संघर्ष अस्तित्वाचा १

----

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 


राधाला बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्या, तसं गणपतने मोठ्या मुलीला मीराला सूईनबाईला बोलवायला पाठवलं. राधाचं हे चौथं बाळंतपण. पहिल्या तिन्ही वेळेस मुली झाल्या. आता तरी मुलगा होऊ दे म्हणून गणपतने देवाला नवस केला होता. 

सुईण बाई आल्या आणि राधाकडे गेल्या. घराबाहेर येरजऱ्या मारणाऱ्या गणपतच्या मनात मुलगा एवढंच घोळत होत. थोड्या वेळाने सुईण बाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, "गणपत, या येळेला बी लक्ष्मीचं आली बघ." हे ऐकून गणपत खूप निराश झाला. त्याने त्या बाळाचा चेहराही कित्येक दिवस पहिला नाही. त्या नकोशीच नाव राधाने कावेरी ठेवलं.

 आपल्या इतर बहिणीनंप्रमाणे कावेरी कलाकलाने वाढू लागली. आई आणि इतर तिन्ही बहिणी कावेरीला फार जीव लावत पण वडील कधीच तिच्याशी नीट बोलत नव्हते. काही काळाने त्यांना भाऊ झाला. गणपतला मुलाच्या जन्माने हर्षवायू झाला. मोजक्या शेतीमध्ये गणपतला सर्व घरच करावं लागे. त्यामुळे कावेरीच्या मोठ्या दोन बहिणी कधी शाळेत गेल्याच नाही. घरातील कामे आणि शेतातील कामे यातच त्यांचा पूर्ण दिवस जात असे. गावात सरकारी शाळा आल्यामुळे कावेरी आणि तिच्या 3 नंबर बहिणीला शाळेत जाता आलं. भावाला मात्र काही काळाने चांगल्या शाळेत टाकलं. दिवस सरत होते आणि कावेरी तिच्या बहिणींसोबत मोठी होत होती. नकोशी असल्यामुळे कावेरीला सर्व बहिणींसोबत काम करावं लागे. पण अभ्यास सांभाळून ती सर्व कामे चोख करत. 

तिची मोठी बहीण १७ वर्षांची असताना तिला स्थळ आलं, आणि काहीही चौकशी न करता गणपतने मोठ्या मुलीचं लग्न दारातच लावून टाकलं. वर्षभरातच बातमी आली की मोठ्या मुलीचा आडातून पाणी काढताना पाय घसरून, त्यात पडून मृत्यू झाला. सर्व सोपस्कार आटोपलं आणि काही दिवसांनी समजले की, मोठ्या मुलीच्या नवऱ्याचं आधी एक लग्न झालं होत आणि तिने माहेरून पैसे आणायला नकार दिल्यामुळे, तिचाही आडात पडून मृत्यू झाला होता. राधा म्हणाली की पोलिसात तक्रार करू पण गणपत ला कोर्ट कचेरी मागे पैसे घालवायचे नव्हते, म्हणून त्याने त्याला गोष्टीला नकार दिला. आता तक्रार करून ती परत येणार आहे का?  असं म्हणून विषय सोडून दिला. 

कावेरीच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. कावेरीच्या इतर बहिणींची लग्ने ही गणपतने अशीच कोणतीही चौकशी न करता करून दिली. त्यांनाही सासरी त्रास होताच. पण माहेरी सांगायची सोय मात्र नव्हती. 

१२ वी ची परीक्षा नुकतीच संपली होती कावेरीची. आणि निकाल लागायच्या आधीच एक स्थळ पाहून गणपतने कावेरीचं लग्न लावून दिलं. कावेरीचं लग्न झालं आणि एका खूप मोठया संकटातून बाहेर पडल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. 

कावेरी सून म्हणून मोहनच्या घरी आली. आणि एका नवीन जाचाला सुरुवात झाली. सासू मनासारखा हुंडा न मिळाल्यामुळे नाखूष होत्या. उठता बसता टोमणे, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काम, रात्री नवऱ्याची मनमानी. या सगळ्या गोष्टींचा कावेरीला खूप त्रास होत होता पण ती काहीच करू शकत नव्हती. 

एक दिवस कावेरीला बर वाटत नव्हतं. चक्कर येत होती, मळमळत होतं. कावेरीला दिवस गेलेत हे तिच्या सासूच्या लक्षात आलं. संध्याकाळी सर्व घरी आल्यावर कावेरीसोमर सासूने ही सर्वांनी सांगितली. कावेरीला आनंद झाला की किमान आतातरी जाच संपेल पण पुढच्याच क्षणी सासूबाई म्हणाल्या, " वंशाला दिवाच हवा. " हे ऐकून कावेरीला आपले जुने दिवस आठवले. आणि टेन्शन अजूनच वाढलं. 

येणाऱ्या जाणाऱ्या बायांनी कावेरीच्या सासूच्या मनात भरवलं की, " हिच्या आईला आधी ४ पोरीचं, त्यामुळे हिला पण मुलीचं होणार. " शिक्षणाशी दूरदूर पर्यंत संबंध नसलेल्या लोकांचं बोलणं मात्र कावेरीच्या सासूला पटलं. आणि कारस्थान सुरु झालं. सासूबाई कावेरीला जड अवघड कामे सांगू लागल्या. खूप कपडे गोधड्यांसकट धुवायला टाकू लागल्या. 

पावसाळा सुरु होता. त्यात सासूने कावेरीला विहिरीवरून पाणी आणायला सांगितलं. कावेरी म्हणाली की, " आई अहो, पावसामुळे वाट निसरडी झाली आहे. मला भीती वाटते. " हे ऐकल्यावर सासूबाई चिडून वाटेल ते बोलू लागल्या. " आम्हाला जशी मुलं झालीच नाहीत, मी तुला त्रास देते असचं सर्वांना सांगायचं आहे तूला वगैरे वगैरे..... "   

शेवटी कावेरी हंडा उचलून विहिरीकडे गेली आणि खरंच वाट निसरडी असल्यामुळे कावेरी पाय घसरून पडली. तिचं बाळ गेलं. डॉक्टरने नंतर सांगितलं की होणार बाळ हा मुलगा होता. हे ऐकून सासू कावेरीलाच दोष देऊ लागली की माझ्या वंशाच्या दिव्याला तू खाल्लास. कावेरी जी आधीच बाळ गेल्यामुळे दुःखी होती, ती म्हणाली आई तुम्हीच तर मला विहिरीवर पाठवलं होतं. हे ऐकून सासू तांडव करू लागली, " म्हणजे मी माझ्या नातवाचा जीव घेतला असं म्हणायचं आहे का तूला ?  बघ मोहन कशी बोलते ही. " हे सर्व ऐकून मोहन कावेरीवर चिडतो आणि तिला मारू लागतो., " माझी आई माझ्या बाळाचा जीव घेईल असं तूला वाटलंच कसं?  तूच बाळाला मारलस. " असं म्हणत तिला घराबाहेर काढलं. सासूला माहित होतं की आपल्याच चुकीमुळे बाळ गेलं, ते जावं म्हणून हे सर्व केलं. पण बाळ मुलगा होता याचं तिला वाईट वाटलं. पण चूक मान्य करायची नव्हती.  सून काय दुसरी आणता येईल पण चूक मान्य करायची नाही. भलेही एखादं आयुष्य खराब झालं तरी चालेल. 

आता घरून बाहेर काढल्यानंतर कावेरीचा मोठा संघर्ष सुरु होणार होता.  

क्रमश...... 

🎭 Series Post

View all