Oct 18, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...( भाग 3 )

Read Later
संसार हा सुखाचा...( भाग 3 )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


" काय झालं नक्की सांगशील का ? इतका आनंद कश्याचा झालाय , इतक्या पहाटे हा उत्साह ..." अर्धवट झोपेत असलेल्या प्रियाला काहीच कळलं नव्हतं...
" अनु डियर अग एक छान आयडिया आलीय त्यामुळे आपण तिघही जाऊ शकतो आणि आई बाबांची सुद्धा काहीच काळजी राहणार नाही आपल्याला...ऐक ..." विनयची कल्पना ऐकून प्रिया ला खूपच आनंद झाला पण फक्त आई बाबांना पटलं पाहिजे हे च तिला वाटत होतं...
प्रिया आणि विनय सुखाची स्वप्न बघत पुन्हा झोपून गेले.सकाळी उठून रोजचं रूटीन सुरू झालं... सिद्धी शाळेत गेली तशी प्रिया रूम मध्ये येऊन विनयशी बोलायला लागली पण " पीयू मला खूप उशीर होतोय , आपण रात्री निवांत बोलूया...तोपर्यंत आई बाबांना काही सांगू नकोस " असे बोलून विनय ऑफिसला निघून गेला...
दिवसभर प्रियाचं कश्यातच लक्ष लागत नव्हतं... सारखा सारखा तोच विचार... विनयच म्हणणं पटेल का आई बाबांना ? आईंच्या मनात तर अढी निर्माण झालीय ...ती लवकर सुटली पाहिजे तरच शांत मनाने जाता येईल नाहीतर आयुष्यभर टोचणी लागून राहिलं...काय करावे...खूप विचार केल्यावर प्रियाने विनयला फोन केला..." विनू मला वाटतंय की आपण आधी अनु ताईशी बोलूया..त्या जर बोलल्या तर आई नक्की तयार होतील.आपण बोललो तर उगीच अर्थाचा अनर्थ व्हायचा... सोनारानेच कान टोचलेले बरे..."
" हो ग खरं आहे तुझं.मी असं करतो ताईला फोन लावून आपला विचार ऐकवतो...मग रात्री व्हिडिओ कॉल करायला सांगून सगळे एकत्र बोलूया... थँकयु डियर खूप मोठा ताण हलका केलास तू..." प्रियाच्या बोलण्याने विनयला खूप बरं वाटलं.
अनिता ताईच लग्न होऊन पंधरा वर्ष झाली होती पण अजूनही घरातला प्रत्येक निर्णय तिला विचारल्या शिवाय घेतला जात नव्हता...अगदी कुठला कार्यक्रम असेल तर कुठली साडी नेसू पासून गिफ्ट काय द्यावे हे सगळे आई आपल्या लाडक्या लेकीच्या सल्ल्यानेच करत.प्रिया मात्र बारा वर्ष होऊनही या बाबतीत अजूनही परकीच मानली जात होती.तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं .आई बाबांसाठी अगदी कशाचीही परवा न करता तिने सगळ केलं होतं पण कधीच कौतुकाचा एकही शब्द तिच्या वाट्याला आला नव्हता की घरातल्या निर्णयासाठी तिचा विचार घेण्याची कोणाला गरज वाटली नव्हती...विनय नेहेमी तिच्या मनाचा विचार करायचा पण आईंचं वागणं नेहेमीच तिचं मन दुखवयाच...
ठरल्या प्रमाणे विनयने अनिताला फोन करून आपला विचार सांगितला.तिलाही तो पटला आणि आवडलाही.रात्री सविस्तर बोलूया म्हणून तिने फोन बंद केला .
विनयचा विचार खरंतर अनिताच्या दृष्टीने खूपच चांगला होता कारण त्यात तिचाही स्वार्थ होता. ..!
घरी मात्र आईना खूपच निराश वाटत होतं... मुलगा आपल्याला सोडून परदेशी जाणार ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती...
" अहो तुम्ही काहीच कसे बोलत नाही ,? हे दोघे खुशाल परदेशी जाणार आणि मज्जा मारणार आणि आपण इथे खुडत राहायचं हे पटतंय का तुम्हाला ? एकदा तिकडे गेले की तिकडचेच होतील बघा...ही प्रिया काही साधी भोळी नाही आपल्या विन्याला चागलं गुंडाळेल आणि कायमचं तिकडेच राहतील दोघं...इथे काय कमी आहे का त्यांना आणि आता माझ्याच्याने काही काम नाही होणार. माझं कोणी ऐकत नाही पण मी अनिताला सुद्धा सांगितलय , ती आहेच माझ्या पाठीशी आणि तुम्ही सुद्धा चागलं खडसावून सांगा काही जायचं नाही म्हणून..."
" अगं सुमती इतकी कशी स्वार्थी झालीस तू ? तुला नक्की प्रॉब्लेम कशाचा आहे ? आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण थोडेदिवस एकटे राहिलो तर कुठे बिघडलं ? आणि तो काही कायमचा तिकडे राहणार नाही आपणही अधून मधून जात जाऊया तिकडे आणि ते सुद्धा येतच राहतील ना ... आणि कामाची काही काळजी करू नकोस... पूर्ण वेळ घरी बाई ठेवू तुझ्या दिमतीला मग तर झालं ? आणि मला सांग आपणही वेगळेच राहिलो ना माझ्या आई बाबांपासून ? का तू राहिली होतीस एकटी त्यांच्यासोबत ? नाही ना मग आपली सून मुलाला सोडून आपली सेवा करत इथे राहावी असं कसं वाटू शकतं तुला ...हे बघ जास्त ताणू नकोस आपणही त्यांना समजून घ्यावं ग , तू जास्त आततायीपणा केलास तर दुखावतील आणि कायमचे दुरवतील आपल्याला....मला हे आजिबात चालणार नाही सांगून ठेवतो...वेळीच वागणं बदल...नाहीतर परिणाम वाईट होतील..." विजयराव बायकोच्या वागण्याला वेळीच निर्बंध घालण्यात पटाईत होते...
" इतकी काही मी वाईट नाहीये बरं...आणि तुमच्या आई बाबांना राहायचं नव्हतं आपल्यासोबत...आणि आता जुन्या गोष्टी कश्याला उकरून काढताय ? पण खरंय तुमचं , ठीक आहे मग जाऊ देऊया त्यांना .मी काही आता मोडता घालणार नाही पण आपली सगळी सोय नीट करून जा म्हणावं त्यांना..." विजयरावांच्या बोलण्याने वसुधा बाई जरा वरमल्या...आता काही आपली डाळ शिजत नाही हे त्यांना कळून चुकलं होतं.
विनय ऑफिसमधून येताच बाबांनी न राहवून विचारलंच.
" मला काहीच सुचत नाहीये बाबा , पण एक विचार आलाय मनात बघा पटतोय का तुम्हाला... ताईशी बोललोय मी , ती म्हणतेय की तुम्हाला दोघांना गावी पाठवण्यापेक्षा माझ्या घराजवळ घर घेऊया म्हणजे ती जवळ असली की कुठली काळजीच नको...शिवाय आत्या आणि आपली मीना मावशी सुद्धा आहेत तिथेच.आणि बाकी नातेवाईकही आहेत जवळपास त्यामुळे तुमची काही अडचण होणार नाही... दिवसभरासाठी कामाला बाई ठेवूया म्हणजे आईला काही करावं लागणार नाही...." विनय आई बाबांच्या उत्तराची वाट बघत होता...
तितक्यात अनुताईचा फोन आला.... ठरल्याप्रमाणे तिने व्हिडिओ कॉल केला आणि सगळ्यांनी एकत्रपणे बोलायचे ठरवले...
" आई बाबा मला वाटतं विनय म्हणतो ते योग्यच आहे.माझ्या घराजवळ तुमच्यासाठी घर बघुया म्हणजे काही लागलं तर मी आहेच...मलाही खूप दिवसांनी तुमच्याजवळ मनसोक्त राहता येईल...मग करूया ना हे फायनल ? मी घर शोधायला सुरुवात करते मग..." अनिताचे बोलणे ऐकून खरंतर आई बाबा सुखावले होते.लेक जवळ असली म्हणजे अजून काय हवं ...
तरीही एक दोन दिवसात निर्णय घेऊ म्हणून त्यांनी वेळ मागून घेतला...
अनिता ताईची याला खूप सहमती होती .आई बाबा असले म्हणजे तिच्या मुलांची तिला काळजी करायची गरज नव्हती.तिच्या सासू सासऱ्यांचे निधन झाले होते ... त्यामुळे तिला कुठे जायचं असलं की मुलांची अडचण असायची .आता मुलांना आजी आजोबांच्या स्वाधीन करून ती मनसोक्त हुंदडायला मोकळी होणार होती...आणि शेवटी माहेर जवळ असणं ही प्रत्येक लग्न झालेल्या मुलीसाठी पर्वणीच असते ना...अनिताचे यजमान सुजय एक सज्जन गृहस्थ होते.त्यांचा स्वभाव खूप चांगला होता.त्यांच्यामुळे आई बाबांना नक्कीच मदत होणार याची विनयला खात्री होती.
खरंतर लेकिजवळ राहायला जायचं म्हणून आई बाबा लगेच तयार होतील असं सगळ्यांना वाटत होतं पण त्यांनी विचार करायला वेळ मागून घेतल्यामुळे विनय आणि प्रिया पुन्हा काळजीत पडले...आई बाबा दुखावले तर गेले नाहीत ना ? या विचाराने दोघं व्याकूळ झाले...पण आता त्यांना त्यांचा वेळ देण्याचं विनय आणि प्रियाने ठरवलं....

पुढे काय होईल ? आई बाबा तयार होतील का ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...!

©®स्मिता भोस्कर चिद्रवार.

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing