सांगायलाच हवे का?

कथा कुटुंबाची


सांगायलाच हवे का?


" ती ना? खूप खडूस आहे. नाही बोलत कोणाशी पटकन. " सुमेधा घरी परतत असताना तिच्या कानावर शब्द आले.

" तुला कसं ग माहित?" दुसरा आवाज आला.

" तिच्या सासूबाई नेहमी सांगतात. ऐकले नाहीस का कधी?" तिसरा आवाज आला.

" ते सोड. मी तर ऐकलं आहे नवर्‍याशी ही पटत नाही तिचं." अजून एकजण बोलली.

सोसायटीच्या आवारात संध्याकाळी बसलेल्या बायकांची ही बोलणी रोजच्या प्रमाणे सुमेधाच्या कानावर पडली. तिच्या सासूबाई तिथे दिसत नव्हत्या. त्या आज वीरला घेऊन खाली आल्या नसाव्यात बहुतेक. म्हणूनच सहानुभूतीचा ओघ त्यांच्या दिशेने वहात होता. सुमेधा घरी आली. घरभर वीरने काढून ठेवलेली खेळणी पसरली होती. तो डोंगर ओलांडत ती आत आली. तिला पाहताच " आई , आई " करत वीर तिला चिकटला.

" आज खाली खेळायला नाही का गेलास?" सुमेधाने त्याला विचारले.

" नाही.. आज आजी दमली होती म्हणून घरातच खेळ म्हणाली. आणि आज शाळेत होमवर्क पण खूप दिला आहे." दुसरीत असणारा वीर मोठ्या मुलासारखा बोलला.

" हो का? तो जो होमवर्क आहे ना तो आपण रात्री जेवल्यानंतर संपवू. पण तुझे मित्र खाली तुझी वाट बघत आहेत. जा थोडा वेळ त्यांच्यासोबत खेळून ये. आल्यावर मी तुला काहीतरी छानसे खायला देते." पर्स खाली ठेवत सुमेधा बोलली.

" आलीस का तू?" आतून सासूबाईंचा आवाज आला.

" हो.. आत्ताच येते आहे."

" चहा ठेव बाई थोडा. आज दमले आहे नुसती वीरच्या पाठी धावून."

" हो.. ठेवते.." सुमेधा बोलली. तोवर
पडत्या फळाची आज्ञा घेत वीर खाली पळाला होता. हातपाय धुवून सुमेधा स्वयंपाक घरात गेली. ओट्यावर नेहमी सारखा पसारा पडला होता. तिने तो पसारा आवरला आणि चहा ठेवला. चहा होईपर्यंत तिने वीरचा पसारा आवरला. चहा झाल्यावर तिने तो सासूबाईंना नेऊन दिला.

" आज वीरला खाली नाही का पाठवलं?"

" ते मला नाही झेपत सतत त्याच्या पाठी धावणं."

" तो त्याचा त्याचा खेळतो. आता नाही का गेला?"

" ते तू पाठवले म्हणून.. तुम्ही पाठवल्यावर तो पडला तरी आमच्यावर ठपका नाही." सासूबाई बोलल्या. लहान असताना वीर आजीसोबत खेळायला गेला होता. आजी मैत्रिणीशी बोलत असताना तो घसरगुंडीवर एकटाच गेला होता. एका मुलाचा धक्का लागून तो पडला होता. त्याला खूप लागले होते. तेव्हा सुमेधाचा नवरा नीरज आईला बोलला होता. तो प्रसंग आठवून सुमेधाने ओठ बंद केले आणि काहीच न बोलता चहाचे कप आत ठेवायला ती गेली. ते बघून तिच्या सासूबाईंना अजूनच राग आला.

" आखडू नुसती.. एवढं बोलले तरी एक शब्द निघाला का तोंडातून." वैतागून त्यांनी फोन हातात घेतला.


खरंच असेल का सुमेधा आखडू, खडूस? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all