Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

संघर्ष अस्तित्वासाठी

Read Later
संघर्ष अस्तित्वासाठी

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : संघर्ष 
                                संघर्ष अस्तित्वासाठी 
संघर्ष! प्रत्येकाचा वेगळाच असतो नाही का?
आजच्या या आधुनिक, सुखसोयींची मुबलकता असलेल्या युगात जरी आपण वावरत असू, तरीही 'संघर्षा'ला मात्र पर्यायच नाही. या ना त्या स्वरूपात प्रत्येक जण जणू झगडतच असतो. अगदी प्रत्येक सुख पायाशी लोळण घेत आहे,‌ अशा परिस्थितीत राहणारी व्यक्ती सुद्धा कुठेतरी मनातील विचारांसोबत झगडताना दिसून येते. अर्थात अपवाद असतातच!
काही व्यक्ती स्वतःच्या हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत 'संघर्ष' करत आहेत तर काही लोकं सतत मिळणाऱ्या अपयशासोबत! काहींना मानसिकदृष्ट्या तर काहींना शारीरिकदृष्ट्या सतत संघर्ष करावा लागतो. कोणी दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी, तर कोणी उपलब्ध असलेल्या जेवणासाठी कुणी सोबती तरी मिळावा म्हणून संघर्ष करतोय. स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी तर एक निराळाच संघर्ष! कुठे नाहीये आज संघर्ष? आज ज्या परिस्थितीत आहोत त्याहून अधिक सुखकर आयुष्य जगण्याची इच्छा मनात ठेवून सातत्याने मेहनत करून परिस्थितीसोबत संघर्ष करणं कदाचित आजची गरजच झाली आहे.
खरंतर संघर्ष म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळं असावं. कारण विचारांची, राहणीमानाची, व्यक्तींची भिन्नता  कोणत्याही गोष्टीची व्याख्या अन् व्याप्ती ठरवण्यासाठी जबाबदार ठरतात. एखाद्याला जी बाब अगदीच क्षुल्लक वाटते, ती बाब इतर कोणत्यातरी व्यक्तीसाठी 'संघर्षमय' नक्कीच असू शकते. 
असं म्हणतात की सहज मिळालेल्या गोष्टीची कदर नसते. पण तीच गोष्ट खूप कष्ट करून मिळवली की ते समाधान काही वेगळंच असतं. सोनं तावून सुलाखूनच लकाकतं नाही का? याचा अर्थ मी असा नाही म्हणणार की संघर्ष असायलाच हवा. पण जिथे संघर्ष करावा लागतो आहे, तिथे हरून न जाता हा विचार नक्की मनात आणावा की संघर्ष आपल्याला आणखी बळकट बनवतील.
माणूस जसा या ना त्या बाबतीत संघर्ष करतोय, तसंच इतर सजीव सुद्धा या संघर्षाला चुकले नाहीत. आणि दुर्दैवाने त्यांना तर स्वतःच्या अस्तित्वासाठी ही संघर्ष करावा लागतोय. एकूणच काय तर स्वतःच्या अस्तित्वासाठी आपण कितपत मेहनत करू यावर भवितव्य अवलंबून आहे. उज्ज्वल भविष्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्षाच्या वाटेवरून चालणं सुद्धा हवंच!
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//