Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा....! ( भाग 10 )

Read Later
संसार हा सुखाचा....! ( भाग 10 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


बराच वेळ धिंगाणा करून मुलं दमली आई बाबा त्यांना घेऊन झोपायला गेले...अनिता , विनय आणि प्रिया बराच वेळ बोलत होते...
" तायडे खरंच थँकयु ग , इतका सुंदर प्लॅन केलास तू... तसं प्रिया म्हणत होती की आपण जायच्या आत आई बाबांची एनीवर्सरी आणि आईचा वाढदिवस साजरा करूया , एखादं छान गेट टुगेदर करू वगैरे...पण सगळ्या टेन्शन मुळे काहीच सुचत नव्हतं मला.पण तू हे छान केलंस... प्रियाची कल्पना म्हणजे वायफळ खर्च वाटणार आई बाबांना आता तू सगळं प्लॅन केलास म्हणजे ते खुश असणार..." विनय म्हणाला.
" तसं काही नाही रे...तुला उगीच असं वाटतं...अरे खरंतर तुमचं जायचं ठरलं तेव्हाच प्रिया मला म्हणाली होती याबद्दल , पण नंतर काहीच ठरवण झालं नाही...हा प्लॅन प्रियाचाच पण तो एक्सिक्यूट मी केला..." अनुने प्रियाच श्रेय तिला दिलं..
" आता जाऊ द्या बरं तो विषय...चला तयारीला लागुया...काय काय करायचं त्याची लिस्ट करूया आधी मग त्याप्रमाणे काम वाटून घेऊ ..." प्रियाने विषय बदलला...
" आता मॅनेजरीन बाईंचं ऐकायला हवं.. " अनिता आणि विनय जोरात हसले...!
तिघांची चर्चा , मस्ती मस्त रंगली होती... पहाट कधी झाली ते कळलंच नाही कोणाला...आता थोडा वेळ झोपुया म्हणून ते जाणार तितक्यात दार वाजलं...
दारात सुजय उभा ! प्रिया आणि विनयला बघून सुजयला खुप आनंद झाला ...
" अरे वां , माझ्या स्वागताला लवकर उठलात वाटतं ? " भरभरून हसत सुजयने विनयला मिठी मारली...
सुजश आणि अनिताच लव्ह मॅरेज , सुजश विनयचा मित्र म्हणून दोघांची दोस्ती आधीपासूनच होती...अगदी देवमाणूस होता सुजय आणि नेहेमी हसतमुख , सगळ्यांना सांभाळणारा , म्हणूनच सगळ्यांचा लाडका !!
" वेलकम सुजयराव , तुमच्याच घरात तुमचे खूप खूप स्वागत " सुजयला वेलकम करून अनिता चहा करायला गेली...आता कोणीच झोपणार नव्हतं...गप्पांना रंग चढणार होता...
काही वेळाने आई , बाबा , मुलं उठली... चौघांना मस्त हास्य विनोद करतांना पाहून आई बाबा सुखावले... मुलं सुजयला बिलगली...
प्रियाला मस्त रिलॅक्स बसलेलं पाहून आईंनी लगेच ऑर्डर सोडली..." प्रिया अगं सुजयराव दमून आलेत , चहा नाश्त्याची सोय बघ जरा...गप्पा काय मारत बसलीयेस ? आणि जेवणाचाही फक्कड बेत होऊन जाऊ दे...रात्री मग विनयला निघायचं आहे , त्याला जरा बांधून दे खाण्याच..."
" चहा होऊन जाऊ दे अजून एक मस्त आणि नाश्ता मी ऑर्डर करतो , जवळचं इडली मिळते मस्त तुम्हा सगळ्यांना आवडेल...आणि मग दुपारी जाऊ भटकायला , मूव्ही बघुया आणि जेऊनच परत येऊ...नाश्ता करून आराम करा , भाऊ बहिण गप्पा मारून थकला असाल ना ..." सूजयने चिडवायला सुरुवात केली तशी आई गप्प बसल्या... प्रियालाही आराम मिळाला ...
नाश्ता आला ...सगळे तुटून पडले...खूप मस्त होती इडली , वडा सांबार...खाऊन झाल्यावर मुलं खेळायला गेली आणि बाकी सगळे आराम करायला गेले...थोडी झोप काढली...
थोडा एकांत मिळताच विनयने प्रियाला कुशीत घेतलं...
" काय राणी सरकार खुश ना ... सगळं टेन्शन गेलं पण आता मला तुझ्याशिवाय राहणं कसं जमेल ? काय करू थांबून जाऊ का ? "
" आजिबात नाही ह...तुझी बॅग भरून ठेवते म्हणजे रात्री गडबड होणार नाही.घरी बरच आहे खण्याच त्यामुळे प्रॉब्लेम नाही... जेवणं शेजारच्या \" अन्नपूर्णा स्वयंपाक घरातून \" आणत जा...दुपारचं होईल ऑफिस मध्ये ...आणि मला इथे खरंच खूप छान वाटतं...हे माझं दुसरं माहेरच आहे...सुजय दादा आणि ताई किती लाड करतात माझे " प्रिया खूप आनंदात होती...
" आणि आम्ही सासुरवास करतो वाटतं..." विनय मास्करीच्या मुड मध्ये आला होता तशी प्रिया स्वतःला सोडवून घेत पळाली...
सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं ....आई बाबा नको म्हणत होते पण लाडका जावई थोडाच ऐकणार होता ? मूव्ही मस्त होता नंतर सगळ्यांच्या आवडीच जेवण मग मात्र आई बाबा आणि मुलं कंटाळली आणि घरी परतली...हे चौघे मात्र समुद्रावर जाऊन अगदी प्रसन्न होऊन परतले...
विनयला रात्रीच्या गाडीने निघायचं होतं म्हणून घरी येऊन प्रियाने लगेच त्याची सगळी तयारी करून दिली...
" प्रिया अगं त्याला जरा चार पदार्थ बांधून दिले असतेस ना , उगीच फिरत बसलात दिवसभर...आता एकटा राहणार तो तिकडे " आईंनी प्रियाला सुनावलं
" आई काहीच काळजी करू नका...घरी मी चिवडा , चकली , लाडू , शंकरपाळी सगळं करून ठेवलंय...शिवाय बाकीही पदार्थ आहेतच ...येतानाच त्या तयारीने आलो होतो ना आम्ही ...आपल्या शेजारच्या अन्नपूर्णा मधून रात्रीच जेवण आणतील आणि दुपारी तर ऑफिस मध्ये होईल...तश्या मंदा ताई आहेतच त्या ही करून देतील हवं तर...आणि हॉटेल्स आहेतच ना ...उगीच नका बरं टेन्शन घेऊ..." प्रियाने आईना आश्वस्त केलं
" मी काय लहान आहे का आई ? इतकी काय काळजी करतेस ? प्रियाने माझी सगळी सोय व्यवस्थित लावून ठेवलीय...तू मस्त मजेत राहा...तुझा वाढदिवस आहे तेव्हा हवं ते मागून घे , शिवाय तुमच्या लग्नाचाही वाढदिवस मस्त करा शॉपिंग...चला येतो मी " आई बाबांच्या पाया पडून आणि सगळ्यांना बाय करून विनय निघाला !
विनय गेल्यावर प्रिया , सुजय आणि अनिताची पुन्हा गप्पांची मैफिल जमली...आई बाबा मुलांना घेऊन फिरायला गेले आणि या तिघांनी कार्यक्रमाचं आयोजन सुरू केलं...साहिल ची मुंज , आई बाबांची एनिवर्सरी आईंचा वाढदिवस असा जंगी कार्यक्रम ठरला !
गुरुजींना बोलून आधी मुहूर्त काढायचा आणि मग त्याप्रमाणे सगळं ठरवायचं असा करार सर्वानुमते झाला...आई बाबांना पाहुण्यांची लिस्ट करायचं काम सोपविण्यात आलं...अनु आणि प्रिया शॉपिंग च बघणार होत्या आणि सुजय ने हॉल बुकिंग , डेकोरशन याची जवाबदारी घेतली...
आई बाबांना फक्त साहिलची मुंज इतकचं माहिती होतं त्यांची एनिवर्सरी आईंचा वाढदिवस हे त्यांच्यासाठी सरप्राइज असणार होतं...त्यामुळे आई बाबांची सगळी तयारी गुपचूप करावी लागणार होती... घरातही बोलतांना भान ठेवावं लागणार होतं...
दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी मुहूर्त सांगितला...अठरा दिवसानंतर मुहूर्त होता...अनिताने लगेच विनयला फोन करून सुट्ट्यांच प्लॅनिंग करायला सांगितलं...
" चला म्हणजे पंधरा दिवस तरी आहेत आपल्या हातात...संध्याकाळ पर्यंत मला किती पाहुणे होतायेत हे सांगा म्हणजे त्या प्रमाणे हॉल बुक करता येईल...इनव्हींटेशन मोबाईल वरच पाठवू या आणि सगळ्यांना फोन करून आमंत्रण देऊया...माझी मित्रमंडळी जवळपास पंचवीस होतील...आई बाबा हवे होते आज त्यांना खूप आनंद झाला असता..." दोन वर्षांपूर्वी एका अपघातात सुजय च्या आई बाबांचं आकस्मिक निधन झालं होतं...त्यांच्या आठवणीत तो व्याकूळ झाला होता...
आई बाबा सुजय जवळ गेले...बाबांनी जवळ घेऊन त्याला समजावलं " देवाच्या लीलेपुढे आपण काहीच करू शकत नाही बेटा , सांभाळ स्वतःला ... आम्ही आहोत आता त्यांच्या जागी..."
अनिता सुद्धा भावनिक झाली...खूप चांगले होते तिचे सासू सासरे...तिला अगदी मुलगीच मानायचे ...प्रियाने अनिताला जवळ घेतलं...आईच्या कुशीत अनिताने स्वतःच मन मोकळं केलं...सगळेच भावना विवश झाले...
तितक्यात मुलं खेळून आली आणि सगळ्यांना पाहून रडवेली झाली... मुलांना पाहून सगळ्यांनी आपल्या भावना आवरल्या !
सुजय ऑफिसला गेला...आई बाबा लिस्ट करायला बसले तोपर्यंत अनिता आणि प्रियाने घरचं आवरलं...सगळ्यांची जेवणं झाली आणि मग दोघी शॉपिंगला बाहेर पडल्या...आई बाबा घरी असल्यामुळे मुलांची चिंता नव्हती...दोघींचं मस्त जमायचं. चॉईससुद्धा छान होता त्यामुळे शॉपिंगला मज्जा येणार होती...
घरी आई बाबा बोलत होते..." पोरांनी इतका मोठा कार्यक्रम आखला आहे पण आपल्या लग्नाचा वाढदिवस दोन दिवस आधी आहे याचा विसर पडलाय त्यांना...दरवर्षी विनू आणि प्रिया करतात साजरा पण यावर्षी जाण्याच्या नादात ते दोघेही विसरले आपल्याला... असं करू आपणच त्यांना पार्टी देऊ यावेळी...बाहेर घेऊन जाऊ सगळ्यांना...कामाच्या गडबडीत विसरली असतील जाऊ दे...आपण कशाला मनाला लाऊन घ्यायचं ? आणि तुझाही वाढदिवस आहे सांग काय घ्यायचं तुला माझ्याकडून ? की आपण दोघच दोन दिवस कुठेतरी फिरून यायचं ? " बाबांनी आपली कल्पना आईला सांगितली...
" खरंय तुमचं. मला तर खूप वाईट वाटलय पण बघू कदाचित आठवेल मुलांना...तुम्ही म्हणता तसं आपणच पार्टी देऊ... सगळ्यांसाठी कपडे घ्यायला हवे आपण ...मी सांगते अनिताला सगळ्यांच्या आवडीच घे म्हणून आपली पसंती काही त्यांना आवडतं नाही , त्यांच्या पसंतीच घेतलं म्हणजे झालं...
मला मेलीला कशाला हवं काही...पण आपल्या दोघांसाठी मुंजित घालायला नवे कपडे मात्र घ्यावे लागतील...की आपण विनू येईल त्याला सांगू घरून येताना आन म्हणून आपले कपडे ? इतका मोठा घाट घालतायेत पण आपल्याला साफ विसरले आपले पोरं...बाकीच्यांचे जाऊ द्या पण निदान अनुला तरी आठवण नको का आपली..." आईनी आपलं दुःख बाबांजवळ उघड केलं
" तू नको मनाला लावून घेऊ ग...उद्या आपण जाऊ खरेदीला .तू एकदा यादी बघ कोणी राहिलं नाही ना चुकून नाहीतर महत्त्वाचं कोणी विसरून जायचो आपण बोलवायचं..." बाबांनी बायकोचं सांत्वन केलं...!
अनिता आणि प्रियाने आईसाठी सुंदर पैठणी घेतली आणि एक नऊवारी साडी आणि मुंजीसाठी कांजीवरम...प्रियाने घरून गुपचूप आईच एक ब्लाउज आणलं होतं मापासाठी .लगेच टेलर कडे जाऊन आल्या दोघी आणि वेळेवर साडी ब्लाऊज तयार करायला सांगितलं ...बाबांसाठी सिल्क चा कुर्ता , धोतर जोडी आणि एक मस्त थ्री पीस सूट घेतला .कपडे घरी घेऊन येणं तर शक्य नव्हतं कारण घरी गेलं की आई बाबा खरेदी बघतील आणि मग सरप्राइज राहणार नाही मग अनिताने आई बाबांची खरेदी तिच्या जवळच राहणाऱ्या मैत्रिणीकडे ठेवायचं ठरवलं...
दोघींनी सारख्या साड्या घेतल्या...मुंजिसाठी नऊवारी , आणि बाकी कार्यक्रमासाठी डिझायनर साडी आणि एक घागरा सुद्धा...आता आपणही आपली हौस पुरवून घ्यायची असं दोघींनी ठरवलं होतं...विनय आणि सुजय साठी सुद्धा सारखे कपडे घ्यायचे असे त्यांनी ठरवले होते...पण त्यासाठी सुजय बरोबर हवा होता...
मुंजीच सगळं गुरुजी बघणार होते त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता...संध्याकाळी दोघी थकून घरी आल्या...
आई बाबांनी उत्सुकतेने खरेदी बघायला सुरुवात केली फक्त अनिता आणि प्रियाची खरेदी होती...आई बाबांचा हिरमोड झाला...प्रियाला ते जाणवलं पण तिने साफ दुर्लक्ष केलं आणि म्हणाली " आई , बाबा कशी वाटली आमची खरेदी ? छान आहेत ना साड्या आमच्या ....उद्या आपण सगळे जाऊ आणि तुमची आणि मुलांची खरेदी करू...परवा भाऊजिना सुट्टी आहे तेव्हा त्यांची खरेदी होईल...आणि सगळ्यांना काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावे असं माझ्या मनात आहे...तुम्हाला काय वाटतं...काय द्यावं ? "
" तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा...आम्हाला काय कळतंय त्यातलं ? " \" मुलींनी फक्त स्वतःची खरेदी केली सोबत आईसाठी एखादी साडी सुद्धा नाही आणली...प्रिया सुद्धा विसरली आणि अनिता तर पोटची लेक पण ती सुद्धा विसरली.. \" आईंनी आपलं दुःख बोलून न दाखवताच तिथून निघून जाऊन व्यक्त केलं...
आई बाबा आपल्यावर नाराज आहेत हे प्रिया आणि अनिताला कळलं होतं पण तिकडे आजिबात लक्ष न देता दोघी रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या...!!

पुढे काय होईल ? कसा होईल कार्यक्रम ? आई बाबांची निराशा मुलांच्या आनंदावर विरजण तर पडणार नाही ना...जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing