Mar 01, 2024
वैचारिक

संमती

Read Later
संमती

'श्रीपती' गुरुजी आज शाळेतून जरा लवकरच घरी आले. आपल्या उदासवाण्या वाटणाऱ्या वाड्याकडे एक नजर टाकून त्यांनी आपली सायकल तुळशी वृंदावनापाशी उभी केली. स्वयंपाक घरातून छान घमघमाट सुटला होता. "आता या वेळेला कोण बरे आले असेल!" असे मनाशीच म्हणत ते हातपाय धुवून  स्वयंपाक घरात गेले.

उमा, बापूंची म्हणजेच श्रीपतरावांची 'धाकटी बहीण' स्वयंपाकघरात चुलीवर स्वयंपाक करत होती आणि त्यांची म्हातारी आई एका कोपऱ्यात बसून डोळे मिटून एकसारखा जप करत होती. उमेला पाहताच बापूंच्या चेहेऱ्यावर आनंद पसरला. तिथेच एका जवळच्या पाटावर बसत बापू म्हणाले, "उमे आज कसं काय येणं केलंस?"
"उमेने तुझ्यासाठी एक स्थळ आणले आहे बापू." आई जपमाळ ओढत म्हणाली.
तसे बापूंनी चमकून उमेकडे पाहिले. तसे उमा किंचित हसली आणि भाजी भाकरीचे ताट बापूंच्या समोर सरकवत म्हणाली, "बापू आधी पोटभर जेव, मग निवांत बोलू." उमेच्या हातचे जेवून बापू तृप्त झाले.
सारी आवराआवर झाल्यानंतर थोड्यावेळाने बापूंच्या पाठोपाठ उमा बाहेर अंगणात येऊन बसली.
बापूंचा स्वभाव तसा कडकच. बराच वेळ शांततेत गेल्यानंतर उमेने जरा घाबरतच विषय काढला, "बापू वहिनींना जाऊन सहा वर्षे होत आली. त्यांच्या आठवणीत किती दिवस काढणार आहेस? आपल्या लहानग्या श्रीधरलाही आईची गरज आहेच. आता तरी मनावर घे आणि लग्नाला तयार हो. तुम्हा दोघांच्या पुढ्यात अवघे आयुष्य आहे. श्रीधर असा माझ्याजवळ किती दिवस राहील? माझ्या सासूबाईंना फारसा रुचत नाही तो, माहित आहे ना? त्याला तुझी आठवण येते सारखी आणि नसलेल्या आईचीही.

हे ऐकून आपल्या पत्नीच्या 'सावित्रीच्या ' आठवणीने श्रीपतरावांच्या डोळ्यात पाणी आले.

पुढे उमा म्हणाली, ती आपली लता आहे ना, वरच्या आळीतली! मागल्या महिन्यात हुंड्यापायी भर मांडवात लग्न मोडले तिचे. आता तिच्याशी लग्न करायला कोणी मुलं तयार होईनात. तिचे वडील, आण्णा आले होते आज आपल्या घरी. विचारत होते, "श्रीपतराव आमच्या लतेशी लग्न करतील का म्हणून?" उद्याच त्यांनी आपल्याला भेटायला बोलावले आहे.
बापू, वहिनी होत्या तोवर ठीक होत सारं. त्या गेल्या आणि या वाड्याची रयाच गेली. आता हक्काच्या स्त्रीचा हात लागला ना या वाड्याला, की पुन्हा कसा हसता खेळता होईल बघ तू."

रात्रभर या विचाराने बापूंचा डोळ्याला डोळा लागला नाही. आपल्या देवाघरी गेलेल्या पत्नीच्या आठवणीने ते रात्रभर तळमळत राहिले. राहून राहून उमचे एकच वाक्य त्यांच्या कानात घुमत होते, "श्रीधरला आईची गरज आहे."
पहाटे कधीतरी श्रीपतरावांचा डोळा लागला. पण काही वेळातचं उमेच्या आवाजाने त्यांना जाग आली. आण्णा दात्यांकडे जायचे असल्याने त्यांनी उठून लगेच आवरायला घेतले.

दात्यांकडे उमेचे आणि बापूंचे छान स्वागत झाले. लताच्या वडिलांनी आण्णांनी लागलीच मुद्द्याला हात घातला. बापूंनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले "आण्णा माझ्या केवळ दोनच अटी आहेत. पहिली म्हणजे, लताने श्रीधरला आईची माया द्यावी आणि दुसरी अट म्हणजे तिचे हे पहिलेच लग्न, तर या लग्नाला तिचीही 'संमती 'हवी बस्."
तसे आण्णा हसत-हसत म्हणाले "अहो बाई माणसाची कशाला हवी संमती? आम्ही आहोत ना इथे निर्णय घेणारे."
हे ऐकून बापू तिरमिरीत अचानक उठून उभे राहिले. त्यांचे हे रूप पाहून आण्णांनी प्रसंग ओळखून लताला बाहेर बोलावले. तिने खाल मानेने दिलेला 'होकार ' ऐकताच तेव्हा कुठे बापू शांत झाले. मग आण्णांनी बसल्या बैठकीत लग्नाचा मुहूर्त पाहून तारीखही पक्की करून टाकली.

बऱ्याच दिवसांनी वाड्यात आलेला श्रीधर "नवी आई येणार म्हणून" खूप खुश होता. कदाचित तो लवकरच लताचा 'आई म्हणून स्वीकार' करेल.  पण आयुष्याच्या या नवीन वळणाशी कसे जुळवून घ्यावे, हे श्रीपतरावांना उमगतच नव्हते. त्यांच्या मनातील सावित्रीची प्रतिमा अजूनही स्पष्ट होती, ती विसरणे अशक्य होते. लता सावित्री सारखीच शांत ,समंजस होती. शिवाय दिसायला अतिशय देखणी होती. श्रीपतरावांना वाटले, आण्णांनी आणखी थोडे प्रयत्न केले असते तर, लतासाठी 'प्रथम वर ' नक्कीच मिळाला असता. त्यासाठी माझ्यासारख्या विधुर माणसाच्या हाती तिचा हात का दिला असेल त्यांनी?
पण उमा म्हणते तसे, 'सारे काही ठीक होईल,' म्हणून त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली आणि या लग्नाला श्रीपतराव अगदी मनापासून तयार झाले.

श्रीपतराव नुकतेच शाळेतून घरी परत आले होते. अचानक आण्णा वाड्याकडे घाईगडबडीने आले. त्यांच्या चेहऱ्यावरून मनातील खळबळ व्यक्त होती, पण बराच वेळ झाला तरीही अण्णा काही बोलायला तयार होईनात. चहापाणी झाल्यावर बर्‍याच वेळाने अण्णा बापूंना म्हणाले, "माफ करा श्रीपतराव, पण मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आमच्या लतेचे मानपानापायी भर मांडवात लग्न मोडले, हे आपणास ठाऊक आहेच. तर आता वराकडील मंडळींनी माफी मागत पुन्हा लताला मागणी घातली आहे. मग आता काय निर्णय घ्यावा सुचेनासे झाले, म्हणून गडबडीने इथे आलो." आण्णा कसानुसा चेहरा करत म्हणाले.
हे ऐकून श्रीपतरावांच्या चेहर्‍यावरचे हावभाव झटक्‍यात बदलले. पण स्वतःला सावरत ते  म्हणाले, "आता लताची काय इच्छा आहे अण्णा?" आणि किंचित हसून पुढे म्हणाले, माझ्यासारख्या विधूराशी लग्न करण्यापेक्षा प्रथम वर केव्हाही उत्तमच. नाही का!"
इतके बोलून श्रीपतराव अचानक उठून बाहेर गेले. निराश झालेले त्यांचे मन म्हणू लागले, "असे आपल्याच बाबतीत पुन्हा का व्हावे! ऐन भरात आलेला संसार अर्ध्यावर सोडून सावित्री निघून गेली. आता पुन्हा नव्याने संसार  मांडण्याआधीच.. इतक्यात पाठीमागून आलेल्या उमेने बापूंच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि दोघेही पाणावलेल्या डोळ्यांनी जाणाऱ्या आण्णांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहात राहिली.

दोन दिवस असेच विचित्र अवस्थेत गेले. श्रीपतरावांचे शाळेत मुलांना शिकवण्याकडेही लक्ष लागत नव्हते. शिपायाने अचानक येऊन श्रीपतरावांना निरोप दिला, "गुरुजी तुम्हाला भेटायला कोणीतरी बाई आल्या आहेत." ते बाहेर आले तसे शाळेच्या मुख्य दरवाज्याजवळ लता उभी असलेली दिसली.
श्रीपतरावांना पाहताच ती पुढे होत म्हणाली,  "माफ करा तुमचा शिकवणीचा वेळ घेतला मी. पण झाल्या घटनेने आण्णा आजारी पडले आहेत. ते म्हणाले, तू स्वतः जाऊन श्रीपतरावांना निरोप देऊन ये. ते वाट पाहत असतील." 
आपल्या खांद्यावरला पदर सावरत लता पुढे म्हणाली," श्रीपतराव आपले लग्न ठरल्या मुहूर्तावर होऊ द्या. मी मनापासून होकार दिला आहे या लग्नाला. आता तुमच्याखेरीज आणखी कोणाचा विचारही माझ्या मनात येणे शक्य नाही. त्या दिवशी तुम्ही लग्नाची बोलणी करताना माझे मत विचारात घेतले, अगदी त्याच दिवशी तुमच्याविषयी माझ्या मनात 'आदर 'निर्माण झाला. असे वाटले, हुंड्यासाठी, मानपानासाठी लग्न मोडणारे कुठे आणि एका स्त्रीच्या मताचा आदर करणारे कुठे!
हा माझा निर्णय अगदी अण्णांनाही मान्य आहे. बरं येऊ मी? बराच उशीर झाला," असे म्हणत श्रीपतरावांच्या उत्तराची वाट न पाहता लता जायला निघाली.
अचानक काहीतरी राहून गेल्यासारखे वाटल्याने मागे वळून पाहात ती म्हणाली, मी श्रीधरची 'आई ' होण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करेन श्रीपतराव." हे ऐकून श्रीपतरावांच्या चेहेऱ्यावर समाधानाची भावना पसरली. त्यांनी लतेच्या पाणावलेल्या डोळ्यात पाहिले, त्यात फक्त विश्वास भरून राहिला होता अगदी त्यांच्या सावित्रीसारखाच.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//