Login

संसारात नणदेची भूमिका काय? भाग२

, एक कथा
संसारात नणदेची भूमिका काय? भाग २
लग्न होऊन साक्षीला महिना झाला होता. घरातील कामं, जबाबदाऱ्या, लोकांची अपेक्षा… सगळं ती शिकण्याचा आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. पण मन मात्र… माहेरीच रेंगाळलत असे.
त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. घरात सगळे आपापल्या कामात गुंतले होते. साक्षी गॅलरीत एकटीच बसून होती. हातातली ओढणी घट्ट पकडून तिने डोळे बंद केले… आणि तिच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा उभा राहिला.
"आई... तुझ्याशिवाय काहीच सुधरत नाही इथे..तुझी खूप आठवण येते आहे." तिच्या डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळू लागले.
तेवढ्यात नंदिनी मागून आली. तिच्या हातात चहाचे कप होते.
"हे काय? तू इथे एकटी? आणि डोळे इतके लाल का?" नंदिनीने चहा तिच्या हातात दिला.
साक्षीने हसण्याचा प्रयत्न केला. "असं काही नाही... जरा थकल्यासारखं वाटतंय..."
"थकवा डोळ्यातून अश्रू बनून वाहत नाही ग साक्षी. सांग ना खरं... आईची आठवण येते ना?"
साक्षीने डोळे पुसत मान होकारार्थी डोलावली.
"माझ्या अंगणात हरवलेलं लहानपण आठवतं... आईचा स्पर्श, बाबा सकाळी आवाज देत उठवायचे, भाऊ संध्याकाळी गप्पा मारायला यायचा… हे सगळं मी मिस करते."
नंदिनी थोडा वेळ तिच्याजवळ शांत बसली.
"साक्षी, हे घर तुझं आहे, हे सांगणं सोपं असतं. पण हे घर तुझं वाटायला लागायला थोडा वेळ लागेल, मुलीचं आयुष्य एका विशिष्ट वयानंतर एका घराच्या अंगणातून दुसऱ्या घराच्या अंगणात रूजायचं असतं आणि कुणीतरी आधार द्यायला हवं असतं. मी आहे ना?"
साक्षी हळूच तिच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, "खूप दिवस झाले माहेरी गेले नाही... एकदाही फोनवर आई म्हणाली नाही की ये, सासरची परवानगी लागेल म्हणून."
नंदिनीने तिला हळूच समजावत विचारलं, "जातेस माहेरी उद्या? मी आईशी बोलते."
"पण सासूबाई… त्या परवानगी देतील का?"
"देतील गं. बोलते मी."
त्या रात्री नंदिनीने आपल्या आईजवळ जाऊन विषय काढला.
"आई, साक्षी उदास असते हल्ली. माहेरी जायचं म्हणते आहे."
"हं. नववधू इतक्या लवकर माहेरी गेली की लोकं काय म्हणतील?"
"लोकं काय म्हणतील यापेक्षा, तिचं मन काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही का? तिच्या डोळ्यांत मी स्फटिकासारखी माहेरची ओढ बघितली आहे. तूच म्हणायचीस नं– घरातली सून हसरी ठेवायची, तर तिच्या मनाला समजून घ्यावं लागतं."
सासूबाईंनी थोडं विचार केला. मग म्हणाल्या, "ठीक आहे. दोन दिवस जाऊ दे, पण वेळेत परत यायला सांग."
दुसऱ्या दिवशी साक्षीला नंदिनीने गालावर थाप देत सांगितलं, "जा गं, दोन दिवस मन भरून ये. आणि हो, आईनं परवानगी दिलीये."
साक्षीला विश्वासच बसत नव्हता. ती धावत सासूबाईंकडे गेली. "आई, खूप खूप धन्यवाद…"
सासूबाईंनीही हलकं हसून तिच्या पाठीवर हात ठेवला.
त्या दिवशी, साक्षीने स्वतःच्या मनाशी कबूल केलं – या घरात मला खरं आधार मिळाला, तो नंदीनीकडून जी माझी नणंद आहे साक्षीला माहेरी जायला मिळणार म्हणून खुद्द हसू आलं.

🎭 Series Post

View all