Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 8 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 8 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून.." विनय अरे काय झालं ? कोणाचा फोन आला होता ...अरे बोल ना काहीतरी ..." विनयचा पडलेला चेहरा बघून प्रियाचा जीव घाबरा झाला...
" भाऊजिंचा फोन होता , आई पडली आणि तिच्या हाताला आणि पायाला लागलं आहे ...खूप काही सिरीयस नाही पण पायाला प्लास्टर घालावं लागणार बहुतेक..." आईच्या काळजीने विनयचा चेहेरा पार सुकून गेला होता...
" आपल्याला जावं लागेल ना तिकडे...मी आवरते तू तिकिटांच बघ...संध्याकाळच्या गाडीने निघुया..." प्रिया लगेच आवरायला निघाली..
" अगं पण एक प्रॉब्लेम आहे , आपला व्हिसा येणार आहे ना घरी मग आपण कसे जाणार ? आपण दोघेही हजर पाहिजे , आपल्या हातातच देतात ते दुसऱ्या कोणाच्या हातात नाही देत.खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ना ते...मी सांगतो तसं फोन करून भावजिना . व्हिसा आला की जाऊ आपण लगेच " विनयने आपला प्रॉब्लेम सांगितला
" ओह...म्हणजे मलाही नाही जाता येणार , नाहीतर मी एकटी तरी गेले असते... आईंना समजावून सांगावे लागेल नीट नाहीतर अजून वाईट वाटेल त्यांना...आधीच त्यांच्या मनातली अढी अजून गेली नाही.त्यात हे अजून एक कारण...काय होतंय रे असं...नुसता ताप झालाय डोक्याला...व्हिडिओ कॉल कर आता बोलूया आईंशी " प्रियाचा आणि विनयचा इतका चांगला मुड एकदम काळजीने व्यापून गेला...!
" कशी आहेस ग आई ...अशी कशी ग धडपडलीस ? इतक्या वर्षात कधीच नाही झालं असं...काय म्हणाले डॉक्टर ? काही काळजी करण्यासारखं तर नाही ना...काळजी घे...तशी तुझी लाडकी लेक आहेच तुझ्याजवळ , त्यामुळे काळजी नाही काही.आम्ही येतो पुढच्या आठवड्यात..."
" बरीच आहे म्हणायची...थोडक्यात निभावलं...मला वाटलं होतं की तू लगेच धावत येशील आपल्या आईला बघायला पण पुढच्या आठवड्यात येतो म्हणतोयस...ठीक आहे बाबा तुला आईपेक्षा अनेक महत्वाची कामे असतील आणि आता आम्हाला सवय करून घ्यायलाच हवी ना ..पिकली पानं आम्ही , सारखं काही ना काही होत राहणारच...नशीब अनु तरी आहे इथे नाहीतर आम्ही म्हातारे बिचारे वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली असती ...." आईंच् बोलणं प्रियाच्या जिव्हारी लागत होतं...
" अहो आई असं काय बोलताय तुम्ही ? आहों आम्ही कधी काही चुकीचं वागलो आहे का तुमच्याशी...आई अहो व्हिसा घरी येतो पासपोर्ट सोबत ते महत्त्वाचं असतं खूप त्यामुळे आम्ही इथे हजर असणं आवश्यक आहे म्हणून आम्ही नाही येऊ शकत लगेच नाहीतर ताबडतोब निघालो असतो हो...रहावलं असतं का आम्हाला ? काही काळजी करू नका , लवकर बऱ्या व्हाल तुम्ही...आम्ही व्हिसा आला की लगेच येतो...काळजी घ्या..."
" आम्हाला काय कळतंय त्यातलं , तुम्हाला हवं तसं करा , नाही आलात तरीही ठीक आहे ..माझी लेक आहे माझी काळजी घ्यायला समर्थ...तुम्हाला काय करायचं ते करा..." असं तोडून बोलून आईंनी फोन ठेवून दिला...!
विनयने सगळं ऐकलं होतं.त्याच्या डोळ्यात पाणी आलं...प्रिया तर रडायलाच लागली...
" काय चूक आहे रे आपली ? असं कसं बोलू शकतात आई ? कुठे कमी पडलो आपण...मी त्यांचं इतकं केलं , स्वतःच्या आई पेक्षा जास्त काळजी घेत आलीय त्यांची आणि त्यांनी असं बोलावं ? त्यांना साधा ताप आला तरी तू चार वेळा फोन करतोस मी तर सतत जवळ असते ...आणि त्या असं का बोलल्या असतील त्या ? मला खूप त्रास होतोय , आणि वाईट वाटतं खूप..." प्रिया खूप दुखावली होती..
विनय सुद्धा आज आईच्या वागण्याने फारच दुःखी झाला होता... तो नेहेमी काही झालं की प्रियाची समजूत घालायचा पण आज तो स्वतःची समजूत घालण्याचा असफल प्रयत्न करत होता...
कितीतरी वेळ दोघेही स्वतःच्या भावना आवरत एकमेकांना मूकपणे आधार देत होते...
सिद्धी घरी आली आणि दोघे भानावर आले...दोघांचाही रडवेला चेहरा पाहून ती चिमुकली सुद्धा भेदरली...
" मम्मा , पप्पा काय झालं तुम्हाला ...रडत होता का तुम्ही ? काय झालं ..." सिद्धीने दोघांना जवळ घेतलं...त्यांना पाणी पाजलं...
" काही नाही ग बाळा , आपल्या आज्जीला थोडा बाऊ झालाय पायाला...पण आपण लवकर जाऊया तिच्याकडे..." प्रियाने तिला समजावलं आणि पटकन फ्रेश होऊन आली...काहीही झालं तरी घरच्या भानगडीचा सिद्धीवर काहीच परिणाम तिला होऊ द्यायचा नव्हता...
घरातलं वातावरण खूपच विचित्र झालं होतं...कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हतं...रूटीन सुरू होतं पण कुठलेच चैतन्य नव्हतं...दोघेही वरवर सगळं ठीक असल्याचं भासवत होते पण मनातून मात्र वेदना जात नव्हती...दोन तीनदा फोन करूनही आईशी बोलणं झालंच नव्हतं...काहीतरी कारण सांगून टाळलं जात होतं... विनयने अनिताला फोन केला पण तिनेही तुटकपणें बोलून फोन ठेऊन दिला...
काही दिवस गेले आणि एकदाचा व्हिसा आला... सगळं व्यवस्थित होतं...
विनयने लगेच तिकीटे बुक केली ...प्रियाने निघायची तयारी केली...विनय दोन दिवस राहून परत येणार होता.त्याला जास्त राहणं शक्य नव्हतं पण प्रिया आणि सिद्धी आई बरी होईपर्यंत राहणार होत्या...शाळेला सुट्टी लागलेली असल्यामुळे काही चिंता नव्हती...
मंडळी निघाली.ताईकडे आधी काहीच कळवल नव्हतं...
तिघेही पोचले...
संध्याकाळची वेळ होती , अनिताची मुले यश आणि नेहा बाहेर खेळत होती...मामा मामी आणि सिद्धीला बघताच दोघेही खेळ सोडून त्यांना बिलगली... सिद्धीला आपल्यासोबत घेऊन दोघे परत खेळायला गेले...प्रिया आणि विनय घरात आले...दार उघडेच होते...बाबा टेबलावर बसून भाजी निवडत होते , किचन मधुन अनिताचा आवाज आला..." आई अगं किती जाड करतेस पोळ्या , पातळ कर ना अजून ...आणि आज मस्त खमंग पिठलं कर तुझ्या हातचं ....
" हो आम्हालाही आवडेल पिठलं आईच्या हातचं...." प्रिया आणि विनय एकदम हसत म्हणाले ....
सगळे आश्चर्याने बघू लागले....प्रिया विनय बाबांच्या पाया पडले आणि मग आईच्या आशिर्वादासाठी वाकले आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं...आई एकदम धडधाकट उभी होती ...काहीच झालं नव्हतं तिला...दोघांना काहीच कळेना...
त्यांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह बघूनही कोणी काहीच सांगायला तयार नव्हतं...आई काही बोलणार इतक्यात अनिताने तिला डोळ्याने इशारा केला आणि आई आत निघून गेली...बाबाही उठून गेले ....
" कश्या आहात ताई , अहो हे काय आम्ही तर किती घाबरून गेलो होतो...काय झालंय नक्की ? काय लपवताय तुम्ही सगळे ? " प्रियाने अनिता ताईच्या पाया पडत विचारलं...आई बाबा असे निघून गेल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं होतं...आपण आलो नाही म्हणून त्यांना राग येणं साहजिक आहे पण असं नेहेमीच वागले तर काय होईल ...?
" हो हो आताच तर आलात ना ...सांगते निवांत . स्वयंपाकाला लागते मी तुम्ही फ्रेश होऊन या..." प्रियाकडे न बघताच अनिता म्हणाली...
विनय आणि प्रिया एकमेकांकडे बघत राहिले ...कोणी काहीच बोलत नाही म्हटल्यावर त्यांना अजुनच अपराधी वाटत राहिलं... न बोलता बॅग घेऊन ते आत फ्रेश व्हायला गेले...
प्रिया विनय फ्रेश होऊन हॉल मध्ये आले... मुलंही खेळून परत आली होती...
सिद्धी आत्या, आजोबा आजीसोबत गप्पा मारण्यात दंग होती...दोघांकडे कोणीच लक्ष दिले नाही...
" मामी काय आणलं आमच्यासाठी ...दे ना लवकर..." यश आणि नेहा दोघेही मामीचे खुप लाडके होते आणि मामीही त्यांची फेवरेट होती...प्रिया नेहेमी त्यांच्यासाठी छान छान खाऊ , खेळणी , बुक्स असं काही ना काही आठवणीने आणायची ...
" अरे राजा मस्त गिफ्ट आणलय , चला देते काढून..." प्रिया मुलांना घेऊन आत गेली...
गिफ्ट बघून मुलं खुप आनंदली...मामीला मिठी मारून दोघे सगळ्यांना आपली गिफ्ट दाखवायला धावली...
" वाह मज्जा आहे तुमची...लाडकी मामी आणि मामा नाही ना लाडका..." विनयने खोटं खोटं रुसत असल्याचा अभिनय केला तशी नेहा , यश विनयला बिलगली...
?" तू पण लाडका आणि बेस्ट मामा आहेस..." मुलांच्या चेहेर्यावर आनंद बघून विनय खूप खुश झाला आणि मुलांचे फेवरेट चॉकलेट त्यांना देऊन अजुनच खुश करून टाकलं...!
" भावजी कधी येणार ग ...? " विनयने विचारले..
" ते बाहेरगावी गेलेत कामासाठी उद्या येतील..." बाबा म्हणाले.
प्रियाने सगळ्यांसाठीच गिफ्ट आणले होते , तिने ते सगळ्यांना दिले...
आईंसाठी मस्त तलम कांजीवरम साडी , त्यांच्या आवडत्या गुलबक्षी रंगांची आणि सुंदर नक्षीचा कुंकवाचा करंडा...बाबांसाठी त्यांच्या आवडत्या पांढरा रंगाचा कुर्ता आणि आयुर्वेदिक तेल , अनिता ताईसाठी सिल्क चा ड्रेस मटेरियल आणि त्याला मॅचींग ज्वेलरी , भावजींसाठी शर्ट आणि वॉलेट...
खरंतर सगळ्यांना त्यांचे गिफ्ट खूप आवडले आहे हे त्यांच्या डोळ्यात दिसत होते पण तरीही सगळेजण चेहेरा निर्विकार ठेऊन काही न बोलता बसले होते.प्रियाला हे सगळं खूप मनाला लागलं , विनयला सुद्धा वाईट वाटलं पण त्याने तसं काहीच दाखवलं नाही...
" आता तरी सांगा हे काय चालू आहे ? आईला लागलंय हे समजल्यापासून जीवात जीव नाही आमच्या...प्रिया तर किती रडत होती ...आम्हाला लगेच येता आलं नाही याची किती टोचणी लागली होती मनाला...आता पटकन सांगा ..." विनय काकुळतीला येऊन म्हणाला...पण कोणीच मनावर घेतलं नाही....
" मुलांनो चला जेवायला , भूक लागली असेल ना ...बाबा , विनय तुम्हीही बसा जेवायला...आई तू ही बसून घे ...प्रिया तू ही बस जेवायला बसायचं तर..." असं म्हणून अनिता जेवणाची तयारी करायला निघून गेली पाठोपाठ आई , बाबा , मुलं सगळेच जेवायला गेले...
प्रिया आणि विनय अपराध्यासारखे एकमेकांकडे बघत राहिले...काय करावे काहीच कळत नव्हते दोघांनाही...कोणीच काही सांगायला तयार नव्हते...आता खरं कसं काय कळणार ? विचार करून डोकं सुन्न झालं पण काही मार्ग सापडत नव्हता...!

नक्की काय झालं असेल ? सगळेजण असे का वागतायेत ? खोटं का बोलले सगळे अगदी आई बाबा सुद्धा...? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका...!सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing