Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा ....! ( भाग 2 )

Read Later
संसार हा सुखाचा ....! ( भाग 2 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून.." बाप रे इतका उशीर ? इतकी कशी झोप लागली आज ? सिद्धू सिद्धू उठ बाळा चल पटकन खूप लेट झालाय ... आवर लवकर..." प्रियाने सिद्धीला आवरायला पाठवलं.आज खरंतर तिला उठवतच नव्हतं...डोकं अगदी जड झालं होतं.पण आता विचार करायलाही वेळ नव्हता..
पटकन तिने सिद्धीसाठी सँडविच बनवलं , आणि एकीकडे पोह्यांची तयारी करू लागली...एकीकडे जाऊन तिने विनयला उठवलं " आज प्लीज सिद्धीला सोड ना शाळेत...उशीर झालाय स्कूल बस निघून जाईल ..."
पण विनयने " झोप झाली नाहीये माझी , आता उठवू नको मला .मी लेट जाईन ऑफिसला .तू जा की तिला सोडायला..." असे म्हणून पुन्हा झोपून गेला...
प्रियाने सिद्धीला दूध प्यायला दिलं , आई वाकड्या नजरेने तिची धावपळ बघत होत्या तिला मदत करायचं सोडून " चहा नाही वाटतं आज...आणि नाश्त्याला काहीतरी चमचमीत कर आज..." असे बोलून सिद्धीच्या डब्यात डोकावून सँडविच पाहून अजुनच डोळे वटारले आणि त्या परत काही बोलणार तितक्यात " आई चहा ठेवलाय गॅस वर , आणि पोहे करून ठेवलेत पाच मिनिटांनी गॅस बंद करा आणि खाऊन घ्या.. मी सिद्धीला सोडून येते शाळेत , येताना भाजी सुद्धा घेऊन येईन त्यामुळे वेळ लागेल ..." असे बोलून आईंच्या उत्तराची वाट न बघता प्रिया पटकन सिद्धीला घेऊन निघाली...आधीच उशीर झाला होता त्यामुळे आता आईंचे टोमणे नक्की खावे लागणार याची तिला खात्री होती.पण त्यांना काही काम करावे लागणार नाही याची तिने काळजी घेतली होतीच...
प्रियाला घरी यायला बराच उशीर झाला...खूप भूक लागली होती तिला सकाळपासून साधा चहा काय पाणीही प्यायली नव्हती ती...आता पोहे खाऊन चहा प्यावा आणि मग जेवणाच बघावं म्हणून की किचन मध्ये आली...भाजी फ्रिज मध्ये ठेवली आणि पोह्यांची कढई बघू लागली पण ती तर रिकामी होती... \" आईनी रिकामी भांडी निदान घासायला तरी टाकायला काय हरकत आहे...आणि पोहे जास्त केले होते आज तरीही संपले कसे काय ? आता चहा बिस्कीट तरी खाऊ \" म्हणून चहा तिने ठेवला ...अर्थातच आई बाबांसाठी सुद्धा चहा ठेवलाच होता तिने...तितक्यात आई किचन मध्ये आल्या " काय ग आज उशीर झाला उठायला ? रात्रीचं बाहेर जाता कशाला तुम्ही ? आणि जरा लवकर उठून पोरीसाठी चागलं चुंगल बनवत जा ना ...विनू उठला नाही अजून ? दमतो बिचारा दिवसभर काम करून ....झोपू दे त्याला...आज पोहे काही जमले नव्हते नीट , खावेसे नाही वाटले , मग मी शांता आली होती ना कामाला तिला देऊन टाकले... असं कर ते ब्रेड च काय करतेस ना तू ते दे बाबांना करून मी खाईन चिवडा ...स्वयंपाक ही करून टाक लवकर ...चहा मग घेऊ..."
बिचारी प्रिया पुन्हा चडफडत बाबांसाठी आणि स्वतः साठीही सँडविच बनवले आणि आईना चिवडा दिला...आता खायला बसणार तितक्यात विनयने हाक मारली म्हणून ती उठून गेली !
विनय ऑफिसला निघाला ...त्याला उशीर होऊ नये म्हणून प्रियाने स्वतःसाठी केलेलं सँडविच विनयला दिलं आणि चहाही दिला...
" आई हे काय आज कोरडा नाश्ता ? तू सँडविच खात नाही म्हणून का ? आणि आज इतका उशीर नाश्त्याला ? " विनयने विचारले...
" अरे झाला उशीर इतकं काही नाही ...तू खाऊन घे ...आणि काय काय ठरलं ते सांग हो आम्हाला...ही प्रिया काही बोलली नाही " आईंनी अगदी समजूतदार पणाचा आव आणला
" अग अजून काहीच नाही ठरलं...आपण बोलू निवांत मी निघतो आता बाय..." विनय ऑफिसला निघून गेला...
प्रियाची नुसती चीड - चीड होत होती... सासूबाईंच्या वागण्याची तिला आता सवय झाली असली तरी त्रास हा व्हायचाच...नुसती चार बिस्किटे आणि दूध पिऊन ती स्वयंपाकाची तयारी करू लागली...
सिद्धी शाळेतून आली मग सगळ्यांची जेवणं झाली .आई बाबा झोपायला आपल्या रूम मध्ये निघून गेले...रोज या वेळी मायलेकी होम वर्क करत आणि खेळत पण आज मात्र प्रियाच डोकं दुखत होतं डोळ्यावर गुंगी होती...
" बेटा आजच्या दिवस होम वर्क करशील का आपली आपली...मम्मा च डोकं खूप दुखतयं मी झोपते ....नंतर थोडावेळ टीव्ही बघ चालेल का राजा ? "
" ओके मम्मा तू झोप मी नाही डिस्टर्ब करणार .मी आता मोठी झालिये...तू झोप मी तुझं डोकं दाबून देते मग होम वर्क करते. "
सिद्धीने तिला झोपवलं आणि तिच्या छोट्या छोट्या हातांनी मम्माच डोकं दाबू लागली...लेकीच्या प्रेमळ , समजूतदार पणाने प्रियाला खूप भरून आलं...समाधानाने तिला झोप लागली !
छान झोप लागल्यावर खूपच फ्रेश वाटत होतं प्रियाला...पण दुपारच्या चहाला उशीर झाल्यामुळे वैतागलेला आईंचा चेहेरा डोळ्यापुढे तरळून गेला आणि ती पटकन उठून किचन मध्ये गेली...चहापाणी झालं की ती सिद्धीला घेऊन सोसायटीच्या गार्डन मध्ये गेली... सिद्धी खेळायला गेली आणि मग तिने तिच्या माई अप्पांना ही आनंदाची बातमी दिली आणि कोणालाही न सांगण्याच् वचन त्यांच्याकडून घेतलं...दोघेही आनंदले पण लेक आता आपल्यापासून दूर जाणार म्हणून त्यांना वाईटही वाटले.
मग तिने विनयला फोन लावला तो घरी लवकर येणार म्हणाला म्हणून प्रिया पटकन घरी आली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागली...आजतरी निवांत बोलता येईल म्हणून भराभर तिने विनयच्या आवडीच जेवण बनवलं आणि फ्रेश होऊन विनयची वाट बघू लागली...
विनय ऑफिस मधून आल्या आल्या त्याच्या आवडीच्या पदार्थांच्या सुवासाने खुश झाला " वॉ आज पुरी भाजी वाटतं ! वासानेच खूप भूक लागलीय ...पटकन वाढ मी फ्रेश होऊन येतो..."
सगळ्यांची हसत खेळत जेवणं झाली आणि मग विनयने आई बाबांसमोर लंडनचा विषय काढला , " आपण फक्त ताईला सांगुया सध्या बाकी सगळं फायनल झालं की बाकीच्यांना सांगू...मी ऑफिस मधून फोन केला होता तिला पण तिने उचलला नाही...आता लावतो तिला फोन..." तितक्यात अनिता ताईचा फोन आला " अभिनंदन विन्या , काय रे छुपा रुस्तम निघालास .आम्हाला काहीच सांगितलं नाहीस .पण म्हणून कळणार नाही होय आम्हाला ? मी मोठी बहीण ना तुझी मग मला सांगायला पाहिजे ना तू आधी "
" अग ताई तुला फोन केला होता मी दुपारी पण तू उचलला नाहीस...आता करणारच होतो तुला फोन...आईने सांगितलं वाटतं ! बरं असो अजून काहीच ठरलं नाहीये .फक्त जायचंय हे समजलंय. व्हिसा आणि बाकीची प्रोसेस करेपर्यंत वेळ जाईल बराच .पण एक प्रॉब्लेम आहे..आई बाबांना लगेच नाही नेता येणार..त्यांच्या व्हिसाला वेळ लागेल आणि त्यांना तसाही फक्त सहाच महिने राहणं अलाउड आहे. कंपनी फक्त आमच्या तिघांचीच प्रोसेस करणार आहे , तसा रुलच असतो.त्यामुळे आता आई बाबांना एकटं कसं ठेवायचं आणि कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे.काय करू ? की प्रियाला इथेच राहू देऊ आई बाबांजवळ ? पण मी सुद्धा तिथे एकटा कसा राहू ? काहीच सुचत नाहीये ...मला वाटतं कॅन्सल करू का जाणं ? " विनयने ताईजवळ आपलं टेन्शन बोलून दाखवलं...
" अरे असा पटकन काहीतरी निर्णय घेऊ नकोस...तुझ्या कष्टाचं चीझ झालंय .इतकी चांगली संधी कशाला सोडतोस ? आई बाबा अजून चांगले ठणठणीत आहेत .आणि आम्ही आहोत ना .कशाला काळजी करतोस ...बघुया थोडा विचार करू सगळेजण काहीतरी मार्ग नक्की निघेल.पण आततायी पणा करून चुकीचा निर्णय आजिबात घेऊ नकोस.मी आहे तुझ्यासोबत .माझेही आई बाबा आहेत ते त्यांची काळजी घेईन मी " ताईच्या बोलण्याने विनयचं टेन्शन जरा कमी झालं...
आई बाबांच्या चेहेर्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती...आपल्याला न घेता जाणार हे तिघे हे काही त्यांना पटलं नव्हतं...
" आई बाबा सांगा आता कसं करायचं ते...कंपनी च्या रुल प्रमाणे तुम्हाला आताच तिकडे नेता येणार नाही आणि तुम्ही सहा महिन्यांपेक्षा जास्त राहू शकत नाही तिकडे...त्यामुळे मला कळत नाहीये काय करावं ते...गावी आता कोणी जवळचं नाही त्यामुळे तुम्ही तिकडे राहण्याचा प्रश्नच नाही.दुसरी काहीतरी सोय करावी लागेल...प्रियाला राहू दे का तुमच्या सोबत की मी कॅन्सल करू जाण्याचं ...? " विनय खूप काळजीत होता.
" अशी कशी रे तुझी कंपनी ? आई वडिलांना वाऱ्यावर सोडून खुशाल बायको पोरीला सोबत राहण्याची मात्र परवानगी ? काय हे असले नियम ? म्हाताऱ्या आई बापाचा काही विचार नाही...तुझ्या बायकोला इथे सोडून तू एकटा राहणार तिकडे परक्या देशात ? हे काय बरोबर नाही...मला काही पटत नाही हे सगळं...इथे काही कमी आहे का तुला , चागलं कमावतोस की .कश्याला हवं जायला परक्या देशात आम्हाला एकटं टाकून ? काय करायचं ते करा...तुला इतकं शिकवलं , मोठं केलं ते काय हा दिवस बघण्यासाठी...? " आईने डोळ्याला पदर लावला...
बाबा मात्र विनयच्या पाठीशी होते...ते मदतीला धावून आले " तू जरा गप्प बस सुमती ...इतकी चांगली संधी चालून आली आहे देवाच्या कृपेने , ते काही नाही विनू तू जायची तयारी कर...अरे हेच तर दिवस असतात नवीन काहीतरी करण्याचे...आमची आजिबात काळजी करू नकोस.आणि प्रियाला आणि सिद्धीला सुद्धा सोबत घेऊन जा.पोर किती नाचतेय कालपासून जायचं जायचं म्हणून.आम्ही राहू नीट .अजून तुझी आई दहा जणांचा स्वयंपाक करेल .वाटलं तर बाई लावुया.आणि फारच त्रास झाला तर बघू मग .पण आता ही संधी तू सोडू नयेस असं मला वाटतं.आणि लंडन कितीस दूर आहे असं दहा बारा तासांचा तर प्रवास...हाक मारली की येशील तू ..."
बाबांनी समजल्यावर आई जरा शांत झाली.
काहीतरी मार्ग कधी म्हणून सगळे झोपायला गेले....
पहाटे पहाटे विनय अगदी उत्साहात उठला.प्रियाला हलवून त्याने उठवलं " पियु , प्रियु उठ ना , मला एक चागला मार्ग सापडलाय ! आता काहीच प्रॉब्लेम येणार नाही..."

काय असेल तो मार्ग ? आई बाबांना विनयचा निर्णय पटेल का ? पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing