Oct 27, 2020
स्पर्धा

संघर्ष अस्तित्वाचा ८

Read Later
संघर्ष अस्तित्वाचा ८

संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा 

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरी समाजसेवेत कार्य सुरु करते. शिवाय त्याचं जोमाने आपल्या अभ्यासाकडे ही लक्ष देते. कावेरी दुसऱ्या वर्षाची ही परीक्षा चांगल्या गुणांनी पास होते. माधुरी कावेरीच्या प्रगतीवर खुश होऊन तिला 'जिव्हाळा' मध्ये टिपलेलं तिचं हसरं चित्र तिला भेट म्हणून देते. ते देताना तिला काहीही झालं तरी नेहमी असचं हसत राहायचं असं सांगते. माधुरी तिला सल्ला देते की शेवटच्या वर्षाच्या परीक्षेसोबतच UPSC च्या परीक्षेची तयारी करायला सांगते. कावेरी शेवटच्या वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होते पण UPSC च्या मुख्य परीक्षेत २ गुणांनी मागे राहते. माधुरी तिला पुन्हा प्रयन्त करण्याचा सल्ला देते. त्यानुसार कावेरी पुन्हा अभ्यासाला सुरुवात करते. समाजसेवेत सक्रिय असल्यामुळे अनेक अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि महिला आश्रम शी ती जोडली गेली होती. एकदा एका महिला आश्रम मध्ये गेली असता तिथे तिला एक महिला सुंदर विणकाम करताना दिसते. कावेरीला तिचं काम फार आवडतं, त्यामुळे ती ठरवते की माधुरीच्या वाढदिवसाला तिला विणकाम केलेला जॅकेट द्यायचा. त्यासाठी ती पुन्हा तिथे येणार होती. आता पुढे..... )


कावेरीला त्या महिलेचं विणकाम फार आवडल्यामुळे ती पुन्हा यायचं असं ठरवून ठेवते. कावेरी आणि माधुरी घरी आल्यावर महिला आश्रम आणि तिथल्या राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करत होत्या. असे आश्रम असेल तर महिलांना पायावर उभं राहायला मदत होते असं बोलणं झालं. शिवाय या अश्या आश्रमला आपल्याकडून हर तऱ्हेने मदत करायची असं ठरवतात. 

काही दिवसांनी माधुरी तिच्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी २ दिवसांसाठी बाहेर जाते. कावेरी ही संधी पाहून त्याच महिला आश्रमात परत येते. आणि त्या महिलेविषयी चौकशी करते. एक मदतनीस कावेरीला त्या महिलेजवळ नेवून सोडते. कावेरी तिच्याजवळ जाते आणि तिची चौकशी करते. तिचं नाव विचारते. ती तिचं नाव कमल सांगते. कावेरी तिच्या विणकामच कौतुक करते. आणि पुढचं बोलणं सुरु होतं. 
कावेरी - " तुम्ही येथे कश्या आलात ?  म्हणजे कारण काय ? "
कमल - " ताई एका खेड्यात जन्म झाला, आई - वडिलांना मुलगा हवा होता. त्यामुळे माझ्या असण्या - नसण्याने कुणाला फरक पडत नव्हता. " 
कमलच बोलणं ऐकून कावेरीला तिचं माहेर आणि ती वागणूक आठवण आली. 
कमल पुढे बोलू लागली, " १६ वर्षाची झाले आणि आई - वडिलांनी पैसा बघून एका बिजवराशी लग्न लावून दिलं. त्यासाठी मदत म्हणून माझ्या घरच्यांना ही एक मोठी रक्कम दिली. त्याची पहिली बायको पळून गेली असं सांगितलं होतं. बिजवर असला तरी माझं पाहिलंच लग्न होतं ना, लग्नानंतर तरी मला सुख मिळेल असं वाटल होतं. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी ५ वाजल्यापासून कामाला लावलं ते २.३० वाजले तरी काम संपलं नव्हतं. वरून लग्नात मान -पान नीट झाला नाही असे टोमणे वेगळे. रात्री नवरा जनावरासारखा ओरबाडत होता. त्यात प्रेम नव्हतं. हळू हळू या अश्या आयुष्याची सवय झाली होती. पण जसं जसे वर्ष सरत होते, तसं तसे मला मूल न होण्यावरून टोमणे सुरु झाले. ४ वर्ष लग्न झाल्यावरही मूल झालं नाही म्हणून सासरचे वांझ म्हणू लागले. कंटाळले होते. मी पण करणार काय ?  डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला नात्यातल्या कोणीतरी दिला. मला घेवून नवरा डॉक्टर कडे गेला. पण त्यांची आधीची ओळख होती बहुदा. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. लग्नाला ४ वर्ष झालेत तरी मूल नाही म्हणून माझं चेक-अप करायला सांगत होते.
डॉक्टरांनी एका नर्स बरोबर मला दुसऱ्या चेक -अप रूम मध्ये जायला सांगितलं. मी गेले सुद्धा. त्या नर्स ने बसायला सांगितलं आणि तिच्या कामाला निघून गेली. त्या रूम मध्ये बरीच यंत्र होती. म्हणून मला वाटल की दागिने काढून ठेवावे लागतील चेक -अप साठी म्हणून मी परत डॉक्टरच्या रूम कडे गेले. आणि त्यांच्या बोलणं ऐकून मी दाराबाहेरच उभी राहीले. डॉक्टर माझ्या नवऱ्याला सांगत होते, "तुमच्यातच problem आहे, मग तुमच्या बायकोचं चेक -अप कश्यासाठी ?  मागच्यावेळीच मी सांगितलं होतं की problem तुमच्या बायकोत नाही तुमच्यात आहे. तरी तुम्ही दुसरं लग्न केलेत. बायको बदलली तरी तुमचा report तोच राहणार आहे ना ? " 
त्यावर माझा नवरा  नोटांचे बंडल पुढे करत म्हणाला, " डॉक्टर मागच्या वेळी झालं ते सोडा, आता यावेळी माझ्या बायकोतच problem आहे असा रिपोर्ट करून द्या. माझ्यावर कोणीही बोट ठेवलेल नाही चालणार मला. पैसा हवा तेवढा घ्या पण मला रिपोर्ट बनवून द्या. " 
पैस्यापुढे डॉक्टर झुकला. खोटे रिपोर्ट बनवून देतो म्हणाला पण आधीची बायको आली आणि तिने सांगितलं तर?  असा प्रश्न विचारला. त्यावर माझा नवरा म्हणाला, " ती जिवंत असेल तर सांगेल ना असा म्हणाला. " 
डॉक्टर, " म्हणजे ?  तुमची बायको पळवून गेली असं ऐकलं होतं मी. मग जिवंत असेल म्हणजे ? " 
त्यावर माझा नवरा म्हणाला, " मीच मारलं तिला. मी बाप होऊ शकत नाही असं सांगणार होती ती घरी. घरात तिला बोलत होते म्हणून. पण ती कोणाला सांगेल त्याआधीच तिला मारलं मी आणि ती पळून गेली असा बनाव केला. डॉक्टर या गाव खेड्यातल्या गोष्टी तुम्ही फक्त तुमचं काम करा. कोणत्या लफड्यात पडू नका. पैसा हवा एवढा घ्या. पण तोंड खोलू नका. नाहीतर मी माझ्या बायकोला मारू शकतो तर..... "

कमल पुढे बोलते, "त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी कोणाकडे काही बोलले तरी त्यांनी पहिल्या बायकोचा केला तसा माझा ही खून करतील आणि गप्प राहिलो तर त्यांच्या घरचे रोज थोडं थोडं मला तोडून खातील हे नक्की होतं. मी आल्या पाऊली परत चेक -अप रूम मध्ये जाऊन बसले. डोकं मात्र सुन्न झालं होतं. डॉक्टरांनी खोटा रिपोर्ट बनवून दिला आणि माझा सासुरवास कैक पट्टीने वाढला. त्यांच्या घरचे तिसरं लग्न कर म्हणून त्यांच्या मागे लागले. पण मुखवटा घालून फिरणारा हा माणूस म्हणतो कसा, " माझं हे दुसरं लग्न आहे, मी तिसरं केलं तर लोग म्हणतील की आपणच सुनांना घरात त्रास देतो वगैरे. शिवाय हिच कसं होणार ?  घरच्यांना हा देवमाणूस वाटतं होता. पण मुखवट्याखालचा चेहरा मी बघितला होता. रोज जे होत होतं ते असहाय्य होतं. तोंड दाबून बुक्क्याचा मार दुसरा काय. 

मला सर्व काम आटोपून मंदिरात जायची सवय होती. आणि सर्व काम आटोपून मंदिरात जायला दुपार व्हायची. सर्व शांत असायचं आणि म्हणून कदाचित मला त्यावेळी जाणं आवडायचं. एक दिवस मी मंदिरात गेले होते. तेव्हा काही माणसं माझ्या मागे कोयते घेऊन लागले. मी जीव वाचून पळाले. लपून बसले. शोधा शोध करूनही मी नाही सापडत बघून ते गेले, ते गेले तरी मी बराच वेळ लपूनच होते. रात्री झाल्यावर मी घराकडे निघाले तेव्हा पाहिलं की काही अंतरावर माझे सासरे होते आणि त्यांच्या बरोबर तेच लोक होते ज्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. अंधारात त्यांना मी दिसले नाही पण मला त्यांचं बोलणं ऐकू येतं होतं. माझे सासरे त्यांच्यावर रागावत होते. मी त्यांच्या हातातून सुटलेच कशी म्हणून चिडले होते. त्यांचा डाव होता. माझ्यावर हल्ला करायचा आणि दुपारी मंदिरात जाताना दरोडेखोरांनी लूट करण्यासाठी हल्ला केला आणि त्यात मी मेले असं जगासमोर दाखवायचं. माहेर माझं कधी नव्हतंच. नवरा स्वार्थी, आता जीवावर लटकती तलवार त्यामुळे मी ते सर्व मागे सोडून वाट मिळेल तिकडे जायचं ठरवलं. आणि निघाले. वाट मिळेल तिकडे. ८-१० दिवस भटकत होते. एका माणसाने माझ्यावर हात टाकायचा प्रयत्न केला. पण नशीब चांगला होतं माझं म्हणून या आश्रमातील लोक तिथे पोहचले आणि मला वाचवलं. आणि इथे आणलं. माहेरी माझ्या आजीने विणकाम शिकवलं होतं ते कामी आलं. आता तेच करते मी. आता कोणाकडून काही अपेक्षा नाहीत. आता फक्त मला माझ्यासाठी जगायचं आहे. जन्मापासून ते आता पर्यंत माझं असं अस्तित्व आहे हे कळतंच नव्हतं मला. पण आता मला फक्त माझा आत्मसन्मान आणि अस्तित्व वाचवायचं आहे. "

कमलचं बोलणं ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं. कारण कुठेतरी कावेरीसुद्धा या सर्वातुन गेली होती. कावेरी विणकाम असलेल्या जॅकेट ची ऑर्डर देऊन गेली. ३ -४ महिन्यांचा अवधी होता माधुरीच्या वाढदिवसाला त्यामुळे आरामात बनवा जॅकेट पण छान बनवा असं सांगितलं. रात्री बेडवर पडल्यावर कावेरीच्या मनात परत कमलचा विचार आला . कावेरी विचार करते, स्त्रीला तिच्या अस्तित्वासाठी किती संघर्ष करावा लागतो?  काही ठिकणी स्त्रियांना दिला जाणार मान पहिला की असं वाटतं की स्त्री अन्याय असा शब्द ही नसावा या जगात. पण हे प्रमाण फार कमी आहे. आजही स्त्रीला तिच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय.  UPSC चं तिने अजूनच मनावर घेतलं. आपणच नाही तर आपल्यासारख्या अनेक आहे. सर्वांची नाही पण काहींची मदत करू शकले तरी आयुष्य सफल झालं असं समजेन. 

क्रमश...... 

 


संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

 

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470


संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500


संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533