संघर्ष सुमने 3

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की सुमनला सगळे सत्य समजले होते.. कुमारची शेतीच काय साध घर देखील नव्हतं.. सुमनला काय सुचत नव्हते.. तिच्या समोर खूप मोठं संकट उभे होते.. आता पुढे..

सुमनने एक निर्णय घेतला.. ती धुणी भांडीचे काम करायला तयार झाली.. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच.. तसे तिने कुमारच्या मावशीला सांगितले.. मग कुमारच्या मावशीने तिला त्या घरी नेले आणि तिथूनच सुमनच्या कामाला सुरुवात झाली.. तिचे ते पहिले काम.. ती घरात होती तोपर्यंत ठिक होते कारण तिच्याकडे फक्त एकच साडी होती.. आणि ती घरी गाऊन घालून बसायची त्यामुळे तिला काही वाटत नव्हते.. पण आता कामावर जायचे म्हटल्यावर रोज एकच साडी कशी नेसायची?

ती जिथे काम करत होती तिथल्या बाईने सुमन एकच साडी नेसून येते ते पाहिले आणि सुमनला त्याबद्दल विचारले, "मावशी, तुम्ही रोज एकच साडी कशी नेसता?" ती बाई

मग सुमनने तिला तिची सगळी हकीकत सांगितली.. त्या बाईने सुमनला तिच्या काही साड्या दिल्या.. आणि तिला रोज चपाती देऊ लागले.. त्यावर सुमनचे तात्पुरते चालू लागले.. काही दिवसांनी सुमनला एक गोड मुलगी झाली.. मुलगी झाल्यावर कुमार परत गावाकडे आला.. पण तो काहीच काम करेना.. इथेही दारू पिऊन येऊ लागला..

हळूहळू सुमन दोन चार घरची कामे करू लागली आणि नवर्याला न सांगता काही पैसे बचत करू लागली.

मुलीला सासू जवळ सोडून तिसर्या महिन्यातच ती परत कामाला आली कारण तिला पैशाची गरज होती. थोड्या दिवसांनी ती पंधरा घरची कामे करू लागली. आता तिच्याकडे बरीच रक्कम जमा होऊ लागली.. त्यातून ती मुलांचे शिक्षण आणि इतर खर्च भागवू लागली..

दहा वर्षात तिला दोन मुली आणि एक मुलगा झाला. कामातून मिळणार्या पैशातून तिने मुलांचे शिक्षण पूर्ण केले.. कपडालत्ता, घरखर्च, भाडे सगळं ती बघत होती.. पंधरा घरची कामे करून ती त्यातून काही पैसे बाजूला काढून ठेऊ लागली.. हळूहळू तिची मुले मोठी होत होती.. तरीही तिचा नवरा काहीच काम करेना.. दारूसाठी पैसे हवेत म्हणून तो सुमनला मारहाण करत होता..

एक दिवस अचानक कुमारची तब्बेत खूप बिघडली.. हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर ट्रिटमेंट सुरू झाली.. डाॅक्टरांनी सांगितले कंडीशन खूप क्रिटिकल आहे.. आम्ही प्रयत्न करतो पण काहीच सांगता येणार नाही..

सुमन म्हणाली, "डाॅक्टर काहीही करा पण माझ्या नवर्याला वाचवा.."

"आमचे प्रयत्न चालूच आहेत.. बघूया.." डाॅक्टर असे म्हणून जातात..

सुमनला खूप वाईट वाटत होते.. कुमारचा जीव वाचवण्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत होती.. कसला का असेना? शेवटी नवरा आहे तो.. नुसता नावालाच आहे.. पण त्याचाच तर आधार आहे.. नवरा आहे म्हटल्यावर बाहेरच्या लोकांची नजर बदलत नाही.. तेच जर विधवा असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेलाच असतो.. ती सुध्दा एक स्त्रीच असते.. फक्त तिला नवरा नसतो..

नवरा नाही म्हटलं की कामावर गेल्यावर तिथे जाता येता कितीतरी लोकं भेटतात.. पण आता जसा त्यांचा दृष्टिकोन आहे तसाच पुढे नसणार.. विधवा होऊन फिरणं खूप वाईट.. त्यात हा समाज.. त्यापेक्षा नवरा फक्त नावाला का असेना? आहे यातच समाधान.. म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत होती..

सर्व प्रयत्न करून कुमार बरा झाला.. सुमनने आतापर्यंत साठवलेले सगळे पैसे त्याच्या उपचारासाठी खर्च केले.. कुमार आता घरी आला.. घरी आल्यावर त्याला सुमनने केलेल्या कष्टाची जाणीव झाली.. त्याने पूर्णपणे दारू सोडून दिली.. तेव्हापासून त्याने एक घोट सुध्दा पिले नाही..

कुमार आता थोडफार काम करू लागला.. सुमन सुध्दा कामावर जाऊ लागली.. सुमन आधीसारख पैसे बचत करू लागली.. कुमार आता सुधारला म्हणून तिलाही खूप आनंद झाला.. आता त्यांचा संसार सुखाचा होतो न होतो तोच कुमार आणखी मित्रांबरोबर जाऊ लागला.. पण तो दारू पिऊन येतं नसे .. हेच समाधान सुमनला वाटले..

काही दिवसांनी कुमार परत सुमनकडे पैसे मागू लागला.. काहीतरी कामासाठी हवे असतील म्हणून सुमनने पण त्याला पैसे दिले.. आणखी दोन दिवसांनी तो परत मागू लागला.. तेव्हा पण सुमनने पैसे दिले.. मग एक दिवस तिला समजले की तो जुगार खेळत होता.. त्यामध्ये पैसे घालवत होता.. तेव्हापासून सुमनने त्याला पैसे देणं बंद केले..

"हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात किती ती संकटे, दुःख दिलेस रे? तू संकटे दे, पण ती पेलायचे बळ सुध्दा दे रे.. मी एकटीनेच हा संसाराचा गाडा किती ओढायचा रे.. पदरात तीन मुले आहेत.. बिनकामाचा नवरा.. कसला रे हा संसार.. आईरूपी परमेश्वराने मला आधीच समजावून सांगितलं होतं.. पण माझं कर्म इतकं बलवत्तर होतं की ते काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत मी नव्हते.. ही सगळी माझ्याच कर्माची फळं आहेत.. दोष तरी कोणाला द्यायचा.. माझं नशीबच फुटक.. त्याला कोण काय करणार?" असे ती सारखं म्हणत होती..

एक दिवस तिचा नवरा तिच्याकडे बारा हजार रूपये मागू लागला.. जुगार मध्ये त्याने तितके पैसे घालवले होते.. सुमनने त्याला पैसे द्यायला नकार दिला.. तुझे पैसे तूच जमा कर असे सांगितले.. पहिल्यांदाच तिला इतकं बळ आले की तिने कुमारला स्पष्ट सांगितले.. कुमार सुध्दा अवाक् होऊन बघत राहिला.. मग तो थोडेफार काम करू लागला..

सुमनची मुले हळूहळू मोठी होत होती.. दोन मुली आणि एक मुलगा अशी एकूण तीन मुले होती.. मुली मोठ्या झाल्यावर त्यांच्या लग्नाची जबाबदारी परत सुमनवरच आली.. त्यात दोन मुली.. खर्च कसा करायचा? लग्न कसे करायचे? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात.. कुमार मात्र निवांतच होता..

थोड्याच कालावधीत सुमनने जमा केलेले पैसे आणि थोडीफार कर्ज काढून एका ठिकाणी छोटीच पण स्वतःची जागा घेतली.. त्या जागेत स्वतःच हक्काच घर बांधायच स्वप्न उराशी घेऊन ती परत जोमाने कामाला लागली.. पण तिच्या समोर मुलींची लग्न कधी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता..
क्रमशः


🎭 Series Post

View all