संदिप भैय्या....!

#Aspirants #Sandeep Bhaiyya #TVF

             काही दिवसांपूर्वी टिव्हीएफ या चॅनलची अस्पिरंट्स ही वेबसिरीज यु ट्यूबवर आली. याच वेबसिरीज मध्ये हे संदीप भैय्या आपल्याला भेटतात. टिव्हीएफच्या सर्वच वेब सिरीजची एक खासियत असते. काही कॅरॅक्टर्स ते असे कमालीचे उभे करतात कि प्रेक्षकांच्या मनात त्या संबंधित पात्राची इमेजच छापल्या जाते. जसं कोटा फॅक्टरी मध्ये जो तरूण शिक्षक जीतू भैय्या यांनी उभा केला. त्यानंतर प्रत्येकालाच मनातून वाटते कि आपल्यालाही जीतू भैय्यासारखा फ्रेंडली, विद्यार्थ्यांना आपला मित्र मानून  अगदी त्यांच्या लेव्हलवर जाऊन त्यांना गाईड करणारा शिक्षक मिळाला पाहिजे. किंबहुना जीतू भैय्याला पाहिल्यावर काहींना लक्षात आलं असेल कि अरे आपले ते सर तर अगदीच जीतू भैय्या सारखेच आहेत किंवा होते. हाच स्ट्राँग पॉइंट आहे टिव्हीएफचा. ते पात्र एवढं जबरदस्त पद्धतीने प्रेझेंट करतात कि आपण आपल्या आयुष्यातील लोकांना त्या पात्रांसोबत रिलेट करतो. म्हणूनच जीतू भैय्या सारखा शिक्षक आपल्याला जवळचा वाटतो.

     याच टिव्हीएफने खूप सुंदर सुंदर विषयांवरचा बेस्ट कंटेंट वेब सिरीजच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला आहे. यांच्या वेबसिरीज पाहून आपला वेबसिरीज या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. वेबसिरीज म्हटलं कि क्राईम, रक्तपात, सॉफ्ट पॉर्न अशीच विकृत इमेज काही बॅनर्सनी आपल्या मनात बिंबवली आहे. म्हणून खूप निवडून निवडून या वेब सिरीज बघाव्या लागतात. पण टिव्हीएफचं कौतुक कि त्यांनी सिद्ध केलं. बोल्ड सीन्स नसले तरीही वेबसिरीज ब्लॉकबस्टर ठरतात. क्वालीटी कंटेंट असला की नवोदित अभिनेतेही लोकांच्या मनात जागा निर्माण करू शकतात. गरज नाही कि मोठेच अभिनेते असले कि वेबसिरीज हिट ठरते. अशा अनेक समजांना टिव्हीएफने राँग प्रुव्ह केलं आहे. तर या लेखातून अस्पीरंट्स बद्दल मी लिहिणार आहे. पण अस्पीरंट्स ची कथा मी अजिबात रिव्हील करू इच्छित नाही. कारण या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही यु ट्यूबवर जाऊन हे पाचही एपिसोड्स पाहू शकता. या लेखातून मी फक्त या सिरीजमधील माझं आवडतं पात्र म्हणजे संदीप भैय्यांबद्दलच लिहिणार आहे.

         संदीप भैय्या भेटतो आपल्याला या अस्पिरंट्सच्या पहिल्याच एपिसोडमध्ये. सिरीज मधील मुख्य नायक अभिलाष राहत असलेल्या पीजी मध्ये त्याच्या बाजूच्या रूममध्ये दिसणारा हा धीरगंभीर, मॅच्युअर्ड, सुरुवातीला थोडासा उद्धट वाटणारा, हरीयाण्वी टोन मध्ये संवाद साधणारा, उंचपुऱ्या शरीरयष्टीचा तरूण.  पहिल्याच सीन मध्ये लक्षात येते कि या संदीप भैय्याचा नक्कीच काहीतरी पास्ट असणार. हा संदीप भैय्या म्हणजे आपल्या कॉलेजमधील तो सिनियर आहे. जो स्वतः च्या अपयशातील चूकांमधून शिकून, त्याच्या ज्युनियर्सनी मात्र त्या चुका करू नये म्हणून त्यांना त्याच्या अनुभवातून शिकवण देत असतो. सल्ले देत असतो. असे सिनियर्स असतात कॉलेजमध्ये. जे त्यांच्या ज्युनिअर्सना वेळोवेळी समज देतात, मदत करतात. ते सर्व याच संदिप भैय्याच्या कॅटेगरीत मोडतात. या वेबसिरीज मध्ये मुख्य अस्पिरंट अभिलाष वर फोकस आहे. अभिलाषच्या युपीएससी प्रिपरेशनच्या काळात त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर मुख्य फोकस या सिरीजचा आहे. एका अस्पिरंटचं आयुष्य नेमकं कसं असते ते दाखवण्याचा प्रयत्न यातून केल्या गेला आहे. पण याच युपीएससीच्या जर्नी दरम्यान अभिलाषला मदत करणाऱ्या संदिपभैय्याची पण ही कथा आहे. संदिप भैय्या वयाने मोठा असलेला, सरकारी शाळेतील त्याची शिक्षकाची नोकरी सोडून आयएएस बनायला ओल्ड राजिंदर नगर मध्ये येऊन मेहनत घेणारा सर्वांच्याच मनात ज्याच्या बद्दल आदर आहे असा एक अस्पिरंट. अभिलाषला ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना बरेच लोकं कन्फ्युज्ड करतात. पण सोल्युशन मात्र फक्त संदीप भैय्याच देतो. ते ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगून. अगदी स्वतःच्या लहान भावाला समजावून सांगतात तसंच. अभिलाष मधील निगेटिव्ह अॅटिट्युड त्याचं नुकसान करेल. म्हणूनच त्याला नकळत त्याच्यात नेमकं काय पोटेन्शीयल आहे कि ज्यामुळे तो आयएएस बनू शकतो याचा शोध घ्यायला लावणारा हा संदिप भैय्या खरोखरच एका मार्गदर्शकाची भूमिका चोखपणे वठवतो. भले ही तो स्वतः दोन वेळा मेन्स देऊनही क्रॅक करण्यात अपयशी ठरला असेल. पण त्याचा त्या परिक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असल्याचं जाणवते. त्याच्या बोलण्यातून नकळतच तो अभिलाषला मोटिव्हेट करत असतो. संदीप भैय्यासारखे सिनियर त्यांच्या अनुभवातून इतरांना शिकवत असतात. हे ते लोकं असतात कि जे स्वतः जिंकू शकले नसले तरी कित्येक विजेते घडवतात त्यांच्या अनुभवाच्या जोरातून. हा संदीप भैय्या एखाद्या फिलॉसॉफरसारखा वाटतो मला. याचा प्रत्येक संवाद मी परत परत रिवाइंड करून ऐकला. खूप मोजकं पण खूप अर्थपूर्ण बोलतो हा संदीप भैय्या. सुरुवातीला कामाशी काम ठेवणारा संदिपभैय्या नंतर मात्र अभिलाष सोबत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतो. त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी पण तो अभिलाषला सांगतो. प्लॅन बी इज फॉर लूजर्स असं सांगणारा संदिपभैय्या नंतर पाचव्या एपिसोडमध्ये पूर्णपणे बदललेला दिसतो. शेवटच्या अटेम्प्टची प्रिलिम्स जेव्हा क्रॅक होत नाही तेव्हा अभिलाष मात्र मित्रांना बिलगून रडताना दिसतो. पण संदिप भैय्या.....संदिप भैय्या मात्र एकटाच अव्यक्तपणे पावसाच्या पाण्यात आपले अश्रू लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. आयुष्यातील अनेक गोष्टींना सहज सोल्युशन देणारा हा सिनियर चौथ्या अटेम्प्टच्या फेल्युअर नंतर कोणालाही न सांगता गायब झालेला दिसतो. आयुष्याकडे बघण्याचा पॉजिटिव्ह दृष्टीकोन ठेवून जिंकण्याचा प्रयत्न करणारा संदिप भैय्या युपीएससीच्या लढाईत हरला याचं दुःख होेते. प्रेक्षक म्हणून त्याचे सीन्स आता पुढील एपिसोडमध्ये दिसणार नाही याचंही कदाचित ते दुःख असेल.

        टिव्हीएफला प्रेक्षकांची नाडी व्यवस्थित पकडता येते हे कोटा फॅक्टरीच्या वेळेसच समजलं होतं. आता तर विश्वास बसला. संदिप भैय्याची युपीएससी जर्नी संपल्यासारखं दाखवून पाचव्यात टिव्हीएफने सर्व प्रेक्षकांना सरप्राइजच दिलं. रामपूरचे जिल्हाधिकारी अभिलाष शर्मा यांना एक असिस्टंट लेबर कमिशनर भेटायला येतात. अभिलाषच्या चेहऱ्यावर त्या एएलसीना पाहून एक वेगळीच चमक येते. आनंद होतो. ते एएलसी म्हणजेच अभिलाषचे दिल्लीत युपीएससी प्रिपअरेशनच्या काळातील सिनियर संदीप भैय्या असतात. प्रेक्षक म्हणून मला सुद्धा हा सीन खूप आनंद देऊन गेला. आनंद या गोष्टीचा होता कि संदिप भैय्या हरला नव्हता. त्याची स्टोरी संपलेली नव्हती. जरी युपीएससी क्रॅक नसेल झाली त्याच्याकडून. पण तरीही तो जिंकला होता.  पाचवा एपिसोड संपूर्णपणे संदीप भैय्यावरच फोकस केल्या गेलेला आहे. या एपिसोडमध्ये विनम्र संदिप भैय्या अभिलाषला खूप छान प्रकारे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन समजावून सांगतो. अभिलाष सोबत त्याच्या पदाचा मान राखून आदराने बोलणाऱ्या संदिप भैय्याने या एपिसोड मध्ये सर्वच लोकांची मन जिंकली. या सिरीजच्या समीक्षणात्मक लेखात सर्वत्र संदिप भैय्याचीच चर्चा दिसते. हे पात्र आहेच तेवढं सुंदर. त्याचे संवादही अत्यंत प्रेरणादायी आहे. चेहऱ्यावरून गूढ वाटणारा हा संदिप भैय्या आयुष्यातील मोठी मोठी गणितं अतिशय सोप्या पद्धतीने अभिलाषला समजावून सांगताना दिसतो. शेवटचा एपिसोड कमी लेंथचा आहे. पण खूप सुंदर आणि इमोशनल एपिसोड आहे हा. यात संदिप भैय्या आणि अभिलाषच्या भेटीचा सीन. त्यात संदिप भैय्या प्लॅन बी बद्दल, आयुष्यात आपण फक्त स्वप्नांच्या पाठीमागे धावताना कसे आपल्या लोकांना  नेहमी गृहित धरलं, ड्रीम अचिव्ह करताना आपल्या फॅमिलीला, मित्रांना आपण त्यागलं या सर्व गोष्टींबद्दल अभिलाष कडे मन मोकळं करताना दिसतात. परत एकदा अभिलाषला आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन संदिप भैय्या देऊन निघून जातात. जाताना संदिप भैय्या अभिलाषला मिठी मारतात, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. तेव्हा एक मोठा भाऊ त्याच्या लहान भावाच्या कर्तृत्वाने समाधानी होऊन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असल्यासारखं दृश्य आपल्याला दिसते. खूप इमोशनल सीन आहे हा. तर असा हा संदिप भैय्या. आपल्याला अत्यंत जवळचा वाटतो. आपल्यापैकीच एक वाटतो. असं अजिबात नाही कि हे संदिप भैय्या फक्त युपीएससी अस्पिरंट्स मध्येच सापडतात..नाही. हे खऱ्या आयुष्यातही प्रत्येक क्षेत्रात सापडतात. जे स्वतः हून आपली मदत करतात. चुकीच्या ट्रॅकवर जात असू तर समजावून सांगून योग्य ट्रॅकवर परत घेऊन येतात. स्वतः च्या अपयशातून शिकलेल्या गोष्टींमुळे इतर लोकांना त्या चुका करण्यापासून परावृत्त करतात. जे आपले सख्खे नसतात पण सख्ख्याप्रमाणे आपल्या अडीअडचणीत संकटमोचक बनून धावून येतात. कदाचित त्या सर्वांची खऱ्या आयुष्यात नावं वेगळी असेल पण प्रातिनिधिक स्वरुपात त्या सर्वांना संदिप भैय्या म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

       कॉलेज जीवनात, प्रिपअरेशनच्या काळात, ज्या क्षेत्रात काम करता त्या ठिकाणी असे अनेक संदिप भैय्या तुमच्याही आयुष्यात कधी तरी नक्कीच आले असतील. किंवा तुमच्यापैकी अनेक जण कोणासाठी तरी संदिप भैय्या असाल. माझ्या आयुष्यातही असे संदिप भैय्या आले, भविष्यातही येतील. ही सिरीज पाहताना त्यांची सर्वांची आठवण झाली. असे समजावून सांगणारे लोकं आयुष्यात यायलाच हवे. जे त्यांच्या अनुभवातून आपल्याला शहाणं करत जातात. तर अशा सर्व संदिप भैय्यांना हा लेख अर्पण करतो. यु ट्यूबवर "अस्पिरंट्स" ही सिरीज नक्की पाहा. प्रत्येकानेच पाहायला हवी एवढी सुंदर सिरीज आहे. कारण फक्त परिक्षा देणारेच अस्पिरंट असतात असं थोडीच आहे. आयुष्यभर आपल्यातील अस्पिरंट जीवंतच असतो. काही ना काही उद्देशाच्या मागे आपल्यातील तो अस्पिरंट सतत धावतच असतो. त्या सर्वांसाठीच ही सिरीज आहे. थांबतो. धन्यवाद..!

-अजिंक्य देशमुख ©