संधी काली या अशा... (भाग ३) अंतिम

एक छोटीशी गोड गोष्ट




संधी काली या अशा...(भाग ३)


सोहम् आणि अर्पिता दोघे घरात गेले. रामराव आणि सुमनताई दोघे फिरत-फिरत सोसायटीच्या गार्डनमध्ये आले. मार्च महिन्याचा दिवस होता त्यामुळे सूर्यास्ताला अजून थोडासा वेळ होता.


"चल, अजून एक चक्कर मारून येऊ." रामराव 

"नको, राहू द्या. आपण बसू थोडावेळ." सुमनताई


"म्हणजे तू म्हातारी झालीस." रामराव परत चेष्टेने म्हणाले.


"तसं समजा हवं तर…" सुमनताई नाक फुगवत बोलल्या. अर्पिताने सांगितलेल्या बाकावर दोघे बसले. बराच वेळ शांततेत गेला.

"सुमे…" रामराव म्हणाले.

"आता हे काय नवीनच….!" सुमनताई

"नवीन नाही, जुनंच…" रामराव

"म्हणजे?" सुमनताई

"म्हणजे… खरंतर लग्न झालं तेव्हापासूनच तुला सुमे अशीच हाक द्यावीशी वाटायची… पण घरात, भावंडात अगदी चुलत, मावस,आत्येभावात मी सर्वात मोठा आणि त्या नात्याने तुही घरात सर्वात मोठी… त्यातल्या त्यात मी शिक्षकी पेशाचा…! असं वाटायचं मीच तुला सुमे म्हटलं तर बाकीचे घरातले तुला असंच काहीबाही बोलतील… पण सुमे; अगदी मस्त सांभाळून आणलंस हो सगळंच… लग्न करून घरात आलीस आणि दुधात साखर विरघळावी तशी एकरूप झालीस… माई, अण्णा, माझे तीन भाऊ, तीन बहिणी, गावातच राहणारे चुलते, सगळी नाती किती सहज पेललीस तू! तुझ्याबद्दल कधीच कोणीच, कोणतीही तक्रार केली नाही. म्हणायला मी शिक्षक… समाजात जेवढा जास्त मान तेवढाच तुटपुंजा माझा पगार! मला आठवतं, एकदा सरपंच त्याच्या मुलाला घेऊन आले होते घरी… मुलाची शिकवणी घ्या म्हणून… गळंच घालायला लागले तेव्हा मात्र तू शिकवणीच्या पैशाकडे न बघता त्यांना उत्तर दिलं होतंस," ज्ञानदानाच काम करताय… असं त्याची पैशात तुलना करून पाप लावू नका… बापूला संध्याकाळी घरी पाठवत जा… मुलांबरोबर खेळेलही आणि अभ्यासही करेल." तुझ्या या उच्च विचारांची झलक तेव्हाच दिसून आली होती. सुमे, तुला कधीच वेळ देऊ शकलो नाही गं… घरात सतत पै-पाहुण्यांचा राबता, येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ नेहमीच असायची. पुढे तालुकाच्या ठिकाणी माझी बदली झाल्यावर वाटलं आतातरी तुला वेळ देता येईल; पण तुही किती मोठ्या मनाची, तालुकाच्या ठिकाणी आपण राहतोय म्हणून माझ्या बहीण-भावांची पुढच्या शिक्षणाची तू नकळत सोय करून दिलीस. पुढे सोहमचा जन्म झाला; अगदी त्याकाळात एकाच मुलावर थांबायचा धाडसी निर्णय तू घेतलास. माई म्हणायचीसुद्धा सोहमला भाऊ बहीण काहीतरी दुसरं होऊ दे, सोहम एकटा नको पडायला; पण तू म्हणायचीस आपल्या नात्यागोत्यांची शिदोरी सोहमला कधीच कमी पडणार नाही.


माई, अण्णांचं वयानुसार आजारपण, बहिण-भावांचे लग्न, नंतर त्यांचे बाळांतपण, सुख-दुःख सगळं कसं हसत सांभाळलंस… सगळे आपापल्या मार्गी लागल्यावर असं वाटलं, आतातरी तुला वेळ मिळेल; पण नंतर तुझं सगळं लक्ष सोहमवर केंद्रीत झालं. त्याचंही शिक्षण, नोकरी, लग्न या सगळ्यात तू त्याच्या पाठीशी होती. घरात सून आली… तिच्याशीही अगदी मस्त गुळपीठ जुळवून घेतलंस… या सगळ्यात माझ तुझ्यावरंच प्रेममात्र व्यक्त करायंच राहून गेलं. तुला काय हवं नको, तुझे मत काय विचारायचं राहूनच गेलं… प्रत्येकचं गोष्टीत तुला गृहीत धरत गेलो." रामराव बोलत होते. त्यांचा कंठ दाटून आला होता.


"कोण म्हणत प्रेम व्यक्त करायंच राहून गेलं? बोलून दाखवलं म्हणजेच प्रेम असतं का? त्याहीपेक्षा प्रेम कृतीतून दिसून येतं हे महत्त्वाचं नाहीये का? तुम्ही कधी कोणासमोर माझा पाणउतारा केला नाहीत, कधी कोणासमोर मला अपशब्द बोलला नाहीत… जेव्हा-जेव्हा मी एखाद्या गोष्टीसाठी शब्द टाकला, तुम्ही तो कधीच पडू दिला नाहीत. पैसा-आडका, दाग-दागिन्यांचा मला कधीच मोह नव्हता… ते काय आज आहे, उद्या नाहीत… आपलंच बघा ना… जुनीच सायकल कमी पैशांत मिळत होती म्हणून घेतली होती आपण आणि आज आपल्या दारात सोहमची दोनचाकी, अर्पिताची दोनचाकी, अजून चारचाकी ती वेगळीच आहे आणि अर्णवच्या सायकली तर विचारू नका… हे मात्र नक्की, की मी पैसा गोळा करण्यापेक्षा नातीगोती भरपूर गोळा केलीयेत आणि तिच माझी श्रीमंती आहे… या सगळ्यांत तुमची साथ आणि विश्वास यामुळेच सर्व नात्यांना पूर्णत्व आहे." सुमनताईंनी बोलता बोलता रामरावांच्या हातावर हात ठेवला.


"सूर्य मावळतोय… उगवला तो मावळणारच… नाही का?" सुमनताई मावळत्या सूर्याकडे बघत बोलल्या.


"ते तर त्रिकालावादीत सत्य आहे; पण सूर्य मावळतोय असा विचार करण्यापेक्षा हा संधीप्रकाश बघ ना… लाल, गुलाबी, केशरी, पिवळा किती रंगांची उधळण करतोय. नीट पाहिलंस तर एक हिरवी छटाही दिसेल तुला… आपणही आयुष्याच्या या वळणावर येऊन थांबलोत… आयुष्याची ही संध्याकाळ मात्र तुझ्या सहवासात… तुझ्या सहवासाच्या संधी प्रकाशात घालवायची आहे. साथ देशील मला ?" रामरावांनी सुमनताईंपुढे हात केला. त्यांनीही अगदी गोड हसून रामरावांचा हात पकडला.


दोघे घरी आले. सोहम कोणासोबततरी फोनवर बोलत होता.


"अरे बाबा, आलात पण! आताच राजाकाकाचा फोन येऊन गेला. पुढच्या आठवड्यात छकुला बघायला मुलाकडचे येणार आहेत. तेव्हा तुम्ही दोघेही त्यांना तिथे हवे आहात… माई अण्णांच्या जागी आता तुम्हीच आहात असं राजाकाका म्हणत होते. आपली गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा. मी त्या ड्रायव्हरला आताच फोन करून सांगतो… किती मोठी झाली ना छकू… आताच तर एवढूशी होती..." सोहम् आणि रामराव बोलत होते.


सुमनताई मात्र कौतुकाने रामरावांकडे बघत होत्या कारण याच तर नात्यामुळे त्यांना नात्यागोत्याची शिदोरी मिळाली होती. आता आयुष्यातला प्रत्येक क्षण रामरावांसाठीच जगायचं असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. तेवढ्यात घरात सुरू असलेल्या एफ्. एम्. वर त्यांचं आवडीचं गाणं लागलं… त्याचे बोल ऐकून त्याही अगदी गोड हसल्या …

संधी काली या अशा
धुंदल्या दिशा दिशा
चांद येई अंबरी
चांदराती रम्य या
सोबती सखी प्रिया
प्रीत होई बावरी


पूर्णविराम!

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all