Login

संसार

This is a short story "SANSAAR" which related to understanding between newly married couple and the love and success in their graceful relation .

          भयंकर संतापलेला राघव बडबडतच घरात शिरला . दुर्लक्षित झाल्याच्या भावनेने त्याच्या इगोला चांगलाच धक्का बसला होता . कोण समजते कोण ती स्वतःला ? तिच्या माहेरचे लोक काय भेटले चक्क मला विसरली ? येऊच दे तिला आता घरी चांगलंच खडसावतो तेव्हाच तिला कळेल नवरा म्हणजे काय असतो ते . राघवचा राग सातव्या आसमानावर पोचला होता .

           जेमतेम सहा महिन्यांपूर्वीच राघव आणि रश्मीचा लग्न झालेल होत . रश्मी अत्यंत मनमिळावू , बोलकी व भिडस्त स्वभावाची होती पण राघवला मात्र  बोलणं जरा कमीच होत . सगळ्यांसोबत बसून बोलणं ,  हसणं ,  गप्पा मारणं , त्याला विशेष रुचत नसे . तसा तो स्वभावाने जरासा हट्टी व रागीट असला तरी एव्हाना रश्मीने मात्र त्याला  बऱ्यापैकी सांभाळून घेतल होत . पण आज मात्र गाडं चांगलंच  बिनसलं होत . रश्मीच्या मावशीच घर गावातच होत  आणि तिच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न अवघ्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने रश्मीच्या माहेरचं संपूर्ण गोतावळ तिच्या मावशीकडे जमलं होत . कितीतरी दिवसांनंतर रश्मी सुद्धा मोठ्या उत्साहाने आज त्या सगळ्यांमध्ये सामील झाली होती . राघवही बरोबर होताच . इतक्या दिवसांनंतर  रश्मी  भेटल्याने सगळेच तिच्याशी अगदी भरभरून बोलत होते . बरोबरीच्या भावंडांच्या थट्टा मस्करीला अगदी उधाणच आलं होत . ती सुद्धा कितीतरी दिवसांनी भेटलेल्या माहेरच्यांच्या सहवासात सगळं काही विसरून मनसोक्त आनंद लूटत होती .

          राघवला  सुद्धा सगळेच जण  यथोचित मान सन्मान देऊन गप्पागोष्टींच्या रंगतदार कार्यक्रमात आपुलकीने सहभागी करू पहात होते  पण हे महाशय मात्र गाल फुगवून बसले होते . घरी सतत आपल्याभोवती रुंजी घालणारी आपली बायको इथे आपल्याकडे जरा सुद्धा लक्ष देत नाहीए असं वाटून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली आणि तो कुणालाही काहीही न सांगता तडक घरी निघून आला .

         संतापलेल्या राघवने सगळी गाथा आपले आई बाबा म्हणजेच माई व आप्पांपुढे वाचली . तश्या माई सुद्धा चांगल्याच खवळल्या . अगं बाई ! जळलं मेलं कर्म ! समजते तरी कोण ही बया स्वतःला ? खुद्द नवर्याकडे दर्लक्ष करते ही ? राघव आत्ताच चांगली वठणीवर आण हो तिला नाहीतर अशीच सवय पडायची . आज ती आणि उद्या तिच्याबरोबर तिच्या माहेरची माणसं देखील विचारायची नाहीत हो तुला . आत्ताच सावध हो , एकदा जर का बायको डोक्यावर बसली की माणसाला अगदी सळो की पळो करून सोडते एवढं लक्षात ठेव . 

          माईंच्या तोंडाचा पट्टा सुरु झालेला बघून अप्पा कडाडले .  अहो , काय चालवलय तुम्ही हे ? काही कळतंय का तुम्हाला ? चिडलेल्या पोराला शांत करायचं , समजवायचं सोडून आगीत तेल ओतायचं काम करताय ? गप्प बसा . तुम्हाला तर बाई माझं बोलणं नेहमीच नकोस असतं . करा काय हवं ते मी जातेच कशी . असं म्हणून माई फणकाऱ्यातच उठल्या आणि स्वयंपाकघराकडे वळल्या . राघव मात्र रागातच तोंड पाडून सोफ्यावर बसला . अप्पांनी जवळच टेबलावर भरून ठेवलेल्या तांब्यातून पेलाभर पाणी राघवला दिल व म्हणाले ,  बाळा ,  अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाराज होऊन डोक्यात राख घालून घेऊ नाही रे . अरे इतकी वर्ष आईबापाच्या प्रेमाच्या छायेत लाडाकोडात वाढलेली ती निरागस पोर , लग्न करून ह्या घरात आली . हे घर , घरातलं वातावरण ,  इथली माणसं सगळंच तिच्यासाठी अगदी नवीन आणि अपरिचित होत . तरी तिने  हळू हळू सगळं काही आपलस करून घेतलं . स्वतःला आपल्या ह्या घरात नव्याने रुजवलं एवढी कठीण गोष्ट तिने तिच्या स्वतःच्या बळावर अतिशय उत्तमरीत्या पार पाडली . आयुष्याच्या ह्या अतिशय नाजूक काळामध्ये तिला सर्वात जास्त गरज होती ती तुझ्या मदतीची , प्रेमाची आणि विश्वासाची . ह्या सहा महिन्यात तू एकदा तरी तिला सांगितलंस  का , की हे घर , इथली माणसं सगळं काही जरी आता तुझं असलं तरी देखील हे सगळं तुझ्यासाठी अजून नवीन आहे . तू तुझ्या जिवाभावाच्या लोकांना सोडून माझ्या सोबत आयुष्याच्या एका नवीन प्रवासासाठी सिद्ध झाली आहेस ह्या अतिशय अवघड वळणावर मी कायम तुझ्या सोबत आहे असा  प्रेमळ विश्वास तू एकदा तरी तिला दिलासा का ? घरातील लोकांचे स्वभाव गुणधर्म , आवडी- निवडी , आपल्या घरातल्या पद्धती ह्या सगळ्या गोष्टींची तोंडओळख तू तिला करून दिलीस का ? तिचं इथे रुळणं सहज , सुलभ व्हावं ह्यासाठी तू तुझ्याकडून काही तरी प्रयत्न केले का ?  अप्पांच्या अगदी अचूक आणि रास्त प्रश्नांनी राघव निरुत्तर झाला . अप्पांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं राघवकडे होकारार्थी उत्तर नव्हतंच . एखाद्या अपराध्यासारखा तो हतबलपणे अप्पांकडे बघू लागला .

             अप्पांनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला व म्हणाले , बाळा दुसऱ्यांच्या चूकांचा पाढा वाचायच्या आधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघायची सवय आता तरी लावून घे . काही वेळ ती पोर तिच्या माणसांमध्ये रमली , हसली , बोलली , थट्टा मस्करी केली तर बिघडल  कुठे ? तिची संपूर्ण जबाबदारी तर ती अगदी सुरळीतपणे पार पाडते आहेच ना ? आता तूच तुझी जबाबदारी समजून वाग. जस तुझ्यासोबत तुझ्या आईवडिलांचा , नातलगांचा तिने प्रेमाने स्वीकार केला तसाच तू ही तिच्या लोकांना मनापासून आपलं मानून त्यांनाही यथोचित मान दे . तेव्हाच तुमच्या नात्यातलं प्रेम व गोडवाही बहरेल आणि टिकेल . पती आणि पत्नी ह्यांना संसाररथाची दोन चाकं उगाच नाही म्हणत .  दोघांनाही बरोबरीने हा रथ हाकावा लागतो मग वाटेत कितीही खाचखळगे असो यशही निश्चित असत . 

                         आता राघवला स्वतःची चूक पूर्णपणे उमगली होती .  अप्पांच्या बोलण्याने त्याच मन चांगलंच थाऱ्यावर आलं होत . त्याच्या डोळ्यात चमकणारे पश्चात्तापाचे  अश्रू त्याच्या आणि रश्मीच्या नव्याने सुरु होणाऱ्या सुंदर संसाराची साक्षच देत होते . त्याने अप्पांचे आभार मानले आणि तडक आपल्या प्रियेला भेटायला निघाला तसे अप्पा उद्गारले , अरे कुठे निघालास ? अप्पा , मी आलोच जरा  मावशींकडे जाऊन  तुमच्या सुनेची मनापासून माफी मागतो आणि तिला सुचवतो तुझी  इच्छा असेल तर राहा सगळ्यांसोबत मनसोक्त . मी रोज रात्री येत जाईन गप्पा मारायला लग्न आटोपल्यावरच घरी ये असं सांगतो तिला आणि जाताना सगळ्यांसाठी आईस्क्रीम पॅक करून घेऊन जातो असं म्हणत राघव वाऱ्याचे पंख लावून निघाला सुद्धा .