Aug 18, 2022
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 16 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 16 )बराच वेळ झाला तरी अनिता , सुयश आणि यश घरी आले नाहीत...वाट बघून सगळे कंटाळले तसा विनयने सुजयला फोन केला पण त्याने उचलला नाही , अनिताने सुद्धा फोन उचलला नाही...विनयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली....
त्याने हळूच प्रियाला आपली शंका बोलून दाखवली...प्रियासुद्धा जरा चरकली...शेवटी विनय हॉस्पिटल मध्ये जायला निघाला....तितक्यात...सुजयची गाडी दिसली....सगळे आंनंदले...
" थांबा थांबा आता येऊ नका ..." असे म्हणून प्रिया लगबगीने आत जाऊन आरतीच ताट घेऊन आली... यशच औक्षण करून मग आत्याने त्याची दृष्ट काढली ....
घरात त्याचे अगदी थाटात स्वागत झाले...इतकं सुंदर घर सजवलेलं बघून यश खूप खुश झाला...नेहा आणि सिद्धीने त्याच्यासाठी खास बनवलेलं ग्रीटिंग त्याला दिलं...तिघा भावंडांनी एकमेकांना प्रेमळ मीठी मारली...त्यांचं प्रेम बघून सगळ्यांचेच डोळे पाणावले !
यश सहित सगळेजण मग देवघरात जाऊन देवाच्या पाया पडले आणि देवाचे आभार मानले...
" मामी मस्त स्मेल येतेय काय बनवले ? खूप भूक लागलीय मला ..." यश म्हणाला
" हो बाळा चल बघ सरप्राइज आहे तुझ्यासाठी... सगळं तुझं फेवरेट ...चल पटकन फ्रेश होऊन ये सगळे थांबले आहेत तुझ्यासाठी..." प्रियाने यशला जवळ घेतलं...
जेवणाचा मेनू बघून यश खूप खुश झाला...आज सगळे त्याला भरवत होते...त्याला खूप भारी वाटत होतं...पण इतकं सगळं कौतुक कश्याबद्दल तेच त्याला कळत नव्हतं...खरतर धडपडल्यामुळे आपल्याला सगळे ओरडतिल अस त्याला वाटलं होतं पण इथे तर वेगळंच चाललं होतं...पण आपलं खरंच चुकलं याची त्याला जाणीव झाली होती...
" मम्मा , डॅडी , मामा , मामी , दीदी सगळ्यांना खूप सॉरी ...मी असं नाही करणार यापुढे...नीट खेळेल , सगळं ऐकेल तुमचं ...गडबड नाही करणार...प्रॉमिस...मी हॉस्पिटल मध्ये का होतो ते मला माहित नाही पण मी बघितलं की मम्मा रडत होती... मामी पण रडली होती...मामा आणि पप्पा खूप घाबरलेले वाटतं होते...नक्की काय झालं होतं ? आणि मी हॉस्पिटल मध्ये होतो तर मला रागवायचे सोडून तुम्ही सगळे माझे इतके लाड का करताय...? " लहानगा यश अगतिक पणें बोलत होता...
" अरे बेटा तू पडलास ना आणि मग काहीच बोलत नव्हतास ...आणि झोपलेलाच होतास मग आम्ही खूप घाबरलो आणि तुला हॉस्पीटल मध्ये घेऊन गेलो...पूर्ण रात्र तू उठलाच नाहीस मग काय तुझ्या मम्मा ने आणि मामी ने सगळ्या देवांना साकडं घातलं आणि सकाळी तू उठलास ...देव बाप्पांनी तुला सुखरूप ठेवलं आणि डॉक्टर काकांनी सुद्धा म्हणून आपण त्यांना थँकयू म्हणालो ...आणि तू ठीक आहेस म्हणुन आम्ही सगळे खूप खुश आहोत म्हणून तुझं ग्रँड वेलकम केलं....आणि तू तर आहेस ना सगळ्यांचा लाडका मग तुझे लाड तर आम्ही करणारच...
आता डॉक्टर काकांनी सांगितल्या प्रमाणे सगळं ऐकायचं आणि घरच्या मोठ्या सगळ्यांच सुद्धा...तू दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचं..." विनयने यशला जवळ घेऊन छान समजावलं तसा यश मामाला बिलागला...
" किती शहाणं आहे लेकरू...आता त्याला आराम करू द्या बरं...यश बाळा आता आराम कर बरं तू...अनु आम्ही निघू का आता ? प्रियाचा फोन आला आणि तसेच निघालो...आता लेकराला धडधाकट बघून जीवात जीव आला बघ..." आत्या म्हणाली
" हो ठीक आहे आत्या...तुम्ही होतात म्हणून किती आधार वाटला आम्हाला...आई बाबांना काहीच कळवल नाही...उगीच काळजी करतील...परत आल्यावर सांगू त्यांना...विनय सोडून येतोस का आत्या मामांना..." सगळे आत्या मामांच्या पाया पडले आणि विनय त्यांना घरी सोडून आला...
यश झोपला होता...नेहा आणि सिद्धीनी त्याला गोष्ट सांगत झोपवलं होतं आणि स्वतःही त्याच्या जवळ झोपल्या...त्या तिघांना बघून अनिता च मन भरून आलं...
प्रियाच्या जवळ तिने आपल्या मनाचा बांध फोडला...आता सगळं ठीक झालं होतं .... जिवावरच्या संकटातून देवानेच सोडवलं होतं...प्रिया फक्त अनिताच्या पाठीवरून हात फिरवत होती...अनिताला तिने मोकळं होऊ दिलं...थोड्या वेळात ती शांत झाली....
प्रियाने सगळ्यांसाठी मस्त कॉफी केली...आता सगळ्यांनाच फ्रेश वाटत होतं...
" आता उद्या सगळ्यांनी फक्त आराम करायचा...खूप टेन्शन होतं सगळ्यांनाच...यश बरोबर आपल्या सगळ्यांना सुद्धा आरामाची गरज आहे...काय अवस्था झाली होती ना आपली...प्रिया , अनिता तुम्ही आता यशची काळजी घ्या...मुलीही बावरल्या आहेत त्यांनाही गरज आहे तुमची...मी आणि विनय बघू बाहेरचं सगळं...तशीही कामं झाली आहेत बऱ्यापैकी...होईल सगळ नीट...चला झोपूया सगळे..." सुजयने सगळ्यांना झोपायला पाठवलं...आणि स्वतः मात्र मुलांच्या रून मध्ये जाऊन झोपला...अनिता सुद्धा तिथेच येऊन झोपली...आणि थोड्याच वेळात विनय आणि प्रिया सुद्धा...
दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे सगळ्यांनी आराम केला...यश आता एकदम ठीक होता त्यामुळे काळजी नव्हती...
आई बाबा अधून मधून फोन करत होते...त्यांना यशबद्दल कोणी काहीच सांगितलं नव्हतं...
आईच्या वाढदिवसाला आणि आई बाबांच्या एनिवर्सरी साठी सगळ्यांनी फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या पण सरप्राइज बद्दल कोणीच काही बोलले नाही...
सगळे मिळून उरली सुरली कार्यक्रमाची तयारी करत होते...आता काहीच दिवस उरले होते...आई बाबा सुद्धा एक दोन दिवसात परत येणार होते...
सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा सगळी तयारी चेक केली...सगळी कामे झाल्यासारखीच होती...
प्रिया , अनिता पॅकिंग ला लागल्या होत्या...मुलंही त्यांना मदत करत होते...प्रियाच मॅनेजेंट खूप छान होतं...सगळ्या गोष्टी लेबल लावून व्यवस्थित पॅक केल्या गेल्या....प्रत्येक कार्यक्रमाची प्रत्येकाची बॅग तयार होती...सगळी मंडळी आणि पाहुणे एक दिवस आधीच येणार होते त्यामुळे हॉल वर लागणाऱ्या सगळ्या वस्तू अगदीं आठवणीने घेतल्या होत्या...वेळेवर उगीच धावपळ होणार नाही याची काळजी सगळेच घेत होते...
आई बाबा परत आले...घरी आल्या आल्या त्यांचे छान स्वागत होईल असे त्यांना वाटले होते...त्यांची एनिवर्सरी आता नक्की सगळे मिळून साजरी करतील अशी त्यांची अपेक्षा होती... आईंचा वाढदिवस सुद्धा नुकताच झाला होता त्यामुळे मुलांनी मिळून नक्कीच काहीतरी बेत आखला असेल असे आई बाबांना वाटले होते...पण घरी तशी काहीच तयारी नव्हती...कोणी साधं विश सुद्धा केलं नव्हतं...
सगळे आपापल्या कामात बिझी होते...आई बाबांच्या चेहेर्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती पण सगळ्यांनी त्याकडे अगदी साफ दुर्लक्ष केलं होतं...आईंची धुसफुस चालू होती...त्यांनी आडून आडून सगळ्यांना आठवण देण्याचा प्रयत्न केला होता पण सगळे अगदी जाणीपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मज्जा घेत होते...
शेवटी बाबांनी सगळ्यांना पार्टी द्यायची कल्पना सांगितली पण.... \" आता प्रोग्राम आलाय दोन दिवसांवर...आता कुठे जमेल ? नको आता , बघू नंतर...वेळ नाही आता आजिबात..\" अशी अनेक कारणे देऊन प्रत्येकाने काढता पाय घेतला आणि बाबांचा प्लॅन सपेशल हाणून पाडला...
" काय हो ही मुलं आपली ? थोडीही फिकीर नाही आई बापाची...काय म्हणावं यांना...स्वतः काही करायचं नाही आणि आपण पार्टी देतो म्हटल तरी नाही म्हणतायेत...असे कसे हो वागतात...आई वडिलांच्या मनाची काहीच पर्वा नाही असं कसं ?" दुःखी मनाने आई बाबांना म्हणाल्या...
" अग जाऊ दे आता वाईट वाटून घेऊ नकोस बरं...बिझी आहेत सगळे...मुद्दाम नसतील करत दरवर्षी तर छान साजरा करतात ना मुलं...यंदा काय झालंय हे मलाही पडलेलं कोडं आहे...पण आता शांत रहा तू ...उगीच कोणाला काही बोलू नकोस..." बाबांनी आईला समजावलं...
सगळेजण खूप उत्साहात होते...प्रत्येकाने कामे वाटून घेतली होती त्याप्रमाणे प्रत्येकजण आपलं आपलं काम अगदी चोख पार पाडत होतं...
घरात विधी सुरू झाले होते...मावशी , आत्या , प्रियाचे आई बाबा , भाऊ वहिनी , सुजयचे भाऊ वहिनी असे सगळे सहपरिवार हजर होते...घरात अगदी आनंदी वातावरण होतं...सुमती बाईंची स्वभावानुसार थोडी फार कुरबुर चालूच होती... तेवढं एक सोडलं तर बाकी सगळा आनंदी आनंद होता...यश सांगितलेलं सगळं अगदी व्यवस्थित करत होता...
आता मुख्य कार्यक्रम अगदी उद्यावर येऊन ठेपला होता...सगळेजण दोन दिवस हॉल वरच राहणार होते.... निघायची लगबग सुरू होती....आता सगळं सुरळीत पार पडावे अशी देवाला प्रार्थना करून मंडळी हॉल वर निघाली....!

पुढे काय होईल ? कार्यक्रम सुरळीत पार पडेल ना ...जाणून घेऊया पुढील भागात...!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing