ....
व्हिसा ची डेट मिळाल्याचा आनंद आई बाबांच्या अश्या वागण्यामुळे दुखात परिवर्तित झाला होता...

पुढे काय होईल ? विनयला विसा मिळेल का ? आई बाबांच्या मनातली अढी दूर होईल का जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing