Oct 18, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! (भाग 12 )

Read Later
संसार हा सुखाचा...! (भाग 12 )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now" काय चाललंय तुमचं ? कसली गडबड आहे ? आणि काय ग प्रिया तुला कळत नाही का दोघं नवरा बायको रूम मध्ये आहेत आणि तू इथे काय करतेय ? असं हसणं खिदळनं शोभत का ? " आईंनी तोंडसुख घेतलं तशी प्रिया बावरली...
" आई ...ते ...मी...ताईंना बोलवायला...जेवायला आले आणि...ते फोन...म्हणून..."
" काय ग प्रिया इतकी काय घाबरतेस ? आणि काय ग आई तू तिला बोलतेस असं..? ती जेवायला बोलवायला आली होती आम्हाला ...तितक्यात विनय चा फोन आला म्हणून बोलत होतो.जरा मज्जा चालू होती आमची नेहेमी सारखी...बाकी काही नाही.घे फोन चालू आहे अजून बोल तुझ्या लाडक्या लेकाशी..." अनिताने सगळं सावरलं...आईला काही समजल नाही हे कळल्यामुळे सगळेच रिलॅक्स झाले... सगळ्यांचं दडपण दूर झालं...आई विनयशी बोलू लागल्या...
" बोल रे बाळा कसा आहेस ? जेवण बिवन नीट करतोयस ना ? तू तिथे बिचारा एकटा आणि इकडे तुझी बायको तुझ्या ताई सोबत हुंदडतेय नुसती...दोघी नुसत्या फिरत असतात दिवसभर... बरं सुट्टी मिळाली का तुला ? कधी येणार आहेस ? "
आईनी आपल्या मनातलं लेकासमोर उघड केलं...
" हो का त्रास देतात का ग तुला दोघी ? मी आल्यावर बघतो त्यांना , काळजी करू नकोस...मी व्यवस्थित आहे ग...तुझी सून तिथून लक्ष ठेवून आहे माझ्यावर...सगळी सोय अगदी छान आहे.काळजी करू नकोस ग...सुट्टी मिळाली मला ...एक आठवड्याची त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी पाच दिवस येईन आणि मग दोन दिवस राहून आपण सगळे परत जाऊ...फ्लॅट च काय झालं ? कधी येणार आहे तो बिल्डर ? " विनय आईशी मनमोकळ बोलला ...
" बरं झालं बाबा...तुला जरा निवांतपणा मिळेल.आणि आमचं सामान आणायचं आहे येताना..तुला सांगते मग...त्या बिल्डर च काय ते जावई बापूंना विचार तू. ते कामही झालं तर बरं होईल...जेवत जा नीट...बोल तू जावई बापुंशी..." आईनी फोन सुजयला दिला...
अनिता आणि प्रिया ची खुसर फुसर चालू होती...आईंनी काही न ऐकल्यामुळे दोघी निवांत होत्या...आईंनी रागाने पहिल्या बरोबर दोघी जेवायला चला म्हणून किचन मध्ये पळाल्या...
सुजयला आणि मुलांना विश्वासात घेतल्यामुळे आता बाकी सगळ्यांची एक टीम झाली पण आई बाबांना एकटं पडल्यासारखं वाटायला लागलं...
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे निता मॅम कडे सगळ्यांना जायचं होतं...\" मुलांना खेळायला गार्डन मध्ये घेऊन जातो \" असं सांगून प्रिया आणि अनिता बाहेर पडल्या...सुजय ऑफिस मधून परस्पर येणार होता म्हणजे आई बाबांना संशय नको...
" काय हो रोज मुलांना बाहेर घेऊन जा म्हणून अनु म्हणते आपल्याला आणि आज आपण तयार असताना दोघी निघून गेल्या मुलांना घेऊन ? काय चाललय काहीच कळत नाहीये...सुजय राव घरी येतील आता तर घरी थांबायचं सोडून दोघी गेल्या निघून...स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून ठेवलीय..." आईना अनिताच्या वागण्याचं नवल वाटतं होतं.
" अग कशाला इतका विचार करतेस ? जाऊ दे ना...सुजयराव उशिरा येणार आहेत आज , म्हणून गेल्या असतील .चल आपणही थोडं फिरून येऊ..." बाबा आईंचा मुड चागला करायचा प्रयत्न करत होते.
निता मॅम कडे सगळे जमले..त्यांनी तीन चार ऑप्शन्स सांगितले...सगळ्यांनी हो नाही करत करत खूप गोंधळ केला..शेवटी \" हम साथ साथ है \" आणि \" ये तो सच है की भगवान है ..\" यावर साधा , सोपा पण तरीही मस्त परफॉर्मन्स करायचं ठरलं...सगळ्यांना शिकवण्याची जवाबदारी निता मॅम ने घेतली...मुलांसाठी अजून एक डान्स परफॉर्मन्स करायचं ठरलं...बाकीची तयारी , मेक अप , डेकोरेशन यासाठी निता मॅम ने त्यांच्या ओळखीच्या लोकांना कॉन्टॅक्ट दिला..
वेळ कमी होता आणि घरी प्रॅक्टिस करणं शक्य नव्हतं त्यामुळे रोज दोन तास तरी प्रॅक्टिस ला यायला हवं असं निता मॅम नी सांगितलं...सुजय च ऑफिस असल्यामुळे संध्याकाळची वेळ ठरली...विनय रोज व्हिडिओ मीट द्वारे जॉईन होऊन सगळ्यांसोबत प्रॅक्टिस करणार होता...
भारी धम्माल येणार होती... मुलं तर खूप एक्साईटेड होती पण मोठ्यांना मात्र एक्साईटमेंट बरोबरच टेंशनही होत...पण आता मागे हटायच नाही असं सगळ्यांनी ठरवलं...
" काय ग तुम्ही दोघी इतका विचार करताय ? आमच्याकडे बघा , मुलांचा उत्साह बघा जरा ...आणि या परफॉर्मन्स नंतर आई बाबांच्या आनंदाला पारावार उरणार नाही...बर असं करूया एक आठ दिवस करून बघू प्रॅक्टिस...अगदी नाहीच जमलं तर मग बघू...पण आता हटायच नाही...काय ? " सुजय म्हणाला
" हो ठीक आहे ...पण आई बाबांना काय सांगायचं रोज ? दोन तास रोज संध्याकाळी आपण बाहेर जाणार... कस जमेल ते ? " प्रिया म्हणाली..
" मुलांना स्विमिंग क्लास लावलाय असं सांगू , बाबा म्हणत होते मुलांना स्विमिंग शिकवा म्हणून...सुजयला सुट्टी घ्यायचीय म्हणून उशीर होईल काही दिवस असं सांगुया .मावशी आणि आत्या बोलवतायेत कधीच्या आई बाबांना , चार दिवस पाठवून देऊया का तिकडे ? मी करते मावशीला फोन..." अनिता म्हणाली
" हो चालेल...एक अजून आयडिया आलीय माझ्या डोक्यात बघा कशी वाटतेय...आपण आपल्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना आणि आई बाबांच्या मित्र मंडळींना त्यांचे विचार मांडायला सांगू या का ? आणि जे येणार नसतील त्यांचे व्हिडिओ मागवून घेऊ या का..." प्रियाने आपली आयडिया सांगितली
" वाव भारी आहे ही आयडिया...मी मावशीला सांगते ती सांगेल त्यांच्या कडच्या सगळ्यांना...आईच्या मैत्रिणीना सुद्धा तिच बोलेल तर बरं...आणि बाबांकडच्या पाहुण्यांना सांगायला आत्याला सांगू...दोघी नक्की करतील आपलं काम...पण आपल्या सरप्राइज बद्दल सगळं सांगायला हवं त्यांनाही..." अनिताला कीर्तीची कल्पना खूप आवडली...सुजय ने सुद्धा मान्यता दिली...
अनिताने लगेच मावशी आणि आत्याला फोन करून विश्र्वासात घेतलं...त्यांनाही खूप आनंद झाला...कुठलीही मदत करायला सगळे तयार होते...
अनिताने प्रियाला मिठी मारली...होणाऱ्या कार्यक्रमाची कल्पना करूनच तिला खूप आनंद झाला होता...मावशी एक दोन दिवसात आई बाबांना तिच्याकडे बोलवणार होती आणि मग आत्या , म्हणजे घरी सगळी तयारी करायला वेळ मिळणार होता...आई बाबा नसतील तर प्रॅक्टिस सुद्धा करता येणार होती...
सगळे आनंदात घरी आले...आई बाबा वाटच बघत होते...
" काय ग कित्ती उशीर ? कुठे फिरत होतात ? मुलं भुकेली असतील ना " आई म्हणाली
" अगं मुलांना घेऊन स्विमिंग क्लास बघायला गेलो होतो...बाबा नव्हते म्हणत मुलांना स्विमिंग शिकवा म्हणून , मग आता सुट्टया आहेत तर लावून टाकला क्लास उद्यापासून संध्याकाळी आहे रोज दोन तास... तसही सुजयला उशीर होणार आहे काही दिवस ऑफिस मधून यायला .मग आम्हीही येऊ तोपर्यंत.स्वयंपाक करून ठेवत जाऊ , तुम्ही दोघे फिरून येत जा आणि जेवून घ्या ." अनिताने आईला काहीच बोलायची सोय ठेवली नाही...
मीना मावशी आणि कला आत्या ठरल्या प्रमाणे कामाला लागल्या...त्याची फोनाफोनी सुरू झाली...!
दुसऱ्या दिवशी मावशीचा फोन आला ...आईच आणि मावशीच बोलणं अनिताने गुपचूप ऐकलं... " ताई काय कमी केलं ग मी या मुलांसाठी आणि बघ ना आमच्या लग्नाचा वाढदिवस विसरले , माझा वाढदिवस तर दरवर्षी करतात साजरा पण आता इतका मुंजीचा घाट घातला पण कोणालाच काही आठवण नाही...नको तू काही आठवण नको करून देऊस...हे म्हणालेत की आपणच देऊ पार्टी...इतकी खरेदी केली ग सगळ्यांनी पण आम्हा दोघांना मात्र एक नवा कपडा नाही आणला...तुला तुझ्या भाच्यांचच कौतुक मीच मेली मूर्ख मलाच वागायचं कळतं नाही...काही बोलू नकोस तू...तुझ्याकडे येऊ म्हणतेस चार दिवस ? पण इथे काही मदत लागेल ना आमची...या दोघी पोरी मुलांना आमच्या जीवावर सोडून दिवसभर उंडारत असतात .कुठे जातात , काय करतात काय माहिती..." आई बहीणी जवळ मन मोकळं करत असतांनाच अनिता मुद्दाम आत आली..
" काय ग आई कोणाचा फोन ? "
" मावशी आहे ग , चार दिवस राहायला या म्हणतेय...पण इथे कामं असतील ना .आमची मदत होईल म्हणून मी नको म्हणत होते..."
" अगं जा की मग आणि अजून वेळ आहे कार्यक्रमाला , तसाही सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलंय घरी फारसं काही करायचं नाहीये... कार्यक्रमाला सुद्धा वेळ आहे अजून...राहून या चार दिवस इतकी बोलावते आहे मावशी तर..काही गरज पडली तर येऊ शकता ना तुम्ही जवळच तर आहे घर तिचं..." अनिताने आई बाबांना मावशीकडे पाठवायचा चंगच बांधला...
" बरं ताई मग मी ह्यांना विचारून तुला सांगते...काय म्हणालीस ते काही माझ्या शब्दाबाहेर नाहीत...काय ग थट्टा करतेस...हो हो येतो मग आम्ही...दुपार होईलच तरी...चल मग भेटू लवकरच ..." सुमतीबाई बहिणीकडे जायला आतुर होत्या.फक्त विजय रावांनी काही मोडता घालायला नको असं त्यांना वाटत होतं...
" तुझे बाबा काही खुसपटी काढायला नकोत आता...त्यांनाही त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं...पण मी नको म्हणाले तेव्हा .आता त्यांनी उट्ट काढलं तर ग " आईंनी अनितापुढे आपली शंका बोलून दाखवली...
" तसं नाही करणार बाबा , आणि काही म्हणाले तर मी आहेच ना ...तुम्ही असं करा आधी मावशीकडे जा आणि मग आत्या कडे जाऊन या...म्हणजे प्रॉब्लेम मिटला..." अनिता ने ठरल्याप्रमाणे तोडगा काढला.
" अहो ताईचा फोन आला होता , ती खूप आग्रह करतेय या म्हणून , जायचं का चार दिवस ? " सुमती बाई म्हणाल्या...
बाबांनी डोळे वटारले...\" माझ्या बहिणीकडे जायला नाही म्हणालीस आणि आता स्वतःच्या बहिणीकडे मला चल म्हणतेस ? \" असं काहीतरी बाबा बोलणार आणि वाद नक्की वाढणार याची कल्पना येऊन अनिता पटकन म्हणाली " बाबा तुम्ही मावशीकडे जा आणि मग आत्या कडेही जाऊन या ना चार दिवस...इतक्या आग्रहाने बोलवतायेत ...मी बॅग भरून देते आणि लाडू सुद्धा केलेत ते घेऊन जा ..." अनिताने दोघांना पाठवायचा अगदी फुल्ल फ्लेज प्लॅन केला होता...
बाबांना काहीच बोलायची संधी मिळाली नाही...ते उठून आवरायला गेले.
" अनु अगं मुंजीच्या आहेराच काय ? चागलां आहेर करायला हवा मावशीला , तुला किती करते ती .आणि तुझी आत्या सुद्धा उगीच फुगून बसेल चागलं नाही केलं तर ...तुला तर माहीतच आहे ती कशी आहे ते..." आईनी हळू आवाजात लेकीला सांगितलं...
" हो ग काळजी करू नकोस...मी येते एक दोन दिवसात मग मावशीला आणि आत्याला घेऊन जाऊ आणि त्यांच्या आवडीचा आहेर घेऊ त्यांना...खुश ना मग ? " अनिताने आईची चिंताच मिटवली...खुशीत त्या तयार व्हायला गेल्या...
आई बाबा गेले आणि प्रिया आणि अनिता पुढच्या प्लॅनिंग ला लागल्या...आता त्यांना मोकळेपणाने सगळं करता येणार होतं...आई बाबा घरात असल्यामुळे वागण्या , बोलण्यावर सारखं बंधन येत होतं आता ती काळजी नव्हती...
पण तरीही \" मावशीकडे आणि आत्याकडे सगळं ठीक होईल ना \" याची काळजी मात्र दोघींनाही लागून राहिली होती... !!

पुढे काय होईल ? कार्यक्रम नीट पार पडेल ना ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...!!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing