संकल्प आणि सिद्धी

संकल्प आणि सिद्धी

विषय -   'नवी स्वप्ने नवी आशा'

सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

                 नवी स्वप्ने नवीन आशा

                  ही प्रगतीची नवपरिभाषा

खरंच स्वप्ने पाहण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे पण ती स्वप्ने फक्त स्वप्नचं राहू नये, ती प्रत्यक्षात उतरली पाहिजेत.त्यासाठी संकल्प आणि सिद्धी या दोन्ही गोष्टीची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच कोणताही संकल्प सिद्धीस जातो तो अथक प्रयत्नातून. केवळ संकल्प करून उपयोग नाही तर तो सिद्धीस नेणे महत्वाचे आहे.


प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात. त्या त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी मग त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे तेवढेच गरजेचे असते. फक्त तोंडाने म्हणून काहीच उपयोग नाही. मी उद्यापासून अभ्यास सुरू करणार, मी उद्यापासून डायट सुरू करणार, व्यायामाला सुरुवात करणार असे म्हणत दुसऱा दिवस जेव्हा उगवतो तेव्हा परत उद्यापासून नक्की. अशी मानसिकता जर असेल तर कोणताच संकल्प, कोणत्याच आशा पूर्णत्वास जात नाहीत. त्यासाठी सातत्य, दृढनिश्चय, मनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.


सृष्टीतल्या साऱ्या विकासाची दिशा ही आतून बाहेर अशीच असते. फुल आतून उमलते. नदीचा उगम पृथ्वीच्या गर्भातून होतो. वटवृक्षाचा जन्म बीजाच्या आतून अंकुरल्याने होतो. फुलपाखराचा जन्म कोशाचे धागे आतून तोडून होतो. म्हणजेच कोणतेही स्वप्न पाहत असताना ते पूर्णत्वास नेण्याची इच्छा ही आतून असली पाहिजे. अर्जुनाला फक्त जसा माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे आपण आपल्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजेच मला हे करायचे आहे असं म्हणण्यापेक्षा मला हे करायचेचं आहे असे म्हणत तो संकल्प सिद्धीला नेला पाहिजे.


मला जे निसर्गाने भरपूर दिले आहे. जी गुणवत्ता माझ्यामध्ये जन्मजात आहे त्या गुणवत्तेचा शोध घेऊन, तिला जोपासत, भव्य स्वप्न बघत, ते आज,आता,आणि या क्षणी पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेवण जर स्वादिष्ट असेल तर प्रत्येक घासायला जेवताना मजा येते. तसेच जगण्यात अर्थपूर्णता असेल तरच प्रत्येक क्षणी जगण्याची गंमत येते. जगण्यातली ही अर्थपूर्णता प्रत्येक माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते कारण तिचं खरी जगण्यामागची प्रेरणा असते. म्हणून स्वतःचं स्वतःची प्रेरणा बना. नवीन वर्षासाठी तुम्ही स्वप्ने पाहिली असतील, तर ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. आशा कधीच सोडू नका.

            नव्या वर्षाची सुरुवात, नवा प्रकाश, नवी चाहूल, नव्या आशा, उजळून टाकूया दाही दिशा.


सौ. रेखा देशमुख