Oct 18, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 13 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 13 )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


आई बाबा निघाले तशी अनिताने पटकन मावशीला फोन केला आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली...थोडीशी जरी गडबड झाली तरी आई बाबांना कळणार होतं आणि मग सगळं सरप्राइज पाण्यात जाणार होतं... मावशीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि अनिताला हायस वाटलं.
अनिताने हे प्रियाला सांगितल्यावर तिलाही बरं वाटलं...दोघी आवरून मुलांना घेऊन निता मॅम कडे पोचल्या...आज प्रॅक्टिस चा पाहिला दिवस होता त्यामुळे धडधडत होतं....सुजय सुद्धा पोचला...विनय ऑनलाईन आला आणि निता मॅम ने सगळ्यांना सूचना देऊन प्रॅक्टिस सुरू केली...
अनिता प्रिया ची जोडी बऱ्यापैकी नीट स्टेप्स करत होती , मुलांचा तर प्रश्नच नव्हता , मॅम जसं सांगतील तस मुलं पटापट करत होती...सुजय आणि विनयची मात्र वाट लागली होती...आणि त्यांना शिकवता शिकवता निता मॅमची सुद्धा सगळी कला पणाला लागली होती....पण सगळ्यांनाच खूप मज्जा येत होती..हास्य विनोद , धिंगा मस्ती आणि डान्स यात दोन तास कसे गेले ते कळलेच नाही...
मंडळी घरी यायला निघाली...सगळेच खूप थकले होते...आता घरी जाऊन स्वयंपाक करायची इच्छा प्रिया आणि अनिताची साहजिकच नव्हती....दोघीही काहीतरी शॉर्ट कट बेत करणार हे सुजयने ओळखले आणि " जेवण ऑर्डर करायचं की जाऊया हॉटेल मध्ये ? " असा कानाला गोड गोड लागणारा प्रश्न विचारला...
मुलांनी लगेच " पिझ्झा पिझ्झा " ओरडायला सुरुवात केली !
" हो चालेल पिझ्झा करूया ऑर्डर , नाहीतरी आई बाबा नाहीत आपल्या सगळ्यांना पिझ्झा खायला तेव्हढाच चान्स..." अनिताने आनंदाने होकार दिला ! सुजयने लगेच सगळयांच्या आवडीची ऑर्डर दिली म्हणजे घरी पोहोचेपर्यंत पिझ्झा सुद्धा येणार होता...
घरी पोहोचून फ्रेश होईपर्यंत पिझ्झा आलाच , सगळे तुटून पडले !
" ताई उद्यापासून आपण जातानाच स्वयंपाक करून जात जाऊ म्हणजे आल्यावर लगेच जेवता येईल...नाहीतर काही खरं नाही भावजिंच... बघा चेहेरा किती उतरलाय तो..." प्रियाने सुजयला चिडवल ...दोघांचं नातं अगदी बहीण भावासारखं होतं...
" हो हो बघा बघा किती काळजी भावाची...तिकडे माझ्या भाऊरायाची काय अवस्था झाली होती...बिच्चारा ग...आता आपल्या या दोघी भावांनी परफॉर्मन्स ची वाट लावली नाही म्हणजे मिळवली...दोघे मित्र एका पेक्षा एक बोर आहेत... आज्जिबात हलत नाहीत.बिच्चारी निता सांगून सांगून थकली... असच चालू राहिलं तर डान्स क्लास बंद होईल तिचा..." अनिताने सुजय ची खेचायला सुरुवात केली...सगळे हसायला लागले...
" पप्पा खरंच आता प्रॅक्टिस करा तुम्ही नाहीतर फंनी होईल आपला प्रोग्राम..." नेहा म्हणाली , ती अजून काही बोलू नये म्हणून अनिताने तिला दटावल...
" हो नाही जमत आम्हाला , आयुष्यात पहिल्यांदाच तर करतोय ना असा परफॉर्मन्स...आणि पहिलाच तर दिवस आजचा , ऑफिस मधून इतका थकून भागून आलेला जीव पण कोणाला काही आहे का त्याचं ? आम्ही दोघे बिच्चारे इतका जाच सहन करतो तुमचा आता मी एकटा बघून मला पीडताय नुसते...आई बाबांना सांगतो मी मग बघा...कोणी हसायची गरज नाहीये बघून घेईन एकेकाला..." सुजयने सगळ्यांना सुनावलं...पण कोणावर काहीच परिणाम झाला नाही.सगळे अजुनच जोरात हसायला लागले आणि सुजयने \" आता आपलं काही खरं नाही \" म्हणून तिथून काढता पाय घेतला !
मुलं झोपली आणि प्रिया , सुजय आणि अनिता पुढच्या प्लॅनिंग ला लागले... मुंजिचा मुहूर्त सकाळचा लवकरचा होता त्यामुळे बाकीचे विधी आदल्या दिवशी संध्याकाळपासून करावे लागणार होते.त्यामुळे हॉल सुद्धा आदल्या दिवशीच घ्यावा लागणार होता...जवळचे नातेवाईक आधीच येणार असल्यामुळे सकाळपासूनच सगळ्यांची व्यवस्था करायचं ठरलं...मुंज झाली की दुपारचं जेवण आणि मग संध्याकाळी बाकी कार्यक्रम असं करायचं ठरलं...आई बाबांचं नव्याने लग्न , मग परफॉर्मन्स , मग आई बाबांची तुला , त्यानंतर आईंचा वाढदिवस , त्यात आईचं सगळ्या नातेवाईकांकडून स्वागत ....मग मावशीच्या गाण्याचा कार्यक्रम होणार होता...
हे झालं की आई बाबा विषयी सगळ्यांच मनोगत , व्हिडिओज आणि मुलांचा अजून एक परफॉर्मन्स असा दणकेबाज कार्यक्रम ठरला ! आई बाबांना नवरा नवरी सारखं सजवून लग्नमंडपात आणलं जाणार होतं आणि पुन्हा एकदा त्यांचं लग्न लागणार होतं ! सुजय आणि अनिता कन्यादान करणार होते ...एक आगळा वेगळा सोहळा सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणार होता...! प्रिया विनय च सरप्राइज फेअरवेल सुद्धा अनिता आणि सुजयने प्लॅन केलं होतं.तो सुद्धा अफलातून कार्यक्रम होणार होता...अनिता - सुरेश विनय आणि प्रिया होणार होते आणि नेहा - यश आई बाबा ... पीहू पिहुचा रोल करणार होती...एक धम्माल नाटूकले अनिता सुजयने आधीच बसवले होते आता फक्त गुपचूप त्यात पिहुला सामील करून घेतले होते...निता मॅम कडे मुलांच्या डान्स बरोबर त्याचीही गुपचूप प्रॅक्टिस सुरू होती...!
आई बाबा सोडून बाकी सगळ्यांना याची कल्पना देण्यात येणार होती...
" डिझाईन बघितलं का तुम्ही दोघींनी आमंत्रण पत्रिकेच ? मुंजीची वेगळी पत्रिका तयार करू आणि बाकी कार्यक्रमाची वेगळी...म्हणजे त्या प्रमाणे बोलवता येईल...फक्त जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आई बाबांच्या प्रोग्राम ला बोलावू या आणि मुंजिला मात्र सगळ्यांनाच बोलावू या...आता डिझाईन फायनल करा आणि उद्या मला गेस्ट लिस्ट फोन नंबर सहित हवी आहे बरका...सगळ्यांना आधीच इनवाईट करायला हवं ...आणि आपण लिस्ट बघून वाटून घेऊया कोणी कोणाला फोन करायचे ते...तुम्ही दोघी आता पटापट कामाला लागा, आई बाबा नाहीयेत तोवर सगळं आटोपू ..." सुजयने दोघींना सुनावलं...
" हो रे बाबा , लिस्ट तयार आहे...डिझाईन आता करून टाकू फायनल...आणि उद्या सुट्टी आहे तर तुझी आणि विनयची शॉपिंग करून टाकू ...रिटर्न गिफ्ट काय द्यायचं ते ठरवू या...मी काही सँपल मगवलेत बघा बरं काय ठरवायचं ते विनयला कर व्हिडिओ कॉल म्हणजे आताच ठरवून टाकूया मग ऑर्डर देता येईल उद्या... हॉल वाल्याशी बोलालायेस ना सगळं ? उद्या आम्हा दोघींना घेऊन जा तिकडे म्हणजे सगळं बघू नीट आणि जेवण टेस्ट करून मेनू सुद्धा करू फायनल...अजून काय काम राहीलियेत आठवा बरं , मला तर टेन्शन येतंय नुसतं...इतका घाट घातलाय आपण सगळं व्यवस्थित होईल ना..." अनिता म्हणाली.
" होईल हो सगळं व्यवस्थित काही काळजी नका करू...उद्याची खरेदी आटोपली की बहुतेक सगळी शॉपिंग आटोक्यात येईल... मुंजीसाठी जवळच्या नातेवाकांनाआहेर करायचे असं म्हणत होत्या आई ...मावशी , आत्या त्यांना त्यांच्या पसंतीच्या साड्या घायच्या असही म्हणत होत्या...त्यात दिवस जाईल आपला ...ते ही लवकर करून टाकायला हवं..." प्रियाने आठवण दिली
" हो ग बरं झालं आठवण दिलीस...उद्याच करून टाकू हे काम...पण होईल का सगळं एका दिवसात ? नाहीतर असं करू , आई , मावशी आणि आत्या ला पाठवू खरेदीला त्या सिलेक्ट करतील ...तोपर्यंत आपण या दोघांची खरेदी आटोपु आणि मग त्यांना जॉईन होऊन फायनल करू सगळं...काका , मामा लोकांचेही कपडे सांगुया त्यानांच , सगळ्यांच्या पासंतीची होऊ दे खरेदी..." अनिता म्हणाली... प्रियानेही दुजोरा दिला..
सुजयने विनयला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं...सगळ्यांच्या पसंतीने मग पत्रिकेचा मजकूर आणि डिझाईन ठरलं ...आई बाबांना एखादा दागिना द्यावा अशी प्रियाची इच्छा होती म्हणून सगळ्यांनी मिळून बाबांसाठी सोन्याचं ब्रसलेट आणि आईसाठी सुंदर हार ऑनलाईन पसंत केला...उद्या जाऊन प्रिया आणि अनिता ऑर्डर देणार होत्या...दोघांसाठी अंगठ्या सुद्धा घ्यायचं ठरलं...विनय आणि अनिता ने मिळून घेतल्यामुळे बजेट वाढलं आणि छान वस्तू घेता आल्या...ही सुद्धा प्रियाची कल्पना की आपण मिळून घेतलं तर चांगली वस्तु घेता येईल आणि ते सगळ्यांनी मान्य केलं...
सकाळी अनिताने मावशीकडे फोन करून आई आणि मावशीला आत्याला घेऊन शॉपिंग ला जाण्यास सांगितले...
प्रिया , सुजय आणि अनिता त्यांची शॉपिंग आटोपून त्यांना जॉईन होणार होत्या... असं केल्यामुळे खूप वेळ वाचणार होता... मुलं निता मॅम कडे प्रॅक्टिसला जाणार होती त्यामुळे दोन तीन तास तरी त्यांचा प्रश्न नव्हता... सूजय ची खरेदी झाली की तो मुलांना घेऊन घरी येणार होता....
सगळे भरपेट नाष्टा करून निघाले...दुपारी जेवणासाठी प्रियाने पराठे करून ठेवले होतेच....
सुजय आणि विनयच्या खरेदीला फारच वेळ लागला होता...काहीच मनासारखं मिळत नव्हतं...सुजयला मुंजीसाठी धोतर आणि सिल्क चा छानसा कुर्ता मिळाला...परफॉर्मन्स साठी विनयला जोधपुरी हवा होता तर सुजयला पठाणी...विनय तिकडून ऑनलाईन होताच...
" काय चाललंय रे तुम्हा दोघांचं ? आम्ही तिघींची तिन्ही प्रोग्राम ची शॉपिंग यापेक्षा कमी वेळात केली आणि तुमचं सरतच नाहीये...तिकडून फोन येतायेत आईचे ...चार दुकानं पालथी घातली आता अजून किती फिरायचे ? आता बास्स ...आम्ही चाललो तुम्हाला काय करायचं ते करा..." अनिता वैतागली होती...
" डार्लींग प्लीज ना अशी नको ना चिडू... बरं आता तू जे म्हणशील ते घेतो मग तर झालं ना ...आणि तुझा भाऊराया तर तुझ्या आज्ञेत आहेच..." सुजयने अनिताला मस्का लावणं सुरू केलं...
आता प्रिया आणि अनिताने पटापट मस्त सिलेकशन केलं...दोघं मित्र \" बायको असावी तर अशी \" असं म्हणून खुश झाले....काम झालं तसा सुजयने तिथून काढता पाय घेतला...घरी जाऊन जेवून मस्त ताणून द्यायचा त्याचा प्लॅन होता ...मुलांना एखादी मूव्ही बघत बसवायचं असं त्याने मनाशी ठरवलं...
प्रिया आणि अनिता आई होती त्या दुकानाकडे निघाल्या...सुजय मनातल्या मनात दोघींच्या उत्सहाच कौतुक करत होता...तो तर थकून गेला होता पण या दोघी मात्र अजूनही उत्साहात होत्या...
आईने पसंत केलेल्या साड्या दोघींनाही आवडल्या नव्हत्या...मग पुन्हा दुसऱ्या साड्या बघाव्या लागल्या...शेवटी सगळ्यांसाठी सारख्या साड्या ची खरेदी झाली...बाबा , काका आणि मामा मिळून पुरुषांची खरेदी करत होते...शेवटी एकदाची खरेदी पूर्ण झाली...आणि सगळी मंडळी आनंदाने घरी गेली...
सुजयची झोप मस्त झाली होती...मुलंही थकून झोपी गेली होती ...मुलांना उठवून सुजयने दूध दिलं आणि अनिताला फोन केला..." झालं की नाही ग तुमचं ? हॉल वर जायचंय ना ...येऊ का मी तिकडे तुम्हाला घ्यायला ? "
" अरे देवा ! ते तर राहिलंच...आणि प्रॅक्टिस ला पण जावं लागेल ना निता मॅम कडे...कसं होणार सगळं ? " अनिता काळजीत पडली...
" ताई , आपण सरळ घरी जाऊया आता जरा फ्रेश होऊन प्रॅक्टिस ला जाऊया आणि हॉल वर उद्या सकाळी जाऊ...चालेल का ? " प्रिया म्हणाली ...अनिताने होकार दिला...तसही दिवसभर फिरून दोघीही दमल्या होत्या घरी जाऊन तासभर आराम करून मग प्रॅक्टिसला जाता येणार होतं...
दोघी घरी आल्या...सुजयने गरम गरम चहा दोघींना दिला आणि समोसे सुद्धा...दोघींनीही खूपच आनंदाने सुजयकडे पाहिलं... इतकं थकल्यावर हातात गरम चहा आणि समोसे मिळण्याच भाग्य दोघींना लाभलं होतं...आतून खमंग वास येत होता...
" ताई खरंच फारच भाग्यवान आहात तुम्ही...इतकी काळजी घेणारा नवरा मिळायला खरंच भाग्य लागतं..." प्रियाला मध्येच थांबवत सुजय म्हणाला..." थांब थांब ...लगेच नको करुस कौतुक...आता तुम्ही दोघी आराम करा तासभर...मी मुलांना बाहेर घेऊन जातो खेळायला...रात्रीच्या जेवणासाठी पुलाव तयार आहे...येतोय ना खमंग सुवास...आज जरा मास्टर शेफ च्या हातचं खाऊन बघा मग कळेल तुम्हाला खरी चव कशाला म्हणतात ते... हा आता करा कौतुक कंटीन्यू..." सुजय हसत म्हणाला...
अनिताच्या डोळ्यात सुरेशबद्दल खूप प्रेम आणि अभिमान दिसत होता...डोळे आनंदाने भरले होते...खरंच तिला आपल्या भाग्याचा हेवा वाटत होता...
" खरंच दृष्टच काढायला हवी तुमची...ताई तुमच्याबरोबर मी सुद्धा भाग्यवान आहे बर का , माझा भाऊ किती समजून घेणारा आहे...भाऊजी तुमच्या मित्राला सुद्धा जरा सांगा काहीतरी...मी तर आसुसले आहे यासाठी...बघा ताई माझा भाऊ कित्ती छान आहे नाहीतर तुमचा भाऊ...ट्रेनिंग द्या त्याला चांगलं..." प्रिया खूप आनंदली होती...पण विनय कधीच असा वागला नव्हता याची हलकिशी दुःखी भावना तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावून गेलीच...

पुढे काय होईल ? कार्यक्रम कसा होईल ? अजून काय काय घडेल ? जाणून घेऊया पुढील भागात...

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing