
पुढचे काही दिवस खूपच धावपळीचे गेले...सगळी कामे झाली म्हणता म्हणता लहान मोठी कामे एकामागोमाग निघतच गेली...त्यात परफॉर्मन्स प्रॅक्टीस... निमंत्रण...पण प्रिया आणि अनिता सगळं काही निभावून नेत होत्या...मुलंही उत्साहात होती...त्यांना जमतील तशी मदत करत होती... कार्यक्रमाच्या चार दिवस आधीच सगळी तयारी व्हायला पाहिजे असा सुजय चा कटाक्ष होता...
आई बाबा मावशिकडचा पाहुणचार घेऊन आता आत्या कडे गेले होते...मावशी आणि आत्याने दिलेली जवाबदारी अगदी चोख पार पडली होती...खूप लोकांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते...
आईचा फोन आला " काय ग झाली का तयारी सगळी ? आम्ही येतो आता , वेळेवर खूप कामं असतात मदत लागेल तुम्हाला...आणि विनय सुध्दा येईल ना दोन तीन दिवसात " अनिताला काय बोलावे ते सुचेना...आई बाबा घरी आले तर पुन्हा सगळं गुपचूप करावं लागेल...आणि दोन दिवसानंतर त्यांची एनिवर्सरी होती आणि दुसऱ्या दिवशी आईचा वाढदिवस...त्या दिवशी काय करायच ही सुद्धा मोठी पंचाईत होती...ते दोघे दुखवण्याची शक्यता जास्तच होती...फक्त \" बर \" म्हणून अनिताने फोन ठेवला...
\" आता काय करावं \" असा विचार करत अनिता आणि प्रिया बसल्या होत्या तितक्यात मावशीचा फोन आला .
"अनु अगं तुझे आई बाबा खूप दुखावले आहेत बरं...ताईचा वाढदिवस आणि एनिवर्सरी आलीय तरी तुम्ही मुलं विसरलात असं त्यांना वाटतंय..\" गडबडीत मुलं विसरली असतील ग , असं मनाला लावून काय घेताय ? दरवर्षी तर छान सेलिब्रेशन करतात ना मुलं मग आता नको वाईट वाटून घेऊ...किती काम आहे त्यांना..आपण समजून घ्यायला हवं \" असं म्हणून मी समजूत घातली त्यांची आणि त्यांना ते पटलही...पण आता ते स्वतःच पार्टी द्यायचा विचार करतायेत...सगळ्यांना घेऊन हॉटेल मध्ये पार्टी करूया म्हणत होते... वीराजला विचारत होते बुकिंग च...मला माहितीये ग तुम्ही इतकं मोठं प्लॅनिंग करताय ते...पण आता काय करायचं ? " मावशी सरप्राइज फुटेल म्हणून काळजीत होती...
" हो ग मावशी , आता आईचा फोन आला परत येतो म्हणतायेत...काय करायचं काही सुचत नाही...काहीतरी विचार कर ना...नाहीतर तू आणि काका आई बाबांना घेऊन फिरून या ना चार दिवस कुठेतरी...बघ काही जमतंय का ते..." अनिता म्हणाली...
" हे चागलं आहे , पण कुठे जावं ? ताई होईल का तयार ? तुम्हाला मदत लागेल , इतकं मोठं कार्य म्हणून तुझ्याकडे यायचं म्हणत होती....एक कल्पना आहे...गावच्या देवीला जायचं म्हटलं तर तयार होतील दोघं नक्कीच...नाहीतरी विराजच लग्न झाल्यापासून जाणं झालच नाहीये...दोन दिवस सुट्टी आहे तर करते त्याला तयार आणि ताई - भाऊजींना बरोबर येण्यासाठी गळ घालते....विराज आणि गीता मागे लागले तर तयार होतील नक्कीच " मावशीने युक्ती सुचवली...
" वाह मावशी किती ग्रेट आहेस तू....नक्कीच तयार होतील आई बाबा...करा तुम्ही प्लॅन... कळव मला कसं ठरतंय ते...लगेच सांग आईला , संध्याकाळी परत यायचं म्हणत होते ते..." अनिताला मावशीचा प्लॅन खूप आवडला...आता फक्त आई बाबा तयार व्हावे अशीच सगळ्यांची इच्छा होती...थोड्याच वेळात आईचा आपेक्षे प्रमाणे फोन आलाच...
" अग अनु , मावशीचा विराज आणि गीता देवीच्या दर्शनाला जायचं म्हणतायेत...त्याच लग्न होऊन सहा महिने झाले तरी अजून गेलेच नाहीयेत ग ते...आणि आम्हाला सोबत चला म्हणून मागे लागलेत ....आता देवाला नाही तरी कसं म्हणायचं ग ? पण इथे इतका कार्यक्रम आहे मी नकोच म्हणत होते पण सूनबाई आणि विराज हट्टच धरून बसलेत काय करू ग आम्ही आता ? तू बोलतेस का त्यांच्याशी ? "
" आई तू काहीच काळजी करू नकोस ...इथे सगळी तयारी झालिये...सगळंच तर कॉन्ट्रॅक्ट दिलंय ना आपण त्यामुळे फारसं काहीच करायचं नाहीये... मुंजिची सगळी तयारी गुरुजी करणार आहेत...आणि तुम्ही यालच ना कार्यक्रमाच्या दोन तीन दिवस आधी मग झालं तर...आणि अजून काही वाटलं तर फोन करेनच ना तुला...ते काही नाही तुम्ही जा बिनधास्त...किती दिवसापासून तुझी इच्छा होती ना जायची...जा बर इथली काही काळजी करू नका...तुमचं काही समान पाठवायचे असेल तर सांग...मी येईन संध्याकाळी " अनिताने आईला गप्प केलं...आणि जाण्यासाठी मनवल...
अखेर सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आणि हो , नाही करत एकदाचे आई बाबा तयार झाले...मावशीने ठरल्याप्रमाणे सगळं प्लॅन केलं आणि मंडळी जाण्यासाठी तयार झाली...मुद्दाम लगेच न निघता अजून दोन तीन दिवसांनी निघायचं आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी परत यायचं असा प्लॅन आखण्यात आला...तोपर्यंत इकडे सगळी तयारी करून होणार होती .संध्याकाळी प्रिया आणि अनिता जाऊन आई बाबांचं सामान देऊन आल्या...
सगळ्यांना हायस वाटलं , आता अजून वेग वाढवायला हवा होता...सगळेच जोमाने कामाला लागले !
दिवस कसा सुरु होतोय आणि संपतो तेच कळत नव्हतं...प्रॅक्टिस मस्त सुरू होती...आता सगळ्यांचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी चांगला होता त्यामुळे तशी काळजी नव्हती...
आई बाबा आणि मंडळी गावी पोचल्याचं कळलं आणि सुजय , अनिता आणि प्रिया मिळून सगळ्या कामाची एकदा फायनल चेकिंग करत होते... सगळ्यांना आमंत्रण गेले होते आणि बहुतेक सगळे हजेरी लावणार होते... मुलं बाहेर खेळत होती अचानक गलका ऐकू आला आणि सगळे बाहेर धावले...
यश विनयच्या कडेवर होता आणि नेहा आणि पीहु त्याला बिलगल्या होत्या...मुलांनी आनंदाने नाचायला आणि मस्ती करायला सुरुवात केली होती...विनयला अचानक लवकर आलेला पाहून सगळेच आनंदले...!
चौघांची मस्त मैफिल जमली...विनयला काय सांगू आणि काय नाही असं झालं होतं तिघांनाही...विनय ठरल्यापेक्षा दोन दिवस आधीच आला होता त्यामुळे जास्तच धमाल येणार होती...आता सगळ्यांना एकत्र प्रॅक्टीस सुद्धा करता येणार होती...कीर्ती आणि प्रियाने विनयला सगळी शॉपिंग दाखवायला सुरुवात केली...मुलंही सरसावली...\" हे कसं आहे ? \" \" ते कसं आहे ? \" \" कुठलं जास्त छान आहे ? \" असं विचारून सगळ्यांनी विनयला भंडावून सोडलं होतं...शॉपिंग बघूनच तो थकून गेला...
" सगळ्या दुकान वाल्यांच वर्षाच टार्गेट पूर्ण केलं वाटतं तुम्ही सगळ्यांनी मिळून..." असा हसत हसत टोमणा मारून विनय झोपायला गेला...जाता जाता हळुंच प्रियाला \" लवकर ये \" असं त्यानं खुणवल...अनिताच्या नजरेतून ते सुटलं नव्हतं...
" जा ग बाई माझा भाऊराया वाट बघतोय...कधी भेटणार माझी राणी ? जा जा आता आम्ही कोण ? आमच्याशी बोलायला वेळ कसा असेल ? " अनिताने प्रियाला चिडवायला सुरुवात केली...
कितीतरी दिवसांनी विनयला भेटून प्रिया अगदी खुश झाली होती...विनयची अवस्था काही वेगळी नव्हती...इतके दिवस एकटं राहून तो खूप अस्वस्थ झाला होता...आता त्याला खूप मस्त वाटत होतं...
" मॅनेजर साहेब सगळं नीट चेक करून घ्या बरं का ...आम्ही आमच्या परीने केलीय तयारी पण तुमचा फायनल टच द्या एकदा ..." अनिताने विनयची खेचायला सुरुवात केली...
" काय ग तायडे ! तुम्ही इतकी हुषार मंडळी इथे असताना मी बापडा काय बोलणार ? सगळं भारी प्लॅनिंग केलंय तुम्ही...आणि एक्सिक्यूशन तर जबरदस्त , टाईम मॅनेजमेंट परफेक्ट...आणि चॉईस तर एकदम..." विनयच्या तोंडून टेक्निकल भाषा ऐकून सगळे हसायला लागले...मध्येच त्याला तोडून प्रिया म्हणाली...
" कळलं ह...साहेब आता आमच्या भाषेत बोला म्हटलं...तुम्ही घरी आहात ऑफिस मधून बाहेरच्या जगात या आता..."
" हो हो ग बायांनो... सगळं एकदम परफेक्ट आहे...काळजी नसावी... तसही आता दुकानात काही उरलच नसेल काही आणायचं म्हटल तरी...तुमच्या ऑर्डर प्रमाणे तिकडून येताना सामान आणलं आहे ते चेक करून घ्या...माझी फक्त मोजडी राहिलीय तेव्हढी घ्यायची...आणि प्रॅक्टिस करूया आता सगळे मिळून... मोजडी घ्यायला जाऊ आणि मग बाहेरच जेऊन येऊया मस्त...नंतर वेळ नाही मिळणार..." विनयने ऑर्डर सोडली.
एकदा हॉल वरही जायचं ठरलं आणि बिल्डर सुद्धा आला होतं त्याच्याशी सुद्धा बोलायचं होतच...
एकदा प्रॅक्टिस करून सगळे तयार व्हायला गेले...
बिल्डरशी बोलून सगळं फायनल करण्यात आलं...सगळ्यांनाच खूप आनंद झाला...दोन दिवसात सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण करून फ्लॅट हातात मिळणार होता...आई बाबांना एनिवर्सरी गिफ्ट म्हणून फ्लॅट द्यायची विनयची ईच्छा पुर्ण होणार होती...आता खरंच पार्टी तर गरजेची होतीच....
मंडळी मॉल मध्ये पोचली... मुलं गेम झोन मध्ये धावली ....प्रिया आणि विनय मोजडी घ्यायला गेले तोपर्यंत अनिता आणि सुजय मुलांना गेम खेळवत होते...
अनिताने कसं बस मुलांना गेम झोन मधून बाहेर काढलं तोपर्यंत विनय प्रिया सुद्धा आले...आता जेवायला कुठे जायचं याची चर्चा सुरू झाली...प्रत्येकजण वेगळं सांगत होता...नुसता गोंधळ सुरू होता...तितक्यात...जोरात आवाज आला...यश धावला आणि एक्सीलेटर वरून जोरदार पडला ....
" यश , यश " सगळे धावतच यश जवळ पोचले...
" बाळा डोळे उघड ...काय झालं बोल बोल " अनिता जोर जोरात रडत होती....प्रिया सुद्धा खूप घाबरली यश बेशुध्द झाला होता.... ताबडतोब एम्बुलंस आली आणि यशला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं...
पुढे काय होईल ? यश बरा होईल ना ? कार्यक्रम होणार की नाही...? जाणून घेऊया पुढील भागात...!
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!